Thursday, April 28, 2011

दोन बायका चंगळ ऐका!(घरवाली बाहरवाली)


हिंदी सिनेमांचे वरवर पाहता बरेच प्रकार दिसतात... कौटुंबिकपट, हास्यपट, ऍक्शनपट, प्रेमपट वगैरे. पण नीट निरखून पाहिलं तर यातले बहुतेक सिनेमे एकाच जातकुळीचे असतात... `पुरुषपट', पुरुषांनी, पुरुषी भूमिकेतून, पुरुष प्रेक्षकांसाठी तयार केलेले सिनेमे. यात खास बायकांसाठी म्हणून बनवलेले रडारडपटही येतात बरं! कारण, बायकांना रडवून गल्ला गोळा करणाऱया असल्या सिनेमांमधल्या स्त्राeप्रतिमाही पुरुषांना सोयीस्कर पद्धतीनंच रंगवलेल्या असतात.
अर्थात दुटप्पी पुरुषप्रधान संस्कृतीचा वारसा लाभलेल्या आपल्या देशात सिनेमावाल्यांना प्रतिभा वापरून काही वेगळं घडवण्याची गरज नसते. इथली ढोंगी मूल्यं ते इथल्या ढोंगी समाजाला साफसूफ करून विकतात इतकंच.
 `घरवाली बाहरवाली'मध्ये डेव्हिड धवनही तेच करतो. द्विभार्यप्रतिबंधक कायदा असलेल्या देशात दोन बायकांच्या `सुखी' दादल्याची गोष्ट `हलक्याफुलक्या' पद्धतीनं मांडून गाण्याबिण्यांनी सजवून खपवतो. या सिनेमातला नायक अनिल कपूर पाहताना राज कपूरच्या सिनेमातल्या नायिकेची आठवण येते. राज कपूरची नायिका पांढरी साडी लपेटून झऱयाखाली सांगोपांग न्हाताना दिसते तेव्हा तिच्या चेहऱयावर कमालीचे निरागस पवित्र भाव असतात. ती काय बापडी, भोळीभाबडी आंघोळ करतीये. आता अंगावर पाणी पडतंय, पारदर्शक साडीतून तिच्या अंगप्रत्यंगांचं दर्शन प्रेक्षकाला घडतंय, तो हपापून पाहतोय, हा निव्वळ योगायोग. तिच्या चेहऱयावर कधी `तसलं' काही दिसायचं नाही.
  तसाच इथे नायक एक बायको असताना दुसरी करतो. पहिलीला दुसऱया लग्नाची, त्यातून झालेल्या अपत्यप्राप्तीची कल्पनाही देत नाही. दुसरीला पत्नीपदाचा अधिकार देत नाही. स्वत:च्या मुलाला `अनाथ' ठरवून त्याच्यावर अन्याय करतो. पण, सिनेमाची रचना अशी चपखल की, एवढं सगळं करूनही तो गरीब बिच्चाराच. कारण, हे उत्पात घडवते परिस्थिती. बिचारा परिस्थितीपुढे लाचार, असहाय्य. (परमेश्वर करो आणि सर्व पुरुषांना अशी असहाय्यता लाभो.)
या विलक्षण चतुर आणि प्रभावी मांडणीचं श्रेय द्यायला हवं कथाकार के. भाग्यराज (`आखरी रास्ता'चा दिग्दर्शक) आणि पटकथाकार रुमी जाफरी यांना. `अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी' म्हणत रवीना आणि रंभा अशा दोन बायकांशी एकाच वेळी संसार करणाऱया अनिल कपूरची गोष्ट पूर्णपण त्याच्या दृष्टिकोनातून मांडण्यात ते यशस्वी झाले आहेत. फक्त `अगं अगं म्हशी' ऐवजी `अरे, अरे रेडय़ा' म्हणायला हवं.
 हा रेडा म्हणजे नायकाचा- अरुणचा म्हातारा बाप (कादरखान) अरुण आणि काजल (रवीना टंडन) यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली तरी त्यांना मूलबाळ नाही, म्हणून मन रमवण्यासाठी हे गृहस्थ शेजारपाजारची मुलं गोळा करून त्यांची कोडकौतुकं पुरवतात. त्याची लाडाची पद्धत काय, तर मुलांना घरातल्या काचेच्या वस्तू फोडायला द्यायच्या आणि जास्तीत जास्त तोडफोड करणाऱया कारटय़ाला बक्षीस द्यायचं. असल्या नतद्रष्ट म्हाताऱयाकडे शेजारीपाजारी कशाला मुलं पाठवतील?
  मग एकटा पडलेला हा म्हातारा मुलाला सुनेला बोल लावायला लागतो. त्यातून ते दोघे डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेतात. डॉक्टर (असरानी) अरुणला सांगतो, की काजलमध्ये दोष आहे, ती कधीच आई बनू शकणार नाही. हे वडिलांना कळलं तर ते आपलं दुसरं लग्न लावून देण्याचा हट्ट धरतील, हे ठाऊक असलेला अरुण काजलवरच्या प्रेमापोटी घरी थाप मारतो. आपल्यामध्येच दोष असल्याचं सांगून खोटे औषधोपचारही सुरू करतो. पण, त्याच्या बेरकी बापाला खरी गोष्ट कळायला वेळ लागत नाही. तो अरुणच्या मागे तरुण पोरींची फौजच्या फौजच पाठवतो. यातली कुणीही पसंत कर, लग्न कर आणि मला नातू (लक्षात घ्या `नातू', नात नाही) दे, असा लकडा लावतो. त्याच्या लेखी मुलगा म्हणजे नातू देणारं यंत्रच.
अरुण आपल्या मिनतवाऱया, धाकटपटशाला बधत नाही म्हटल्यावर तो चक्क आजाराचं नाटक करतो, आत्महत्येच्या धमक्या देऊन अरुणकडून दुसऱया लग्नाचं वचन घेतो. नंतर मित्रासोबत नेपाळमध्ये गेलेल्या अरुणला मनीषा (रंभा) ही नेपाळी मुलगी भेटते. तिचं लग्न होत नसल्यानं तिचा बाप एका वासराचा बळी द्यायला निघालेला असतो. ती त्या वासराला हाकलत असताना गैरसमजुतीनं अरुण ते वासरू उचलतो. पुढे अरुणचा बाळवट मित्र (सतीश कौशिक) वासराचा जीव वाचवण्यासाठी अरुण मनीषाची लग्न करील, अशी तात्पुरती थाप ठोकतो. पण, नेपाळमधले कडक नीतीनियम, आणि खोटं बोलणाऱयाला तिथे मिळणारी कठोर शिक्षा पाहिल्यावर तो अरुणला पूजेच्या बहाण्यानं मंदिरात घेऊन जातो आणि नकळत त्याचं लग्न लावून टाकतो. हे समजल्यावर भडकलेला अरुण मनीषाला आपण विवाहित असल्याचं सांगतो. त्याला मनोमन वरलेली मनीषा त्याच्यावरचं बालंट स्वत:वर घेऊन विधवेचं आयुष्य पत्करण्याची शिक्षा भोगायला तयार होते. तिची त्यागवृत्ती पाहून खजील झालेला अरुण तिचा स्वीकार करतो. या निमित्तानं वडिलांची इच्छा पूर्ण होणार म्हणून हरखतोही.
  पण, मनीषाला नेपाळमध्ये ठेवून भारतात आलेल्या अरुणला बापाचं नवंच रुप दिसून येतं. म्हाताऱयानं आता पुन्हा टोपी फिरवलेली असते. आपली सून किती महान आणि प्रेमळ आहे, याचा साक्षात्कार झालेला म्हातारा अरुणला सांगतो, की मला नातू नको, माझी पहिली सूनच हवी. आता मी कधीही तुझं दुसरं लग्न करण्याचा आग्रह धरणार नाही.
  पण, इकडे अरुणनं मनीषाबरोबर `शादीका फर्ज' आधीच पुरा केलेला असल्यानं म्हाताऱयाला नको असला तरी नातू नेपाळात मनीषाच्या उदरात वाढत असतोच. मग मनीषा भारतात येऊन म्हाताऱयासाठी नातू पैदा करते. तिचा जन्मच मुळी त्याग करण्यासाठी झालेला असल्यानं तान्ह्या मुलाला मागे सोडून ती नेपाळला परत जाते. हा मुलगा अनाथ असल्याचं सांगून अरुण स्वत:च त्याला दत्तक घेतो.
 या मुलामधले गुरख्यांचे `गुण', अंगावरच्या जन्मखुणा आणि अरुणच्या संशयास्पद नेपाळवाऱया यांची सांगड घालून उपद्व्यापी आणि रिकामटेकडा म्हातारा या मुलाच्या जन्मरहस्याचा उलगडा करतोच. आणि मग आपल्या वंशाला `दिवा' होणाऱया धाकटय़ा सुनेलाही इथंच आण, असा हट्ट मुलापाशी धरतो. मनीषा घरात मोलकरीण बनून येते. काही घटनांमधून काजलला संशय येऊ लागतो. संशयकल्लोळातून वास्तवाचा स्फोट होतो आणि अखेर दोन्ही बायका एकाच दादल्याबरोबर सुखानं नांदू लागतात.
 कथानक अंमळ विस्तारानं सांगितलं;
कारण त्यातून भाग्यराज- रुमी- डेव्हिड या त्रयीनं अरुणला कसा निष्पाप ठेवलाय, ते अभ्यासण्यासारखं आहे. त्याची कुठलीच चुकीची कृती त्याच्या स्वत:च्या प्रेरणेतून होत नाही. मूल होत नाही, यात त्याचा दोष नाही. दुसरं लग्न होतं ते मित्राच्या चुकीमुळं आणि नादान बापाच्या आग्रहामुळं. पहिल्या पत्नीवर अन्याय होतो तो तिच्याच सुखाखातर. दुसऱया पत्नीवर, मुलावर अन्याय होतो ते प्रथम पत्नीवरील अपार प्रेमापोटी आणि सतत बिचारा तारेवरची कसरत करत सर्वांना सुखी ठेवण्यासाठी झटतोय, झटतोय...
 अरे चोरा! (हे नायक, कथाकार, पटकथाकार आणि दिग्दर्शक या सर्वांना उद्देशून असलेलं संबोधन) बाकी सगळ्या ठिकाणी या नायकाची असहाय्यता कळू शकते. अगदी नकळत दुसरं लग्न लागणंही समजून घेता येतं. पण इतक्या विचित्र स्थितीमध्ये, पहिल्या पत्नीवर अन्याय करीत असल्याची भावना पोखरत असताना अपघातानंच पत्नी बनलेल्या अपरिचित मनीषाबरोबर इतक्या कमी वेळात `शादी का फर्ज' कसा पूर्ण करतो तो! तिच्याशी लगेच शरीरसंबंध प्रस्थापित करण्याची तर काहीच गरज नसते. की आगीजवळ लोणी ठेवलं तर पाघळायचंच म्हणून गप्प बसायचं? तसं असेल तर या नायकाच्या सगळ्या कृतींना उदात्ततेचा, असहाय्यतेचा मुलामा देण्याचा `डेव्हिडी प्राणायाम' कशाला केला?
म्हणजे अरुणाचाही दोष नाही, मनिषा तर त्यागमूर्तीच आणि अरुणचा बाप तर साधाभोळा, रांगडा, नातवंडांच्या प्रेमासाठी आचावलेला म्हातारा. मग दोष कुणाचा, तर काजलचा. बाईच्या जन्माला येऊन साधा नातू नाही देऊ शकत? `क्लायमॅक्स'मध्ये अरुणच्या दुसऱया लग्नाची- मुलाची भानगड समजल्यावर संतापलेल्या काजलला गप्प करण्यासाठी हाच मुद्दा वापरलाय.
  भाग्यराज-रुमी-डेव्हिड यांनी हे खास पुरुषी स्खलनशीलतेची भलापण करणारं लॉजिक प्रभावीपणे मांडलंय हे त्यांचं क्रेडिट. सर्व दुटप्पीपणा कळत असूनही प्रेक्षक शेवटच्या काही रिळांमध्ये काजलला `खलनायिका' मानायला लागतो, तिचा काहीच दोष नाही, हे विसरून जातो, हे या त्रयीचं मोठं यश आहे. तसंच या कथानकात खरा खलनायक असलेला अरुणचा हट्टाग्रही बापही मोठय़ा चतुराईनं भाबडा, निरागस बनवलाय. अरुणचं दुसरं लग्न लावायला कारणीभूत ठरणारा मित्र तर सिनेमातलं विनोदी पात्रच. त्यामुळे सगळा दोष परिस्थितीवर ढकलला जातो.
 अर्थात, सुरुवातीलाच म्हटल्यानुसार भाग्यराज- डेव्हिड- रुमी प्रभृतींनी काही समाजजागृतीचा (आणि स्वत:ची दुकानं बंद करण्याचा) वसा घेतलेला नाही. ते इथल्या पुरुष प्रेक्षकांना आणि पुरुषांच्या पद्धतीनं विचार करण्याची गुलामी स्वखुशीनं पत्करलेल्या बायकांना `हलकंफुलकं मनोरंजन' देऊन गल्ला गोळा करण्यासाठी जमले आहेत. एकदा ही विचारसरणी मनात स्पष्ट झाल्यावर ती सिनेमातून पटवून देण्यासाठी, तर्कशुद्ध बनवण्यासाठी ते ज्या- ज्या क्लृप्त्या वापरतात त्यांना दाद द्यायला हवी. डेव्हिडचा सिनेमा असूनही नायिकांचं ओंगळवाणं अंगप्रदर्शन नाही, हीसुद्धा एक जमेची बाजू.
  `एक तरफ है घरवाली', `नेपाल की ठंडी हवाओं में', `तारा रारा रारा रारा' वगैरे अनु मलिकच्या ठेकेबाज संगीतातली सोप्या, सुश्राव्य चालींमधली गाणी (त्यात तीन स्वप्नंगीतचं) पेरून, फार गंभीर वळणं न येण्याची खबरदारी घेऊन, फाफटपसारा टाळून डेडव्हडनं सर्वसामान्य प्रेक्षकाला तीनं तासांचा टाईमपास दिला आहे.
 अनिल कपूरच्या अत्यंत संयत अभिनयानं सिनेमाचा तोल राखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. वयोमानपरत्वे व्यक्तित्त्वात आलेली परिपक्वता, अभिनयक्षमता आणि मोना- बोनी- श्रीदेवी प्रकरणातून घरच्या घरी मिळालेलं अनुभवशिक्षण यांचा पुरेपूर वापर करून त्यानं अरुण झकास साकारलाय. पण `जुदाई', `विरासत' आणि आता `घरवाली, बाहरवाली' मधून अनिलचं `दोन बायकांचा दादला साकारण्यात `स्पेशलायझेशन' होण्याचा धोकाही दिसतो.
 रवीना एकाच सुरात बोलते. तरीही तिची काजल सुसह्य आहे. रंभाला फारसे संवादच न देऊन डेव्हिडनं तिच्या बाबतीत तीही अडचण ठेवलेली नाही. ती अभिनयाचा यशाशक्ती प्रयत्न करते; पण तो जाणवण्यासाठी तिच्या चेहऱयावर () नजर ठेवण्याची `प्रॅक्टिस'च करायला लागते.
  हिंदी सिनेमा हा भारतीय संस्कृतीचा समाजजीवनाचा आरसा मानतात. डेव्हिडनं `घरवाली, बाहरवाली'च्या रुपानं जत्रेतल्या आरसेमहालातला विरुपदर्शक आरसा मांडला आहे. इथे आपलंच विरुप प्रतिबिंब पाहून दचकू नका, मोठ्ठय़ानं हसा. साधा सोपा, हलकाफुलका टाईमपास आहे हा! फार गांभीर्यानं घेऊ नका.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment