Sunday, April 10, 2011

`डुप्लिकेट' नव्हे, ओरिजिनल गम्मत


तसं पाहिलं तर `स्टोरी'त काहीच नावीन्य नाही `डुप्लिकेट'च्या.
`डबल रोल'वाल्या आजतागायतच्या बहुतेक सर्व सिनेमांची असते तसलीच स्टोरी. सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींच्या संघर्षाचा गाभा कायम ठेवून दोन्ही प्रवृत्तींना एकच `चेहरा' देण्याचं `गमिक' लढविणारी. फरक इतकाच, की इथे `डबल रोल' म्हणजे लहानपणी बिछडलेले जुळे भाऊ नाहीत, त्यांचा एकमेकांशी कसलाच रक्ताचा- नात्याचा संबंध नाही आणि दोघेही पूर्ण काळे- पांढरे आहेत.
म्हणजे चांगला शाहरूख (सिनेमातला बबलू) हा पूर्णपणे चांगला- सत्प्रवृत्त... एकदम `व्हाईट' तर वाईट शाहरूख (सिनेमातला मन्नू) हा गुंड, खुनी, खुनशी... काळाकुट्ट. बबलू हा एका हॉटेलातला बावर्ची. आपल्या आईसोबत (फरिदा जलाल) राहणारा. हॉटेलातली `बँक्वेट मॅनेजर' सोनिया कपूर (जुही चावला) ही त्याची प्रेमिका.
मन्नूला त्याच्याच साथीदारांनी (गुलशन ग्रोव्हर, राणा जंग बहादूर, शरद सक्सेना) बँकेवरच्या दरोडय़ाच्या प्रकरणी तुरुंगात अडकवलंय. तो तुरुंग फोडून बाहेर पडतो आणि बँकलुटीतला पैसा मिळवून दगाबाज साथीदारांना यमसदनी धाडण्याची मोहिम आखतो. त्याच्या साथीला आहे लिली (सोनाली बेंद्रे) ही गुन्हेगारी जगताशी संबंधित मदनिका.
मन्नू तुरुंग फोडून बाहेर पडल्यावर पोलिस त्याचा शोध घेऊ लागतात आणि एकदा बबलूला मुन्ना समजून तुरुंगात टाकतात. त्यातून उद्भवलेल्या घोटाळ्यामुळे मन्नूला आपला कुणीतरी हमशकल असल्याचा सुगावा लागतो. बबलूला मन्नू बनवलं, तर पोलिस त्याला ठार करतील आणि आपण बबलू बनून सुखात राहू, असा त्याचा प्लॅन. त्यानुसार तो बबलूला गोत्यात आणतोही. पण, मन्नूच्या राक्षसी ताकदीशी लढण्याची ताकद अंगी नसलेला बबलू डोकं वापरून मन्नूचीच युक्ती त्याच्यावर उलटवतो, अशी ही कथा.
 ही कथा वाचताना आपल्या डोक्यात आपल्या मनातला एक सिनेमा सहजच साकारत जातो. पण आपल्या डोक्यातला सिनेमा हा माणसांचा, सजीव पात्रांचा सिनेमा असेल आणि `डुप्लिकेट' मात्र त्याच कथानकावरच्या कार्टून फिल्मसारखा आहे. म्हणजे, एखाद्या माणसाचा फोटो आणि अर्कचित्र किंवा व्यंगचित्र यात तो फरक असतो तोच फरक अन्य सिनेमातली अशीच पात्र घटना- मांडणी आणि या सिनेमातल्या पात्र- घटना- मांडणी यांच्यात आहे.
महेश भटनं जाणीवपूर्वक आणि मेहनत घेऊन सिनेमाच्या हाताळणीला दिलेलं फ्रेश परिमाण, शाहरूखचा अभिनय आणि `स्पेशल इफेक्टस्' या तीन प्रमुख आधारस्तंभांवर `डुप्लिकेट'च्या यशस्वी वेगळेपणाचा डोलारा उभा आहे. रॉबिन भट आणि आकाश खुराना या महेशच्या हुकमी लेखकांबरोबर जावेद सिद्दिकींनी हा सिनेमा लिहिलाय तोच एखादी कार्टून स्टिप लिहावी तसा.
कॉमिक बुकांमधली पात्रं आपल्यातल्या एकेका मानवी प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करत असतात. भावदर्शन, हालचाली आणि संभाषणातल्या अतिशयोक्तीतून त्या प्रवृत्तीची छटा गडद करीत असतात. मुख्यत: संस्कारक्षम वयातली मुलं आणि मोठय़ांच्या मनातलं लहान मूल हा `कॉमिक्स'चा `कार्टून्स'चा लक्ष्य प्रेक्षक असल्यानं प्रत्येक पात्राला- प्रवृत्तीला निरुपद्रवी निरागसतेचा स्पर्श असतो. वास्तवात टोचणारे सर्व कंगोरे खास तान्ह्या बाळांसाठी बनवलेल्या मऊ- मुलायम खेळण्यांसारखे (सॉफ्ट टॉइज्) काढून टाकलेले असतात. वास्तवावर आधारलेलं वास्तवापेक्षा भिन्न असं एक आटपाटनगरच उभारलेलं असतं.
`डुप्लिकेट' ही अशा आटपाट नगरातच घडतो. बबलूचं घर, त्याच्या हॉटेलातलं किचन, मन्नूचा गुप्त अड्डा, त्याच्या गुंड साथीदाराचं घर, या बंदिस्त चित्रणस्थळांमधून एक `सर्रियल' वातावरण तयार होतं. इथला बबलूही केवळ साधाभोळा नाही, तर निर्बुद्ध वाटावा एवढा निरागस. तो आईला `बेबे' (`बेबी'चा स्टायलिश उच्चार) म्हणतो. वेंधळेपणानं सतत पडत- धडपडत राहतो. मन्नूचं केलेले खून, सिनेमातला इतर हिंसाचार आणि मदनिका लिलीचा वावर, हा एरवीचा `ऍडल्टस्' भागही सिनेमात निरुपद्रवी मजेशीर `सॉफ्ट टॉय' बनून येतो.
दोन्ही शाहरूख, त्याच्या नायिका, खलनायक आई आणि पोलिस यांचे विशिष्ट गडद स्वभाव आणि लकबी आहेतच. तरीही त्यातून आणि सिनेमातल्या सर्व प्रसंगांमधून अंतिमत: हास्यरसाचा परिपोष करायचाय, हे भान लेखकांनी सोडलेलं नाही. आणि कलादिग्दर्शिका (शर्मिष्ठा रॉय), छायालेखक (समीर आर्य) यांच्यापासून नृत्यदिग्दर्शिकेपर्यंत (फरहा खान) सर्व तंत्रज्ञांनीही सिनेमाचा `लुक' कॉमिक्ससारखाच राहील, याची खबरदारी घेतली आहे.
महेश भटनं प्रत्येक प्रसंगाचं चित्रणही सिनेमाची ही जातकुळी ठरवून- लक्षात घेऊन केलंय. त्यासाठी अतिशयोक्त हालचालींतून फुटणाऱया `स्लॅपस्टिक' विनोदाचा चपखल वापर केलाय. प्रेक्षकांना `डबल रोल' मध्ये दोन्ही `नायक'च पाहायची सवय आहे. म्हणजे. जो दुष्प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करोत तोही शेवटच्या रिळात सत्प्रवृत्त बनून जातो. प्रेक्षकांना त्याच्या बाजूने विचार करायला लावलं जातं. `डुप्लिकेट'चा मन्नू मात्र पूर्णपणे काळ्या रंगातला आहे आणि अखेरीस त्याला मारून टाकण्याचं धाष्टर्य़ही महेशनं दाखवलंय.
शाहरूखची ही पहिलीच दुहेरी व्यक्तिरेखा. चार्ली चॅप्लिनपासून (`मास्क' प्रसिद्ध) जिम कॅरीपर्यंत अनेकांचे संस्कार त्याच्या अभिनयात दिसतात. पण तो कुणाची नक्कल करीत नाही. सगळ्या पूर्वसुरींच्या शैली स्वत:त मुरवून घेऊन त्यातून स्वत:ची शैली विकसित करतो. बबलू आणि मन्नूमधला फरक स्पष्ट करण्यासाठी शाहरूख केवळ चेहरा कसा वापरतो, हे पाहण्यासारखं आहे.  
खालचा ओठ पुढे आणि वरचा ओठ मागे खेचून, जीभ ओठाला चिकटवण्याची लकब मन्नूला घृणास्पद बनवते. तर अगदी लहान मुलासारखा सर्व भाव स्पष्ट दाखवणारा चेहरा आणि निरागस डोळे `बबलू'चं सत्प्रवृत्त नायकपण अधोरेखित करतात
शाहरूख खरी कमाल करतो बबलू आणि मन्नूची अदलाबदल झाल्यावर. मन्नू बबलूला त्याच्याच घरात नजरकैदेत ठेवून सोनियाबरोबर बबलू बनून हॉटेलात जातो तेव्हा सोनियाशी चाललेली (बबलूला न शोभणारी) लगट, तिनं लटक्या रागानं झिडकारल्यानंतर त्याला येणारा खरा हिंस्र राग आणि मधेच आपण आता बबलू आहोत, हे लक्षात आल्यावर बदललेला आवाज आणि चेहरा यातून शाहरूखची ताकद दिसते. बबलू जेव्हा स्वत:ला मन्नू बनवतो तेव्हा तर धमालच उडवतो. यात पुन्हा दोघेही जण एकमेकांच्या रुपात अवघडलेले आहेत, हा भाव या दोघांचा अभिनय करणाऱया तिसऱयाच शाहरूखनं दाखवणं, हे बुद्धिमान अभिनेत्याचं लक्षण आहे
उत्स्फूर्तपणा आणि अफाट एनर्जी शाहरूखला दैवदत्त लाभली आहे. पण आधी स्वत:ला सिनेमाच्या एका स्वरुपाशी जखडून घ्यायचं, मग दोन्ही भूमिकांची स्वतंत्र स्वभाववैशिष्टय़ं आत्मसात करून घ्यायची, त्यातल्या एकीतून दुसरीचा विचार करायचा- दाखवायचा आणि सरतेशेवटी हे सगळं सहज, उत्सफूर्तपणे घडतंय, असा आभास निर्माण करायचा, ही मोठी कसोटी आहे अभिनेत्याची. त्यात शाहरुख शंभर टक्के गुणांसह पास होतो.
जुही चावलाला तिच्या पठडीतली भूमिका आहे आणि ती तिनं चोख बजावलीये. खरी संधी मिळालीये सोनाली बेंद्रेला. उंच, शिडशिडीत बांध्याचा योग्य वापर करून तिनं आधुनिक `मदनिका' साकारली आहे. बबलूची `बेबे' फरिदा जलालही धमाल उडवून देते.
`डुप्लिकेट'मध्ये एक प्रमुख आकर्षण आहे आधुनिक तंत्रानं साकारलेल्या डबल रोलचं. आतापर्यंत `डबल रोल'ची दोन्ही पात्रं जेव्हा एक दृश्यचौकटीत दिसायची तेव्हा दोन्ही प्रतिमा एकमेकांपासून अंतर राखून बोलायच्या. मिठय़ा, मारामाऱयांमध्ये अशी दृश्ये आणि प्रत्यक्ष शारीरिक संपर्काच्या वेळी एकाच्या पाठीकडून दुसऱयाचा चेहरा दाखविणाऱया दृश्यांच्या संकलित मिश्रणातून परिणाम साधला जायचा पण त्यातली कृत्रिमता जाणवायची, कारण, आधी फिल्मचा एक भाग झाकून दुसऱया भूमिकेचं चित्रण आणि मग चित्रित भाग झाकून दुसऱया भूमिकेचं चित्रण करण्याचं `मास्किंग' तंत्रच उपलब्ध होतं दुहेरी भूमिकांसाठी.
`डुप्लिकेट'मध्ये हिंदी पडद्यावर प्रथमच संगणकीय दृक्परिणाम वापरून डबल रोल चित्रित झालाय. इथे दोन्ही शाहरूख एकाच फ्रेममध्ये एकमेकांना स्पर्श करतात. एकमेकांच्या मागेपुढे उभे राहतात, एकमेकांना ओलांडतात. यातून ही दोन वेगवेगळी माणसं असल्याचा भास निर्माण होतो आणि पूर्वीच्या तंत्रातली कृत्रिमता लोप पावते. या चित्रणात दोन्ही भूमिकांचं चित्रण फक्त दहा मिनिटांत पूर्ण करणं बंधनकारकं असतं, हे समजल्यावर तर शाहरूखविषयीचा आदर वाढतो.
सिनेमाची हलकीफुलकी प्रकृती लक्षात घेऊन अनु मलिकनं जावेद अख्तरच्या गाण्यांना सोप्या- गुणगुणवता येणाऱया चाली दिल्या आहेत. `एक शरारत होने को है' मधलं `ललाई लाई लाई ल् लाई ल् लाई लाई' तर आधीच आबालवृद्धांच्या तोंडी बसलंय. `शुक्रिया मेहरबानी करम' हेही गाण ठेक्यामुळं लोकप्रिय झालं आहे. या गाण्यात लिली बबलूला मन्नू समजून त्याला `भिडते' पण बबलू मात्र आपल्या मनातल्या सोनियाला उद्देशून गाणं म्हणतो, ही गंमत फरहा खाननं गीतचित्रणात सुरेख खुलवलीये. दोन्ही शाहरूख दोन्ही नायिकांबरोबर आलटून पालटून दाखविणाऱया `लडना, झगडना' या गाण्याचं चित्रणही विसंगतींमधून मजा आणतं.
हिंदी सिनेमात दर मिनिटाला काहीतरी नाटय़मय, संघर्षमय वा अतिभावुक घडलंच पाहिजे, असा अट्टाहास नसेल तर `डुप्लिकेट' चा आनंद उपभोगता येईल. मुख्य प्रवाहातल्या व्यावसायिक सिनेमात फारसे प्रयोग घडत नाहीत. `डुप्लिकेट' हा व्यावसायिक चौकटीतून राहून ती चौकट रुंदावण्याचा केलेला प्रयत्न आहे. बाकी सगळं बेमतलब वाटलं, तरी किमान शाहरूखचा शंभर नंबरी अभिनय पाहण्यासाठी `डुप्लिकेट' पाहायलाच हवा.


(महाराष्ट्र टाइम्स)

1 comment:

  1. मी शाळेत असताना हे परिक्षण महाराष्ट्र टाईम्समध्ये वाचलं होतं. ते मला अजूनही आठवतंय. आज पुन्हा एकदा या ब्लॉगच्या रुपाने वाचायला मिळले. धन्यवाद.

    ReplyDelete