Friday, April 1, 2011

सायलारू सायलारे, काय होता काय झाला रे? (जोश)


सिनेमा आपण बराचसा आंधळेपणानं आणि बहिरेपणानं पाहतो. कथानक, संवाद आणि अभिनय किंवा त्या नावाखालची स्टार मंडळींची स्टाईलबाजी यापलीकडचं आपल्याला फारसं काही जाणवत नाही. आपलाही फार दोष नाही म्हणा! कारण, प्रेक्षकाला यापलीकडचं काही दिसावं, समजलं नाही तरी किमान संवेदनांना जाणवावं, अशी कामगिरी आपल्याकडून न होण्याचीच खबरदारी घेत असतात आपले `फिल्मफेकर.'
त्यामुळेच किमान तगडा दृश्राव्य अनुभव देणारा `जोश'सारखा दुर्मिळ सिनेमा सगळ्या दोषांसह एकदातरी आवर्जून पाहावा, अशी शिफारस करावी लागते.
दिग्दर्शन, छायालेखन, कलादिग्दर्शन, रंगभूषा, वेशभूषा, पार्श्वसंगीत ही सिनेमाची तांत्रिक अंग फक्त ऐकूनच माहिती असलेल्या प्रेक्षकाला ती जाणवण्याचा, दिसण्याचा थरारक अनुभव देतो हा सिनेमा. ही ताकद नसती, तर `जोश' आवडणं सोडा, कदाचित पाहवलाही नसता. कारण हा भारतात अशक्यप्राय अशा या एका सिच्युएशनवरचा सिनेमा आहे. तो `वेस्ट साइट स्टोरी' या दहा ऑस्कर मिळवणाऱया हॉलिवुडपटावर आधारलेला आहे.
`जोश'कडे वळण्याआधी `वेस्ट साइड स्टोरी'चा परामर्श घ्यावाच लागेल, कारण त्याशिवाय `जोश'चं फाऊंडेशन समजणं कठीण आहे. 1961 साली आलेल्या `वेस्ट साइट स्टोरी'मध्ये रोमिओ- जुलिएटची अजरामर प्रेमकहाणी संपूर्णपणे आधुनिक संदर्भासह नव्या रंगरुपात मांडली होती. न्यू यॉर्कच्या गरीब वस्तीतल्या वैफल्यग्रस्त तरुणांच्या दोन टोळ्यांमधील तुंबळ झगडय़ाच्या पार्श्वभूमीवर ही प्रेमकहाणी फुलते. अमेरिकेत जन्म झालेल्या तरुण `अमेरिकनां'ची `जेट्स' ही एक गँग आणि प्युर्टो रिकन निर्वासितांची `शार्क्स' ही दुसरी गँग. परस्परांच्या रक्ताची तहान लागलेल्या या दोन दुश्मन टोळ्यांमधले दोन तरुण जीव एकमेकांच्या प्रेमात गुरफटतात. वांशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांचं प्रेम खुलतं, फुलतं आणि अपरिहार्य अशा शोकात्म शेवटाकडे जातं.
अमेरिकेत केवळ दोन पिढय़ांपासून स्थायिक झालेल्यांनी स्वत:ला मूळ अमेरिकन मानणं आणि नव्या निर्वासितांना उपरे मानणं, हा वास्तवात `ब्लॅक ह्यूमर'चा प्रत्यय देणारा सामाजिक विनोद. तो भारतातही बहुसंख्याक - अल्पसंख्याक संघर्षामध्ये अनुभवायला मिळतोच. पण इथलं मधमाशांचं मोहोळ उठवण्याचा उपद्व्याप व्यावसायिक हिंदी सिनेमा कशाला करील? त्यामुळेच `जोश' कर्त्यांना भारतीय वातावरणातच, वास्तवाचा किंचित आधार असलेली काल्पनिका रचावी लागली आहे.
दिग्दर्शक मन्सूर खानच्या स्वत:च्या (?) कथेवर, मन्सूर आणि नीरज व्होरा यांनी पटकथा रचताना पार्श्वभूमी निवडली आहे ती गोव्याची. काळ निवडला आहे 1980 चा. वास्को शहरामध्ये `बिच्छू' आणि `ईगल्स' या हुल्लडबाज तरूणांच्या दोन टोळ्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. ईगल्सचा म्होरक्या मॅक्स (शाहरूख खान) आणि बिच्छूचा बॉस प्रकाश (शरद कपूर) हे एकमेकांना पाण्यात पाहतात. त्यांनी शहरात एक अदृश्य सीमारेषा आखून इकडच्या `पोरां'ना तिकडे जाण्यास बंदी घातली आहे. संधी मिळेल तिथे या टोळ्या एकमेकांना भिडतात आणि इन्स्पेक्टर (शरद सक्सेना) किंवा फादर यांनी हस्तक्षेप करेपर्यंत तुफान मारामाऱया करतात.
शर्ली (ऐश्वर्या राय) ही मॅक्सची जुळी बहीण. देखणी पण सतत मुलांमध्ये राहून टपोरी झालेली पक्की `ईगल'. तिच्या रुपावर लुब्ध असलेले अनेक तरुण मॅक्सच्या धाकामुळे तिची छेड काढण्याच्या फंदात पडत नाहीत. आईवडिलांविना वाढल्यामुळे शर्लीच्या बाबतीत मॅक्स अगदीच हळवा आणि ओव्हरप्रोटेक्टिव्ह आहे.
शर्लीवर थेट आणि गांभीर्यपूर्वक `लाईन मारण्याचं' धाडस दाखवतो राहुल (चंद्रचूड सिंग). हा प्रकाशचा मुंबईहून आलेला भाऊ. बिच्छू- ईगल्समधला संघर्ष, त्यांची `नियमावली' आणि शर्ली ही खतरनाक मॅक्सची बहीण आहे याचा थांगपत्ता नसताना तो शर्लीच्या प्रेमात पडतो. पण, सगळं समजल्यावरही मागे हटत नाही. हा संघर्षच मुळात मान्य नसलेला सरळमार्गी आणि निर्भीड राहुल शर्लीच्याही मनात भरतो. नेमकं त्याचवेळी दोन्ही टोळ्यांमधलं वैमनस्य शिगेला पोहोचतं. आतापर्यंत निव्वळ एकमेकांचे हातपाय तोडण्याचीच मनीषा असलेले मॅक्स आणि प्रकाश आता मात्र एकमेकांचा जीव घ्यायला निघतात.
`जोश'चं हे मध्यंतरापर्यंतचं कथानक. सिनेमा पाहण्याची इच्छा असलेल्या प्रेक्षकाला तितकंच माहिती असलेलं बर. पुढचा कथाभाग सांगितल्यास पुढचा सिनेमा पाहण्यातली मजा जाईल तसंच पुढे तशी मजाच नाही, हेही एक कारण आहे.
लेखक- दिग्दर्शकांनी तंत्रज्ञ- कलावंतांच्या साह्यानं `जोश'चा पूर्वार्ध नेहमीच्या हिंदी सिनेमापेक्षा इतका वेगळा आणि जोशिला बनवलाय, की आपण `हिंदी सिनेमा' पाहतो आहोत, हे भान सुटतं. सिनेमाची एकूण ट्रीटमेंट अशी भन्नाट की असं झाल्याचा त्रासही होत नाही. उलट आता काहीतरी वेगळं पाहायला मिळणार, अशी सुखद हुरहूर वाटू लागते. मात्र, मन्सूर खान हिंदी व्यावसायिक सिनेमाच्या चौकटीत `वेस्ट साईड स्टोरी'चा उत्तरार्ध पेलण्याचं धाडस करील काय, अशी शंका `वेस्ट साइड स्टोरी'चा संदर्भ ज्ञात असलेल्या प्रेक्षकाला चाटून जाते. आणि ही कुशंकाच खरी ठरते. ज्या क्षणी काहीतरी पाहायची प्रेक्षकाची मानसिक तयारी पूर्ण होते, त्या क्षणीच हा सिनेमा `वेस्ट साइड' सोडून `इस्ट साइट' स्टोरी बनून जातो; इतका हिंदी वळणावर येतो, की याच सिनेमातल्या लोकप्रिय गाण्याच्या चालीत प्रेक्षक `सायलारू सायलारे, काय होता काय झाला रे' म्हणत डोक्यावर हात मारून घेतो.
`जोश'कारांनी कथानक गोव्यात घडवताना चतुराई दाखविली आहे. या कथानकांसाठी केवळ कॉस्मोपोलिटनच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय लुक असलेल्या स्थळाची गरज होती. त्यामुळे ही कथा मुंबईतही घडू शकली असती. पण, मग एकतर वारंवार दिसलेली किंवा `सत्या'नं शोधलेली (म्हणजे प्रेक्षकांनी आधीच पाहिलेली) मुंबई पुन्हा एकदा चित्रित करावी लागली असती. शिवाय इथे दोन टोळ्यांमधल्या संघर्ष दाखवताना निव्वळ काल्पनिक चित्रणाला वाव मिळाला नसता. गोव्यानं या सिनेमाला फारच मोठय़ा प्रमाणावर तारलंय. तिथली सामाजिक संरचना सामान्य प्रेक्षकाला फारशी परिचित नाही. शिवाय, प्रदीर्घ पोर्तुगीज अमलामुळे ईगल्स ही बराच काळ सत्ताधारी असल्यामुळे मालकीची भावना प्रबळ असलेल्या `मूळ' ख्रिश्चनांची टोळी असावी आणि `बिच्छू' ही उपऱया, `गावठी' हिंदू `प्रजे'ची टोळी असावी, अशी शंका आणणारा एक अतिशय अस्फुट सावध धागा सिनेमात गुंफलाय. वास्को शहराचं नाव ज्याच्यावरून ठेवलं त्या रॉबर्ट वास्को या काल्पनिक माणसाची, त्याच्या `इतिहासा'ची सिनेमात केलेली गुंफणही डोकॅलिटी दाखविते.
मात्र ही डोकॅलिटी इथवर चालते.  
गोव्यातल्या या टोळ्या टपोरी भाषा बोलतात ती आपल्या मुंबईची. वयस्क पात्रं बोलतात ती हिंदी सिनेमानंच गोव्याची हिंदी म्हणून ठसवलेली बंबईया भाषा. प्रकाशच्या टोळीच्या टोळी असण्याला काही कारण आणि काही `कामधंदा' आहे. बडय़ा बिल्डर्ससाठी धाकदपटशा, हाणामारी करून चाळी- वस्त्या खाली करून देण्याचं काम ही टोळी करते. प्रकाश आणि या टोळीतल्या अन्य पोरांची वेशभूषा- रंगभूषा या व्यवसायाला, त्यांच्या आर्थिक स्तराला साजेशी आहे. मॅक्सच्या `ईगल्स'ची मात्र काहीच टोटल लागत नाही. त्यांना गैरव्यवहार करताना दाखवलं, तर मॅक्सच्या `हिरो'पणाला बाधा येईल म्हणून की काय, ते फक्त बिच्छू मंडळींशी नडानडी करतानाच दिसतात. शिवाय, या पोरांचा पोटापाण्याचा धंदा उमगत नाही मॅक्स आणि शर्ली यांच्या आर्थिक स्थितीचा काही पत्ता लागत नाही. त्यांचे एकाहून एक फ्लॅशी, चकाचक वेष, लक्ष्मीपुत्र जिचा `माय मशीन' असा साभिमान उल्लेख करतात, अशा दर्जाची मॅक्सची मोटरसायकल, श्रीमंत डान्स क्लब्ज आणि हॉटेलांमधला त्यांचा सराईत वावर याची सांगड त्यांच्या निरुद्योगी टपोरीपणाशी बसत नाही.
सगळ्यात चक्रावणारा भाग आहे तो या टोळ्यांमधल्या हिंसक दुश्मनीचा, या टोळ्या किती कट्टर वैरी आहेत, हे अगदी पहिल्या काही प्रसंगांमध्येच दिग्दर्शक एकदम सुस्पष्ट करून टाकतो. पण, त्यांच्यातल्या संघर्षाचं कारण काही शेवटपर्यंत समजत नाही. मूळ प्रेरणास्रोतातल्याप्रमाणे वांशिक किंवा अन्य कोणतीही `जमिनीवरची' कारणं देणं परवडणारं नाही, म्हणून की काय, हा अगदी महत्त्वाचा प्रश्न लेखक- दिग्दर्शकांनी अनुत्तरित ठेवलाय. केवळ चूष म्हणून घडणाऱया हिंसेची भारतात फार मोठी परंपरा नाही, यामुळे ही हिंसा अनाकलनीय आहे. शिवाय, `वेस्ट साइड स्टोरी'चा म्युझिकलचा बाज कायम ठेवून मन्सूर खाननं `जोश'च्या पूर्वार्धातली हिंसा नुसतीच आखीवरेखीव, `देखणी' केलेली नाही, तर ही `संगीत हिंसा'ही आहे. म्हणजे, `सायलारू सायलारे' हे लोकप्रिय गाणं या दोन टोळ्यांमधल्या मारामाऱयांचं गाणं आहे. त्यात संगीताच्या तालावर नृत्याच्या ठेक्यावर रीतसर रक्तरंजित हिंसा घडते. प्लेग्रुप- केजीतल्या शिशुंनी एकमेकांना ढकलावं, थपडा माराव्यात, इतक्या निरागस, निष्पाप पातळीवरची ही हिंसा आहे, अशी आपली समजूत करून देण्याचा हा प्रयत्न भासतो. पण, तो फसतो.
या प्रयत्नातली गोम उमगते सिनेमाच्या क्लायमॅक्सला. तिथे `मी मारामाऱया करत होतो, पण कुणाला जिवे मारण्याचा भयानक विचार कधीच माझ्या मनात आला नव्हता', असं मॅक्स एका नाटय़मय सिच्युएशनमध्ये पश्चातापदग्ध स्वरांत सांगतो. या मंडळींच्या मारामाऱयांमधला जोश पाहता, हे म्हणणं पटत नाही. आणि एरवीही हा युक्तिवाद भयाणच आहे. या युक्तिवादाच्या आधारावर प्रेक्षकांनी मॅक्सला खून माफ करावा, अशी लेखक- दिग्दर्शकांची अपेक्षा आहे. म्हणजे `मी समोरच्याच्या छातीत सुरा खुपसला, पण त्याला जिवे मारण्याचा माझा इरादा नव्हता', म्हटलं की प्रत्येक खुनी बाइज्जत बरी व्हायला मोकळा!
`जोश'च्या कथानकाची सगळी मांडणी आणि व्यक्तिरेखांचं लॉजिक हे त्या व्यक्तिरेखा कुमारवयीन- टीनएजर असल्यास त्यांना साजणारं आहे. सगळे प्रमुख कलावंत त्या वयोगटातले असते, तर प्रेक्षकाला आहे या स्थितीत न पटणाऱया अनेक गोष्टी आपसूक पटल्या असत्या. मन्सूरनं दोन्ही टोळ्यांमधली दुय्यम पोरं या वयोगटातली निवडली आहेत. मात्र, त्यानं निवडलेल्या प्रमुख कलावंतांनी जोशपूर्ण अभिनय केला असला तरी त्यांच्यापैकी कुणीच टीनएजर वाटत नाही, याचा सिनेमाच्या परिणामकारकतेवर परिणाम होतो.
हे सगळे खटकणारे मुद्दे गृहित धरूनही `जोश', विशेषत: पूर्वार्धात जबरदस्त पकड घेतो. याचं श्रेय सगळ्या टीमचं आणि त्यांच्याकडून अव्वल कामगिरी करून घेणाऱया दिग्दर्शक मन्सूरचं. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कलादिग्दर्शनात कमालच केली आहे. गोव्याच्या वास्तव पार्श्वभूमीतल्या सर्व परिचयाच्या खुणा कायम ठेवून त्यांनी एक काल्पनिक दुनिया उभी केली आहे. `ईगल्स'चा अड्डा, वास्कोचा अंतर्भाग, हॉटेल, राहुलचं दुकान, मॅक्स आणि प्रकाश जिथे एकमेकांना भिडतात ती जागा, यासारख्या चित्रणस्थळांच्या त्यांनी केलेल्या रचनेत गोव्यातल्या वास्तुरचना, नगररचनेवर केलेलं कल्पनेचं आरोपण दाद देण्यायोगं आहे.
अशीच ए-वन कामगिरी आहे के.व्ही आनंद या छायालेखकाची. `जोश' पाहताना सगळ्यात पहिल्यांदा जाणवतो तो त्याचा अगदी वेगळा दृश्यात्मक पोत. सहसा व्यावसायिक सिनेमांमध्ये बाह्यचित्रणात वातावरण प्रसन्न दाखवण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळच्या जवळपासच्या, सोनेरी, तिरप्या प्रकाशाच्या वेळा गाठल्या जातात. `जोश'मध्ये प्रेमगीतांमधल्या काही प्रसंगांचा अपवाद वगळता कुठेही या वेळा साधलेल्या दिसत नाहीत. जास्तीत जास्त बाह्यचित्रणात माध्यान्हीची प्रखर उन्हाची वेळ दिसते. माणसे आणि झाडे, वास्तूंच्या सावल्या अगदी छोटय़ा दिसतात. दृश्यरचनेमध्ये अगदी अंधारा भाग आणि प्रखर प्रकाशित भाग यांचा खेळ दिसतो. या चित्रणपद्धतीमुळे पडद्यावरच्या सगळ्या प्रतिमांच्या रंगांना एक उजळ फिकेपणा मिळून किती वेगळा, चित्रासारखा लुक मिळालाय, हे प्रत्यक्षच पाहावे. प्रकाश आणि गँगचे सडकछाप कपडे, खुरटय़ा दाढय़ा, मॅक्स आणि गँगचे आधुनिक ट्रेंडी कपडे, सफाचट चिकनेचुपडे चेहरे यांतून रंगभूषा आणि वेशभूषाकारांची कामगिरी लक्षात येते. भावाच्या गँगबरोबर राहून टपोरी झालेल्या शर्लीच्या वेशांमध्ये राहुलच्या प्रेमात पडल्यानतंर घडणारा बदल, प्रेमगाण्यांमध्ये या दोघांचे लहान मुलांसारखे सस्पेंडर लावलेले `निरागस' वेश वेशभूषाकारांच्या बुद्धीमत्तेची साक्ष देतात.
मन्सूर खाननं आधी हा सिनेमा मनातल्या मनात फ्रेम बाय फ्रेम पाहिला आहे, याची खूण त्याच्या दृश्यविरेचन आणि टेकिंगमधून मिळते. त्याच्या हाताळणीतला जोशच `जोश'च्या पूर्वार्धात अशक्य ते शक्य करून दाखवतो, अविश्वसनीय ते विश्वसनीय बनवतो. अनु मलिकनं सिनेमाची धाटणी ओळखून दिलेलं उत्तम संगीत, फरहा खान, राजू खान आणि हॉवर्ड रोझमेयर यांचं आशयसुसंगत नृत्यदिग्दर्शन, प्रेमप्रसंग आणि प्रेमगीतांना लाभलेला खास मन्सूर खानचा हळवा, हळुवार टच यांच्या जोडीनं अंजन बिस्वास यांच्या जबरदस्त पार्श्वसंगीताचाही उल्लेख करायला हवा.
आधी उल्लेखल्याप्रमाणे `जोश'च्या सर्वच कलाकारांची कामगिरी उत्तम दर्जाची आहे. शाहरूख खानच्या मॅक्समध्ये त्याच्या आधीच्या नकारात्मक भूमिकांच्या छटा झळकत नाहीत. मॅक्सला त्यानं रानटी, रासवट खुनशीपणाची झाक दिली आहे. या त्याच्या कष्टांवर दिग्दर्शकानं उत्तरार्धात पाणी ओतलंय, तो भाग वेगळा, ऐश्वर्यानं साकारलेल्या शर्लीमध्ये सतत मुलांमध्ये राहून आलेले पुरुषी मॅनरिझम्स विशेष उल्लेखनीय आहेत. तिचं अत्यंत निर्विकार बेदरकारपणे हिंसा पाहणंही वेगळ्या जातकुळीचं, भूमिकेची समज दाखवणारं आहे. चंद्रचूड सिंगनं आपल्या गोड गुलगुलीत व्यक्तिमत्त्वाचा योग्य वापर करून राहुलचं बाह्यरूप साकारतानाच त्याची आंतरिक सत्त्वाची ताकदही भावाविष्कारांतून योग्य प्रकारे दाखविली आहे. शरद कपूरला प्रकाश हा त्याच्याकडून अपेक्षाच नसल्यानं विशेष प्रभावी वाटतो.  
कथानकाच्या रचनेत खलनायक ठरू शकणारा प्रकाश त्याच्या सहजतेमुळं स्खलनशील सामान्य माणसाच्या पातळीवर आला आहे. शाहरूखच्या प्रेयसीच्या `पाहुण्या' भूमिकेत प्रिया गिलला खास वाव नाही. अन्य मंडळींमध्ये  विवेक वास्वानी लक्षात राहतो.
एकूणात, सिनेमाच्या तंत्राची जादू अनुभवण्यासाठी `जोश' पाहाच, पण फार जोशात जाऊ नका, नाहीतर अंती पस्तावण्याची पाळी येईल.


(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment