`व्हॅलेंटाइन डे'च्या मुहूर्तावर `टाइम' मॅगझिनने रूपेरी पडद्यावरील जगातील सर्वोत्कृष्ट पाच प्रेमपटांच्या यादीत स्वर्गीय गुरुदत्त दिग्दर्शित `प्यासा' या अजरामर चित्रकाव्याचाही समावेश केल्याने `प्यासा' हा मूलत: प्रेमपट आहे, या काहीशा दुर्लक्षित वास्तवाकडे एतद्देशीय चित्रपटरसिकांचे आणि समीक्षकांचे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असेल. `टाइम'च्याच 100 सार्वकालिक सर्वोत्कृष्ट जागतिक चित्रपटांच्या यादीत याआधीच समाविष्ट झालेला `प्यासा' ही गुरुदत्त यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे, असे मानणारे अनेक आहेत. गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट `कागज के फूल' आणि त्यांच्या चित्रपटांचे लेखक अब्रार अल्वी यांनी दिग्दर्शित केलेला `साहिब, बिवी और गुलाम' हेच गुरुदत्त यांचे अधिक कलात्मक आणि आशयघन चित्रपट आहेत, असे मानणाऱयांचीही संख्या कमी नाही.
मात्र, `प्यासा' हा गुरुदत्त यांच्या या आशयघन चित्रत्रयीमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट आहे, हे नि:संशय आहे. आपण भविष्यात `टाइम'च्या जागतिक यादीत समाविष्ट होणारा चित्रपट काढायचाच, असा पण गुरुदत्त यांनी तेव्हा केलेला नसल्याने तत्कालीन व्यावसायिक हिंदी चित्रपटातील सर्व लोकप्रिय घटक वापरून त्यांनी हळव्या कवीची हळवी कहाणी सांगणारा `प्यासा' बनवला.
कवीची कहाणी असल्याने आणि हा चित्रपट स्फुरण्यात साहिर लुधियानवी यांच्या `तलखियां' या कवितासंग्रहाचा मोठा वाटा असल्याने गीत-संगीताची लयलूट असणे स्वाभाविकच होते. मात्र, `रिलीफ'साठी पेरलेला जॉनी वॉकर यांचा चंपी-तेलमालिशवाला आणि वेडय़ांच्या इस्पितळाचे `विनोदी' पद्धतीने केलेले चित्रण हा ढोबळपणा असूनही त्याने हा चित्रपट डागळला नाही. उलट, चित्रपटाचे अभिजात सौंदर्य खुलविणारी ती तीट ठरली.
सुरुवातीला गुरुदत्त यांच्या भावजीवनातील उच्चभ्रू आणि दौलतीसाठी प्रेमाला ठोकर मारणारी `मीना' हीच त्यांच्या कथेची एकमेव नायिका होती. अब्रार अल्वी यांच्या आयुष्यातील `गुलाबो' या कथेत आली आणि `प्यासा'चा पोतच बदलला. खरेतर हा किती साचेबद्ध प्रेमत्रिकोण. जे श्रीमंत ते निष्ठुर, पाषाणहृदयी बेवफा आणि गरीबाचे प्रेम हेच निर्मळ, नितळ, नि:स्वार्थ, हा हिंदी चित्रपटांचा अगदी अलीकडेपर्यंत हुकुमी यशस्वी असलेला सिद्धांतच याही चित्रपटाच्या केंद्रस्थानी दिसतो.
पण, अब्रार अल्वींची लेखणी, साहिर लुधियानवींच्या नज्म्सा, सचिनदेव बर्मन यांचे संगीत, दिलीपकुमारच्या ऐनवेळच्या नकारामुळे स्वत: कॅमेऱयासमोर उभ्या राहिलेल्या गुरुदत्त यांच्याबरोबरच वहिदा रहमान, माला सिन्हा, रहमान यांच्यापासून जॉनी वॉकरपर्यंत सर्वांचा अभिनय, गुरुदत्त यांचे दिग्दर्शन आणि त्यांच्या मनात उमटणारा चित्रपट सेल्युलॉइडवर टिपण्याची अद्भुत क्षमता लाभलेल्या व्ही. के. मूर्ती यांचे छायालेखन अशा सगळय़ा घटकांनी `प्यासा' अजरामर केला.
दक्षिण भारतातील हिंदीद्वेष्टय़ा पट्टय़ातही रौप्यमहोत्सवी यश संपादन करण्यापर्यंत या चित्रपटाने मजल मारली. पण, या व्यावसायिक यशाने आणि नंतर अभिजात चित्रपटरसिक आणि चित्रपटविषयक गंभीर लेखन करणारे समीक्षकांच्या मांडणीने `प्यासा'वर `सामाजिकते'चा शिक्का बसला. ब्रिटिश शासक गेल्यानंतर `काळे साहेब'च सत्तास्थानी येऊन बसले आहेत, याचे भ्रमनिरास करणारे भान याच काळात संपूर्ण देशाला येऊ लागले होते.
स्वातंत्र्यप्राप्तीविषयीचा रोमँटिसिझमची राजकारणी-नोकरशाही यांच्या संगनमताच्या कातळावर येऊन फुटली, त्याचेच `प्यासा' हे एक रूपक होऊन बसले. त्यात गुलाबो ही वेश्या असणे, `जिन्हे नाझ है हिंदपर वो कहां है' असा थेट कम्युनिस्ट प्रश्न विचारणारे- वेश्यावस्तीत चित्रित झालेले गाणे, आपल्याच स्मृतीदिनाचा सोहळा पाहून `ये महलें ये तख्तों ये ताजों की दुनिया' अशी भयचकित प्रतिक्रिया व्यक्त करणारा भणंग नायक, त्याची आत्मनाशाची तीव्र ओढ, चित्रपटभर विखुरलेल्या त्याच्या सुळावर चढविलेल्या ख्रिस्तासारख्या प्रतिमा, यांमुळे `प्यासा' ही `कल्ट फिल्म' झाली, पण ती सामाजिक भाष्याच्या अंगाने.
तिच्या गाभ्याशी विजयची शाश्वत प्रेमाची तहान आहे, याचा विसरच पाडणारा हा विचारव्यूह होता. त्याला `टाइम'च्या या प्रेमपटांतील समावेशाने छेद दिला आहे. गुरुदत्त आणि त्यांच्या सहकलावंतांनी हा सगळा वैचारिक काथ्याकूट पाहिला असता, तर साहिरच्या शब्दांत त्यांनी एवढीच प्रतिक्रिया दिली असती, `जाने क्या तूने कही, जाने क्या मैने सुनी, बात कुछ बन ही गयी.'
(प्रहार, २०११)
No comments:
Post a Comment