तुम्ही `सिक्स्थ सेन्स' पाहिलाय?
त्यातल्या हॅली जोएल ओस्मंटचा बावनकशी अभिनय पाहिल्यावर त्याल `बालकलाकार' म्हणायचं धाडस करू शकाल?
मग, संतोष सिवन दिग्दर्शित `हॅलो'लाही `बालचित्रपटा'चं लेबल लावता येणार नाही.
हा सिनेमा राष्ट्रीय युवा आणि बालचित्रपट संस्थेनं तयार केलाय, त्यात एका लहान मुलीची तिच्या हरवलेल्या कुत्र्याची गोष्ट आहे, मुख्य भूमिका बालकलाकारांच्या आहेत, लहान मुलं (अगदी लहान नव्हे, चार-साडेचार वर्षांच्या पुढची) हा सिनेमा पाहताना रंगून जातील, हे सगळं खरं आहे. तरीही `हॅलो' काही फक्त बालचित्रपट नाही. हा सिनेमा मोठय़ांनीही लहानांच्या बरोबर, बरोबरीनं किंवा स्वतंत्रपणे पाहावा, असा त्याचा वकूब आहे.
`ऍलिस इन वंडरलँड', `मुग्धाची रंगीत गोष्ट' हे साहित्य बालकांबरोबर मोठी माणसंही किती आवडीनं वाचतात. `जम्पिंग ओव्हर द पडल्स अगेन' हा क्लासिक `सिनेमा' मानला जातो, क्लासिक `बालचित्रपट' नव्हे. या सगळ्या `दादा' गँगशी `हॅलो'ची तुलना करण्याचा हेतू नाही. तरीही हा नॉर्मल बालचित्रपटांपेक्षा हा प्रकार काही और आहे, हे निश्चित.
कार्टूनी विनोदपट, राजा- राणी- पऱया- सुपरमॅन वगैरे `चांदोबा'छाप अद्भुतरम्य गोष्टी आणि वृत्तपत्रांच्या `बालांच्या पानां'मधल्या नीरस बोधकथा आणि सुटय़ांच्या काळात कुत्र्याच्या छत्र्यांसारखी फोफावणारी तथाकथित `धम्माल' बालनाटय़ं यांच्या चौकटीतलं मनोरंजन इथल्या बहुतेक बालांना उपलब्ध आहे. `हॅलो'मध्ये संतोष सिवन मात्र आजच्या उच्च मध्यमवर्गीय बालकांभोवती त्यांच्या भावविश्वाचे ताजे संदर्भ गुंफणारी कथा सांगतो आणि कसलाही आव न आणता एक सुंदरसा बोधही देतो. हा सिनेमा काढताना त्यानं मुलांवर, त्यांच्या कल्पनाशक्तीवर, दृक्साक्षरतेवर टाकलेला मोठा विश्वास हे `हॅलो'चं सगळ्यात विलोभनीय वैशिष्टय़ आहे.
`हॅलो'ची नायिका साशा (बेनाफ दादाचनजी) ही सात वर्षांची, आईविना वाढलेली, उदासवाणी मुलगी. तिचे वकील वडील (राजकुमार संतोषी) कामात व्यग्र, किशोरवयीन चुलतबहीण (डिंपल घोष) प्रेमप्रकरणात मग्न आणि तिच्यासाठी आणलेलं दूध स्वत:च गट्ट करणारा प्रेमळ पण थापाडय़ा नोकर सतत आत्मरत. या सगळ्यांच्या गराडय़ात एकटय़ा पडलेल्या, जिवाभावाच्या सोबतीसाठी तरसणाऱया साशाला हा नोकर एक लोणकढी थाप ठोकून देतो. देव लवकरच साशासाठी एक खस मित्र सोबती पाठवणार आहे, देवासारखंच डोक्याभोवती प्रकाशमान वलय (halo) असलेला. या भविष्यवाणीवर रस्त्याकडेचा कुडमुडय़ा ज्योतिषीही (हरीश पटेल). शिक्कामोर्तब करतो आणि एक दिवस गावठी कुत्र्याचं पिल्लू साशाच्या घरात शिरतं. हाच देवानं पाठवलेला वलयांकित सोबती म्हणून साशा त्याचं नाव ठेवते `हॅलो.' त्याच्या आगमनानं साशामध्ये झालेलं आश्चर्यकारक आणि आनंददायक परिवर्तन पाहून एरवी कुत्र्यांना हाडहाड करणारे तिचे वडीलही हॅलोला कुटुंबाचा सदस्य म्हणून स्वीकारतात. साशाच्या आयुष्यात जरा काही धमाल होऊ लागते ना लागते, तोच एक दिवस अचानक हॅलो हरवतो.
अनिल या टकलू, चष्मिस मित्राबरोबर साशा हॅलोला शोधायच्या मोहिमा आखते, तेव्हा तिची एकाहून एक तऱहेवाईक माणसांशी गाठ पडते. साशाची कहाणी हप्त्याहप्त्यानं रंगवून छापणारा एक वृत्तपत्राचा सटकू संपादक, भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आयुष्य घालवल्यानंतर आता कुत्रेच आपल्याला पकडायला येतील, या भीतीनं गठाठलेला येडचाप `डॉग-कॅचर' (सुरेश भागवत), राजा नावाचा मुका स्मगलर (टिनू आनंद), त्याला पकडण्याचा विडा उचलेला चिडखोर पोलिस कमिशनर (मुकेश ऋषी), त्याचे दोन मद्दड हवालदार, रंगादादा नावाचा सडकछाप पोरांचा स्टाईलबाज दादा अशा अव्वल वल्ली साशाला भेटत जातात. त्यातून हॅलो सापडणं सोडून बाकी बऱयाच घडामोडी घडत राहतात. अर्थात, शेवटी हॅलोचा शोध लोगतो साशाला, पण `सापडत' मात्र नाही तो; त्याऐवजी पुढच्या आयुष्यात अतिशय मोलाचं ठरेल, असं काहीतरी तिला गवसून जातं...
... ढोबळमानानं पाहिलं तर हा `ऍलिस इन वंडरलँड'चाच घाट. फक्त ऍलिसची `वडरलँड' संपूर्णपणे अद्भुत अशी स्वप्नदृष्टी होती, तर साशाचं सगळं जग वास्तवातलं, खरंखुरं आहे. मात्र, तिच्या वयानुरुप आणि perception नुसार तिला हे जग जसं दिसतं, तसं पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न संतोषनं केला आहे. एखाद्या झोपाळ्यावर तासन्तास तंद्री लावून झुलणारं लहान मूल कधी पाहिलंय तुम्ही? त्या तंद्रीत ते काय काय पाहात असेल, कोणकोणत्या वास्तव आणि अद्भुत प्रदेशांना भेटी देऊन येत असेल, वास्तवाची अद्भुताशी सरमिसळ झाल्यावर त्याच्या/ तिच्या चिमुकल्या मेंदूत हे जग केवढी विलक्षण surrealistic रूप धारण करत असेल, याचा विचार कधी करतो का आपण?
कथा- पटकथाकार- दिग्दर्शक- छायालेखक संतोष सिवन आणि संवाद- गीत लेखक संजय छेल यांनी तो केलाय. मोठय़ा वयात लहान मुलांचं जग त्यांच्या नजरेनं पाहण्याचा, उमगून घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी मुलांच्या मनात क्षणाक्षणाला आंदोळणाऱया, चेतवणाऱया, विझणाऱया प्रतिमांची अनोखी शैली संतोषनं वापरली असल्यानं सिनेमात प्रसंगबांधणीचं नेहमीचं तंत्र आढळत नाही. अनक प्रसंगाच्या मध्ये एखाददुसऱया वाक्यापुरतं भलतंच पात्र झळकून जातं. आखीवरेखीव दृश्यचौकटी, कॅमेऱयाच्या यांत्रिक सुबक हालचाली (ट्रॉली किंवा क्रेनच्या साह्याने केल्या जाणाऱया), स्थिर कॅमेऱयाच्या बेतशुद्ध हालचाली (डावी उडवीकडे पॅन किंवा पुढे- मागे झूम) यांना फाटा देऊन संतोषनं कॅमेरा खांद्यावर घेऊन चित्रण केल्यावर मिळणाऱया थरथरत्या, वेगवान, वाकडय़ातिकडय़ा. संज्ञाप्रवाही प्रतिमांची दुनिया उभारली आहे. त्यामुळे, मोठय़ा माणसांचं `व्याकरणशुद्ध' वास्तव सिनेमात साशाच्या वयाला साजेसं, किरटय़ा अक्षरांचं रूप धारण करतं.
श्रेयनामावलीपासूनच सूत्रधाराची भूमिका बजावणारी कडक म्हातारी नन, व्हिडियो कॅमेरा घेऊन `डोनाह्यू' गिरी करत फिरणारा `बडबड टॉक शो'चा चटपतीत सूत्रधार पोरगा, `बी पोलिटिकल यार' असं साशाला सारखं मोठेपणाच्या अविर्भावात सांगणारी कुर्रेबाज मैत्रीण, `कोई हमे देख रहा है' असं एका गगनचुंबी इमारतीच्या टेरेसवर सतत बडबडत फिरणारा टकलू-चष्मिस अनिल आणि टाइपरायटरवर सतत `स्टोऱया' बडवणारा त्याचा टकलू- चष्मिस बाप ही पात्रं `हॅलो'ला एक चक्रम लुक आणि फील देतात.
संजय छेलचे तुटक-तुटक वाटणारे आणि त्यातूनच तिरकस भाष्य करणारे संवाद हा चक्रमपणा आणखी वाढवतात. रणजित बारोटचं पार्श्वसंगीत आणि शीर्षकगीतही सिनेमाला विडंबनात्मक बाज देतात. साशाला खऱया प्रेमाची शिकवण देऊन मोठं करणाऱया क्लायमॅक्सला मात्र हा टेकिंग आणि पटकथा यांतला चक्रमपणा थांबून त्याची जागा रूढ वळणाची हळवी मांडणी अलवारपणे घेते, हा `टच' अभ्यसनीय आहे. मात्र, क्लायमॅक्सपूर्वी जातीय दंगलींमध्ये जळणाऱया एका वस्तीत बेवारशी पडलेल्या लहान मुलाला साशानं (अगदी राज कपूरी कळवळ्यानं) जवळ घेणे आणि पोरटेल्या रंगादादानं तिच्या या कृतीचं अगदी `प्रौढ' (आणि म्हणूनच भंपक) शब्दांत कौतुक करणं, हा ठिगळासारखा बोगस भाग या सिनेमाला गालबोट लावतो.
ख्यातनाम दिग्दर्शक राजकुमार संतोषी, टिनू आनंद, मुकेश ऋषी वगैरे मोठय़ा माणसांकडून संतोषनं स्लॅपस्टिक ढंगाची पण भडक न होणारी कामगिरी करून घेतली आहे. बेनाफ आणि अन्य बच्चे कंपनीला त्यानं इतक्या नैसर्गिक शैलीत `बागडू' दिलंय, की ही मंडळी अभिनय करताहेत की नाही, अशी शंका येते. बेनाफचा गोडवाही प्रेक्षकाला असाच चकवतो. पण, शेवटच्या महत्त्वाच्या प्रसंगात ती साशामधला समजूतदार बदल जबरदस्त ताकदीनं दाखवते, तेव्हा तिच्यातली प्रगल्भ अभिनेत्री दिसते.
सुटय़ांच्या काळात मुलांच्या घाऊक मनोरंजनाची सोय करण्यासाठी हा सिनेमा `दाखविण्या'ऐवजी तो मुलांबरोबर पाहिला, तर फायदाच आहे. पठडीबाज सिनेमे पाहून बधिरलेल्या डोक्यात काही शिरलं नाही, तर सरळ छोटय़ांकडून समजून घ्यावं. कदाचित, एक भलताच वेगळा सिनेमा समजून जाईल.
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment