Monday, April 4, 2011

'स्लमडॉग' आणि 'चेंज'


`चेंज' हा नव्या जगाचा मूलमंत्र आहे, हे सूत्र अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होताना बराक ओबामा यांनी मांडले होते. ते किती खरे आहे, याचे प्रत्यंतर सोमवारी पहाटे लॉस एंजेलिसमध्ये रंगलेल्या 81व्या ऑस्कर पुरस्कार सोहळय़ात आले. ज्या हॉलिवुडमध्ये भारतीय माणसे ही नोकरांच्या, मांत्रिकांच्या दुय्यम भूमिकांपुरती दिसत आणि त्यांच्यावर वांशिक विनोद केले जात, त्याच हॉलिवुडच्या सर्वोच्च पुरस्कार सोहळय़ात गोरे नर्तक-नर्तकी गव्हाळ रंगरंगोटी करून, भारतीय वेशभूषेमध्ये एका भारतीय संगीतकाराच्या हिंदी गाण्यावर थिरकत होते... जग किती वेगाने बदलते आहे, याचे हे थक्क करणारे विश्वरूपदर्शन होते.  
या सोहळय़ात घडलेला इतिहास एवढय़ापुरताच मर्यादित नव्हता. याच सोहळय़ात भारतीय कथानकावर आधारलेल्या, भारतात चित्रित झालेल्या आणि भारतीय अभिनेते-तंत्रज्ञांचा मोठा सहभाग असलेल्या `स्लमडॉग मिल्यनेअर'ने अपेक्षेनुसार आठ ऑस्कर पुरस्कार पटकावून पुरस्कारांची सेंच्युरी साजरी केली. त्यापैकी दोन ऑस्कर `मोझार्ट ऑफ मद्रास' या नावाने जगद्विख्यात झालेला संगीतकार . आर. रहमानने जिंकली, तर एकावर त्याचा साथीदार, साऊंड इंजीनियर रसूल पुकुट्टी याने नाव कोरले
`जय हो' या गाण्यासाठी रहमानने मिळवलेल्या ऑस्करमध्ये गीतकार गुलजार यांचाही वाटा आहेच. त्याचवेळी, भारतातच चित्रित झालेल्या `स्माइल पिंकी' या लघुपटानेही सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटाचा पुरस्कार पटकावला. हॉलिवुडने `जय हो'च्या सुरावटीवर `जय हिंद' म्हणत भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेली ही मानवंदनाच आहे. भारतीय चित्रपटसृष्टी निर्मितीच्या हिशोबात जगात सर्वात मोठी. परंतु, तिचा जागतिक प्रभाव नगण्यच होता. गेल्या काही वर्षांत परदेशस्थ भारतीयांना अस्सल देशी मनोरंजन पुरविण्याच्या मिषाने भारतीय चित्रपटांनी पाश्चात्त्य बाजारपेठांमध्ये शिरकाव केला आणि हा हा म्हणता तेथे मुसंडी मारली. मसालेदार भारतीय `करी'ने जसे पाश्चात्त्यांना वेडे केले, तसेच खूळ त्यांना मसालेदार भारतीय चित्रपटांनीही लावले. अतिनाटकी, शैलीबाज, नाच-गाणीयुक्त देशी मसाल्याचा त्यांना ठसका बसेनासा झाला. उलट या `मिसळी'ची चटक लागू लागली. पाश्चात्त्यांवर भारतीय चित्रपटशैलीचा प्रभाव पडू लागला. `बॉम्बे ड्रीम्स'सारखा मेनस्ट्रीम ऑपेरा आणि `मू लां रूज'सारखा चित्रपट पाहिल्यावर हा प्रभाव किती सखोल मुरला आहे, हे लक्षात येते. तरीही अस्सल भारतीय चित्रपटशैलीला हॉलिवुडची अधिकृत मान्यता मिळाली नव्हती. ती मिळविण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले ते आमिर खान-आशुतोष गोवारीकर यांनी. `लगान' हा चित्रपट ऑस्करच्या परीक्षकांच्या अभिरुचीला साजेसा बनविण्यासाठी त्यातील नाचगाणी वजा करण्याचा मतलबी हिशेबीपणा त्यांनी केला नाही. उलट, हीच आमची चित्रपटशैली आहे, तिचा आहे तसा स्वीकार करा अथवा नाकारा, अशी बेडर भूमिका त्यांनी घेतली.  
आज `ऑस्कर' सोहळय़ात मिळालेल्या यशाचा तो खरा पाया होता. नृत्य-संगीतमय भारतीय चित्रपटशैली हा हॉलिवुडसाठीच नव्हे, तर जगभरासाठी कुचेष्टेचा आणि थट्टेचा विषय होता. आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहून जागतिक अभिरुची विकसित झालेले एतद्देशीय अभिजनही व्यावसायिक भारतीय चित्रपटांना `बाजारू' म्हणून नाके मुरडतात. स्वप्नरंजनवादाच्या अतिरेकाने निर्बुद्ध करमणूक करू पाहणारे बहुतांश चित्रपट हे त्या पात्रतेचेच होते, हे नाकारता येणार नाही. या चित्रपटांमधील `गरीब' नायक झोपडपट्टीमध्ये चार खोल्यांच्या प्रशस्त घरांमध्ये राहात. त्यांच्याकडे अत्याधुनिक फॅशनचे कपडे असत. एकदाही अभ्यास करता ते बीएला फर्स्टक्लास फर्स्ट येत आणि रोज गाजराचा हलवा करून त्यांना खिलवणे त्यांच्या गरीब आईला परवडत असे. मन मानेल तेव्हा स्वप्नात नायिकेसह काश्मीर-ऊटी-महाबळेश्वरला जाऊन कधी याच्या तर कधी त्याच्या आवाजात गाणी गाण्याची कला त्यांना साधलेली असे. अंगावरच्या कपडय़ांची घडी मोडता एकाचवेळी 25 गुंडांना लोळविण्याचे कौशल्यही त्यांच्या अंगी असे. अशा स्वस्त पलायनवादी चित्रपटांनी भारतीय शैली बदनाम केली आणि तिच्यातील स्वयंभू गुणांवर दोषांचा बट्टा लागला. पाश्चात्त्य चित्रपटशैली प्रामुख्याने यथार्थवादी आहे. हॉलिवुडचे फँटसीयुक्त चित्रपटही यथार्थवादी शैलीने साकारले जातात. म्हणजे, `सुपरमॅन' किंवा `बॅटमॅन'च्या चित्रपटांमधील जगाचे चित्रण हे त्या जगात `सुपरमॅन' किंवा `बॅटमॅन' जणू खरोखरीच अस्तित्त्वात असावेत, अशा प्रकारचे असते. त्याउलट भारतात मात्र सामान्य माणसांची कथाही तिचे पडद्यावरचे `नाटक' करून मांडलेली असते. पाश्चात्त्य नायकाची मानसिक उलाघाल त्याच्या मुद्राभिनयातून व्यक्त होत असेल, तर भारतीय नायकाची मानसिक उलाघाल त्याच्याभोवती गरगर फिरणारा कॅमेरा, मागे आर्त गीत आणि नैसर्गिक प्रकाशाचे सर्व नियम उलटेपालटे करणारी उघडझापी प्रकाशयोजना अशा सगळय़ा बाह्य घटकांनी दर्शवली जाते. पाश्चात्त्य चित्रपट हा पडद्यावर `जणू खरेच असे काही' घडवण्याच्या अट्टहासात असतो, तर भारतीय चित्रपट प्रेक्षकांना तुम्ही पडद्यावर वास्तवाचे अद्भुत कल्पनारम्य चित्रण पाहायला आला आहात, असेच बजावत असतो. आज हे टिपिकल भारतीय, `लार्जर दॅन लाइफ' स्वप्नरंजन हॉलिवुडच्या सर्वोच्च सन्मानाला पात्र ठरले आहे.
`स्लमडॉग मिल्यनेअर'चे यश हे `भारतीय यश' कसे मानायचे, असा प्रश्न अनेकांना पडतो. या चित्रपटाचा भारतीय संदर्भ वर उल्लेखलेला आहेच. पण, त्याहून महत्त्वाची आहे ती त्याची शैली. काळामध्ये हेलकावे खात सिनेमा पुढे नेणाऱया डॅनी बॉइलच्या शैलीत खास भारतीय `मसाला' ठासून भरलेला आहे. सायमन ब्युफॉयची पटकथा, डॅनी बॉइलचे शॉट टेकिंग आणि छायालेखक अँथनी डॉड मँटल याने केलेली प्रकाशयोजना या सर्वांमध्ये भारतीय शैलीची छाप आहे. या सर्वांना ऑस्कर मिळाले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. भारतीय शैलीला सलाम म्हणूनच चित्रपट संपल्यानंतर श्रेयनामावलीसाठी `जय हो' हे गाणे नृत्यासह चित्रित करण्यात आले आहे. त्या गाण्यालाच ऑस्कर मिळाले आहे तसेच संपूर्ण चित्रपट एकत्र बांधणाऱया रहमानच्या ऊर्जस्वल पार्श्वसंगीतालाही ऑस्कर मिळाले आहे
`स्लमडॉग...'च्या केंद्रस्थानी असलेले `हरवले-गवसले'चे सूत्र आणि अंडरडॉगचा `विजय' यावरच तर आजवर कोटय़वधी भारतीय प्रेक्षकांचे भरणपोषण झाले आहे. `स्लमडॉग...'ने भारतातील गरिबी `विकली' असा अज्ञानमूलक आरोप अजूनही केला जातो. भारतीय गरिबी विकणे एवढे सोपे असते, तर ती येथील `विक्रीतज्ञ दुकानदारां'नी का नाही विकली? आपण झोपडपट्टय़ा ही शहरांवरील खरूज असल्यासारखे वागायचे आणि तेथील रहिवाशांना अस्पृश्य असल्यासारखे वागवायचे. तेथून जाता-येता नाक दाबून आणि डोळे बंद करून चालायचे आणि ते वास्तव कोणी पडद्यावर मांडून दाखवले की त्याला नावे ठेवायची, हा दुटप्पीपणा झाला.
`स्लमडॉग...' हा गरिबी किंवा झोपडपट्टीवरचा सिनेमा नाही. ही कहाणी आहे त्या गदळातही फुलण्याची क्षमता विकसित करण्याच्या चिवट जीवनाकांक्षेची. विपरीत परिस्थितीवर मात करण्याच्या जिद्दीची. म्हणूनच जागतिक मंदीच्या उदासवाण्या काळात तिला जागतिक `अपील' आहे. अमेरिकेतील `चेंज'चा सूत्रधार बराक `हुसेन' ओबामा आहे आणि तेथे डोक्यावर घेतल्या गेलेल्या `स्लमडॉग...'चा अंडरडॉग `जमाल मलिक' आहे, यालाही काही वांशिक संदर्भ आहेच. जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या हेकट आणि संकुचित नेतृत्त्वाखाली अमेरिकेने इराकपासून अफगाणिस्तानापर्यंत मुस्लिम जगतात घातलेल्या नंगानाचाचा हा सामूहिक पश्चात्ताप असावा.  
एकमेकांविषयीच्या साचेबद्ध कल्पनांच्या भिंती मोडून पाडल्याखेरीज नव्या जगाचे खरे आकलन होणार नाही, याचे भान किमान तेथे तरी येऊ लागले असावे, याची ही नांदी आहे. `स्लमडॉग...'च्या यशाचा खरा अन्वयार्थ हा आहे.

(प्रहार)

No comments:

Post a Comment