Tuesday, April 26, 2011

सरल्यावरही उरणारा शोध (फिजा)


आपण किती भ्रमांमध्ये जगत असतो नेहमीच.
सामान्य माणूस म्हणून जगताना एक उबदार, सुरक्षित चौकट आखून त्या परिघात फिरत राहायचं, सरळमार्गानं चालत राहायचं; म्हणजे कालांतरानं आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत इथपासून ते परमेश्वराच्या इच्छेविना पानही हलत नाही, इथपर्यंतचा कुठलाही भ्रम तत्त्वज्ञान बनून जातो...
... हादरा बसत नाही तोपर्यंतच. तथाकथित सुसंस्कृत समाजरचनेचा भाग म्हणून आखून घेतलेली, जन्मजात लादली गेलेली नाव- गाव- लिंग- जात- वर्ग- धर्माची ओळख जेव्हा अचानक उलटते आणि आपलाच घास घेऊ पाहते, तेव्हा लक्षात येतं की आपलं आयुष्य किती परावलंबी, किती असहाय्य आहे. ऊब देणारी आग स्वाहाकारीही असू शकते, याची भयानक जाणीव घडते जातीय धार्मिक दंगलींसारख्या सामूहिक हिंसक उन्मादांच्या प्रसंगी. तो उत्पात घडविणारी आपल्यासारखीच सामान्य माणसं आहेत, हे इतक्या स्पष्टपणे दिसतं की इथे दैवाच्या, नियतीच्या आडही दडता येत नाही.
आतून ढवळवून काढणारी, पायाखालची `सुरक्षित' जमीन काढून घेणारी ही भयानक जाणीव खालिद मोहम्मद दिग्दर्शित `फिजा' पाहताना गडद होत जाते, अस्वस्थ करून टाकते. नाचगाण्यांच्या, कौटुंबिक जिव्हाळ्याच्या, व्यक्तिगत प्रेमाच्या, शौर्याच्या, धैर्याच्या, उसळण्याकोसळण्याच्या क्षणांचा हा पट... पण त्यावर रेखलेलं चित्र मात्र उदासवाण्या काळ्या- करडय़ा छटांचीच छाया उमटवून जातं मनात.
`फिजा'चा ढोबळ अर्थ आहे आसमंत. थोडासा माहौलच्या जवळ जाणारा. सिनेमात हे आहे नायिकेचं नाव. फिजा इक्रमउल्ला (करिश्मा कपूर) ही मुंबईच्या मिश्रवस्तीतली एक कॉलेजयुवती. एका मध्यमवर्गीय मुस्लिम घरात वाढलेली. मुस्लिम असूनही मुलीला बाहेरच्या जगाचं वारं प्यायला मुभा देणारी प्रेमळ विधवा आई (जया बच्चन) आणि साधासरळ धाकटा भाऊ अमान (हृतिक रोशन) हेच तिचं कुटुंब, तिचं जग...
...1993 साल उजाडतं ते अनपेक्षित हादरा घेऊन.
जातीय दंगलींमध्ये शहर होरपळू लागतं. अमानही अचानक दंगलीत खेचला जातो. आईबहिणीच्या डोळ्यांदेखत त्या उद्रेकात हरवून जातो.
पोलिसदफ्तरी त्याची नोंद होते... दंगलीत बेपत्ता.
पण, म्हणजे काय? जिवंत की मृत? ठाऊक नाही.
सापडला, परतून आला, तर जिवंत. नाहीच आला बराच काळ तर बहुधा मृत. नक्की काय झालं अमानचं हे स्पष्ट नसल्यानं अमान फिजाच्या, त्याच्यावर प्रेम करणाऱया शहनाजच्या (नेहा) आणि मुख्य म्हणजे त्याच्या आईच्या मनात जिवंतच राहतो. ती त्याची वाट पाहात राहते.
सहा वर्षं लोटतात. फिजा कॉलेज पूर्ण करून नोकरी शोधू लागते. अमान हरवल्यानंतरच्या काळात तिच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिलेली मैत्रीण (इशा कोप्पीकर) आणि अव्यक्त प्रेम करणारा मित्र अनिरुद्ध (विक्रम सलुजा) यांचाच तिला आधार आहे. पंखात शिक्षणाचं बळ आल्यानंतर फिजाला आपल्या आईनं अमानची वाट पाहणं असह्य होऊ लागतं. ती हा `सस्पेन्स' कायमचा संपवण्याचा निर्णय घेते. त्यासाठी पैसे गोळा करते.
फिजानं घेतलेल्या शोधातून अमान सापडतो का? जो सापडतो तो तिनं- तिच्या आईनं हरवलेला सहा वर्षांपूर्वीचा अमान असतो का? आणि स्वत: अमानचं काय? त्यानं स्वत: हरवलेला, दंगलीत ज्याचा हकनाक मुडदा पडला तो अमान त्याला स्वत:ला तरी सापडतो का? त्याचा कोणताही दोष नसताना त्याचं आयुष्यच केवळ एका रात्रीत बदलून गेलेलं असतं. त्यानं मागितलेलं सगळं काही हिरावून त्यानं कधीच न मागितलेली एक ओळख त्याच्या कपाळी घट्ट ठोकली जाते...
... अमानच्या हरवण्या- सापडण्यातून फिजाच्या छोटय़ाशा जगाचं अपरिहार्यपणे उद्ध्वस्त होणं भयकारी पद्धतीनं सगळ्या संवेदनांवर आदळत राहतं `फिजा'मध्ये. त्यातही ही एका मुस्लिम कुटुंबाची कहाणी असण्याला वेगळा अर्थ आहे. फाळणीनंतर कायमस्वरुपी दुय्यम किंवा खरंतर `संशयित' नागरिकत्व लादल्या गेलेल्या या समाजाच्या व्यथावेदनांचा पैलूही त्यामुळे `फिजा'ला लाभला आहे. पण, त्याहूनही अधिक ही कोणत्याही सामान्य मध्यमवर्गीय घराची कहाणी असल्यानं मुस्लिमेतर प्रेक्षकालाही हादरवून जाते.
`टाइम्स ऑफ इंडिया'सारख्या बडय़ा वृत्तपत्रातून भल्याभल्या सिनेमाकारांची साप्ताहिक चंपी करणाऱया चित्रपट समीक्षकाचा आणि `फिल्मफेअर'सारख्या दर्जेदार मासिकाच्या संपादकाचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा. कथा-पटकथा आणि दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी या सिनेमात उचलली आहे. यापूर्वी स्वत:च्या आयुष्यातील घटनांवर आधारलेल्या `मम्मो' आणि `सरदारी बेगम' या चित्रपटांच्या पटकथा खालिद यांच्या मालिकेतला अखेरचा `झुबेदा'ही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
`फिजा'मध्ये अगदी खालिद यांचे व्यक्तिगत अनुभवच चित्ररूप घेऊन प्रकटले नसले तरी त्यांच्या परिचयाचा सुधारक मुस्लिम कुटुंबाचा माहौल `फिजा'च्या केंद्रस्थानी आहे, तशीच बहुसंख्यांच्या समाजात विश्वास प्राप्त करण्यासाठी `राष्ट्रीय' असं विशेषण `कमवावं' लागणाऱया मुस्लिम समाजाचा सलही दृग्गोचर होते. अमानच्या शोधमोहिमेमुळे अचानक प्रसिद्धी पावलेल्या फिजाला आपल्या गोटात ओढू पाहणाऱया जहाल हिंदुत्त्ववादी आणि कट्टरपंथीय मुस्लिम नेत्यांना फिजा चार खडे बोल सुनावते ते याच समाजाच्या वतीने. त्यामुळे अशा प्रसंगांच्या पार्श्व-संगीतात राष्ट्रीय गीतांच्या धुना वाजण्याचा ढोबळपणाही क्षम्य मानावा लागतो.
पटकथा म्हणून `फिजा'ची रचना खूपच इंटरेस्टिंग आहे. सरळमार्गी माणसावर कोसळणाऱया परिस्थितीनं आयुष्याला दिलेलं वळण आणि न वांछिलेल्या वाटेवरची अपरिहार्य वाटचाल हा करमणूकप्रधान चित्रपटांचा जगभरातला लाडका रुपबंध आहे. हिंदी सिनेमात हा रूपबंध सहसा फँटसीमध्ये हरवतो. असे असंख्य सिनेमे `पचवलेल्या' खालिद यांनी ही वहिवाट टाळली आहे. `फिजा'च्या नायकावर कोसळणाऱया आपदांना वास्तवाचा भक्कम आधार आहे. त्यांच्या कुटुंबाच्या वाटय़ाला येणारे भोगही फिल्मी नाहीत. मात्र, त्यानंतरही फिजाची शोधमोहिम एकदम सोपीसोपी होते. तिची अमानशी भेट अगदी सहज घडल्यासारखी वाटते.
मध्यंतरापर्यंतचा हा सोपेपणा कदाचित मध्यंतरानंतरच्या खऱया शोधासाठी रचलेला असावा. यो शोधाच्या उलघाली आणि अमानपुरतं भीषण उत्तर मिळण्यापर्यंतच्या उलघाली खालिद नजाकतीनं टिपतात. त्याच्या अटकेचा प्रसंग आणि त्याचा परिपाकही अंगावर काटा आणतो. पण, तिथे `कथा' संपली तरी `पटकथा' सुरूच राहते. लोकप्रिय चित्रपटाच्या रचनेत अत्यावश्यक अशा सुस्पष्ट शेवटाकडे लांबट वाटचाल करत राहते. मध्यममार्गी, कलात्मक आणि व्यावसायिक सिनेमा अशा लेबलांखाली वर्गवारी झालेल्या सिनेमाच्या प्रमुख शैलींची ठळक वैशिष्टय़ं इथे एकत्र आलेली दिसतात. कधी ती एक वेगळा पोत निर्माण करतात, कधी रसभंगही करतात.
उदाहरणार्थ, थरच्या वाळवंटात सुश्मिता सेनवर चित्रित केलेलं `मेहबूब मेरे' हे गाणं गीत- संगीत- नृत्य आदी तांत्रिक निकषांवर विलक्षण आकर्षक आहे; पण त्याची टिपिकल बंजारागीत छापाची सिच्युएशन या कथानकात अचंबित करते. फिजाचं पाश्चात्यनृत्यप्रावीण्यप्रदर्शक `आँख मिलाऊंगी' हे गाणं सर्वस्वी अनावश्यक ठरतं. उलट, अखेरच्या मिशनची तयारी करणाऱया अमानवर चित्रित झालेल्या `मेरे वतन' या तांडवसदृश रणगीताला खास सिच्युएशन नाही. तरीही, युद्धकलांना नृत्याचं परिमाण देऊन चित्रित केलेलं हे गाणं उत्तरार्धाचा `हायलाईट' ठरतं.
त्याचवेळी सगळ्या `व्यावसायिक' गदारोळात अमान आणि फिजा कधी एकत्र असताना, कधी स्वतंत्रपणे सतत आपल्या बालपणाच्या सुखद काळाचा उल्लेख करतात. आपण मोठे झालो हे फार वाईट झालं, असं त्यांना वाटत असतं. ते निष्पाप, निरागस आणि चिंतामुक्त बाल्य हरवलेल्या `मोठय़ा' माणसांच्या सगळ्याच समाजाची ही व्यथा खालिद तरलपणे मांडतात.
सगळ्या शैलींची ही सरमिसळ दिग्दर्शकाचा स्वत:च्या शैलीचा शोध दर्शवते. दंगलीत अमानवर ओढवलेले अघोरी प्रसंग, तो परतल्यावर त्याच्याकडे पाठ करून `नॉर्मल' राहण्याचा प्रयत्न करणारी आई, तिच्या अंत्यसंस्कारापर्यंत शांत राहिलेल्या फिजाच्या `फुटण्या'चा ध्वनीमुद्रणातून प्रभावी केलेला प्रसंग (इथे एक आघाती शोकगीत संपतं, खट्टकन विषण्ण शांतता पसरते, हळूहळू दुरून आल्यासारखे दैनंदिन गटबजाटाचे आवाज वाढू लागतात आणि `भाना'वर आलेली फिजा हंबरडा फोडते.), अशा प्रसंगांमध्ये खालिद यांची माध्यमाची जाण दिसून जाते.
खालिद यांच्या या शोधात आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट असणाऱया तंत्रज्ञांची जबरदस्त साथ मिळाली आहे. वर्षानुवर्षे रंगांवर रंगाचे लेप चढल्यानं भिंतींना मिळालेला खास पोत, खास मुस्लिम धाटणीचे गडद रंग, जुनं वळणदार खानदानी फर्निचर, आरसे यातून कला दिग्दर्शक शर्मिष्ठा रॉय यांनी `फिजा'ची फिजा उत्तम उभी केली आहे
संतोष सिवन यांच्या छायालेखनात नैसर्गिक प्रकाशयोजनेला प्रसंगाच्या मूडनुसार वळविण्यावाकविण्याची शैली दिसते. प्रखर प्रकाशित पार्श्वभूमीवर देहाकारांच्या झालेल्या सावल्या, दृश्यचौकटीत अग्रभागी असलेल्या वस्तू- व्यक्ती धूसर ठेवून साधलेला परिणाम, ज्वाळांच्या आड दिसणारा अमानचा चेहरा, `न लेके जाओ' या शोकगीतात झावळ्यांच्या सावलीचा केलेला कल्पक वापर अशी सिवन यांच्या कामगिरीची अनेक उदाहरण सांगता येतील.
वैविध्यपूर्ण गीत-संगीत हे `फिजा'चं मोठं आकर्षण आहे. `आजा माहिया' आणि `तू हवा है, फिजा है' ही खास गुलजारी शब्दकळेची गाणी अनु मलिकनं झकास चालींनी सजवली आहेत. लोकेशन्स, नृत्यदिग्दर्शन आणि टेकिंग यांत खास दर्जा जाणवतो. `आ जा माहिया'च्या द्रुतलयीतल्या झिंगबाज शेवटचं चित्रण तो वेग आणि शारीर आवेग अचूक पोहोचवतं. `मेहबूब मेरे'मध्ये मास अपील आहे. .आर.रहमानची `पिया हाजीअली' ही शांतवणाऱया सुरावटीची सूफी कव्वाली अचूक वातावरणनिर्मिती करते. `न लेके जाओ' या शोकगीतामध्ये कफनबद्ध मृत चेहरा `पॉपगीत' पद्धतीनं तीन कोनांतून खाट्खाट्खाट् वेगात दाखवण्याचं प्रयोजन कळत नाही. हे गाणं आणि रणजित बारोटनं संगीत दिलेल्या `मेरे वतन'मध्ये `घातक'च्या कोई जाए तो ले आयेच्या इंटरल्यूडच्या आघाती सुरावटी गवसतात, हा योगायोग गमतीशीर.
फिजाच्या शीर्षकभूमिकेत करिश्मा साजून दिसते आणि समंजस भावविष्कार घडविते. पण, फिजाच्या व्यक्तिमत्त्वाला हट्टाची, निग्रही करारीपणाची एकच एक छटा असल्यानं तिच्या कामगिरीवर मर्यादा येतात. जया बच्चननं साकारलेली आई ही या सिनेमातली सर्वात मानवी व्यक्तिरेखा. मुलांच्या बरोबरीनं वावरू वागू पाहणारी, इंग्लिश फेकणारी, विपरीत परिस्थितीत जीवनलालसा मरू न देणारी ही लोभस आई वय, अनुभव आणि सफाईदार अभिनयकलेच्या बळावर जया यांनी झक्क साकारली आहे. तिच्या नखरेल शेजारणीच्या भूमिकेत आशा सचदेव या गुणी अभिनेत्रीचं पुनरागमन ठसकेबाज झालं आहे. नेहाला फार वाव नाही आणि मनोज बाजपेयीच्या मुरादखानची व्यक्तिरेखा पटकथेतच फार संदिग्ध आहे. संजय नार्वेकर आणि शिवाजी साटम हे छोटय़ा भूमिकांमध्ये छाप पाडतात.
नायिकेची शीर्षकभूमिका असलेल्या या सिनेमात सर्वात प्रभावी कामगिरी करून जातो तो नायक हृतिक रोशन. त्याच्याकडून स्टार- सुपरस्टारच्या, `कहो ना...'स्टाईल `लोकप्रिय' अदाकारीच्या अपेक्षा
बाळगणाऱयांचा अपेक्षाभंगही होईल कदाचित; कारण, या सिनेमाची जातकुळी वेगळी आहे. पण, त्याला अभिनेता म्हणून पाहणाऱयांचा विश्वास मात्र तो सार्थ ठरवतो. दंगलींमध्ये अमानची होणारी होरपळ आणि पुढची सगळी तगमग त्यानं अतिशय प्रगल्भतेनं साकारली आहे. विशेषत: उत्तरार्धातल्या राकट-हिंस्र मुखवटय़ाआडची करपलेली कोवळीक अवचित दर्शन घडवते, तेव्हा प्रेक्षकाचं काळीज गोठवते.
मुंबईसारख्या या देशातल्या सर्वात आधुनिक, सर्वात पुढारलेल्या शहरातही माणसाच्या माणूसपणाचं मोल प्रसंगी कसं कवडीमोल होऊन जातं, याची भयावह स्मृती जागविणाऱया या सिनेमाची लांबी (सव्वातीन तास), असमान वेग आणि `लोकप्रिय' घटकांचा अतिरेक मनातल्या मनात संकलित करून पाहिला, तर हा सिनेमा प्रेक्षकाला सोप्या उत्तरांची सोय नसलेले काही प्रश्न पाडतो. एका आंतरिक शोधाला चालना देतो, हेही नसे थोडके.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment