सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, हे `रेफ्युजी'नं पुन्हा एकदा सिद्ध केलंय, पण फारच वेगळ्या प्रकारे. झालंय असं की. `रेफ्युजी'मध्ये अभिषेक बच्चन आणि करीना कपूर या नव्या जोडीनं पदार्पणातच दमदार कामगिरी केली आहे. निर्मितीमूल्यं, कला दिग्दर्शन, संगीत, पार्श्वसंगीत, छायालेखन आदी बाजूही भक्कम आहेत. मात्र, एकटय़ा लेखक- दिग्दर्शकाच्या, जेपी दत्ताच्या भरकटण्यामुळे या सगळ्यांच्या कामगिरीवर पाणी पडलंय आणि तब्बल तीन तास वीस मिनिटांचा हा सिनेमा कंटाळवाणा आणि प्रभावशून्य झालाय.
दिग्दर्शकमाहात्म्य आपण अशा रीतीनं सिद्ध करू, असा विचार `रेफ्युजी' बनवताना जेपीच्या मनाला शिवलाही नसेल. पण, तशी `कामगिरी' त्याच्या हातून घडली आहे करी!
भारत- पाकिस्तान यांच्यातील सांस्कृतिक, वांशिक, भाषिक साधर्म्यामुळं या दोन देशांतल्या शत्रुत्त्वाला- सीमारेषेला काही अर्थ नाही. हीच नव्हे, तर जगातल्या सगळ्याच देशांच्या सीमा कृत्रिम आहेत, कारण मानव तितुका एक. सबब, सर्व सीमा पुसून अमुकस्थान, तमुकस्थान अशा देशांच्या ओळखी नष्ट व्हाव्यात आणि सगळ्या जगाचं रुपांतर विशाल मानवस्थानात (`रेफ्युजी'मधला शब्द- `इन्सानियतस्थान') व्हावं, हा जेपीचा लाडका सिद्धांत. शिवाय भारतातल्या आणि जगभरातल्या निर्वासितांबद्दलही जेपीला मनापासून कळवळा आहे.
या निर्वासितांची- `रेफ्युजी'ची दु:खं आणि भारत- पाकिस्तान मैत्रीचे स्वप्न यांची सांगड एका प्रेमकथेतून घालण्याचा महत्त्वांकाक्षी प्रयत्न जेपीनं `रेफ्युजी'मध्ये केला आहे. पण, आपल्या कल्पनांमधील अंतर्विरोधाचं भान त्याला नसल्यानं हा सिनेमा सगळ्याच आघाडय़ांवर अपेशी ठरतो. त्यात निर्वासितांची दु:खं धड दिसत नाहीत, भारत- पाकिस्तान संबंधावरचं भाष्य उथळ आणि बालिश झालंय आणि प्रेमकहाणीचा तर खेळखंडोबाच झालाय.
दोन देशांच्या सीमारेषांदरम्यान, कोणत्याच देशाच्या मालकीची नसलेली जी `नो मॅन्स लँड' (मानवरहित प्रदेश) असते, तिला `रेफ्युजी'च्या क्लायमॅक्समध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. दुर्देवानं आशयाच्या कोणत्याच प्रदेशाशी धड नातं प्रस्थापित करू न शकणारा हा सिनेमाच `नो मॅन्स लँड'मध्ये जाऊन पडला आहे.
`रेफ्युजी'चा नायक आहे रेफ्युजी (अभिषेक बच्चन) हा तरुण निर्वासित. कच्छच्या रणातल्या भारत- पाकिस्तान सीमेलगतच्या एका मुस्लिमबहुल गावात तो राहतो. या गावाचा मुखिया असलेल्या जानमहंमदनं (अनुपम खेर) या अनाथ मुलाला लहानपणापासून आपला मुलगा मानून वाढवलं आहे. त्याला पित्याचं प्रेम देणारा जानमहंमद चांगलंसं नाव का देत नाही, सगळे त्याला `रेफ्युजी' म्हणूनच का हाक मारतात, हे मात्र विचारायचं नाही.
रेफ्युजीला कच्छचं रण उभं- आडवं पाठ आहे. पाकिस्तानात जाणाऱया निर्वासितांना दोन्ही देशांचे गस्ती- पहारे चुकवून तिकडे सुखरूप नेऊन पोहोचवणं आणि तिकडची माणसं, माल, शस्त्रं अशाच प्रकारे भारतात आणणं, हा त्याचा पोटापाण्याचा धंदा, लहानपणापासून अमिताभ बच्चनचे सिनेमे पाहिल्यामुळे की काय, पण त्याचं व्यक्तिमत्त्व अमिताभच्या पडद्यावरच्या थंड- उद्रेकी, शांत- खदिरांगारी प्रतिमेसारखं झालं आहे. दोन्ही देशांच्या वाऱया करून रेफ्युजी एक मोठं शहाणपण शिकलाय- सीमारेषेच्या दोन्ही बाजूला अगदी एकमेकांसारखीच माणसं राहतात. त्यामुळे या सीमेला खरंतर काही अर्थ नाही आणि भारत- पाकिस्तान या स्वतंत्र देशांनाही, रेफ्युजीचं स्वत:चं निर्वासित असणं, कोणत्याही देशाशी बांधील नसणंही त्याच्या या ज्ञानाला सखोलता मिळवून देतं.
एका बांगलादेशी निर्वासित कुटुंबाला पाकिस्तानात पोहोचवताना रेफ्युजी नाझ ऊर्फ नाझोच्या (करीना कपूर) प्रेमात पडतो. खरंतर आक्रमक स्वभावाची नाझोच त्याला प्रेमात पाडते. या नात्याच्या भवितव्याबद्दल आधी साशंक असणारा रेफ्युजी हळुहळू खुलतो, तिच्या प्रेमावर विश्वासतो आणि तिच्या- त्याच्या घराचं, संसाराचं अशक्यप्राय स्वप्नही पाहू लागतो.
तिकडे अश्रफ (सुनील शेट्टी) हा पाकिस्तानी सैन्याधिकारीही नाझोच्या प्रेमात पडतो. नाझोच्या मोकळ्याढाकळ्या वागण्याबोलण्यातून तीही आपल्या प्रेमात पडली आहे, असा अश्रफचा गैरसमज होतो. नाझो- रेफ्युजीच्या `चोरटय़ा' भेटी, वाढती जवळीक, यातलं काहीच (म्हणे) ठाऊक नसलेले नाझोचे आईवडीलही (पद्मिनी कपिला, कुलभूषण खरबंदा) केवळ कथानकाच्या सोयीसाठी हाच गैरसमज पुढे चालवतात. दरम्यान, नाझो रेफ्युजीच्या पैशानं गावात एक घर `विकत' घेऊन ते भावी संसारासाठी सजवतेसुद्धा. या घरात नाझो- रेफ्युजीचा गांधर्वविवाह (पक्षी : शरीरसंबंध) घडून येतो.
कथानक प्रेमकथेबाहेर झेपावतं ते मध्यंतरानंतर. निर्वासित समजून काही आंतराष्ट्रीय दहशतवाद्यांना पाकिस्तानातून भारतात आणण्याचा गुन्हा रेफ्युजीकडून अजाणता घडतो. हे दहशतवादी ट्रेन- बसेसमध्ये बॉम्बस्फोट घडवतात. शेकडो माणसं मारली जातात. रेफ्युजीची पाकिस्तानात धरपकड होते. अश्रफचा खुनशी सहकारी तौसिफ (मुकेश तिवारी) रेफ्युजीला मरणप्राय बुकलून उंटावर लादून भारतात हुसकावून देतो. भारतीय सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) रघुवीर (जॅकी श्रॉफ) हा अधिकारी रेफ्युजीवर उपचार करवून घेताना त्याचं ब्रेनवॉशिंगही करतो. आणि त्याला एकदम बीएसएफचा जवानच बनवून टाकतो.
या नोकरीत रूजू होताच रेफ्युजी जिवाच्या करारानं लढून आपलं गाव पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या तावडीत जाण्यापासून वाचवतो. त्याला नाझोची आठवण छळत असते, पण आता तो पूर्वीसारखा सहज सीमापार जाऊ शकत नाही. शिवाय नाझो पाकिस्तानी नागरिक असल्यानं तो तिच्याशी लग्नही करू शकत नाही. तिकडे पोटुशी नाझोही रेफ्युजीच्या ओढीनं वारंवार सीमा पार करण्याचे अपयशी प्रयत्न करत राहते. अखेर नियतीला त्यांची दया येते. या दोन प्रेमी जिवांचं मीलन कव्वालीच्या साथीनं घडतं आणि भारत- पाकिस्तानचे लष्करी अधिकारी मिळून `नो मॅन्स लँड'मध्ये जगातला पहिला `विश्वमानव' जन्माला आणण्याचं पुण्य कमावून धन्य होतात.
`रेफ्युजी'ची सुरुवात खरं तर काही अपेक्षा निर्माण करणारी आहे. जगण्याशी जोडणारा कुठलाच धागा नसलेल्या `रेफ्युजी'चं तुटकं एकलेपण हे वेगवेगळ्या प्रकारचं एकटेपण भोगवणाऱया जगातल्या सर्वांशीच नातं सांगतं. त्याच्या विशिष्ट पार्श्वभूमीमूळेच दोन देशांतला फरक- दुरावा- सीमा मान्य नसण्याच्या त्याच्या भूमिकेला वजन मिळतं. याच मनोभूमिकेसह त्याच्या व्यक्तिरेखेचा प्रवास झाला असता, तर जेपीच्या युक्तिवादाला धार आली असती. पण, मध्यंतरानंतर तौसिफनं भारताबद्दल अपशब्द उच्चारल्यावर रेफ्युजी ज्या पद्धतीनं उसळतो आणि देशप्रेमाखातर (`रोजा'च्या नायकाच्या स्टायलीत) बेदम मार खातो, तो सर्व प्रकार वीरश्रीयुक्त टाळ्याखेचक असला, तरी इथेच रेफ्युजीच्या आंतरिक रसायनाला विरजण लागतं. दोन्ही देश त्याच्यासाठी समान असताना त्याला भारताबद्दल एकदम पुळका का येतो, याला काही उत्तरच नाही.
देशहीनांच्या समस्येची काटेरी वाट सोडून जेपी एकदम भारतप्रेमाच्या राजमार्गावर येतो, तिथेच तो भरकटतो आणि सिनेमाही.
नाझो- रेफ्युजीचं प्रेमप्रकरण हा कथाकाचा मूळ गाभा. तो काहीसा हळुवार, काव्यमय करण्याच्या आणि प्रत्येक फ्रेम `सुंदर' करण्याच्या हव्यासांपोटी अविश्वसनीय झालाय, तसाच शब्दबंबाळ, भावबंबाळ आणि बोजडही. पाकिस्तानातल्या एका छोटय़ा गावात दिवसा- रात्री (ही) खुलेआम भेटू शकणारे, मिठय़ा मारणारे, नाचणारे हे प्रेमिक (विशेषत: नाझो) मुळात भुकेकंगाल निर्वासित वाटतच नाहीत. नाझोकडे प्रत्येक प्रसंगाच्या मूडला साजेशा रंगसंगतीचे देखणे, फॅशनेबल कपडे असतात. हा करून विनोद आहे. करुण अशासाठी की निर्वासितांच्या हालांबद्दल प्रेक्षकाच्या मनात करुणाच उत्पन्न होत नाही या छेलबटाऊपणामुळे. शिवाय संवादकार ओ.पी.दत्ता यांनी या दोघांच्या तोंडी त्यांच्या वयाला. पार्श्वभूमीला न साजणारे हळहळे- हुळहुळे, काव्यात्म संवाद देऊन या प्रेमाच्या पायाखालची वास्तवाची जमीनच हिरावून घेतली आहे अकारण.
जेपीचा सिनेमात `दिसण्याचा' हव्यास मध्यंतरानंतर सिनेमात `बोलण्या'च्या पातळीवर घसरतो आणि सिनेमाचा तोलच ढळतो. रघुवीर आणि अश्रफ यांची बैठक हा या दृष्टीनं नमुनेदार प्रसंग आहे. हे दोघे पगाराचं काम सोडून आपापल्या देशाचे राष्ट्रप्रमुख असल्याच्या थाटात द्विपक्षीय संबंधावर अशी काही भाषणबाजी करतात की यंव रे यंव!
मानवतावादाची महती सांगण्यासाठी जेपीला कठोर वास्तवाकडे, दोन देशांच्या संबंधांमधल्या बहुपेडी गुंतागुंतीकडे डोळेझाक करून इतक्या फिल्मी पद्धतीची उथळ उत्तरं शोधावीशी आणि सांगावीशी वाटतात, हे दुर्देव. त्याच्या या खटाटोपात किती ढोबळ गोष्टी घडतात. संपूर्ण सिनेमाभर व्यक्तित्वहीन असलेलं रेफ्युजीचं अख्खं गाव एकदम दहशतवाद्यांना सामील होतं. गावाच्या मुखियाचं देशप्रेमयुक्त भाषण ऐकूनही त्यांच्यावर परिणाम होत नाही. तेच गाव रेफ्युजीच्या चार वाक्यांनी मात्र बंदुका टाकून त्याच्यामागे चालू लागतं. ( क्यों भाई? भाषणाचाच प्रभाव म्हणायचा तर अनुपम खेरचं भाषण वक्तृत्वगुण आणि अभिनयात अभिषेकपेक्षा सरस होतं. फक्त तो हिरो आणि हा कॅरेक्टर ऍक्टर म्हणूनच हा दुजाभाव ना? अच्छे आर्टिर्स्टोकी कदर करना कब सिखेंगे ये लोग? असो.) असा हा प्रवास अत्यंत बटबटीत क्लायमॅक्सला सुफळ संपूर्ण होतो.
अभिषेक- करीनाची ताजी टवटवीत जोडी हे `रेफ्युजी'चं मुख्य आकर्षण. `अभिताभपुत्र तो आहे कसा आननी' ही उत्सुकता असणाऱयांसाठी शुभवर्तमान असे की, या मुलात दम आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वावर साहजिकच बापाची सावली आहे, पण अस्फुटशी. तो पडद्यावर गोंडस दिसत नाही, तरीही त्याच्यात लक्षवेधी स्क्रीन प्रेझेन्स आहे, राकटपणाला निरागस छटा आहे आणि अभिनेत्याची गुणवत्ताही आहे. चेहरा, डोळे आणि शरीरभाषेचा उत्तम वापर करून त्यानं रेफ्युजीचं व्यक्तिमत्त्व उभं केलंय. बापाची नक्कल करणं प्रयत्नपूर्वक टाळतानाच काही अवघड प्रसंगांत मात्र त्यानं पितृस्मरण केल्याचं जाणवतं. आपल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याचा हॉस्पिटलमधला प्रसंग तर त्यानं काहीशा मेलोड्रामॅटिक पण प्रभावी अभिनयानं यादगार केलाय.
त्याचा एकच वांधा दिसतो. तो म्हणजे सातत्याचा अभाव. काही प्रसंगांमध्ये तो एकदम निर्जीव होतो. हे प्रसंग नेमके सुबुद्ध प्रेक्षकाला खटकणारे आहेत, हा योगायोग नसावा. कुणालाही न पटणारा प्रसंग स्वत:ला पटवून घेऊन लाखो प्रेक्षकांना पटवून देण्याचा अमिताभचा अद्भूत गुण अभिषेकच्या अंगी नाही हे खरं! ते बरं की वाईट हे काळ ठरवील.
करीना कपूरची कामगिरी निव्वळ सातत्याच्या बळावर अभिषेकपेक्षा सरस भासते. अल्लड आणि अंमळ ज्यादापणाच करणारी नाझो तिनं आत्मविश्वासानं साकारली आहे. संवादफेकीपासून भावदर्शनापर्यंत कुठेही तिच्यात नवखेपणा जाणवत नाही. करिश्माची बहीण असूनही बांध्यात, रुपात कुठेही तिच्याशी साधर्म्य नसल्यानं ती अनाठायी तुलनेपासून बचावली आहे.
अन्य मंडळींमध्ये अनुपम खेर आणि कुलभूषण खरबंदा नेहमीप्रमाणे प्रभावी कामगिरी करून जातात. जॅकी आणि सुनील शेट्टी सराईत झोकात वावरतात. सुनीलच्या हिंदी- उर्दू उच्चारणामुळे तो पाकिस्तानी वाटत नसला तरी आत्मविश्वासपूर्ण वावराच्या बळावर तो अश्रफ विश्वसनीय करतो. सुदेश बेरी आणि मुकेश तिवारी विशेष उल्लेखनीय. अमजद खानचा मुलगा शाबाद खानही अनुपमच्या बिघडलेल्या मुलाच्या भूमिकेत भाव खाऊन जातो. रीना रॉयचं जानमहंमदच्या बायकोच्या महत्त्वहीन भूमिकेतलं पुनरागमन अगदीच निष्प्रभ. छायालेखक बशीर अली यांनी पहिल्याच स्वतंत्र सिनेमात दिग्दर्शकाच्या नजरेनं सिनेमा टिपण्याचा मार्ग पत्करला आहे. बाह्यचित्रणात मरूभूमीच्या रौद्रसौंदर्यानं त्यांना मदत केलीये. पण बंदिस्त चित्रणात आणि रात्रीच्या दृश्यांत प्रकाशयोजनेची कृत्रिमता आणि टय़ूबलायटी भगभगीतपणा नजरेला खुपत राहतो. रत्नाकर फडके यांनी कलादिग्दर्शनात कच्छची घरं उत्तम रचली आहेत. पण, इथेही फ्रेम सुंदर करण्याच्या हव्यासातून घरांचं नीटनेटकं रचलेपण जाणवत राहतं. जानमहंमदच्या घरातली चूल कधीच पेटली नसावी, इतका तिचा परिसर सुबक स्वच्छ दिसतो.
भिखू वर्मा यांनी ऍक्शनदृश्यांमध्ये वास्तवाभासी वैविध्य आणलंय खरं, पण युद्धसदृश्य आवाक्याच्या भव्य दृश्यांमध्ये परिसराचा भूगोल (टोपोग्राफी) पुरेसा स्पष्ट होत नाही. (`बॉर्डर'मध्येही हा दोष जाणवत होताच.)
जावेद अख्तर यांची अर्थपूर्ण गीते आणि अनु मलिकचं सुरेल संगीत या `रेफ्युजी'च्या जमेच्या बाजू. `रात की हथेली पर', `ताल पे जब ये जिंदगानी चली', `मेरे हमसफर, मेरे हमसफर', `ऐसा लगता है', आणि `पंछी, नदियाँ, पवन के झोंके' ही गाणी गोड चाली आणि भारतीय वाद्यमेळानं श्रवणीय झाली आहेत. उदित नारायण, सोनु निगम, अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी जीव ओतून ती गायली आहेत. `जिसे तू ना मिला' ही कव्वाली मात्र सिनेमातल्या सिच्युएशनमुळे आणि आघाती एकसुरी चालीमुळे अकारण लांबल्यासारखी वाटते नृत्यदिग्दर्शका सरोज खान यांनी `ताल पे जब ये' मध्ये अभिषेक- करीना यांना अस्वभाविक नाचायला लावलंय. त्यात, अभिषेककरवी अमिताभची नक्कल करवून घेण्याचा प्रकार तर फारच सस्ता.
एकूणात दोन नवोदितांचं दमदार पदार्पण यापलीकडे फारसं काहीच न साधणाऱया या सिनेमाला पूर्ण विचाराअंतीच आश्रय द्या, म्हणजे अपेक्षाभंगाचं दु:ख होणार नाही.
(महाराष्ट्र टाइम्स)
mukesh da,
ReplyDeletepunah pratyayacha aanand!
pan lekh blog war taaktana mudrit maadhyamatlya
chuka sorry ek baarikshi chuk talali asti .. (no kumar sanu, dear!)
baaki sab kuch mu ma. wah!