Friday, April 1, 2011

`धोपट' मार्गा सोडू नको! (सलाखें)


``माझ्या (सिनेमांच्या) दिग्दर्शकांकडे आणि लेखकांकडे माझ्यासाठी नवा चेहरा नाही, असं दिसतंय. (माझ्या सिनेमांची) पोस्टरं आणि होर्डिग्जही एकसारखीच दिसू लागलीयेत.''
- मा.श्री. (म्हणजे मारहाणश्री) सनी देओल फिल्मफेअर, मे 1998 हे विधान वाचून एखाद्याची अशी समजूत होईल, की सनी देओल हा कमल हासन, नसिरुद्धीन शाह किंवा अनिल कपूर, शाहरूख खान यांच्या तोडीचा अभिनयपटु आहे. आणि ते नतद्रष्ट सिनेमावाले त्याच्यातल्या अभिनेत्याचा गळा घोटून त्याच्याकडून सिनेमा- दर- सिनेमा गावपैलवानकी करून घेतायत.
पण वस्तुस्थिती काय आहे? सनीचा लेटेस्ट `सलाखें' बघितला की त्याच्या विधानातला शहाजोगपणा स्पष्ट होतो.
मुळात सनीच काय, देओल घराण्यातल्या कोणत्याही नरपुंगवावर कुणी अभिनयाचा आरोप करू धजणार नाही. अर्ध्या सिनेमात खलनायकांकडून भरपूर अत्याचार करून घेतल्यावर उरलेल्या अर्ध्या सिनेमात खलनायकांच्या अख्ख्या गँगवर `ढाई किलो का हाथ' टाकून त्यांचं `कचूमर' बनवण्यासाठी या घराण्याची नेमणूक आहे. सनीच्या सुदैवानं त्याला योग्य वयात आधी राहुल रवैल आणि नंतर राजकुमार संतोषीच्या रुपानं हिंसाचाराला `लॉजिक' देणारे दिग्दर्शक भेटले. सनी अभिनय करू शकतो की काय, अशी शंका विशेषत: राज संतोषीच्या सिनेमांनी निर्माण केली.
पण, सनी काही कुठल्या भूमिकेत शिरून त्या मापात बसत नव्हता तर राज संतोषीनं सनीसाठी अचूक फिटिंगच्या भूमिका शिवल्या होत्या, हे दोघांचे एकमेकांशिवायचे सिनेमे बघितल्यावर लक्षात येतं.
या सगळ्या चर्चेचा `सलाखें'शी जवळचा संबंध आहे कारण `सलाखें' राज संतोषीच्या पटकथाकरानं दिलीप शुक्लानं लिहीलाय. नायकावर होणारे अन्याय आणि नायकानं घेतलेला रक्तलांच्छित बदला या नेहमीच्या फॉर्म्युल्याचा चांगला पटकथाकार किती उत्तम लॉजिक देऊ शकतो आणि औषधालाही नावीन्य नसलेलं कथानक कसं इंटरेस्टिंग बनवू शकतो, याचं `सलाखें' हे उत्तम उदाहरण आहे.
आणि एखाद्या नायकाची रुढ प्रतिमा जपू पाहणारा, साचेबद्ध मनोरंजनाचे भंपक नियम पाळणारा दिग्दर्शक चांगल्या पटकथेची कशी वाट लावू शकतो, याचंही `सलाखें' हे उत्तम उदाहरण आहे.
`सलाखें'चा नायक विशाल अग्निहोत्री (सनी) हा एका शाळामास्तरचा (अनुपम खेर) मुलगा. शहरातील एका गुंडसम्राट धनवंताचा (अमरिश पुरी) मुलगा भर रस्त्यावरून एका मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करतो आणि तिला मारून फेकून देतो. तिच्या अपहरणाची घटना प्रत्यक्ष पाहिलेले विशालचे वडील पोलिसात तक्रार नोंदविण्याची चूक करतात.
खलनायकावर कारवाई करायला अनुत्सुक पोलिस खात्याचे अधिकारी विशालच्या वडिलांचा पद्धतशीर मानसिक छळ करू लागतात. त्यात खलनायकाचा बुद्धीमान वकील प्रधान (मोहन जोशी) पोलिसांना या छळासाठी कल्पक कल्पना पुरवतो. या मानसिक द्वंद्वयुद्धात थकलेले विशालचे वडील भर कोर्टात स्वत:च्या मस्तकात गोळी झाडून घेऊन आत्महत्या करतात. भडकलेला विशाल एकेका खलनायकाला यमसदनाला धाडतो, हे सांगायला नकोच.
वरवर पाहता या कथानकात वेगळेपणा काय आहे? काहीच नाही. पण, पटकथेमध्ये विशालच्या वडिलांचा छळ हा भाग इतक्या प्रभावीपणे मांडलाय की अंगावर काटा येतो तो पाहताना, त्यासाठी सदैव सामाजिक कामांमध्ये पुढाकार घेणारे पापभीरू, सत्शील शाळामास्तर दीनानाथ अग्निहोत्री पटकथाकारानं मोजक्या आणि नेमक्या प्रसंगांमधून रेखाटले आहेत. त्यानं पोलिसातली तक्रार मागे घ्यावी, म्हणून पोलिसांकडून येणारा दबाव आणि त्या दबावाला हा माणूस बळी पडणार नाही, हे समजल्यावर प्रधान वकिलानं त्याची साक्ष दुबळी करण्यासाठी रचलेले डावपेच, हा `सलाखें'चा प्राण आहे.
अत्यंत हुशारीनं या चाली रचण्यात पटकथाकार यशस्वी झालाय. त्या चालींचे तपशील सांगितले तर सिनेमा पाहण्याची मजा जाईल. पण, आधी साधाभोळा मास्तर `एस्टॅब्लिश' करून त्याच्या व्यक्तिमत्त्वामधल्या कमकुवत बाजूंवर हल्ला चढविणाऱया चाली दाखवून प्रेक्षकांची सर्व सहानुभूती त्याच्याकडे वळविण्याची दिलीप शुक्लांची `ट्रिक' योग्य परिणाम साधते.
कथानकाच्या या गाभ्यात अलिकडे- पलिकडे जे घडतं, त्यात मात्र कसलंच नाविन्य नाही. सुरुवातीला सनी आपल्याच मालकाच्या (देवेन वर्मा) फटाकडय़ा मुलीच्या (रवीना टंडन) प्रेमात पडतो. हिमाच्छादित पर्वतशिखरांवर दर दहा मिनिटाला एक अशी गाणी मध्यंतरांपर्यंत उरकून घेतो. आणि वडिलांच्या मृत्यूनंतर विविध प्रकारे खलनायकांना यमसदनी धाडतो.
कथानकाचा हा दुय्यम भाग लेखकाचा आळशीपणा दाखवतो. सिनेमात गाणी हवीत, त्यात नाचायला नटवी बाहुली हवी म्हणून (खास लोकाग्रहास्तव) नायिका घुसडली आहे. रवीना टंडनचं पात्र आणि तिच्याशी संबंधित कथाभाग संपूर्णपणे वगळला तरी `सलाखें'ची परिणामकारकता कमी होणार नाही, उलट दुणावेल.
नायकावरचा (म्हणजे त्याच्या वडिलांवरचा) अन्याय कल्पकतेनं रेखाटणारे दिलीप शुक्ला अन्यायाचा सूड मात्र फारच ढोबळपणे मांडतात. नायक बुद्धीपेक्षा शारीरिक ताकद वापरूनच सूड घेतो. (कदाचित सनी नायक असल्याची ही मर्यादा असेल.) शाळामास्तराच्या घराचा दरवाजा जमिनीवर आणि घराची बाल्कनी मात्र बहुमजली इमारतीच्या टेरेसवर, असं विलक्षण घर दिग्दर्शक गुड्डू धनोआनं दाखवलंय. दोन हजार रुपये पेन्शनवाल्या मास्तराचं घर एवढे ऐसपैस कसं, शाळामास्तराच्या मुलानं अत्याधुनिक बंदुकी चालवायचं, बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं, सुळसुळीत मोटारगाडय़ा बेफाम हाकण्याचं प्रशिक्षण कुठे घेतलं, तुरुंगातून पळालेल्या नायकाला रोज गुळगुळीत दाढी करायला वेळ आणि जागा कुठे मिळते, असले प्रश्न आपल्याला पडत असतील तर आपण हिंदी सिनेमा पाहायला लायक नाही, हे समजून चालावं. (आणि अधिकाधिक हिंदी सिनेमे पाहून पात्रता कमवावी.)
देओल घराण्याप्रमाणंच गुड्डू धनोआवर कोणी दिग्दर्शनाचा आरोप करू धजलसं वाटत नाही. या `सलाखें' मधला सर्वात प्रभावी भाग उत्तम लेखन आणि अनुपम खेर- मोहन जोशी यांच्या अभिनयामुळे प्रभावी झालाय. अनुपम- मोहन यांना गुड्डूनं `दिग्दर्शित' केलंय म्हणावं तर मग सनीला तो का नाही दिग्दर्शित करू शकला? परेडमध्ये चालल्यासारखं हात ताठ ठेवून चालणं, दोन्ही पाय डावेच असल्यासारखं हास्यास्पद नाचणं, विनोदी प्रसंगात ओशाळल्यासारखं हसणं, मधे मधे कुणाकुणावर बोट रोखून गळ्याच्या शिरा ताणून, डोळे फाडूनफाडून, घसा खरवडून एकाच चिरक्या पट्टीत तारस्वरात किंचाळत राहणे, ही सनीच्या `अभिनया'ची व्यवच्छेदक लक्षण `सलाखें'मध्येही भयानक डोकं उठवतात.
शिवाय श्रीमंताघरच्या एखाद्या दिवटय़ाला खेळण्यातल्या गाडय़ा मोडण्याचा जसा शौक असतो तसा गुड्डूला (नावही कसं चपखल आहे बघा) मोटारी, बसगाडय़ा, पेट्रोलपंप मोडण्याचा, स्फोटात उडवून देण्याचा छंद आहे. `क्लायमॅक्स'च्या पाठलागात त्यानं ही हौस पुरेपूर भागवून घेतली आहे. त्यात भव्यपणाच्या दिमाखाऐवजी उधळपट्टीचा अविचारी अतिरेकच जाणवतो.
सनीचे कट्टर चाहते जरी त्याच्यासाठी या सिनेमाला गेले तरी बाहेर पडताना त्यांच्या तोंडी नावं असतील अनुपम खेर आणि मोहन जोशी यांची. हे दोघे या सिनेमाचे खरे `स्टार' आहेत. त्यातही अनुपमच्या वाटय़ाला निदान लांबरुंद स्पष्ट भूमिका आहे. जेमतेम दहा- पंधरा मिनिटांच्या भूमिकेत मोहननी कमाल केली आहे. कोर्टातील या दोघांची जुगलबंदी हा तर `मास्टरपीस'च आहे. तोच `सलाखें'चा हायलाईट आहे.
या दोघांची पोस्टरं आणि होर्डिंग्ज इतकी वेगवेगळी कशी असतात आणि आपली तशी का नसतात याबद्दल `सलाखें'च्या निमित्तानं सनीभय्याची आत्मपरीक्षण केलं तरी खूप होईल.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment