Tuesday, April 26, 2011

त्रिगुणांचे त्रैराशिक (माणूस-नवा)


`माणूस' पाहताना चटकन विश्वास बसत नाही की, आपण मराठी सिनेमा पाहतो आहोत.
कारण मराठी सिनेमा असूनही इथे पार्श्वध्वनींचा कल्पक वापर समजतो आणि क्वचित नि:शब्द, नीरव शांतताही जाणवते. पार्श्वसंगीताच्या ढणढणाटात प्रसंग हरवत नाहीत.
लक्ष्मीकांत बेर्डे नायक असूनही पेटंट `लक्ष्याछाप अदा' दिसत नाहीत.
बटबटीत नाटय़मयतेला वाव देणारी कथा असूनही पटकथा-संवादांनी सिनेमा संयत, सहज लयीचा केला आहे.
बोधकथेचा (अंगभूत?) भाबडेपणा `माणूस'मध्ये आहेच; पण हाडामासांच्या माणसांची ही गोष्ट सांघिक प्रयत्नांतल्या प्रामाणिकपणाच्या बळावर उठून दिसते. काही काळ मनात रेंगाळते.
`प्रभात'च्या `माणूस'शी तुलना करण्याचा मोह आवरला, तर कोणताही आविर्भाव न आणता उलगडणारा एक सच्चा सिनेमा पाहिल्याचा अनुभव ए. राधास्वामी लिखित- दिग्दर्शित नवा `माणूस' ही देतो. राधास्वामी यांनी माणसांमधल्या सत्व, रज आणि तम या त्रिगुणांवर `माणूस'ची बोधकथा बेतली आहे. इथे एकेका गुणाचं प्रतिनिधीत्व एकेक व्यक्तिरेखा करते. सत्वगुणी सखाराम (लक्ष्मीकांत बेर्डे) हा अर्थातच नायक, एका खेडय़ात छोटा ढाबा चालवणारा परोपकारी, सरळमार्गी माणूस, एकदा पुण्यातला एक नामांकित वकील- रजोगुणी प्रभाकर करभरकर (रवींद्र मंकणी) रस्त्यात गाडी नादुरुस्त झाल्यामुळे सखारामच्या ढाब्यावर येतो. पत्नी पल्लवी (निशिगंधा वाड) हिला रात्रीच्या मुक्कामाला ढाब्यावर सोडून गाडी दुरूस्त करायला जातो. सखाराम पल्लवीला स्वत:च्या खोलीत झोपायला जागा देऊन स्वत: बाहेर झोपतो. रात्री तिच्या अंगावर पांघरूण टाकतो.
सखारामच्या माणुसकीमुळे भारावून, पुण्याला येणं झालं तर आपल्याकडे येण्याचं आमंत्रण सखारामला देऊन, प्रभाकर-पल्लवी सकाळी पुढच्या प्रवासाला निघतात.
पुढे सखारामचं गावातल्या प्रेमिकेशी- शांताशी (अर्चना नेवरेकर) लग्न होतं. तिच्या येण्यानं धंद्याला बरकत येते, संसार फुलू लागतो, तिला दिवस जातात. एक दिवस सखारामचा सहकारी नाम्या (जयवंत वाडकर) झाडावरून पडून जखमी होतो. त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. भर रात्री भर पावसात त्याच्यासाठी औषधं न्यायला सखाराम निघालेला असतानाच प्रभाकर त्याच्या ढाब्यावर आश्रयाला येतो. सखारामच्या अनुपस्थितीत आत खोलीत शांत झोपलेल्या शांताला पाहून प्रभाकरची वासना चेतते. ती अनावर होऊन तो तिच्यावर बलात्कार करतो.
सकाळी घरी परतल्यावर सखारामला शांताचं कलेवरच पाहायला मिळतं; कारण बलात्काराचा कलंक सहन न होऊन तिनं आत्महत्या केलेली असते.
घरात बिछान्याजवळ पडलेल्या सिगरेटच्या थोटकांमुळे सखारामला शांतावर कुणी बलात्कार केला हे समजून जातं. शांताच्या मृत्यूनं सैरभैर झालेला सखाराम प्रभाकारला ठार मारून सूड घेण्यासाठी तिरमिरीनं पुण्याला जातो. तिथे प्रभाकरच्या घरी, त्याच्या अनुपस्थितीत पल्लवी आणि तिची मुलगी निकिता (स्वरांगी मराठे) सखारामला नकळत आधार देतात. लळा लावतात. त्यांच्या घरात सामावून घेतात. प्रभाकर परतल्यावर त्याला ठार मारू, असा विचार करून सखाराम तिथेच राहतो, स्वेच्छेनं स्वयंपाकाची जबाबदारी उचलतो. मात्र प्रभाकर परतल्यानंतरही सखाराम त्याला मारू शकत नाही. आधी परिस्थिती आणि मग सात्विक, विचारी वृत्ती त्याच्या निर्धाराला दुबळं बनवत जाते.
प्रभाकरही सखारामला आपल्या घरात पाहून चमकतो; नंतर त्याच्या हेतूचा अदमास लागल्यावर वरमतो. मग आतल्या आत तडफडू लागतो. आधी सखाराम आपल्याला ठार मारेल, ही भीती त्याला खात राहते. पण, सखाराम तसं काहीच न करता, सतत मूकपणे आक्रंदत समोर वावरत राहतो, तेव्हा प्रभाकर पश्चातापाच्या आगीत पोळू लागतो.
इथे कथानकात तमोगुणाचं आगमन होतं चंद्रकांत पाटील (उदय टिकेकर) या बेगुमान उद्योगपतीच्या रूपानं. एका बलात्काराच्या खटल्यातून- चंद्रकांतनं बलात्कार केलेला असूनही- प्रभाकर त्याला सहीसलामत निर्दोष सोडवतो. अशा लांडग्याला प्रभाकर एकदा आपल्या घरी मुक्कामाला बोलावतो... पुढे...
... पुढे काय होत असेल, याची कल्पना `चांदोबा' वाचणाऱया कोणत्याही प्रेक्षकाला येऊ शकेल. फ्लॅशबॅकमध्ये उलगडणाऱया या सिनेमाच्या प्रारंभी जन्मठेपेची सजा भोगून सुटलेला म्हातारा सखाराम दिसतो, हा `क्लू' दिला, तर पुढची कथा सांगायची गरज उरत नाही. कथा- पटकथाकार ए. राधास्वामी यांनी सिनेमाची सरळ सोपी मांडणी केली आहे. अडलेल्या तमासगिरीणीला परोपकाराच्या भावनेतून ढोलकीची साथ करणारा सखाराम, त्याचं आणि शांताचं प्रेमप्रकरण आणि लग्न, `पेंद्या'सदृश नाम्या या पटकथेतल्या युगतींच्या माध्यमातून त्यांनी लावणी, विनोद, श्रृंगार, कौटुंबिक नाटय़, प्रेमगीत आदी `लोकप्रिय' घटक चपखलपणे पेरले आहेत. त्यांच्या अटोपशीर- नेमक्या प्रसंगरचनेला प्रताप गंगावणे यांच्या ग्रामीण बोलीतील साध्या, रांगडय़ा, मार्मिक दृष्टांत देणाऱया संवादांची योग्य साथ मिळाली आहे. त्यामुळे हा कथाभाग पसरट होत नाही. वाहावत जात नाही. `भल्या सखारामच्या वैराण आयुष्यात हिरवळ आली न आली तोच...' या मूळ कथानकातल्या बेतशीर जागेतच हा कथाभाग नेमका बसला आहे.
शांतावरचा बलात्कार, सखारामचं सूडानं पेटणं, इथपासून ते चंद्रकांत पाटलाच्या नीचपणाला सखारामनं दिलेल्या शिक्षेपर्यंतचा पूढचा संपूर्ण कथाभाग निसरडा आहे. कारण त्यात अतिनाटय़मयतेच्या सर्व संधी ठासून भरल्या आहेत. मात्र हा अत्यंत नियंत्रित, (low key) प्रसंगांमधूनच उलगडतो, हेही पटकथाकार- संवादकारांचं यश आहे. पटकथाकार- संवादकार व्यक्तिरेखांच्या मनाचे तळ ढवळत नाहीत, कारण तो या सिनेमाचा `फोकस' नाही. त्यांना तीन वृत्तींचं प्रातिनिधिक दर्शन घडविणाऱया प्रमुख व्यक्तिरेखांच्या ढोबळ आरेखनांमधूनच बोधकथा दाखवायची आहे. ते काम त्यांनी चोख केलं आहे.
अर्थात, या ढोबळ मांडणीमुळे या कथानकात काही प्रश्नही पडत जातात; पण त्यापैकी एक सोडून, बाकी सगळे या प्रकारच्या मांडणीत अपरिहार्य अशी `सिनेमॅटिक लिबर्टी' म्हणून सोडून द्यावे लागतात. असा सोडता न येणारा मुद्दा एकच पण महत्त्वाचा. प्रभाकर पल्लवीला सखारामच्या ढाब्यावर रात्री एकटीला सोडून जातो; तेव्हा ती फारच सहजपणे परक्या घरात, एका परपुरुषाच्या उपस्थितीत राहायला, खोलीत जाऊन झोपायला तयार होते. शिवाय निर्घोर झोपताना दाराला आतून कडीसुद्धा लावत नाही. बलात्काराच्या रात्री शांताही नेमकं असंच वागते. हा प्रकार तर्काला न पटणारा आहे आणि त्यात कथाभाग `घडविण्या'तली पटकथाकाराची असहाय्यता दिसते.
दिग्दर्शक म्हणून राधास्वामींनी लक्ष्मीकांत बेर्डेला गंभीर भूमिकेत निवडण्याचं धाडस दाखवलंय आणि त्याच्याकडून नियंत्रित पण प्रभावी कामगिरी करवून घेतली आहे. वेगळ्या वाटेच्या सिनेमांना सर्वात मोठा धोका त्यांच्या दिग्दर्शकांकडूनच असतो. कारण त्यांना अशा सिनेमात, प्रत्येक फ्रेममध्ये `दिसण्या'चा फार सोस असतो. खास दिग्दर्शिकाचे `टचेस' देण्याच्या हौशीपायी ते सहसा सगळा सिनेमा चिवडून ठेवतात. सुदैवानं राधास्वामी यांना या रोगाची लागण झालेली दिसतं नाही. शंकर बर्धन यांचं छायालेखन, शरद पोळ यांची कला, अनिल मोहिले यांचं संगीत आणि दिग्दर्शक राधास्वामी यांनीच केलेलं ध्वनीमुद्रण या तांत्रिक बाजूही आशयावर स्वार न होता आपापली कामगिरी नेमकेपणाने पार पाडतात. या गुणाची झलक सुबल सरकार यांनी नृत्यदिग्दर्शन केलेल्या, टिपिकल स्वप्नगीत पद्धतीच्या, प्रेमगीतातही दिसतात, इथे नायक- नायिका नाचतात. पण तो `नृत्यदिग्दर्शित' नाच वाटत नाही. ते सहजस्फूर्त नृत्य वाटतं.
 लक्ष्मीकांत बेर्डेच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या भूमिकांमध्ये सखारामचा सहज समावेश होईल. तो सखारामच्या सात्विक वृत्तीशी समरस झालेला दिसतो. त्यामुळे सुरूवातीच्या नर्मविनोदी प्रसंगांमध्येही त्याचा उत्स्फूतं हजरजबाबीपणा वगळता बाकीचे लोकप्रिय `गुणविशेष' झळकत नाहीत. रूढ इमेजच्या पलीकडची, संपूर्णपणे विरुद्ध स्वभावरचनेची ही भूमिका त्यानं जीव ओतून केली आहे, तिला न्याय दिला आहे. रवींद्र मंकणी आणि उदय टिकेकर यांनीही आपापली चपखल निवड सार्थ ठरवली आहे. बलात्कारासारखं घृणित कृत्य करणारा, भ्याडपणे थंड राहणारा, पुढे निर्लज्जपणे एका बलात्काऱयाला सजेपासून वाचवणारा प्रभाकर हा रवींद्र मंकणींनी दाखविलेल्या त्याच्या भावछटांमुळे खलनायक होत नही. स्खलनशील, कमअस्सल- पण माणूसच वाटत राहतो. उदय टिकेकरही चालीबोलीतून चंद्रकांत पाटलाचा जनावरी मस्तवालपणा जिवंत करतात. या त्रिगुणांना निशिगंधा वाडनं स्निग्ध, स्नेहाळ साथ दिली आहे. छोटय़ाशा भूमिकेत चटका लावून जाण्याची जबाबदारी अर्चना नेवरेकर सहजपणे पार पाडते. जयवंत वाडकरचा नाम्याही अगदी झकास, `आभाळमाया'ची `चिंगी' स्वरांगी मराठे हिला टिपिकल बालकलाकारांच्या साच्यातली भूमिका मिळाली आहे. तिचा चुणचुणीतपणा जाणवतो.
जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं, सोप्या शब्दांत थीम मांडणारं `माणूस कसा' हे शीर्षकगीत अनिल मोहिलेंच्या सुरेल चालीमुळे लक्षात राहतं. सिनेमात ते तुकडय़ातुकडय़ात पेरलेलं आहे.
 `मराठी सिनेमात आता घडवतोच क्रांती असल्या आक्रस्ताळ्या अभिनिवेशापासून मुक्त असलेला हा साधा- भाबडा पण अतिशय प्रामाणिक, सिनेमा भलत्या क्रांतिकारक अपेक्षा न ठेवता पाहिला तर मनाला भावून जाईल.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment