महेश कोठारे- लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीच्या `थरथराट', `झपाटलेला', `धडाकेबाज', `दे दणादण' या हिट सिनेमांमुळे त्यांच्या `ऍक्शन कॉमेडी'कडून प्रेक्षकांच्या काही खास अपेक्षा असतात. कारण, या जोडीचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे. लक्ष्या आणि महेश या नावांनीच ते सिनेमात वावरतात. एकमेकांचे मित्र असतात. लक्ष्या हा वेंधळा, बेरकीपणा करण्याच्या प्रयत्नात नेहमी फसणारा, भाबडा `चालू' इसम असतो; तर महेश दिलेर, जिगरबाज, हिंमतवान मर्दमराठा (बहुतेक वेळा इन्स्पेक्टर.) लक्ष्यानं घोळ घालायचे, महेशनं ते निस्तरायचे, हा यांचा पूर्णवेळ उद्योग, आणि त्यांच्या या उचापत्यांमधून कधीतरी एखादा खरतनाक गुन्हेगार किंवा टोळीच त्यांच्याकडून जेरबंद होते, हा या `महेश-लक्ष्या'पटांचा साचा आहे.
या हमखास यशस्वी फॉर्म्युलाला रहस्य आणि थराराची झकास फोडणी देणारा `खतरनाक' या जोडीकडूनच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो आणि वर अनपेक्षित असा बोनसही देतो.
`खतरनाक'मध्ये एक खतरनाक गुन्हेगार दर अमावस्येला गावातल्या एका उद्योगपतीचा बळी घेतो. स्वत:ला चलाख समजणारा पण प्रत्यक्षात बावळट, घाबरट असलेला इन्स्पेक्टर प्रताप तुंगारे (जॉनी लिव्हर) याच्या डोक्याला उगाच खुराक सुरू होतो. याच गावातला वकील पोटभरे (सदाशिव अमरापूरकर) हा तुंगारेनं पकडलेल्या गुन्हेगारांना वकिली युक्तिवादानं निर्देष सोडवण्यात पटाईत. त्यामुळे दोघांत कायम छत्तीसचा आकडा.
याच गावातला खळचट तरूण लक्ष्मीकांत लोखंडे (अर्थातच लक्ष्मीकांत बेर्डे) हा आपल्या रंगा (भरत जाधव) या सहकाऱयाच्या साथीनं `तिरळा डोळा' गुप्तहेर एजन्सी चालवतो. ती चालवताना घातलेल्या घोळांमधून सतत तुंगारेच्या हाती गुन्हेगार म्हणून सापडत राहतो.
दरम्यान, गावात हलकल्लोळ उडविणाऱया गूढ खुनांच्या तपासासाठी इन्स्पेक्टर महेश चौधरी (अर्थात महेश कोठारे) गावात येऊन दाखल होतो. पण, तो गावात आल्यानंतर गावातले सर्वात श्रीमंत उद्योगपती रावसाहेब निंबाळकर (शरद भथाडिया) यांचा खून होतोच.
रावसाहेबांचा शोकसंतप्त भाऊ (अविनाश नारकर) खुन्याची माहिती देणाऱयाला दोन लाखांचं बक्षीस जाहीर करतो. हे बक्षीस मिळवण्यासाठी लक्ष्या- रंगा मिळून
(अर्थातच पुढे अंगलट येणारी) एक युक्ती लढवतात...
लक्ष्या पुढे कसा लटकतो, असा सुटतो, रहस्य कसं उलगडतं वगैरे परिचित पण इंटरेस्टिंग कथाभाग इथे सांगण्याची गरज नाही.
कथा-पटकथा- संवादकार शिवराज गोर्ले यांनी महेश- लक्ष्यापटांच्या मूळ फॉर्म्युलाला मोठा धक्का न लावता काही नवे घटक त्यात चपखलपणे मिसळले आहेत. `ऍक्शन कॉमेडी'ला उपयुक्त थरार या त्रिकुटाच्या आधीच्या सिनेमांमध्ये होताच. `खतरनाक'मध्ये त्यात रहस्याची भर पडली आहे. संशयाचा काटा याच्या- त्याच्यावर फिरवत ठेवायचा, हळूहळू कुणावर तरी रोखायचा आणि क्लायमॅक्सला भलताच खुनी पेश करायचा, ही रूढ पद्धत त्यांनी यशस्वीपणे वापरली आहे. शिवाय क्लायमॅक्सला डबल रहस्योद्घाटनाचा बोनस आहे.
असाच बोनस त्यांनी दिला आहे तो महेश- लक्ष्याऐवजी प्रताप तुंगारेवर- म्हणजे जॉनी लिव्हरवर मुख्य फोकस ठेवून. महेश कोठारेच्या सिनेमाचे हुकमी प्रेक्षक आता या जोडगोळीच्या अदाकारीशी, रसायनाशी अतिपरिचित झाले आहेत. त्यांना केंद्रस्थानी ठेवलं तर ` अतिपरिचयात अवज्ञा' घडू शकते, याचं भान ठेवून त्यांनी प्रताप, खुनाच्या घटना, पोटभरे वकील आणि प्रत्येक खुनाच्या बळीकडे `योगायोगानं' कामाला असलेल्या भिकोबा (रवींद्र बेर्डे) या गडय़ाला आवश्यक फुटेज दिलं आहे. त्यासाठी एकेकाळचा अविभाज्य घटक असलेल्या पॅरडी साँगला कात्री लावण्याचं आणि महेश-लक्ष्याची प्रेमप्रकरणं आटोक्यात ठेवण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आहे. ते सिनेमाच्या पथ्यावर पडलं आहे.
फार डोकेफोड करून पाहिला तर या सिनेमात, कथानकात काही तार्किक प्रश्न पडू शकतात. पण, हा एक करमणुकीचा खेळ आहे, याचं भान ठेवून (म्हणजे खरंतर भान विसरून) तो पाहिला, तर पटकथेचा वेग प्रेक्षकाला आपसूक खेचत घेऊन जातो.
दिग्दर्शक महेश कोठारे यांनी तांत्रिक हुकुमत पणाला लावून खुनांचं गूढ आणि थरार यांचा उत्तम मेळ राखलाय. बाकीचा कथाभाग सफाईदार हाताळणीनं प्रेक्षणीय केलाय. हिंदीच्या तोडीची चकचकीत निर्मितीमूल्यं, त्यांना न्याय देणारं- खास व्यावसायिक गुणवत्तेचं समीर आठल्ये यांचं छायालेखन आणि पटकथेचा वेग नेमकेपणानं पकडणारं संजय दाबके यांचं संकलन या तांत्रिक बाजूंनी `खतरनाक'ला आवश्यक `पॉलिश्ड' रूपडं दिलं आहे. खुनाचे प्रसंग आणि क्लायमॅक्सची पळापळी- पकडापकडी- हाणामारी यात दिग्दर्शक झ्र छायालेखक- संकलक यांची समतोल कामगिरी मजा आणते. सिनेमास्कोपच्या भव्य पडद्याच्या योग्य वापरामुळे ही मजा द्विगुणित होते.
हिंदी स्टायलीतल्या `हाँटिंग' चालीच्या `शीर्षकगीतानंही रहस्य गहिरं करायला मदत केली आहे. राम- लक्ष्मण यांच्या संगीतातील अन्य गाणी ठेकेबाज आणि थिएटरात ऐकणीय- बघणीय श्रेणीची. मात्र, लोकप्रिय लावणी नृत्यांगणा सुरेखा पुणेकर यांना बेढब वेशभूषेत उगाच उत्तान हावभाव करायला लावणारं `कासार दादा सांगू कितीदा' हे द्वयर्थी ग्राम्य गीत दादा कोंडकेंची आठवण करून देतं. (कारण, ते दादांनीच आपल्या आगामी सिनेमासाठी निवडलेलं गाणं आहे. ही महेश कोठारेंची दादांना श्रद्धांजली की काय?)
कलावंतांमध्ये महेश- लक्ष्या सराईत कामगिरी करून जातात. नूतन आणि आरती या त्यांच्या नवोदित नायिका मात्र बेतास बात. त्यांना मोठा वावही नाही. संशयाच्या सुईचं टोक खेचून घेण्याचं काम सदाशिव अमरापूरकर चोख बजावतात. डोळे वटारून मालकाकडे पाहणारा रवींद्र बेर्डेचा भिकोबा, लक्ष्याच्या वावटळीत टिकून राहणारा भरत जाधव, दादासाहेब निंबाळकराची दुहेरी तगमग साकारणारा अविनाश नारकर आणि साक्षात जॉनी लिव्हरच्या बरोबर राहूनही लक्ष वेधून घेणारा महेश कोकाटे (हवालदार मोरे) ही मंडळी विशेष उल्लेखास पात्र आहेत. प्रमोद पवारांचा संतप्त पत्रकारही पटकथेतल्या जबाबदाऱया हुशारीनं पेलतो.
पण, अर्थातच `खतरनाक' चा हुकमाचा एक्क आहे ते या सिनेमातून प्रमुख भूमिकेत मराठीत पदार्पण करणारा जॉनी लिव्हर. त्याचा सर्वपरिचित लवचिक आत्रंगपणा इथे धमाल उडवून देतो. शिवाय, त्याचं डबिंग त्यानं स्वत:च केलं आहे. मराठी शब्दांच्या सहजोच्चारांमुळे पहिल्या काही प्रसंगांनंतर त्याला मराठी माणूस म्हणून स्वीकारता येतं. त्याच्या प्रकृतीला वाव देणारी आणि उत्स्फूर्त भर घालायला प्रोत्साहक भूमिका असल्यानं तो छानपैकी सुटलाय.
क्वचित किरकोळ रेंगाळणारा फुटकळ कथाभाग वगळता `महेश-लक्ष्या'पटांच्या प्रेक्षकांनी अगदी डोळे झाकून `खतरनाक'ला हजेरी लावावी. इतरांनी हे रसायन समजून घेण्यासाठी थिएटरची वाट वाकडी करायला काहीच हरकत नाही.
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment