Tuesday, April 26, 2011

प्रतिमाभंजनाचे 'मनोरंजन' (द मेसेंजर: द स्टोरी ऑफ जोन ऑफ आर्क)


अवघ्या 17 वर्षांच्या एका गावंढळ मुलीनं, एका देशाच्या निस्तेज सैन्यामध्ये प्राण फुंकला, एका बलाढय़ महासत्तेचा पराभव घडवून आणला. राजघराणातल्या वारसाला विधिवत राजमुकुट मिळवून दिला.
तीच मुलगी 19व्या वर्षी त्याच राजाकडून दुष्मनांच्या हाती सोपविली गेली. `देवाची दूत' म्हणून डोक्यावर घेतल्या गेलेल्या या मुलीवर चर्चनं खटला चालवून तिला चेटकीण ठरवलं आणि शिक्षा दिली जिवंत जाळण्याची.
तिला सार्वजनिकरीत्या जाळण्यात आलंही...
...खेळ खलास.
पण, खेळ इथेच संपला नाही. मृत्युनंतर 25 वर्षांनी तिला `निरपराध' घोषित करण्यात आलं. सुमारे पाचशे वर्षांनी तिला संतपदही बहाल झालं.
जोन ऑफ आर्कची ही कहाणी. नाटय़मय, थरारक आणि धर्मशास्त्र, तत्त्वज्ञानाच्या गहनाला अवगाहन करणारी.
म्हणूनच जोन ऑफ आर्कवर 1928 पासून (द पॅशन ऑफ जोन ऑफ आर्क- दिग्द. कार्ल ड्रेयर) 1999 पर्यंत अनेक सिनेमे निघाले. या कहाणीच्या ताकदीमुळे इन्ग्रिड बर्गमनसारख्या सुजाण अभिनेत्रीला 1948 मध्ये वयाच्या 33व्या वर्षी व्हिक्टर फ्लेमिंगच्या सिनेमात निम्म्या वयाची जोन साकारावीशी वाटली. रोबेर्तो रोझेलिनीलाही या अग्नीशिखेची धग अनुभवावीशी वाटली. (त्यात त्याची होरपळ झालीच.) जॉर्ज बनॉर्ड शॉच्या `सेंट जोन' या नाटकावरही सिनेमा निघाला.
या सगल्या सिनेमांच्या कर्त्यांना भावलं ते जोनच्या कर्मकहाणीमधलं प्रचंड भावनाटय़, नाटय़मय चढउतार... राजकारणी आणि धर्मकारण्यांच्या निष्ठुर डावपेचांत `बळी' गेलेली निष्पाप, कोवळी कुमारिका ही जोनची रूढ प्रतिमा... तिच्या मरणोत्तर संतपदाला वलयांकित करणारी.
ज्या प्रान्सच्या स्वातंत्र्यासाठी जोन लढली त्याच फ्रान्सच्या दिग्दर्शकानं, लुक बेसाँ यानं तिच्या या प्रतिमेवर मर्मभेदक आघात करावा, हेही काव्यगत न्यायासारखं विलक्षण नाटय़मय घटित आहे. `द मेसेंजर: द स्टोरी ऑफ जोन ऑफ आर्क' या सिनेमात लुकनं हे अघटित घडवलंय.
तेरा वर्षांची असल्यापासून जोनला (फ्रेंच उच्चार- जान) `देवाचा आवाज' ऐकू येत होता. तत्कालीन फ्रान्सवर कब्जा केलेल्या जुलमी ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येणार आहे, हे तिला देवानं सांगितलं. ही राजवट स्वत: जोन उलथवून टाकणार आहे, हेही तिला देवानं सांगितलं. फ्रान्सच्या पदच्युत राजाच्या मस्तकी राजमुकुटाची स्थापना करण्याची जबाबदारीही तिच्यावर देवानंच सोपवली. कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी लढाईत इंग्रजांचा पराजय होणार, याचेही स्पष्ट संकेत तिला देवानं दिले आणि हे सगळं या खेडवळ मुलीनं खरं करून दाखवलं. जे जे तिला देवानं सांगितलं, ते ते वास्तवात सिद्ध झालं, म्हणजे `तो' आवाज देवाचाच हेही सिद्धा झालं. `जोन ऑफ आर्क' वरच्या साहित्यकृती- नाटक- चित्रपटांनी म्हणूनच हा आतला आवाज जसाच्या तसा स्वीकारला. जोनच्या पराक्रमाचं हे थेट देववादी, आस्तिक विश्लेषण मान्य नसणाऱयांनी पराकोटीच्या सच्च्या धार्मिक श्रद्धेनं घडविलेला चमत्कार म्हणून जोनच्या देवाला मागच्या दारानं प्रेवश दिला.
तिचाच गाववाला लुक मात्र भलताच बेदर्दी निघाला. तिच्या कहाणीतल्या बहुतांश ऐतिहासिक संदर्भांशी प्रामाणिक राहूनच त्यानं सिनेमा काढला, पण त्यात एक मूलगामी प्रश्न उपस्थित केला, जोनला देवाचा आवाज मार्गदर्शन करत होता, की तो तिचाच आतला आवाज होता,... कर्कश, कर्णपटू. तिच्या व्यक्तिमत्त्वाला चैतन्य देणारी धार्मिक श्रद्धा होती, धार्मिक उन्माद होता की व्यक्तिगत सूडाची धग. जोन ऑफ आर्क ही धगधगतं प्रेरणादायी स्फुल्लिंग होती की `पॅरोनॉइड शिझोफ्रेनिक' मनोरुग्ण.
आपल्याकडच्या अनेक उन्मनी संतसत्पुरुषांच्या सामाजिक `प्रासादिक' वर्तनाचा आधुनिक मनोविश्लेषणातून लावला जाणारा अर्थ त्यांना मनोरुग्ण ठरवतो, याची आठवण `जोन ऑफ आर्क' पाहताना होते आणि जोनची व्यक्तिरेखा पाहताना आठवण होते ती `मंदीर वही बनायेंगे' छाप आकांडतांडवी, आक्रस्ताळी, अभिनिवेशी भाषणं देणाऱया उन्मादप्रेरित `सार्ध्वी'ची.
हा योगायोग निश्चितच नाही. ख्रिस्ती धर्मातल्या दहा पवित्र आज्ञांच्या (टेन कमांडमेंट्स) कसावर जोनचं वर्तन तपासण्याचा लेखक- दिग्दर्शकाचा मानस आहे. thou shalt not kill या आज्ञेच्या संदर्भात विचार करता जोनचं वर्तन कसं अधार्मिक ठरतं, हे बेसाँनं स्वत:ला आणि प्रेक्षकांना पटवून देण्याबरोबरच थेट इतिहासात शिरून चक्क जोनलाही ते पटवून देण्याचं धाष्टर्य़ केलं आहे. त्यासाठी त्यानं केलेली पटकथेची मांडणी चतुर आहे.
लहानपणापासूनच चर्चचं, देवाचं `वेड' घेतलेल्या जोनला देव `दिसतो', तो तिच्याशी बोलतो. तिच्यासमोर इंग्रज सैनिक तिचं गाव जाळतात, तिच्या बहिणीचा खून करून तिच्या प्रेतावर बलात्कार करतात. या घटनेनंतर जोनला विलक्षण `चमत्कारिक' वातावरणात शेतात तिची सुप्रसिद्ध तलवार सापडते. ती देवानं दिली, या समजुतीच्या बळावर ती फ्रेंच सेनेचं नेतृत्त्व करण्यापर्यंत मजल मारते. या सगळ्याला केवळ तिची दबलेली सूडबुद्धीच कारक होती, असं डस्टिन हॉफमनच्या रुपातली तिची सद्सद्विवेकबुद्धी तिला सोदाहरण आणि तर्कशुद्ध पद्धतीनं पटवून देते.
बेसाँचं हे तर्कट कुणाला पटो ना पटो, या सिनेमाला आकर्षक आणि विचारप्रवर्तक बनविणारा घटक हाच आहे. जोनची सद्सद्विवेकबुद्धी पुरुषी रुपात का दिसते, ती सद्सद्विवेकबुद्धी आहे. हे सिनेमा पाहणाऱयाला कळत नाहीच (ही माहिती बुकलेटातली), त्याला वाटतं, की जोनचा देवच तिला दमात घेतोय. तरीही यो सिनेमात सर्वात प्रभावी ठरतं, ते हे प्रतिमाभंजनच. बाकी उत्तम निर्मितीमूल्यं, लढायची तपशीलवार दृश्यं (मात्र या लढायांत कोण कुणाशी लढतंय, हे स्पष्ट होत नाही आणि एकही मुख्य व्यक्तिरेखा जखमी होत नाही, हा चमत्कारच!) बेसाँशैलीतलं `क्लोजअप' बहुल चित्रण, स्पेशल इफेक्ट्स. जोनच्या आजूबाजूच्या प्रमुख भूमिकांमध्ये डस्टिन हॉफमन, जॉन माल्कोविच, फे डनवे आदी मान्यवरांची जोरदार कामगिरी आणि (जोनचं बेसाँकृत मनोविश्लेषण मान्य असेल, तरच भावणारी) मिला जोवोविचची आक्रस्ताळी, आक्रमक, भाबडी जोन याही जमेच्या बाजू.
जोनशी भावनिक नातं नसल्यानं आपल्याला तिची ही मरणोत्तर उलटतपासणी तटस्थपणे न्याहाळून काही सार्वकालिक वैचारिक धडा घेता येईल. आपल्याकडच्या प्रत्यक्षाहून उत्कट `प्रतिमां'च्या बाबतीत असे कोणी करू धजण्याची शक्यताच नसल्यानं हा अनुभव असा उसनाच घ्यायचा.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment