सिनेमाच्या प्रेक्षकाला नावीन्याचा सोस असतो. तोचतोचपणा त्याला खपत नाही, अशी एक लाडकी समजूत आहे.
डेव्हिड धवनचा प्रत्येक सिनेमा ती खोटी पाडत असतो आणि धोधो किंवा किमान पैसावसूल चालत असतो.
त्याच्या सिनेमांचा एख ठरलेला साचा आहे. म्हणजे वरवर कथानक वेगळं असतं, कलाकार बदलतात; पण सिनेमातले मुख्य घटक आणि त्यांची मांडणी यात तसू भराचाही फरक नसतो. थोडीशी ऍक्श्न, थोडीशी इमोशन, चक चक ाeत निर्मितीमूल्यं, ठेकेबाज संगीतातल्या नाचऱया आणि पदरेशांत चित्रित केलेल्या गाण्यांची पेरणी आणि या सगळ्याभोवती हलक्याफुलक्या, विनोदी वातावरणाची चौकट हा त्याचा फॉर्म्युला आहे.
बडय़ा घरातले दोन भाऊ (संजय दत्त, सलमान खान) एकाच साध्या, सुंदर, सुशील मुलीच्या (करिश्मा कपूर) प्रेमात पडतात. ती (अर्थातच) कुणातरी एकाच्याच प्रेमात पडते. परस्परांवरच्या आणि प्रियतमेवरच्या अतूट प्रेमातून दोघाही भावांनी एकाच मुलीशी लग्न करण्याची पद्धत आपल्याकडे नसल्यामुळे तिचं लग्न कुणातरी एकाशीचं होणार हे निश्चित. असं लग्न होण्यात येणारे फिल्मी अडथळे आणि तात्कलिक नाटय़मयताही सराईत प्रेक्षकाला परिचित. दोन भाऊ, भावासारखेच असणारे दोन मित्र वगैरे `व्हेरिएशन्स'सह असंख्य वेळा रुपेरी पडद्यावर आलेली कथाच कथाकार इक्रम अख्तर आणि पटकथाकार इक्रम अख्तर-युनुस सजवाल यांनी `चल मेरे भाई'मध्ये मांडली आहे.
अमुक घडलं कसं याचा विचार करायला प्रेक्षकाला वेळ देत नाही. त्याच्या सिनेमात सगळेच कलाकार एकदम `सुटेश'मूडमध्ये असल्यानं सगळ्यांचा वावर एकदम सहज-सराईत असतो. गोविंदाबरोबरचा चावट, अश्लील आणि बीभस्त विनोदाचा सोस डेव्हिडनं हल्ली सोडलेला असल्यानं त्याचा विनोदही कौटुंबिक दर्जाचा आणि सुसह्य झाला आहे. प्रेक्षकाला कंटाळा येईल, जांभया येतील, मानसिक- भावनिक ताण येईल, असं काहीच घडवण्याच्या फंदात तो पडत नसल्यानं अडीच तास `डोक्याला ताप नाही' पद्धतीचं झर्रकन संपतात.
`चल मेरे भाई'मध्ये पटकथाकार आणि संवादलेखन रुमी जाफरी यांनी मिळून काही ठिकाणी बऱयापैकी धमालही उडवली आहे. वेंधळी, गडबडी, चक्रम, पण सालस आणि सुशील नायिका सपना ( करिश्मा), कर्तबगार, कामसू, पूर्वायुष्यातल्या दु:खद अनुभवामुळं काहीसा कडवट झालेला पण आतून प्रेमळ विकी (संजय) आणि नाटकी, चुळबुळ्या, बालिश, एक्स्ट्रोव्हर्ट प्रेम (सलमान) या प्रमुख पात्रांचं स्वभावरेखाटन त्यांनी थोडक्यातच ठसठशीत केलंय. प्रत्येकाच्या स्वभावामुळे स्वतंत्रपणे, एकत्रितरीत्या आणि इतर व्यक्तिरेखांबरोबर घडणाऱया गमतीजमतींमधून कथा वेगानं पुढे सरकत राहील, याची काळजी घेतली आहे. सगळ्यात धमाल जमलं आहे ते दोन भावांचं घट्ट नातं. वरवरच्या विनोदी प्रसंगांमधूनही या नात्याची भावनिक वीण जाणवत राहते. एका मारामारीनंतर विकी हॉस्पिटमध्ये मरणाशी झुंजत असताना प्रेम (फिल्म सिटीतल्या `त्या' सुप्रसिद्ध) मंदिरात जातो. जगात दिलीपकुमार, अमिताभ बच्चन आणि आपण स्वत:हे तीनच मोठे डॉक्टर आहेत, याची अंबामातेला आठवण करून देऊन, गाऱहाणं घालतो ते ``दिलीपकुमार आणि अमिताभ तुझ्यावर चिडून निघून गेले, तरी तू त्यांचे सीन हिट केलेस. मी तर तुझ्यापुढे हात जोडतोय. माझ्या भावाला तू वाचवलंस तर माझाही सीन हिट झाला. असं मी समजेत'' या शब्दांत. अशी `मॅड' चमक दाखवणारे आणखी प्रसंग सिनेमात असायला हवे होते.
या प्रसंगातच सलमान अंबामातेला सांगतो, की अमिताभनं तुझ्या देवळात घंटा वाजवली होती. मला तू इतका छोटा केलायंस की मी इच्छा असूनही घंटा वाजवू शकत नाही. हा प्रकार आश्चर्यकारक आहे. सतत `लार्जर दॅन लाइफ' प्रतिमेत वावरणारा एक नायक आपल्या शारीरिक उंचीच्या कमतरतेवर स्वत:च विनोद करतो, सिनेमात अन्य पात्रांकडूनही `नाटू' असं संबोधन आणि त्यावरचे विनोद घडू देतो, ही मजाच आहे. या डेअरिंगमुळे प्रेक्षकांच्या लेखी सलमानचा क्यूटनेस वाढतो खरा!
`चल मेरे भाई'मध्ये सलमान खान हा धर्मेंद्रच्या जातकुळीचा विनोद घडवताना दिसतो. स्वत:कडे कमीपणा घ्यायला तो डरत नाही. हसताना, रडताना, चिरकताना, चेहरे वेडवाकडे करताना आपण भद्दे दिसू का वगैरे प्रश्न तो पाडून घेत नाही. या स्वत:ला पडद्यावर पूर्णपणे मोकळं सोडण्याच्या वृत्तीमुळंच त्याचा प्रेम पडद्यावर धमाल उडवतो. संजय दत्त त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱया इनिंगमध्ये खूपच मोकळा झालाय. एकीकडे विकीचा रुबाबदार, गंभीर आब सांभाळतानाच तो प्रेमबरोबरची दंगामस्तीही खुलून करतो. सलमानच्या `प्रेम'प्रमाणंच करिश्माची `सपना'ही नावासकट तिच्या सरावाची. ती सफाईदारपणे सपना साकारते. नोकरी गेलीच या भावनेन लिफ्टमधून मालकाबरोबर (त्याची ओळख नसताना) खाली उतरताना चिडचिड ते रडारड असा प्रवास ती लिलया दाखवते, तेव्हा तिच्यातली अभिनेत्री दिसून जाते. शिवाय, या तिघांमधलं पडद्यावरचं रसायनही एकदम फिट्ट, अचूक जमलंय. दिलीप ताहिल, हिमानी शिवपुरी, सुषमा सेठ, शाहबाज खान, असरानी आदी मंडळींच्या सराईत वावरात हॉटेलातल्या वेटरच्या छोटय़ाशा पाहुण्या भूमिकेतला रवी वास्वानी लक्ष वेधून घेतो.
समीरची बम्बईया बोलीतली गाणी आणि आनंद- मिलिंद यांचं उडत्या चालींचं संगीत डेव्हिड धवन स्कूलच्या परंपरेतलं आहे. त्यातही शीर्षकगीत `चोरी चोरी सपनों में आता है कोई', `आज कल की लडकिया' आणि `मेरी नींद जाने लगी है ही गाणी पैसा वसूल. आनंद-मिलिंद यांच्या संगीतात कर्णकर्कश वाद्यमेळाचा अतिरेक नसतो आणि `मेलडी'ला अगदीच चाट दिलेली नसते, त्यामुळे थिएटरात कान किटत नाहीत.
बाकी निर्मितीमूल्यं अर्थातच श्रीमंत.
डेव्हिड धवनचा सिनेमा पाहण्या-न पाहण्याचा निर्णय कुणी इतरांच्या मतावरून घेत नाही. तो जो-तो स्वानुभवावरून घेत असतो. ज्यांना असा पूर्वानुभवच नसेल, त्यांनी आपल्या जबाबदारीवर `चल मेरे भाई'चा अनुभव घेऊन पाहावा.
डेव्हिड धवनचा सिनेमा पाहण्या-न पाहण्याचा निर्णय कुणी इतरांच्या मतावरून घेत नाही. तो जो-तो स्वानुभवावरून घेत असतो. ज्यांना असा पूर्वानुभवच नसेल, त्यांनी आपल्या जबाबदारीवर `चल मेरे भाई'चा अनुभव घेऊन पाहावा.
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment