Monday, April 11, 2011

वाइल्ड विरंगुळा (जंगल)

रामगोपाल वर्माचा सिनेमा कधी उत्कृष्ट असतो, कधी चांगला, कधी बरा, तर कधी (पण फारच क्वचित) एकदम टुकार!
एक खात्री मात्र नेहमीच देता येते. त्याचा प्रत्येक सिनेमा त्याच्या आधीच्या सिनेमापेक्षा आणि अन्य मंडळींच्या समकालीन सिनेमांपेक्षा- विषय आणि/ किंवा मांडणीच्या बाबतीत वेगळा असतो... एकदम हटके.
तंत्रावरची जबरदस्त पकड, नव्या, उत्साही कलावंत- तंत्रज्ञांच्या हुरूपाला वाव देऊन मिळवलेला ताजेपणा यातून त्याचा सिनेमा अगदी संस्करणीय नाही झाला, तरी किमान प्रेक्षणीय असतोच.
`जंगल'ही या सगळ्या निकषांवर खास रामगोपाल वर्माचा सिनेमा आहे. किमान एकवार पाहण्यासारखा निश्चितच.
`जंगल'ही मुळात आहे एक प्रेमकहाणी, प्रेमकहाणीत प्रेमिकांच्या मिलनाआड काही खलप्रवृत्ती, नियती वगैरे घटक आडवे येतात, पण `सच्चा प्यार' सगळ्या अडथळ्यांना ओलांडून मिलनाच्या फितीपर्यंत पोहोचतंच. कधीकधी ते असफल (आणि अधिक उदात्त वगैरे) होतं.
`जंगल'मध्ये कथा- पटकथा संवादकार जयदीप साहनी यांनी हा परिचित `प्लॉट' नेहमीच्या `परिसरा'तून एकदम वेगळ्याच ठिकाणी, घनगर्द जंगलात नेलाय. हिंस्र श्वापदांनी व्यापलेलं भयानक जंगल आणि त्या जंगलावर राज्य करणारा श्वापदांपेक्षाही हिंस्र असा डाकू दुर्गा नारायण हे `जंगल'चे खलनायक.
सिद्धू (फरदीन खान) आणि अनु (उर्मिला मातोंडकर) हे `जंगल'चे नायक- नायिका. अनुचे वडिल (राजू खेर) सालाबादप्रमाणे तिची मर्जी न विचारता कुणा अमेरिकारिटर्न्ड, श्रीमंत मुलाबरोबर तिचं लग्न ठरवतात. तिची त्या मुलाबरोबर गाठ घालून देण्यासाठी सहकुटुंब जंगल सफारीला जातात. सिद्धूही तिच्यापाठोपाठ त्याच जंगलात, त्याच रिसॉर्टमध्ये दाखल होतो; तिथे अनुला सर्वांसमक्ष ओळख दाखवत नाही. इथेही त्यांच्या चोरटय़ा भेटी सुरू होतात, पण, रिसॉर्टचालक दोरायस्वामीला (मकरंद देशपांडे) या भानगडीचा पत्ता लागतोच. या जंगलावर डाकू दुर्गा नारायणच्या (सुशांत) दहशतीचं साम्राज्य असतं. पोलिसांचं विशेष कृती दल त्याचा नि:पात करण्यासाठी जंगजंग पछाडत असतं. पण, तळहातावरच्या रेषांसारखं आख्खं जंगल तोंडपाठ असलेला दुर्गा त्यांना हुलकावण्या देऊन निसटत जातो. हाती सापडलेल्या पोलिसांना, कमांडोंना, खबऱयांना अत्यंत निर्घृण पद्धतीनं ठार मारतो.
जिवंतपणीच दंतकथा होऊन बसलेल्या दुर्गाला संपवण्याचा विडा उचललेला बहादूर पोलिस अधिकारी शिवराज (सुनील शेट्टी) एका छाप्यात जेस्सू (विजयराज) या दुर्गाच्या साथीदाराला जिवंत पकडतो. त्याच्या सुटकेसाठी दुर्गाची टोळी जंगल सफारीवर आलेल्या पर्यटकांचं अपहरण करते.
अनुच्या काळजीनं वेडापिसा झालेला सिद्धू तिच्या सुटकेसाठी जे थरारक, रोमांचकारक प्रयत्न करतो, त्यातून `जंगल'चा कळसाध्याय साकारतो...
...लांबण, फाफटपसारा यांचा वाराही न लागलेली, थोडक्या आणि छोटय़ा प्रसंगांमधून विकसित होत जाणारी पटकथा `जंगल'ला लाभली आहे.
विशेष कृती दलाचे कमांडो लष्करी वाहनातून घनगर्द जंगलात शिरतात, अत्यंत सावधपणे त्यांची शोधमोहिम सुरू असते आणि अचानक सुरुंगाच्या स्फोटात त्या वाहनाच्या क्षणार्धात ठिकऱयाठिकऱया उडतात... या प्रभावी प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर उमटणाऱया श्रेयनामावलीपासूनच `जंगल' पकड घेतो. त्यापुढे लगेचच अनु आणि सिद्धूची प्रेक्षकांना ओळख होते. `पहले गुस्सा फिर प्यार' पद्धतीचं त्यांचं प्रेमप्रकरण एक वर्षापूर्वी कसं जमलं, हा फ्लॅशबॅक `पहली बार मिले थे' या खेळकर गाण्यातून झट की पट उलगडून जातो.
पुढे अनुच्या लग्नाचा प्रस्ताव, सगळ्यांचं जंगलात जाणं हा सगळाच कथाभाग वेगानं पुढे सरकतो. पटकथाकाराची खरी कसोटी होती, ती अर्थातच जंगलात. या मंडळींची जंगलातली पिकनिक, शिवराजची मोहिम आणि दुर्गाचा जंगलातला वावर अशा तीन पातळ्यांवर कथानक फिरवून प्रेक्षकाला खुर्चीशी बांधून ठेवण्याच्या परीक्षेत पटकथाकार प्रथम वर्गात पास झालाय. त्यासाठी पिकनिकमधल्या दुय्यम पात्रांना अर्कचित्रासारखं एकांगी व्यक्तिमत्त्व देण्याची (एक सरदारजी, दुसरा पिकनिकमध्ये तेराव्याला आल्यासारखा वावरणारा उदास इसम, वगैरे) क्लृप्तीही साहनींनी वापरली आहे.
हलकेफुलके प्रसंग, नर्मविनोदी मांडणी आणि खुसखुशीत संवादांनी तसंच `अय्यो रामा' या धमाल गाण्यानं पिकनिक रंगते. त्याचवेळी, एखाद्या श्वापदाच्या चपळाईनं कमांडोंशी झगडणाऱया जेस्सूकडून दूर्गाचा ठावठिकाणा वदवून घेण्यासाठी शिवराजनं केलेले अपयशी प्रयत्न, दुर्गाची खतरनाक एन्ट्री आणि पर्यटकांच्या अपहरणाचा थरारक प्रसंग सिनमातली थराराची बाजू सांभाळतात. अपहृत पर्यटकांचा दुर्गाच्या साथीदारांनी चालवलेला `खेळ' (विशेषत: सिप्पानं (राजपाल यादव) अनुच्या लहानग्या भावाशी खेळलेला `बंदूक- बंदूक'चा भायवह खेळ) अनुकडे दुर्गाने `विशेष लक्ष' देण्यास केलेली सुरुवात आणि एका पर्यटक महिलेची क्रूर हत्या करण्याचा प्रसंग यातून ही तिपेडी वीण घट्ट होऊन जाते. पुढच्या सिनेमाकडून अपेक्षा निर्माण करते...
...दुर्दैवानं पटकथाकार- दिग्दर्शक या अपेक्षा पुढे पूर्ण करीत नाहीत. जेस्सूच सुटकेनंतर दुर्गा ओलिसांची सुटका करतो... फक्त अनुला मागे ठेवून घेतो. तिला सोडवण्यासाठी सिद्धू दोरायच्या मागोमाग थेट दुर्गाच्या तळावर जातो. तिथून सिनेमातला थरार संपतो, गांभीर्य संपतं आणि वेगळेपणाही. खरंतर त्यापूर्वीच जेस्सूची सुटका होणार हे कळाल्यावर दुर्गाचे साथीदार मद्यपान करून `पतली कमर, चिकना बदन' गाण्यावर हैदोसधुल्ला करतात, तिथेच गाडी घसरते. पोलिस मागावर असताना एवढा बेदरकार निष्काळजीपणा घडू देण्याइतका दुर्गा निर्बुद्ध कसा?
दोरायच्या मागोमाग सिद्धूबरोबर विशेष कृती दलाचे कमांडोही पोहोचतात तेव्हा, इतकी सोपी युक्ती यांना यापूर्वी कधीच कशी सुचली नव्हती (आणि इतक्या सोप्या पद्धतीनं दुर्गापर्यंत पोहोचणं शक्य असेल, तर तो एवढा मोठा डाकू कसा झाला), असा प्रश्न पडतो. या तळावर बराच काळ दुर्गा कमांडोंच्या टप्प्यात असलेला दिसतो. शिवराजच्या आदेशामुळे ते त्याला तात्काळ उडवत नाहीत (आणि परिणामी स्वत: `उडतात'). असला आत्मघातकी आदेश शिवराज देतो कसा, याला तार्किक स्पष्टीकरण नाही. थोडासा हलकल्लोळ उडवून देऊन सिद्धू अनुला तळावरून पळवून नेण्यात आणि डाकूंना चुकवण्यात यशस्वी होतो; तेही इतका, की पुढे जंगलात `दो प्यार करनेवाले जंगलमें' हे गाणं (संदीप चौटाच्या `दणदणीत' संगीताच्या साथीनं) गाण्याची फुर्सत त्याला मिळते.
विचार करा. जंगलात प्रथमच आलेले अनु आणि सिद्धू हे कोवळे, शहरी जीव आणि जंगलाचा चप्पाचप्पा जन्मापासून पाठ असलेली दुर्गा आणि कंपनी यांच्यातली शर्यत (निव्वळ उत्कट प्रेमाच्या बळावर?) सिद्धू जिंकतो, हे थेट हास्यास्पदच आहे. दुर्गाचे अनुप्रेम उमगलेल्या जेस्सूचा राग, कुटील दुर्गानं केलेलं त्याचं `एन्काउंटर', अनु आणि सिद्धूला जंगलात वाघ `भेटल्या'वर उडणारी हबेलहंडी, असा काही चमकदार भाग वगळता उत्तरार्ध साफ अपेक्षाभंग करतो. त्यात सिद्धू आणि अनु जंगलात एकटे असताना अनुच्या तोंडचे काही संवाद थेट द्व्यर्थी झाले आहेत; याची पूर्वकल्पना `जंगल' कारांपैकी कुणालाच कशी आली नाही?
`दुर्गा आणि जंगल' हे अनु- सिद्धूचे सर्वात खतरनाक शत्रू असल्याचा उल्लेख दोरायच्या तोंडी असला, तरी `जंगल'चं जंगल काही त्या अर्थानं घाबरत नाही फारसं. अनेक प्रसंगांमध्ये दृश्याच्या `फोरग्राऊंड'ला सरडे, साप वगैरे मंडळी फिरवून, कधी जनावरांची पळापळ दाखवून रामगोपालनं जंगलाचा फील व्यवस्थित दिलाय. पण ते कुठेही भीषण भयावह वाटत नाही.
कळसाध्यायाला सिद्धू, दुर्गा आणि शिवराज या तिघांनाही एकत्र आणताना पटकथाकार- दिग्दर्शक यांची झालेली दमछाक स्पष्टपणे जाणवते. या शेवटाचं नातं गतिमान पूर्वार्धापेक्षा भुसभुशीत उत्तरार्धाशीच अधिक आहे.
मात्र, अंति असमाधानच पदरात घालणारा `जंगल' अथपासून इतिपर्यंत प्रेक्षणीय मात्र झाला आहे. नेहमीपेक्षा वेगळे (पण उगाचच चमत्कारिक नसलेले) दृश्यकोन, प्रसंगांची कुळी ओळखून दिलेली ट्रीटमेंट, क्लोजअप्स आणि एक्स्ट्रीम क्लोजअप्सचा चपखल वापर, परिसर वेळकाळ यांचा विचार करून छायालेखक विजय अरोरा यांच्याकडून करून घेतलेली अव्वल दर्जाची कामगिरी, ध्वनीलेखकाला दिलेला वाव, विशेष ध्वनीपरिणाम, पार्श्वसंगीत आणि दृक्परिणामांचा योग्य वापर याबरोबरच अतिशय उत्तम पात्रयोजना यांचा मेळ दिग्दर्शकानं तयारीच्या वाद्यमेळ संयोजकाच्या कौशल्यानं घेतला आहे.
उर्मिला मातोंडकरच्या अभिनयाचा कस लावण्याचा वकूब काही अनुच्या भूमिकेत नाही. पण, पूर्वार्धाच्या पूर्वार्धातली `गर्ल नेक्स्ट डोअर' सफाईनं साकारणारी उर्मिला दुर्गाच्या तावडीत सापडलेल्या अनुची असहाय्य, भयग्रस्त तडफडही उत्तम साकारते. फरदीन खानचा `स्क्रीन प्रेझेन्स' `प्रेम अगन' मध्येही जाणवला होता; त्यापलीकडेही त्याच्यात काही आहे हे `जंगल' सिद्ध करतो. त्याचं वय आणि एकंदर बाह्यरूप सिद्धूच्या भूमिकेसाठी परफेक्ट आहे. आंग्लप्रदूषित हिंदी उच्चारणातही बऱयापैकी सुधारणा केल्यानं तो या भूमिकेत साजून दिसतो. सुनील शेट्टीचा शिवराजही संयत आणि जोरकस वाटतो. पण, `बॉर्डर', `रेफ्युजी' पाठोपाठ `जंगल'मुळे अशा पोलिसी- लष्करी भूमिका ही त्याची स्पेशालिटी होण्याचा धोका आहे. स्वाती चिटणीस, राज खेर, मकरंद देशपांडे आणि पिकनिकमधली अनाम मंडळी आपापल्या भूमिकांच्या मापात फिट्ट बसून समाधानकारक कामगिरी करतात.  
गेटअप आणि मेकअपमधून बराच वेगळा भासणारा सुशांतचा दुर्गा अंतरी अन्य खलनायकांपेक्षा फार वेगळा नाही. तरीही एरवीची भावहीन नजर, अनुला पाहिल्यावर या नजरेत घडणारी पुसटशी `हालचाल' असे बारकावे त्यानं चांगले खुलवले आहेत. तशी फार भारदस्त अंगकाठी नसताना सुशांतचा अभिनय आणि दिग्दर्शकाचं टेकिंग यातून दुर्गाची दहशत विश्वसनीय झाली आहे.
पण, `जंगल'चे खरे हिरो आहेत ते दुर्गाच्या टोळीचे सदस्य. रंगभूमी आणि मालिकांच्या जगातल्या गुणवंत कलाकारांना निवडून, त्यांच्या `अपरिचित' असण्याचा फायदा घेऊन, त्यांनी वेशभूषा रंगभूषेच्या साह्यानं टेरर डाकू बनवण्याचं काम दिग्दर्शकानं केलंय. पुढचा जिम्मा या मंडळींनी लिलया पेललाय. `भाबडे क्रौर्य' नामक एक विलक्षणच रसायन जन्माला घालणारा राजपाल यादव आणि आदिवासीची काटक चपळाई मूर्तिमंत उभी करणारा विजयराज हे दोघे विशेष उल्लेखास पात्र आहेत. या टोळीला दुर्गावर एकतर्फी प्रेम करणाऱया काश्मिरा शाहची साथ झिंगबाज आहेच; शिवाय दुखावलेल्या प्रेमिकेची मनोवस्थाही ती उत्तम उभी करते.
`जंगल'च्या कथानकात मुरून गेलेली सगळीच गाणी श्रवणीय आणि प्रेक्षणीयही आहेत. पण, संदीप चौटामधला पार्श्वसंगीतकार (नेहमीप्रमाणे) त्याच्यातल्या संगीतकारावर मात करून गेलाय.
एरवी सगळ्याच बाबतीत अकलेचा ठणठणाट दाखवणाऱया सिनेमांपेक्षा वेगळ्या विषयावरचा, तंत्रसमृद्ध आणि गुणवत्तासमृद्ध `जंगल' अनेक पटींनी उजवा आहे. रामगोपाल वर्माच्या मोजपट्टीवर तो तोकडा वाटतही असेल, पण ही मोजपट्टी त्यानंच बनवून दिली आहे, याचं भान ठेवलेलं बरे!


(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment