Thursday, May 5, 2011

सहवास हा सुखाचा (तू तिथं मी)


तो आणि ती एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले...
घरात थापा मारून ते चोरून एकमेकांना भेटतात. बागेत फिरायला जातात. तो `बॉबी' स्टाईलीत आरशाचे कवडसे पाडून तिला भेटीचे संकेत देतो. दोघे एकत्र चालतात, बसतात, बोलतात, आईस्क्रीम खातात.
घरी कोणाला कळू नये, म्हणून तो तिला अर्ध्या वाटेत सोडतो. त्यानं केसात माळलेला गजरा घरातल्यांपासून लपवताना किती धांदल उडते तिची!
विरहाच्या क्षणांमध्ये गजऱयाचा सुगंध दोघांसाठी आठवणींचा सुगंध बनतो. ताटातूट झाल्यावर दोघांची अशी तगमग होते की, समाजाचे सारे रीतीरिवाज मोडून, बंधनं तोडून यावं एकत्र, अशी विलक्षण ओढच निर्माण होते.
 `हरे राम, आता काय सगळी लव्ह स्टोरी ऐकायला लागते की काय? आणि प्रत्येक प्रेमकथेत हेच घडतं, अस्संच घडतं, असा विचार आला असणार तुमच्या मनात. पण, जरा थांबा. ही प्रेमकथा नेहमीची नाही, अकल्पनीयरीत्या वेगळी आहे.
 कारण, इथे `तो' आणि `ती' हे आहेत साठीच्या पलीकडे- अलीकडे, मुला-नातवंडांचा सुखी परिवार असलेले (एकमेकांचेच) पती-पत्नी. नानासाहेब दाते आणि उषा दाते.
 बसला ना धक्का! शन्ना नवरेलिखित आणि संजय सूरकरदिग्दर्शित `तू तिथं मी' हा सुखद धक्का आहे. सेवानिवृत्तीनंतर एखाद्या वृद्धाला जाणवावं की, अरेच्चा, सगळं केलं, संसार केला, घर सांभाळलं, मुलाबाळांना मोठं केलं, नोकरी केली, पण एक करायचं राहिलंच... पत्नीवर प्रेम करायचं राहूनच गेलं... ही कल्पनाच फँटास्टिक.
 शन्नांसारख्या मुरब्बी पटकथाकाराच्या लेखणीतून उतरलेली ही कहाणी अनोखी आणि हृदयस्पर्शी. हसत-खेळत म्हाताऱयांना आणि तरुणांना काही मोलाचं सांगू पाहणारी.
  त्यांचा नायक नानासाहेब दाते (मोहन जोशी) रिटायर होतो, तिथे सिनेमा सुरू होतो. नानासाहेबांना निवृत्तीनंतर काय करावं, सुचत नाही. सतत कार्यरत आयुष्यात एकदम आलेली पोकळी सहन करताना लक्षात येतं की, संसाराचं गाडं सांभाळताना स्वत:च्या आणि पत्नीच्या- फक्त दोघांच्या सुखाचा विचारच झाला नाही आपल्याकडून. त्यातच कॉलनीतला रिक्षावाला शाम (प्रशांत दामले) आणि कविता (कविता लाड) यांच्यातलं चोरटं प्रेम नानासाहेबांच्या नजरेसमोरच फुलू लागतं. चोरटय़ा प्रेमाची ही लज्जत आणखी एक धाडसी विचार मनात आणते... पत्नीवर चोरून प्रेम करता आलं तर?
  आता? या वयात? हेच प्रश्न नानांची पत्नी, उषाही (सुहास जोशी) विचारते. पण, नानांची अचानक घरी भेटायला आलेली सुंदर- नीटस- आकर्षक बालमैत्रीण (स्मिता तळवलकर) उषाबाइभच्या मनात असूया जागवते. तोच धागा पकडून नाना पत्नीला समजावतात की, या वयात, सर्वांमध्ये विभागून आयुष्य घालवल्यानंतरही तुला मी फक्त तुझाच असावंसं वाटतं. अगं, हेच वय आहे आपण दोघेच एकमेकांचे असण्याचं. देहापलीकडचं खरंखुरं प्रेम अनुभवण्याचं.
 उषाबाइभनाही ते पटतं. पण दोन मुलं (आनंद अभ्यंकर, सुनील बर्वे), सुना (शर्मिला कुलकर्णी, शर्वाणी पिल्ले) आणि नातवंडांच्या भरल्या घरात हे प्रेम व्यक्त होणार कसं? लोक काय म्हणतील? मुलं काय म्हणतील? थिल्लरपणा वाटेल सर्वांना.
मग दोघे चोरून एकमेकांना भेटतात. बागेत जातात. `अहो'वरून एकमेकांना एकेरी नावानं संबोधण्याची मजा चाखू लागतात. छोटय़ा छोटय़ा अतृप्त हौसामौजा पुरवून घेऊ लागतात. प्रेमातलं थ्रिल अनुभवायला लागतात.
 `सहवास हा सुखाच' ही नवीन भावना इतक्या वर्षांच्या `संसारा' नंतर आणि अल्पकाळाच्या `सहवासा'नंतर फुलून येत असतानाच, ताटातुटीचं सावट दाटू लागतं. धाकटय़ा मुलाची परगावी बदली होणार म्हटल्यावर दोघे भाऊ मिळून निर्णय घेऊन टाकतात, आईनं धाकटय़ाबरोबर राहायचं, वडिलांनी मोठय़ाबरोबर.
 आपली समंजस, सुविद्य मुलं आपल्या मनाचा विचारही न करता निर्जीव वस्तूंप्रमाणं आपली वाटणी करून टाकतात, हा धक्का या वृद्ध प्रेमिकांना सहन होत नाही. पण, भिडस्तपणामुळं, सवयींमुळं ते निर्णय स्वीकारतात. विरह सोसण्याचा प्रयत्न करतात. पण, उतारवयात लागलेला प्रेमाचा शोध त्यांची तगमग करतो. आणि...
  ... मीलनाचा कोणता मार्ग ते शोधतात, हे पडद्यावरच पाहण्यात मजा आहे.
 ही कल्पना म्हटलं तर धाडसी. कारण, ती नीट मांडली नाही तर `काय हा म्हातारचळ' अशी प्रतिक्रिया (म्हाताऱयांकडूनच) येण्याची शक्यता होती. पण विशेषत: सिनेमाच्या पूर्वार्धात शन्नांनी रचलेले खुसखुशीत प्रसंग ही अफलातून कल्पना शक्यतेच्या पातळीवर आणतात. शाम-कविता या तरूण जोडीच्या प्रेम प्रकरणाचा समांतर ट्रकही सिनेमाचा तोल सांभाळतो.
 स्पष्ट व्यक्तीरेखाटन हे शन्नांच्या पटकथेचं आणखी एक बलस्थान, नाना आणि उषाबाइभव्यतिरिक्तची पात्रंही ठसठशीत आहेत. निवृत्तीनंतरही वेळ जात नाही, म्हणून ऑफिसाच्या गेटवर उभं राहून वेळ काढणारे बुधकर (सुधीर जोशी), नानांचा किरकिऱया मुलगा (सुनील बर्वे), गाण्याची शिकवणी घेणारी सून (शर्वाणी पिल्ले), गरीब पण मेहनती शाम, त्याच्यावर समजूतदार प्रेम करणारी कविता, जॉगिंग करायला येणाऱया तरण्याताठय़ा `डेक्कन क्वीन' डोळे फाडून पाहणारी चावट म्हाताऱयांची गँग (शरद तळवलकर, श्रीकांत मोघे, बाळासाहेब सरपोतदार इ.) ही पात्रं सिनेमात मजा तर आणतातच; पण एकूण घटनाक्रमात महत्त्वाच्या भूमिका बजावतात.
 संपूर्ण सिनेमात एकजीव होत नाही ती `स्कॅप' (सीनियर सिटीझन्स आर प्रेशस) ही नानांच्या बालमैत्रिणीनं चालवलेली संघटना. आपली उपयुक्तता संपली, ही वृद्धांची भावना दूर करून त्यांना आपला अनुभव समाजात वाटण्याची, ज्ञानाचा फायदा करून देण्याची संधी, ही संस्था देते, असं संवादातून समजतं. पण, दृश्यस्वरुपात सुखवस्तू म्हाताऱयांच्या ट्रिपा आयोजित करून त्यांना `आनंद' करण्याची (म्हणजे मद्यपानाची) संधी देण्यापलीकडे ही संस्था काहीच करताना दिसत नाही.
  `स्कॅप'च्या एका वार्ताहार बैठकीत बुधकर आपलं आयुष्य कसं पालटलं, खंत कशी दूर झाली, हे सुभाषितप्रचुर भाषेत सांगतात; पण त्यात संस्थेन काय केलं, हे स्पष्ट होत नाही. परिणामी, मराठीतल्या बुजुर्ग कलावंतांना एकत्र आणून जुन्या गाण्यांची एक सुरेल अंताक्षरी घडवून आणण्याची क्लृप्ती, यापलीकडे `स्कॅप'ला वाव राहात नाही.
 प्रशांत आणि कवितावर चित्रित झालेलं प्रेमगीत आणि नाना-उषा यांच्यावरील समारोपाचे गीत या उत्कट कविता आहेत. ती गाणी पार्श्वगीतं राहिली असती तर बरे झाले असते. अशा `डाऊन टू अर्थ' सिनेमात, उत्कट प्रसंगात पात्रांनी स्वत: गाणे खटकते. प्रशांत- कविता तर बागेत हातवारेही करतात. त्याची काहीच गरज नव्हती. उषाताइभचा चुकून दारू पिऊन म्हाताऱयांच्या फिरक्या घेण्याचा प्रसंग फक्त `चुटकुला' म्हणून चांगला आहे. पण तो नसता तरी सिनेमात परिणामदृष्टय़ा काही उणावले नसते.
 पण या सगळ्या खटकणाऱया गोष्टी असूनही सिनेमा `भिडतो', हे अधिक महत्त्वाचं. दिग्दर्शक संजय सूरकर यांनी चपखल पात्रयोजना करून सरळ सोप्या प्रवाही शैलीत शन्नांची पटकथा खुलवली आहे. त्यात सिनेमास्कोप पडद्याच्या तंत्रालाही न्याय दिला आहे, हे महत्त्वाचं. या कामी छायालेखक हरीष जोशी यांनी शंभर नंबरी कामगिरी बजावून दिग्दर्शकांच्या मनातला सिनेमा पडद्यावर साकारला आहे. सिनेमाचा प्रसन्न मूड त्यांनी छायालेखनात टिपला आहे. दृश्यचौकट `सुंदर' दिसणं वेगळं आणि `प्रसन्न' दिसणं वेगळं. `तू तिथं मी' मध्ये पुण्यातलं बाह्यचित्रण पाहयल्यावर `हे आपलं गाव आहे?... इतकं सुंदर?' असा पुणेकरांनाही प्रश्न पडेल. बाह्यचित्रणाच्या अचूक वेळा निवडून आणि बंदिस्तचित्रणात प्रकाशयोजनेच्या साह्यानं त्यांनी संपूर्ण चित्रपटाला दृश्यात्मक एकात्मतेचं परिमाण दिलं आहे.
 अमर हळदीपूर यांचा हा घरचाच सिनेमा. त्यांचं ताजं टवटवीत पार्श्वसंगीत आशयावर कुरघोडी न करता आशय खुलवत जातं. सुटय़ासुटय़ा प्रसंगांना ओवून घेणारा धागा ठरतं.
 मराठी चित्रपट अभिनयदृष्टय़ा किती संपन्न आहे, याचं दर्शन `तू तिथं मी'मधून घडतं. मोहन जोशींनी नानांचा करडेपणा, उमदा रांगडेपणा, प्रेमात हळवं होणं, विरहातली उलघाल, ताटातूट टाळण्यासाठी केलेलं आजाराचं नाटक आणि पत्नीमधील `प्रेमिका' भेटल्यावर होणारा आनंद जिवंत केला आहे. त्यांना सुहास जोशींनी समर्थ साथ दिली आहे. नानांनी उतारवयात प्रेम करण्याची कल्पना मांडल्यावर येणारा भयचकित हतबुद्धपणा, नानांच्या मैत्रिणीला पाहिल्यावर होणारा जळफळाट, आपण नानांना आवडतो का अजूनही, या प्रश्नानं उठणारं काहूर आणि प्रेम सुरू झाल्यावर `अहो' ना `वसंता' म्हणून हाक मारण्याची अनुभवलेली गोडी त्यांनी झकास साकारली आहे. त्यांच्या चेहऱयातला निरागस गोडवा त्यांना उतारवयातली प्रेमिका साकारताना उपयोगी पडला आहे.
अन्य कलाकारांत प्रशांत दामले, सुधीर जोशी आणि `एव्हरग्रीन' शरद तळवलकर छाप पाडून जातात. सुनील बर्वेचा किरकिरेपणा आणि शर्वाणी पिल्लेचा सहज वावरही लक्षात राहतो. ज्येष्ठ कलावंतांची `अंताक्षरी' सिनेमात एक `आयटेम' म्हणून मजा आणते. स्मिता तळवलकरांनी हायफाय पुरंध्रीचा आब आणि रुबाब दाखविला आहे.
  मराठी सिनेमात तंत्र आणि आशयाचा मिलाफ आढण्याचा दुर्मिळ योग `तू तिथं मी'मध्ये जुळून आला आहे. चांगला मराठी सिनेमा पाहण्यासाठी झुरणाऱया प्रेक्षकांनी तो आवर्जून पाहावा. तीन तासांचा हा सहवास निश्चित सुखाचा ठरेल.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment