Thursday, April 28, 2011

आमिरचा नॉकआऊट पंच (गुलाम)


फिल्मी दुनियेतल्या तमाम पैलवानांनो, सावधान!!
एक नवा ऍक्शन हीरो पैदा झालाय... आमिर खान.
आश्चर्य वाटतंय ना? अनेकांना तर कुत्सित हसूही फुटलं असेल. आमिर खान...? ओठ पिळले तर दूध निघेल असा दिसणारा चिकनाचुपडा हीरो. कुणीही दोन कानफटात मारल्या तर पाणी मागेल असं वाटतं त्याची गिड्डी अंगकाठी आणि गुलगुलीत चेहरा पाहिल्यावर! पोरीबाळींबरोबर झाडांमागे पाठशिवणीच्या लव्हस्टोऱया करण्याऐवजी ऍक्शन फिल्म करतोय? ऍक्शन फिल्मच्या भाषेत बोलायचं तर `ये जायेगा बाराके भावमे... सीधा वरली के गटर में!'
आमिरचा ऍक्शन हीरो बनण्याचा पहिला प्रयत्न असलेला `बाजी' आपटल्यावर अनेकांची ही भावना झाली होती. `हे तो आमिकरचे काम नोहे' म्हणून मंडळी टाळ्या पिटीत होती. `गुलाम'मधून आमिरनं तमाम टीकाकारांच्या नाकाडांवर जबरदस्त पंच मारला आहे.... नॉकआऊट पंच.
`गुलाम'चा नायक सिद्धार्थ मराठे हौशी बॉक्सर आहे. एका झोपडपट्टीवजा वस्तीत राहणारा अनपढ टपोरी. त्याचा मोठा भाऊ (रजित कपूर) वस्तीच्या दादाचा- रौनक सिंग ऊर्फ रॉनीचा (शरद सक्सेना) एक पित्तू. बॉक्सिंग, टपोरीगिरी, भुरटेगिरी, दारूबाजी आणि मौजमस्ती करत फिरणाऱया सिद्धार्थ ऊर्फ सिद्धूची एकदा अलिशा मफतलाल (रानी मुखर्जी) या बडय़ा घरच्या बेटीशी `टसल' होते. चार्ली (दीपक तिजोरी) या तिच्या मुजोर मित्राचा सिद्धू नक्षा उतरवतो आणि सिद्धा तिच्या मनात उतरतो.
एकीकडे ही लव्हस्टोरी फुलत असताना दुसरीकडे रॉनीचं अत्याचारसत्र आणि दहशतीचं राज्य निर्धोक सुरू असतं. गोरगरिबांवर जुलुमाच्या काही घटना सिद्धूच्या नजरेसमोर घडत असतात. पण स्वत: रॉनीसाठी किरकोळ गुंडगिरीच्या कामगिऱया पार पाडणारा सिद्धू या जुलमांकडे दुर्लक्ष करतो. `जियो और जीने दो' या स्वत:च्या सोप्या सोयीस्कर तत्त्वज्ञानानुसार वागत राहतो.
 त्याला पहिला धक्का देतो हरी (अक्षय आनंद) हा सामाजिक कार्यकर्ता. रॉनीच्या दहशतीविरुद्ध झोपडपट्टीवासियांना संघटित करू पाहणाऱया हरीची निर्भय निरलस वृत्ती सिद्धूला त्याच्या दिवंगत स्वातंत्र्यसैनिक पित्याची (दिलिप ताहिल) आठवण करून देते. वडिलांनी दिलेले संस्कार आपण बासनात गुंडाळून ठेवले आहेत, याची टोचणी सिद्धूच्या मनाला लावते.
 त्यात एकदा हरीला `समजावण्या'साठी रॉनी सिद्धूमार्फत त्याला रेल्वेपुलावर बोलावून घेतो. हरी सांगून समजण्यातला नाही, हे लक्षात आल्यावर त्याला सिद्धूच्या डोळ्यांदेखत पुलावरून फेकून देऊन ठार मारतो. सिद्धू पहिल्यांदाच बेभान होऊन थेट रॉनीच्या अंगावर धावून जातो... त्याचा भाऊ थोडक्यात हे प्रकरण मिटवतो. गरीबांच्या वस्तीत तनमनधन अर्पून त्यांच्या हितासाठी झगडणारा हरी हा सुखवस्तू अलिशाचा भाऊ होता हे समजल्यावर सिद्धूला दुसरा हादरा बसतो. आपला भाऊ गैरमार्गावर चालतोय आणि आपण त्याच्यामागे फरफटतोय, हे लक्षात आल्यावर सिद्धू रॉनीविरुद्ध न्यायालयात साक्ष द्यायला तयार होतो. रॉनीवर समन्स बजावलं जातं. झोपडपट्टीवर नांगर फिरवून बडा बिल्डर बनण्याची स्वप्नं पाहणाऱया रॉनीचे सारे बेत उधळण्याचा धोका निर्माण होतो.
 सिद्धूची समजूत काढायला गेलेल्या भावाला सिद्धू एकदम खरीखोटी सुनावून टाकतो. सिद्धू ऐकणार नाही म्हटल्यावर त्याच्या भावाची हत्या अटळ असते. ती होतेच. सूडानं आंधळा झालेला सिद्धू रॉनीचा बदला घ्यायला निघतो. पण, त्याच्यातलं स्वत्व जागं करणारी वकील बाई (मिता वसिष्ठ) त्याला अडवते. रॉनीला खऱया अर्थानं संपवायचं तर त्याला न्यायालयात खेचायला हवं, हे ती सिद्धूला पटवून देते.
न्यायालयात सिद्धूनं साक्ष दिल्यावर रॉनीच्या संतापाचा उद्रेक होतो. तो वस्तीत येऊन सिद्धूचं घर उद्ध्वस्त करून टाकतो. दहशतीच्या बळावर संपूर्ण वस्तीत `बंद' घडवून आणतो. माणसं असूनही सुनसान झालेल्या वस्तीत सिद्धू पाऊल टाकतो तेव्हा त्याच्यासमोर आव्हान असतं रॉनीची पाशवी ताकद संपवण्याचं... त्याची दहशत खच्ची करण्याचं.
  हे काम तो कसं करतो ते अनुभवण्यासाठी `गुलाम'चा प्रदीर्घ आणि अत्यंत बुद्धीमानपणे रचलेला कळसाध्याय (क्लायमॅक्स) प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवा. एरवीचे, ऍक्शन हीरो पिस्तुलं, बंदुकी, बॉम्ब वापरून, रक्ताचा सडा शिंपून खलनायकाचा नि:पात करतात. यातलं काहीही न करता सिद्धू खलनायकाला खच्ची करून अधिक मोठा परिणाम साधतो हे `गुलाम'चं सर्वात मोठा यश आहे.
आमिरसारखा शारीरिक मर्यादा असलेला अभिनेता एकावेळी पंचवीसजणांना हातोहात लोळवतोय, हे आपल्याला पाहायला रुचलं नसतं. ते टाळूनही ऍक्शन फिल्मला साजेसा क्लायमॅक्स रचल्याबद्दल लेखक अंजुम राजाबली आणि दिग्दर्शक विक्रम भट खरोखरीच अभिनंदनास पात्र आहेत.
  अंजुम यांची अत्यंत बंदिस्त पटकथा आणि आमिरचे सर्व गुणदोष लक्षात ठेऊन रचलेला नायक ही `गुलाम'ची बलस्थानं आहेत.
  आमिर ऍक्शन हीरो कसा, असा प्रश्न पडणाऱयांना सनी, सुनील शेट्टी, अक्षयकुमार हे ऍक्शन हीरो कसे, असा प्रश्न पडत नाही; कारण त्यांची सणसणीत उंची आणि बलदंड शरीरयष्टी. पण जरा विचार करून पाहा किंवा चुकूनमाकून कधी खरी मारामारी पाहिली असेल तर आठवून पाहा.
  सनी- सुनील- अक्षयइतक्याच उंचीच्या ताकदीच्या माणसावर पाच-पंचवीस तुटून पडले तर तो त्यांना लिलया लोळवू शकतो का? खऱया मारामारीत सिनेमातल्यासारखे नायकाच्या सोयीनं (खरंतर त्याच्याकडून मार खाऊन घेण्यासाठी) गुंड रांग लावून हल्ला करीत नाहीत. ते गिधाडांसारखे तुटून पडतात एकदम.
 मग सिनेमातली नायकाची एकतर्फी मारामारी आपण कशी चालवून घेतो? ते स्वप्नरंजन असतं. जे वास्तवात घडतं ते पाहायला आपण थिएटरात जात नाही; वास्तव कसं असावं, याची आपली कल्पना साकार स्वरुपात पाहण्यासाठी जातो.
 किरकोळ शरीरयष्टीचा मुद्दा बाद करायचा तर आपल्या `परिचया'चे सगळे `डॉन' आठवा. यातला कोण राकट आणि बलदंड होता वा आहे? सगळी आपल्यातुल्यासारखी माणसं... काही तर आपल्यापेक्षा किरकोळ अंगकाठीची. ते मोठमोठय़ा महानगरांवर राज्य करतात, अनेक बलदंड गुंड पोसतात ते शरीराच्या नव्हे तर अकलेच्या ताकदीवर. पैलवान गुंड हे मारामारीची कामं रोजंदारीवर करणारे मजूर असतात त्यांचे.
  `गुलाम'चा नायक सिद्धू रेखाटताना लेखक अंजुम यांनी या गोष्टीचं अचूक भान ठेवून बाजी मारलीये. सिद्धू गिड्डा, चिकणाचुपडा असला तरी बॉक्सर आहे, त्याची शरीरयष्टी बलदंड नसली तरी पिळदार आहे आणि टपोरीपणातून आलेली `अरे ला का रे' करण्याची वृत्ती आहे. त्याचं अंतिम रिळांमधलं शौर्य हा या वृत्तीचा परिपक्व आहे. तो सुरुवातीला नायिकेवर इंप्रेशन मारण्यासाठी तिच्या मित्राबरोबर पैज लावून सुसाट वेगाने येणाऱया लोकलगाडीच्या दिशेने रुळांवरून धावत जाण्याचं अचाट धाडस करतो. हा शॉट तीन कोनांमधून दाखवून त्यात `ट्रिक' नाही; आमिरनं स्वत:च हे धाडस केलंय, हे दिग्दर्शक प्रेक्षकांच्या मनावर ठसवतो. प्रेयसीला भेटण्यासाठी पाईपावरून बावीस मजले चढून जाणारा सिद्धू जिगरबाज आहे, हेही प्रेक्षकांवर बिंबवल जातं.
  रॉनीसाठी एका क्रिकेटपटूला धमकावायला गेलेला सिद्धू त्या उंच- तगडय़ा क्रिकेटवीराशी मारामारी करत नाही. तो हिंसक भाषा वापरून, त्याच्या बॅटनं टॉयलेट उद्ध्वस्त करून त्याला गर्भगळित करतो. वास्तवातल्या गुंडांची दहशत माजविण्याची पद्धत हीच असते. त्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी शारीरिक हिंसा करावी लागत नाही.
 इतर ऍक्शनवीरांप्रमाणे आमिरचा सिद्धू कुंगफू, कराटे, मार्शल आर्टस्, कुस्ती आणि इतर द्वंद्वकौशल्यांचं बाळकडू प्यायल्यासारखी मारामारी करीत नाही, हे `गुलाम'चं आणखी एक वैशिष्ट आहे. तो बॉक्सर आहे त्यामुळे त्याच्या मारामाऱयांमध्ये मुष्टीयुद्धावरच जास्त भर दिसतो. प्रसंगी (विशेषत: क्लायमॅक्समध्ये) ताकदवान प्रतिस्पर्धी असेल तर तो बेदम मारही खातो.
नायकाभोवतीचे प्रसंग रचताना, इतर पात्र रेखाटताना अंजुम यांनी वास्तवाशी इमान राखून त्यावर कल्पिताची चपखल कलाकुसर केली आहे. सिद्धूच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचं सतत फ्लॅशबॅकमध्ये दिसणारं पात्रच पाहा.
  स्वातंत्र्यसंग्रामात आपल्याला ब्रिटिशांनी कसं पकडलं होतं आणि दोन दिवस त्यांचे निर्घृण अत्याचार सहन करू आपण आपल्या साथीदारांचा ठावठिकाणा त्यांना कसा कळू दिला नाही, याची शौर्यगाथा ते लहानग्या सिद्धूला वारंवार साभिमान सांगत असतात. एक दिवस त्यांचा जुना मित्र भेटायला येतो आणि सिद्धूच्या वडिलांनी ब्रिटिशांना नावं सांगितल्यामुळेच पाच क्रांतिकारक मारले गेले होते, हे सिद्धूसमोरच उघड होतं. त्याचे शरमिंदे वडील स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या करतात. सिद्धूचा हा अस्वस्थ करणारा भूतकाळ पटकथेत अंजुम यांनी चपखलपणे वापरला आहे.
  सिद्धूचं भावाशी असलेलं नातं स्पष्ट करणारी बॉक्सिंगची मॅच हाही `गुलाम'चा हायलाईZट आहे. सिद्धू भावासाठी ही मॅच जाणीवपूर्वक हरतो त्यावेळीच पुढील उद्रेकाची नांदी होते. हरी हा अलिशाचा भाऊ असल्याचं त्याच्या मृत्यूनंतरच सिद्धूला आणि प्रेक्षकांना समजतं; तो धक्काही पटकथाकार- दिग्दर्शक यांनी सुरेख वापरलाय.
 या बुद्धिमान मांडणीमुळेच सुरुवातीचा काही काळ `रंगीला'चा मुन्नाच वाटणारा सिद्धू हळूहळू आपलं वेगळेपणा सिद्ध करतो. तो जातो `घायल', `घातक'च्या मार्गानंच, पण बाहुबळाबरोबर बुद्धीबळ वापरून शारीरिक सामर्थ्याची उणीव भरून काढतो.
 अर्थात `गुलाम' हा काही परिपूर्ण सिनेमा नाही. गल्लापेटीच्या सोयीसाठी() यात नायिका आहे. तिची स्वप्नगीत, पाऊसगीतं आहेत. स्वप्नात हिमशिखरांवर जाऊन आमिरनं आपल्याच `पहला नशा'च्या (जो जिता वही सिकंदर) स्लो-मोशन हालचालींमध्ये गायलेली गाणी आहेत. सामाजिक कार्यकर्त्याची भाषणबाजी आहे. नायकाच्या मदतीला अचानक धावून येणाऱया उपनायकाचा भंपकपणाही आहे.
  पण, वास्तवाच्या खूप जवळ जाणारी तरीही नाटय़मय मांडणी आणि पटकथेतले `फ्रेश' प्रसंगात प्रेक्षकाला खुर्चीला खिळवून ठेवतात. त्यासाठी शरद सक्सेनापासून रजित कपूर, मिता वसिष्ठ, अक्षय आनंदपर्यंत गुणवान पण प्रेक्षकांना अतिपरिचित न झालेले कलावंत वापरण्याची चतुराई विक्रम भटनं दाखवली आहे. शरद सक्सेनाला मुख्य खलनायक साकारण्याची मिळालेली ही पहिलीच मोठी संधी त्यानं सार्थकी लावली आहे. रजित, मिता, अक्षय यांचा सहजाभिनय `गुलाम'ला वास्तवाचं परिमाण द्यायला उपयोगी पडतो.
 राणी मुखर्जीला अभिनयकौशल्य दाखवायला फारसा वाव नव्हताच. पण, ती दिसेत छान, वावरते सहज आणि थोडाबहूत अभिनय करण्याच्या प्रसंगांमध्ये बुजत नाही. ती `अभिनेत्री' आहे हे तिनं यापूर्वीच `राजा की आयेगी बारात'मध्ये सिद्ध केलं होतं. `गुलाम'मध्ये ती टिपिकल हिंदी नटीची कर्तव्यं लिलया पार पाडते.
 अर्थात `गुलाम'चा सर्वात मोठा स्टार आहे आमिर खान. पटकथेपासून दिग्दर्शनापर्यंत सर्व खात्यांमध्ये रस घेतल्याखेरीज तो सिनेमाच करत नाही. फिल्मी दुनियेत याला ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप म्हणतात. पण, वर्षातून एकदोन सिनेमे करणारा आमिर आपल्याकडून कोणतीही कसर राहणार नाही, याची काळजी घेत असतो. (त्यामुळेच `गुलाम' आमिरनंच दिग्दरर्शित केलाय, अशी चर्चा झाली.)
 आमिरच्या या सवयीमुळे त्याच्या सिनेमांकडून प्रेक्षकांच्या मोठय़ा अपेक्षा असतात. तो आपल्याला काहीतरी वेगळं आणि प्रेक्षणीय देईल, अशी खात्री असते. `गुलाम'मधून त्यानं या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. `गुलाम'चा क्लायमॅक्स केवळ त्यात आमिर आहे म्हणूनच तसा घडतो आणि आमिरमुळेच प्रेक्षकाला पटतो- आवडतो, त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिका आणि चित्रपटांमध्ये `गुलाम'चा क्रम बराच वर लागेल, यात शंका नाही.
 `गुलाम'मुळे दिग्दर्शक विक्रम भटवरचा `अपयशी दिग्दर्शका'चा शिक्का धुवू निघण्याची शक्यता आहे. पण, या यशावर निर्विवादपणे अधिकार सांगण्यासाठी त्याला आमिरशिवाय आणि `गुलाम' इतकाच परिणामकारक सिनेमा करून दाखवण्याची कसोटी द्यावी लागेल.
 छायालेखक धर्मा तेजा यांनी सुरुवातीला ग्लॅमरस सॉफ्ट फोकस तंत्र आणि पुढेपुढे वास्तवाधारित प्रखर प्रकाश योजना वापरून `गुलाम'ची परिणामकारकता वाढवली आहे. `जादू हे, तेरा ही जादू है', `आँखो से तुमने ये क्या कह दिया' आणि सुपरडय़ुपर हिट `आती क्या खंडाला' ही सणसणीत गाणी जतीन-ललित यांनी दिली आहेत. अमर हळदीपूर यांचं पार्श्वसंगीतही `गुलाम'च्या आशयाला पूरक ठरतं.
  हिंदी सिनेमांना हल्ली गल्लापेटीवर लागलेल पनवती संपवून यशाचं अधिराज्य प्रस्थापित करण्याचा वकूब `गुलाम'मध्ये निश्चितच आहे.
...................
निर्माता : मुकेश भट
दिग्दर्शक : विक्रम भट
गीते : इंदीवर, समीर, नितीन रायक्वार, विनू महेंद्र
संगीत : जतीन- ललित
छायालेखक : धर्मा तेजा
ऍक्शन : अब्बास हनीफ
कलाकार : आमिर खान, रानी मुखर्जी, रजित कपूर, मीता वसिष्ठ, दीपक तिजोरी, अक्षय आनंद, शरद सक्सेना, दिलीप ताहिल.
.........................
(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment