Friday, April 15, 2011

एकटा जीव गंगाराम (जिस देश मे गंगा रहता है)


`आय ऍम अ स्ट्रीट डान्सर' म्हणत `इल्जाम'मध्ये बेफाम नाचत गोविंदानं जेव्हा देशभरातल्या प्रेक्षकवर्गाचं लक्ष वेधून घेतलं, तेव्हापासूनच मराठी प्रेक्षकांना त्याच्या दिसण्या-वावरण्यात, विशेषत: हसण्यात दादा कोंडकेंची छाप जाणवत होती.
डेव्हिड धवन प्रभृतींनी त्याच्यकडून विनोदी किंवा `इनोदी' भूमिका करवून घेताना बऱयाचदा ग्राम्य, रांगडा, अश्लीलतेकडे झुकणारा `दादा कोंडकेपणा'ही कारायला लावला होता. पण, त्याला थेट दादांनीच भूमिका कुणी करायला दिली नव्हती.
तो उपक्रम महेश मांजरेकरनं केला आहे. दादांच्या `एकटा जीव सदाशिव'वरून प्रेरणा घेऊन बनवलेल्या `जिस देश मे गंगा रहता है'मध्ये तिथल्या सदाशिवचा गंगाराम झाला आहे. मात्र, अठ्ठावीस वर्षापूर्वीच्या सिनेमाचा आशय नव्या काळाशी सुसंगत करून घेण्याचे कष्ट लेखक- दिग्दर्शकानं न घेतल्यामुळे या  `एकटा जीव गंगाराम'मध्ये `एकटा जीव सदाशिव'ची खुमारी औषधालाही उरलेली नाही.
हा साधा-भोळा गंगा (गोविंदा) रामपूर नावाच्या गावात एका मेंढपाळ कुटुंबात वाढलेला. त्याच्यावर जिवापाड प्रेम करणाऱया बापू (शिवाजी साटम) आणि माँ (रीमा लागू) यांना तो आपले आईबाप समजत असला, तरी प्रत्यक्षात मात्र तो शहरातल्या एका श्रीमंत दाम्पत्याचा (शक्ती कपूर- हिमानी शिवपुरी) मुलगा असतो. तो दोन वर्षांचा असताना तीव्र ऍनिमियावर उपचार म्हणून त्याला चोवीस वर्षे शेळ्यामेंढय़ांच्या सहवासात ठेवावं. असा सल्ला एका वैद्यानं दिलेला असतो.  
त्यानुसार तो या कुटुंबात, या गावात तिथल्या इतरांसारखाच अडाणी- गावंढळ म्हणून वाढतो. गावातल्याच सावनीबरोबर (सोनाली बेंद्रे) लग्न करायची त्याची इच्छा असते. पण, तो 26 वर्षांचा झाल्यावर त्याचे खरे वडील त्याला शहरात घेऊन जातात. तिथल्या परीटघडीच्या शहरी वातावरणात त्याचा जीव गुदमरतो. तरीही मूळच्या लाघवी स्वभावामुळे तो या नव्या कुटुंबातल्या घडोमोडींमध्येही गुंतू लागतो
टीना (रिंकी खन्ना) ही शहरी मैत्रीण आणि (तिच्या बाजूनं) एकतर्फी प्रेमिका त्याला मिळते.
या नव्या कुटुंबातल्या गुंत्यातून गंगा एका भलत्याच तापदायक प्रकरणात गोवला जातो. त्यातून आणि त्याचबरोबर या शहरी जंजाळातून त्याची सुटका कशी होते, याची कहाणी म्हणजे हा सिनेमा.
मुळात अस्सल मराठी वाणाच्या `एकटा जीव सदाशिव'वर हिंदी सिनेमा काढणं, हे धाडसच आहे. `एकटा जीव...'कडे सहजगत्या वळू-वाकू शहणारी मराठी भाषा, महाराष्ट्राची सुस्पष्ट पार्श्वभूमी आणि अतिसामान्य माणूस दिसू शकणारे दादा कोंडके हे प्राथमिक महत्त्वाचे घटक होते. दादांची अफलातून विनोदबुद्धी आणि तोवर पक्की झालेली इमेज यांची जोड त्या घटकांना होती.
`...गंगा...'कडे यातलं काहीही नाही. हिंदी भाषेत मराठीची लवचिकता नाही. चित्रणस्थळं, कला-दिग्दर्शन, वेशभूषा, पात्रांची बोली यातल्या कशातूनच `...गंगा...'चा परिसर अधोरेखित होत नाही. गुजराथ, राजस्थान आणि महाराष्ट्र यांच्या संस्कृतींची सरमिसळ `...गंगा...'मध्ये दिसते. अर्थात, हा दोष म्हणूनच पाहण्याची गरज नाही. देशभरात जाणाऱया व्यावसायिक सिनेमात पात्रांना (विशेषत: नायक- नायिकांना) ठाशीव प्रादेशिक ओळख सहसा दिली जात नाही. कारण, त्यामुळे त्या सिनेमाचं अपील एखाद्या राज्या-प्रदेशापुरतंच मर्यादित राहतं.
(महाराष्ट्रातही कोकणी, वैदर्भी, खानदेशी या मराठीच्याच बोलीभाषांतले- त्या त्या प्रेदशांची वैशिष्टे जपणारे सिनेमे काढले तर, उर्वरित महाराष्ट्रात कितीजण पाहतील याचा अंदाज बांधून पाहा.) पण, वेगवेगळ्या प्रदेशाची वैशिष्टय़ं एकत्र आणणारा हा `पॅन- इंडियन' मांडणीचा प्रकार या सिनेमात चपखल बसलेला नाही. शिवाय रोज चकचकीत दाढी करून, कडक इस्त्राeचे डिझायनर एथनिक कपडे घालून शेळ्या हाकणारे, अत्याधुनिक नृत्यप्रकार आत्मसात करून नाचणारे गोविंदा आणि सोनाली खोटे खोटेच वाटतात. जिथल्या तरुण मलानं बहुमजली इमारतही पाहिली नसेल, इतक्या निर्जन भागातला, इतका अडाणी, गावंढळ तरुण म्हणून गोविंदाला स्वीकारताच येत नाही.
सगळ्यात मोठी गफलत झाली आहे ती `एकटा जीव...'ला आशय जवळपास जसाच्या तसा उचलण्यामध्ये. तीस-पस्तीस वर्षांपूर्वीची ग्रामीण आणि शहरी भागांमधली राहणीमानापासून मूल्यविचारांपर्यंतची तफावत आज पुसट झाली आहे; संघर्ष आहेत, पण त्यांचे मुद्दे बदललेले आहेत. स्लीव्हलेस ब्लाऊझ वापरणाऱया, केस कापणाऱया बायकांची `मॉडर्न' म्हणून हेटाळणी करण्याचा काळ खेडय़ापाडय़ांतही इतिहासजमा झालाय.  
गरीब- भाबडा (म्हणजे बावळटच) ग्रामीण नायक हा श्रेष्ठ दर्जाचा माणूस असतो आणि शहरी- श्रीमंत मंडळी ही स्वार्थी- आत्मकेंद्रित म्हणून दुय्यम दर्जाची, ही सुष्ट-दुष्ट विभागणी फारच ढोबळ आणि बटबटीत झाली आहे. याचं भान लेखक दिग्दर्शकानं ठेवलेलं नाही. त्यामुळंच इथली शहरी, आधुनिक टीना धाडदिशी गंगाच्या प्रेमात पडते, त्याच्याशी लग्न करून गावात घर करायला तयार होते, तेव्हा (आणि दुर्दैवानं तेव्हाच) खोखो हसू येतं. आणि `किस देश में गंगा रहाता है?' असा प्रश्न विचारावासा वाटतो.
विनोदनिर्मितीसाठी महेशनं किशोर नांदलस्कर, अतुल काळे, मकरंद अनासपुरे या मराठीतल्या रंगकर्मींचा नाटकीय धाटणीचा वापर केला आहे. तो लक्षणीय आहे. मात्र, मुका, अपंग, तिरळा, सतत दम लागणारा अशा माणसांवर, शारीर व्यंगावर आधारलेला हिणकस विनोद या सिनेमात बराच आहे.
गंगाचे (खरे) आईवडील त्याला 24 वर्षांत भेटायला का येत नाहीत; गंगाला त्याच्या आईवडिलांची- सावनीची प्रकर्षानं आठवण का येत नसते, तो टीनाशी लग्न करायला कसा तयार होतो, वगैरे अनेक प्रश्न या कथा-पटकथेत अनुत्तरित राहतात. पण, ते स्वाभाविकच म्हणायला हवं.
कारण, मूळ कथाबाजीवर काहीही संस्कार न केल्यामुळं अनेक ठिकाणी काय घडवायचं याचा गोंधळ उडाल्याचं स्पष्ट दिसतं. त्यातूनच इथे शीर्षकगीतापाठोपाठ लगेचच्या पुढच्या प्रसंगात `केम छे'हे गाणं जोडलेलं आहे.
 आनंद राज आनंदचं धमाल संगीत ही `...गंगा...'ची सगळ्यात जमेची बाजू आहे. गोविंदाच्या सिनेमांमधल्या गाण्यांकडून नाचऱया टाइमपासची अपेक्षा असते. ती ही गाणी शंभर टक्के पूर्ण करतात. सिनेमातली यच्चयावत गाणी मस्त ठेका धरायला लावणारी आणि लोकसंगीताच्या गोडव्याची आहेत. निमेश भट यांची कोरियॉग्राफीही एकदम `सही' पण, त्यांचा वापर पानपूरकांसारखा झाल्यानं किमान दोन गाणी थेट अनावश्यकच वाटतात सिनेमात.
गोविंदाचा सराईत वावरही या सिनेमाला फारसा तारू शकत नाही. मात्र, त्याला शिवाजी साटम आणि रीमा  यांनी चांगलं साथ दिली आहे. विशेषत: रीमा आणि गोविंदा यांच्यातल्या भावनिक प्रसंगांमध्ये अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळते. सोनाली बेंद्रे ठीकठाक. रिंकी खन्नाला फारसा वाव नाही. अन्य मंडळींमध्ये आपले किशोर नांदलस्कर अफलातून `लवचिक' कामगिरी करून जातात.
एकूणात, कुठे मनाचा ठावच न घेणारा हा गंगाराम थिएटरमध्ये `एकटा जीव' राहिला, तरी प्रेक्षकांनी फार कणव वाटून घ्यायची गरज नाही.

No comments:

Post a Comment