Friday, April 15, 2011

बच्चा भी खूश, बाप भी खूश (जब प्यार किसीसे होता है- नवा)


अमृता सिंग, जॅकी श्रॉफ आणि जुही चावलाचा `आईना' प्रदर्शित झाला तेव्हाच तीन गोष्टी पक्क्य़ा झाल्या होत्या. एक म्हणजे दीपक सरीन हे यश चोप्रांचे सहायक दिग्दर्शक असल्याने `यश चोप्रा स्कूल'चे दिग्दर्शक आहेत.
दुसरी म्हणजे त्यांना धाडसी कथानक निवडून किमान बघणीय सिनेमा बनवता येतो.
आणि तिसरी म्हणजे दीपक सरीनना संगीताचा कान आहे.
त्यावेळी ते पासापुरते मार्क मिळवून पास झाले होते.
मध्ये बराच काळ लोटल्यानंतर दीपक सरीन यांचा दुसरा सिनेमा- `जब प्यार किसीसे होता है' प्रदर्शित झालाय.
हा सिनेमा पुन्हा एकदा त्याच तीन गोष्टींवर शिक्कामोर्तब करतो. पण, दुर्दैवानं दीपक सरीन यांच्या गुणांची टक्केवारी काही वाढलेली नाही. यश चोप्रांच्या शाळेत ते दोन्ही बाजूला समास सोडून देखण्या सुवाच्च हस्ताक्षरांत पेपर लिहायला शिकलेत. पण, एवढय़ा भांडवलावर जास्तीत जास्त टापटिपीचे गुण मिळू शकतात.
खरंतर `जब प्यार किसीसे होता है' ची हनी इराणींनी लिहिलेली कथा नॉर्मल प्रेमकथांपेक्षा वेगळी आणि धाडसी. पण स्वत:च्याच कथेवर त्यांनी लिहिलेली पटकथा मात्र इतकी भरकटलीये की, यशजींसाठी सिनेमे लिहिणाऱया याच का त्या हनी इराणी, असा प्रश्न पडावा. आणि ही पटकथा जशीच्या तशी सरीननी स्वीकारली कशी, हेही कोडंच.
`जब प्यार...'चा नायक सूरज धनराज गीर (सलमान खान) हा एका भारतीय धनवंताचा (अनुपम खेर) परदेशात वाढलेला गुलछबू नातू. शिक्षणाच्या नावाखाली परदेशात काळ्या- गोऱया पोरी फिरवणारा `प्लेबॉय.'
सूरजच्या अय्याशीचा अंदाज आलेले त्याचे आजोबा त्याला भारतात बोलावून घेतात. इथे त्याला कोमल सिन्हा (ट्रिवंकल खन्ना) दिसते. तो तिच्या प्रेमात पडतो. तिला खोटं नाव सांगून तिलाही प्रेमात पाडतो. हे नाटक काही दिवस चालतं.
पण कोमलला जेव्हा त्याची `असलियत' समजते तेव्हा या बदनाम आणि खोटारडय़ा प्रियकराबरोबरचे संबंध ती तोडून टाकते. या वेळी खरोखरच प्रेमात पडलेला सूरज हा धक्का सहन करू शकत नाही. त्याची विषण्ण अवस्था पाह्यल्यावर त्याच्या `दादाजी'नाही या वेळी गाडी रुळावर आलीये' हे लक्षात येत. ते कोमलची समजूत काढायचा प्रयत्न करतात. सूरजनं दारू सोडवी, अय्याशी बंद करावी, अशा अटी ती घालते. सूरजही प्रयत्नपूर्वक स्वत:ला बदलतो. कोमलच्या मनात स्वत:बद्दल विश्वास निर्माण करतो.
आता सर्व ठाकठीक होणार, कोमल-सूरजचं लग्न होणार, असं वाटत असतानाच सूरजचा भूतकाळ त्याच्यापुढे येऊन ठाकतो... कबीर (आदित्य नारायण) या त्याच्याच मुलाच्या रुपानं. परदेशात त्यानं `फिरवलेल्या', पण त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱया एका भारतीय मुलीला (नम्रता शिरोडकर) सूरजपासून झालेला हा मुलगा आईच्या मृत्युनंतर लंडनहून भारतात येऊन थडकतो.
आधी सूरज कबीरला अनाथश्रमात दाखल करण्याचा प्रयत्न करतो, पण हा खट मुलगा तो हाणून पाडतो. काही दिवस त्याला स्वत:च्या घरात लपवून सूरज त्याला लंडनला हॉस्टेलमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन जातो.
पण, प्रथमच `माणसा'त आलेल्या सुरजला कबीरचाही लळा लागलेला असतो. तो न  राहवून त्याला पुन्हा भारतात आणतो आणि `मित्राचा मुलगा' अशी त्याची सर्वांना ओळख सांगतो.
कबीर आणि कोमल यांच्यात सतत घुसफुशी होत राहतात. एकीकडे मुलगा आणि दुसरीकडे प्रेयसी यांच्या प्रेमळ कचाटय़ात सापडलेल्या सूरजला कोमलशी खोटं बोलत असल्याबद्दलही टोचणी लागून राहते. ऐन लग्नाच्या दिवशी तो वऱहाडय़ांसमक्ष कोमलला खरं काय ते सांगून टाकतो. त्याचा प्रामाणिकपणा लक्षात घेऊन कोमल त्याचा कबीरसह स्वीकार करते, हे सांगायला नकोच.
आपल्याकडे प्रेमकहाण्यांमध्ये नायक कितीही गुलछबू असला तरी नायिका वगळता अन्य मुलींशी त्याचे नेमके कसले `संबंध' असतात, हे कधीच स्पष्ट केलं जात नाही. `जब प्यार...'मध्ये हा संकेत धुडकावून हनी आणि सरीन यांनी धाडसी पाऊल टाकलं आहे. पुन्हा त्याच्या नम्रताबरोबरच्या `कॅज्युअल रिलेशनशिप'ला उगाच प्रेमबिमाची झालर देऊन त्याला सहानुभूतीही देणं टाळलं आहे, हे अभिनंदनीय आहे.
त्यामुळे, जेव्हा लंडनमध्ये कबीर सूरजला विचारतो की, माझ्या आईचं वर्णन सांग तेव्हा सूरजला `ही नेमकी कोण' आठवत नाही. जेव्हा कबीर त्याला फोटो दाखवतो तेव्हा उलगडा होतो. हा या सिनेमातला सर्वेत्कृष्ट प्रसंग आहे. पण ही कल्पकता- बुद्धीची चमक फक्त या प्रसंगापुरतीच मर्यादित राहते.
मुलगा आणि नायिका यांच्या ताणात नायकाबरोबर पटकथाकार आणि दिग्दर्शकही सापडले आहेत. ही प्रेमकहाणी करायची, की बाप-मुलाचा भावनिक सिनेमा करायचा, या गोंधळात ते अडकलेले दिसतात.
कबीरची एंट्री बरोब्बर मध्यंतराला होते. तोवरचा सिनेमा हा निखळ प्रेमकहाणीच्या स्वरुपात गोगलगाईच्या गतीनं चालतो. सूरज हा कितीही `मंझा हुआ' `प्लेबॉय' असला तरी परदेशात सतत कोणी ना कोणी गौरांगना येऊन त्याच्या गळ्यात पडत असते. इतका का सलमान मदनाचा पुतळा आहे? आणि असलाच तरी इतक्या निर्बुद्धपणे मुली त्याच्या गळ्यात पडतात? परदेशी मुलींना `चीप' ठरवण्याचा हा प्रकार हास्यास्पद वाटतो. आणि त्या मुलींचं सलमानबरोबर प्रेक्षकांनाही गाण्याबिण्यातून सुभग दर्शन घडतं. त्यांच्याशी केवळ `फ्लटिंग' करणारा सलमान ट्रिवंकलला मात्र पाहातक्षणीच तिच्या थेट गंभीरपणे प्रेमात पडतो, हे पटकथाकारानेच दिलेल्या त्याच्या `प्रकृती'शी विसंगत वाटतं. इतक्या `उच्च' मुलींमध्ये वावरल्यानंतर त्याला ट्रिवंकल आवडते, यातून `प्रेम आधंळ असतं', हेच सिद्ध होतं.
यश चोप्रांच्या शाळेचे विद्यार्थी असूनही सरीन यांनी हे प्रेमप्रकरण फारच सपकपणे आणि रुटीन पद्धतीनं हाताळलंय. प्रेमाचा आत्मा काही त्यांना गवसलेला नाही. त्यामुळे, ट्रिवंकलसाठी सलमान गुलछबूगिरी सोडतो, हे `भिडत' नाही.
आदित्यच्या एंट्रीनंतर मामला आणखी बिघडतो. त्याच्यातला आणि ट्रिवंकलमधला विसंवाद मारून- मुटकून नाटय़ निर्माण करण्यासाठी `घडवलेला' वाटतो.
बाप-लेकांमधलं हळूहळू `एस्टॅब्लिश' होत जाणारं नातंही पुरेशा प्रसंगांअभावी उरकलेलं वाटतं. सलमानची ट्रिवंकलमधली गुंतवणूक, त्यातून त्याला झालेला प्रेमाचा साक्षात्कार; प्रेमाचा अर्थ आणि त्यातली जबाबदारी समजल्यावर त्यानं केलेला आदित्यचा स्वीकार यात उत्तम भावनिक सिनेमाची बीजं होती.
पण, देशातल्या हिंती सिनेमाच्या यच्चयावत सर्व प्रेक्षकांनी आपला सिनेमा पहायलाच हवा, अशा हट्टापोटी पटकथाकार- दिग्दर्शक यांनी सिनेमात अभिरुचींचा `लसावि' काढायचा प्रयत्न केलाय. अंगप्रदर्शन आवडणाऱयांसाठी पाश्चात्य मदनिकांबरोबर सलमानचं नृत्य, बच्चेकंपनीसाठी आदित्य आणि त्याचा  कुत्रा सँडी, विनोदाच्या चाहत्यांसाठी सलमानच्या मित्राच्या भूमिकेत जॉनी लिव्हर, प्रेमपट आवडणाऱयांसाठी परदेशात अप्रतिम लोकेशन्सवर चित्रित केलेली गो।़।़ ग्गोड, झुळझुळीत गाणी, कौटुंबिक सिनेमाच्या चाहत्यांसाठी बापलेकांचं प्रेम, असा दहा-बारा सिनेमांचा ऐवज त्यांनी एकाच सिनेमात भरलाय. प्रेक्षकांची अशी काही `वॉटरटाईट' वर्गवारी असते का? सर्वांना खुश करण्याच्या नादात हनी आणि सरीन यांनी चांगलं कथानक वाया घालवलंय.
सलमानचा सहज अभिनय, ही `जब प्या...' ची जमेची बाजू. एकेकाळी भयंकर `ऑकवर्ड' पद्धतीनं कॅमेऱयापुढे वावरणारा सलमान आता चांगलाच मोकळा झालाय. तो काही फार थोर अभिनेता नाही पण, आदित्यचा बाप `बनत जाणं' त्यानं नेटकेपणानं साकारलंय. त्याहीपेक्षा दादाजी आणि मित्राबरोबरच्या प्रसंगांमध्ये तो बेस्ट खुललाय. ट्रिवंकल मेहनतीनं काम करते खरी पण ती ना `स्टार मटिरियल' वाटते ना अभिनयसंपन्न कलावती. त्यात तिच्या मावशीनं सिंपल कपाडियानं तिच्यासाठी इतके वाईट कपडे कसे काय डिझाईन केलेत कळत नाही. ती पडद्यावर कशी जास्तीत जास्त वाईट दिसेल, याची सिंपल, हेअर स्टायलिस्ट शोभा आणि मेकपवाल्यांमध्ये स्पर्धाच लागलेली दिसते; आणि तिघांनीही ही स्पर्धा जिंकली आहे. अनुपम खेर दादाजीचा प्रेमळ, करारीपणा आरामात साकारतो. आदित्य नारायणचा कबीरही दिसतो गोड, पण त्याच्या भूमिकेला फारशा छटाच नाहीत.
विशेष उल्लेख करायला हवा जॉनी लिव्हरचा. या हरहुन्नरी गृहस्थांकडून चित्रविचित्र चाळे करवून घेणाऱया दिग्दर्शकांनी जॉनीभाईच्या अदाकारीचे बारा वाजवून टाकले आहेत. इथे जॉनी केवळ विनोदी `पात्र' नाही, या कथानकातला महत्त्वाचा माणूस आहे. सतत कसल्या न कसल्या औषधी गोळ्या खाण्याची त्याला दिलेली लकब हनी आणि संवादलेखक जावेद सिद्दिकींनी शेवटपर्यंत उत्तम वापरून घेतली आहे. या सिनेमातली ही सर्वात `जमलेली' व्यक्तिरेखा आहे. ती जॉनीभाईनं आक्रस्ताळी अभिनय न करता, संयमानं झकास वठवलीये. नम्रता शिरोडकरनं `मिनी' पाहुण्या भूमिकेत जास्तीत जास्त `मायको मिनीज' घातल्या आहेत.  
ट्रिवंकलचं दुर्दैव पाहा! ती सिनेमाची नायिका असून `ओ जाना' हे सिनेमातलं सगळ्यात सुरेख गाणं मात्र नम्रताच्या (आखूड) पदरात पडलंय.
जतीन-ललित यांनी `इस दिल में क्या है', `मदहोश दिल की धडकन', `चल प्यार करेगी' आणि `दिल मे बसाके' ही गाणीही श्रवणीय केली आहेत. पण गाण्यांना खास सिच्युएशन्स नाहीत. मनमोहन सिंग यांच्या छायाचित्रणानं आणि लोकेशन्समुळं ती पडद्यावर देखणी होतात इतकंच.
गाण्यांव्यतिरिक्तही सिनेमाची प्रत्येक फ्रेम `रिच' करण्याचा सरीन यांचा अट्टाहास दिसतो. शर्मिष्ठा रॉय यांनी `दिल तो पागल है' प्रमाणंच इथेही कलात्मक अभिरुची आणि पैशाची श्रीमंती दाखवणारं नेपथ्य केलंय. पण, देखणेपणाच्या अट्टाहासापायी अनाथाश्रमाचं कार्यालही नको इतकं सुंदर दिसतं. इंटिरियर डिझायनिंग म्हणजेच इथं कला दिग्दर्शन झालंय.
`जब प्यार...' पाहायचाच असेल तर मध्यंतराच्या काही मिनिटं आधी थिएटरमध्ये शिरा. कदाचित, आदित्यच्या एंट्रीआधी बाहेर पडलेला एखादा प्रेक्षक तुम्हाला त्याचं तिकीट फुकट देऊन टाकेल. तिथून पुढच्याच सिनेमा पाह्यलात तर वेळही वाचेल आणि पैसेही.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment