Thursday, April 14, 2011

त्यांची आग, आपली होरपळ (प्रेमअगन)


`कभी कभी माँ-बाप अपने बच्चों के लिए गलत फैसला कर बैठते हैं... `प्रेमअगन' मध्ये अगदी शेवटच्या प्रसंगात हे वाक्य उच्चारलं जातं. तोवर थिएटरात थांबू धडलेल्या प्रेक्षकाला ते शंभर टक्के पटून जातं. कारण, फिरोज खाननं फरदीन खान या आपल्या मुलाच्या पदार्पणासाठी प्रेमपट काढणं, या दुर्घटनेचं संपूर्ण सार या एका वाक्यात सामावलंय.
फरदीनकडे फिरोज खानच्या खानदानाचा पठाणी रुबाबदार देखणेपणा आहे. खान कुटुंबियांच्या वकुबाची माफक भावभिव्यक्तीही त्याला जमते. त्यामुळे त्याला नायकपदाची गादी चालवायला देण्यात गैर काहीच नाही. मुलाचा पहिला सिनेमा आपणच दिग्दर्शित करावा, हा फोरजचा निर्णय मात्र `गलत फैसला' ठरला आहे.
फिरोज खानचे सिनेमे काही विशिष्ट घटकांनी ओळखले जातात आणि त्यासाठीच पाहिले जातात. भव्यता, चकाचक लोकेशन्स, हेलिकॉप्टर्स, महागडय़ा मोटारी, मोटरसायकली, स्टडफार्म्स, उमदे जातिवंत घोडे, परदेशांतली पॉलिश्ड् बाह्यचित्रण स्थळं, पाश्चात्य प्रभावाची मनोवृत्ती, बाह्यरूप आणि पेहराव धारण करणारे नायक, उन्मादक, अल्पवस्त्रांकित, आक्रमक नायिका, नेहमीपेक्षा वेगळ्या सुरावटीचं आकर्षक संगीत आणि `सेन्शुअस' दृश्यांची वेगवान हाताळणी ही फिरोजच्या सिनेमाची बलस्थानं. `प्रेम अगन'मध्ये हे सगळे घटक प्रेमकहाणीमध्ये भरून कॉकटेल बनवण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. पण दुर्दैवानं `प्रेम अगन'ला मचूळ पाण्याची कळा आली आहे.
याचं एक कारण अगदी उघड आहे. मुलाचं पदार्पण सुरक्षित करण्यासाठी फिरोजनं गरीब-श्रीमंतांचं प्रेम आणि त्यातून उद्भवणाऱया खानदानी दुष्मनीचं घिसंपिटं कथानक निवडलंय, फरदीनचा कोवळा सुकुमार चेहरा आणि बळकट शरीरयष्टी या दोहोंनाही न्याय देण्यासाठी हा `पुराना फॉर्मुला' काही वाईट नव्हता. पण, असा फॉर्मुला सादर करताना समकालीन ताजेपणाची जी जोड द्यावी लागते, ती लेखक म्हणून फिरोज देऊ शकलेला नाही. आजच्या जमान्यातली ही कोवळी मुलं त्यांच्या वडिलांच्या काळातली जड, प्रतिमाप्रचुर भाषा बोलतात. भंपक नैतिक मूल्यं मांडतात, तेव्हा वरवरचं पॉलिश उडून जातं आणि सगळा सिनेमा उघडा पडतो.
सूरज (फरदीन) आणि सपना (मेघना कोठारी) यांची ही प्रेमकहाणी. दोघे एका कॉलेजातले. सूरज एका लष्करी अधिकाऱयाचा (राज बब्बर) `गरीब' मुलगा आणि सपना ही जे.के. (अनुपम खेर) या धनाढय़ उद्योगपतीची मुलगी. त्यांचं प्रेम जेकेला मान्य नसतं. तो सूरजच्या जिवावर उठतो. सूरज जगायला हवा असेल, तर मी सांगतो त्याच्याशी लग्न कर, अशी धमकी देऊन तो सपनाला ऑस्ट्रेलियात घेऊन जातो. मागोमाग सूरज तिथे पोहोचतो. तिथे सपनाच्या भावी नवऱयाचे (संजय भाटिया) दुर्गुण समजल्यावर जेके त्याला गोळी घालून ठार मारतो आणि `माझा निर्णय चुकलाच' म्हणून प्रेमिकांचं मीलन घडवून आणतो, अशी ही कथा.
प्रासादतुल्य घर, घरातल्या हेलिपॅडवर सारखा हेलिकॉप्टरमधून उतरणारा आणि बोलताना दिल्लीतल्या मंत्र्यांचे सलगीयुक्त संदर्भ देणारा बाप, परदेशी बनावटीच्या मोटारी, श्रीमंतांघरीच साजणारे श्वान यातून सपनाचं ऐश्वर्य दिसून येतं. त्या तुलनेत सूरजची गरिबी काही त्याचे कपडे, सायकल, डोंगरउतारावरची शॅक आणि परदेशी रेसर मोटरसायकल यातून दिसत नाही. सपनाच्या तुलनेत सूरज गरीब असेलही; पण या दोघांच्या तुलनेत प्रेक्षक अतिगरीब असल्यानं त्याच्या नजरेत ही दोघंही श्रीमंतच राहतात. तफावत काही भिडत नाही.
अंगप्रदर्शक कपडे घालून नायिकेचे नायकाला लगटणे, फिरोज खान पद्धतीची शारीर संबंधसूचक प्रेमदृश्यं यातून सूरज-सपना हे आधुनिक (आणि समकालीन?) टीनएजर असावेत, अशी अपेक्षा निर्माण होते. किमान फिरोजच्या सिनेमात लैंगिकतेबद्दलच्या दुटप्पी पावित्र्याच्या कल्पना नसणार, असा विश्वास वाटतो. पण, नायकाच्या घरात केवळ एका तलम शर्टातली नायिका `मला यौवनाची `ती' वेदना दे' असं नायकाला खुलं निमंत्रण देते. घट्ट मिठीतलं एक प्रदीर्घ चुंबनदृश्य घडतं. आणि एकदम नायक भानावर येऊन `भावनेच्या आवेगात आपण लग्नाआधी असं करायला नको' सांगून माघार घेतो, हा भारतीय `संस्कृती'नं घडवलेला फिरोजचा पराभव मानायला हवा. हे घडवायला सूरज बडजात्या, आदित्य चोप्रा वगैरे मंडळी आहेतच की! `एट टू फिरोज?'
भारतातही खोलात खोल गळ्याचे घट्ट कपडे घालून अत्र-तत्र-सर्वत्र वावरणारी सपना ऑस्ट्रेलियात पिसाटलेल्या आपल्या भावी नवऱयाला `भारतीय सभ्यते'ची महती सांगू लागते, तेव्हा तर हसूही येत नाही. फिरोज खानच्या नायिकेवर भारतीय संस्कृतीच्या गुणगानाची वेळ यावी! केवढा हा `अध:पात'!
शेवटी सपनावर बळजबरीचा प्रयत्न करणाऱया तिच्या भावी नवऱयाला जेके गोळ्या घालून ठार मारतो, तेव्हा प्रेक्षकाला सहानुभूती वाटते ती त्या मरून पडलेल्या मंगेतराबद्दल, त्याला आपलं प्रेमप्रकरण न सांगता, साखरपुडय़ाची अंगठी घालून सहा महिने रोज रात्री त्याच्यासोबत दारू ढोसणाऱया सपनाचा ही बळजबरी ओढवून घेण्यात मोठा दोष आहे, हे तिच्या बापाला दिसत नसलं, तरी प्रेक्षकाला कळतं. आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिला असं वागायला लावणारा बिनडोक बापच सर्वांत मोठा गुन्हेगार. तो भलत्यालाच गोळी घालून स्वत:ची सुटका करून घेतो. पण, त्यामुळं या सगळ्या प्रेमप्रकरणाबद्दल प्रेक्षकांच्या मनात तिरस्कारच निर्माण होतो.
फरदीन खानचं रुपेरी पडद्यावरचं पदार्पण अगदीच पडत नाही, याचं एकमेव कारण म्हणजे त्याचं देखणं, मर्दानी व्यक्तिमत्त्व, त्याच्या चेहऱयावर प्रसंगानुरुप काही ठरीव भावही यांत्रिकपणे उमटतात. पण, पंचाईत होते तो संवाद बोलू लागल्यावर. त्याच्या हिंदी बोलीत हिंदी पाच टक्के आणि इंग्रजी पंच्याण्णव टक्के आहे. त्याची उच्चाराची धाटणीच आंग्ल आहे. त्यात त्याच्या संवादफेकीवर प्राथमिक मेहनतही घेतली गेलेली नाही. त्यामुळे, टीव्हीच्या `न्यूज चॅनेल्स'वर इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही बातम्या देणारे निवेदक ज्या पद्धतीनं हिंदी बातम्या वाचतात, तसे फरदीन संवाद `वाचतो.'
नवोदित नायिका म्हणून मेघना कोठारीला निवडताना फिरोजनं राज कपूरचं पुण्यस्मरण केलं असावा. लहान मुलीसारखा निष्पाप, निरागस चेहरा आणि त्याखाली पूर्ण वाढेलेलं `बाई'चं भरगच्च शरीर, असं `कॉम्बिनेशन' मेघनामध्ये आहे. पण त्यातही एक गफलत आहे. मेहनाचा चेहरा अगदी तीन-चार वर्षांच्या मुलीसारखा आहे. आणि त्या वयाची मुलगी `आईस्क्रीम पार्लर'मध्ये गेल्यावर तिच्या चेहऱयावर जसे आश्चर्यचकित भाव उमटतात, तसे भाव मेघनाच्या चेहऱयावर कायमस्वरुपी चिकटवल्यासारखे दिसतात... अगदी मोठ्ठे डोळे करून ती संपूर्ण सिनेमात वावरते आणि सिनेमाभर तिच्या डोळ्यांत एकही भाव उमटत नाही. तिची संवादफेकही कॉन्व्हेन्टप्रदूषित आहे आणि संवादफेक शाळकरी मुलीसारखी. फिरोजनं तिला दिलेल्या श्वाससुद्धा घुसमटेल अशा अतिघट्ट कपडय़ांमध्ये ती किमान संवाद उच्चारते, हेच खूप झालं म्हणायचं.
या मुख्य जोडीपेक्षा समीर मल्होत्रा (सपनाचा भाऊ) आणि शमा गेसावंत (त्याची प्रेयसी) ही दुय्यम जोडीच अधिक जमिनीवरची आणि मोकळी वाटते. त्यातही शमा निश्चितपणे उजवी. या सगळ्या तरुण मंडळींमध्ये अस्खलित हिंदी- उर्दू बोलणारा संजय भाटिया उठून दिसतो. त्याचा वावरही आत्मविश्वासपूर्ण आहे. पण त्याची भूमिका आकाराला येण्याआधीच संपते.
राज बब्बर, बीना, स्मिता जयकर हे बुजुर्ग सफाईदार काम करतात (). करी छाप पाडतो अनुपम खेर. मुलीला आपल्या मनाप्रमाणे वागायची शपथ घ्यायला लावल्यावर ती `मरेपर्यंत तुमच्याशी बोलणार नाही, तुम्ही माझा आवाज ऐकायला तरसाल', असा `शाप' देते; तेव्हा बापाचं विद्ध होणं त्यानं लाजवाब दाखवलंय. मुलीचा आवाज ऐकायला व्याकुळ झालेल्या बापाची तडफडही त्यानं उच्च साकारलीये.
अनू मलिकनं `प्रेमअगन'ला मेहनत घेऊन फिरोज खान पद्धतीचं संगीत दिलंय. पण कल्पनाशून्य चित्रण आणि `नाच पाहतोय की युद्धकलेचं प्रात्यक्षिक' असा प्रश्न पाडणारं नृत्यदिग्दर्शनयांनी गाण्यांची माती केलीये.
अन्य तांत्रिक अंगे फिरोज खानच्या लौकिकाला साजेश आहेत. विशेषत: ऑस्ट्रेलियातल्या लोकेशन्सची नैसर्गिक भव्यता छायालेखक कबीर लालनं उत्तम टिपलीये.
एकूणात प्रेमाच्या या आगीतून प्रेक्षकाला कसलीही ऊब मिळण्याऐवजी होरपळच होण्याची शक्यता अधिक आहे.


(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment