जगभर सध्या माहितीचा स्फोट सुरू आहे.
दूरसंचाराच्या अत्याधुनिक साधनांच्या जोडीला इंटरनेट या माध्यमानं तर समातंर सायबरजग निर्माण केलंय. जग अगदी छोटं बनवलंय. या इंटरनेटवरच्या, जगाच्या एका कोपऱयातून दुसऱया कोपऱयात कोणताही संदेश क्षणार्धात पोहोचविण्याऱया `इ-मेल'च्या सुविधेनं माणसामाणसांमधला संवाद एकदम सोपा करून टाकलाय. दूरस्थ सुहृदांशी संवादाबरोबरच परक्यांनाही `इ-स्नेही' बनवून घेण्याची सोय करून दिलीये.
या सायबरसंवादातून दोन तरूण मनांच्या तारा जुळल्या, प्रेम जुळलं तर? या कल्पनेमुळे चटकन आठवतो टॉम हँक्स आणि मेग रायनचा `यू'व्ह गॉट मेल' हा प्रेमपट. ए.एम.रत्नम निर्मित आणि कादिर दिग्दर्शित `दिल ही दिल में'मध्ये हीच कल्पना खास भारतीय (ख र त र दक्षिणीच) चॅट म स ा ल्य ा त घोळवण्यात आली आहे. इंटरनेटवर कधीही कोणाशीही गप्पागोष्टी करण्याच्या `चॅट' सुविधेतून इथे प्रेम फुलतं.
इथले `इ- प्रेमिक' आहेत राजा (कुणाल) आणि रोजा (सोनाली बेंद्रे). राजा हा अलाहाबादमधल्या एका खेडय़ातून उच्चशिक्षणासाठी मुंबईत पळून आलाय. नरिमन पॉइभटवर एका बाकडय़ावर झोपलेल्या राजाला पाहून रामचंद्र युनिव्हर्सिटीचा चालक रामचंद्र (नझीर) याला त्याची दया येते. तो आपल्या प्रतिष्ठित आणि महागडय़ा कॉलेजात त्याला एमबीएची ऍडमिशन मिळवून देतो. राहण्याची- जेवण्याची व्यवस्था करून देतो.
एकदा सायबर कॅफेमध्ये इंटरनेटवर अभ्यासाचे संदर्भ धुंडाळणाऱया राजाला एक मित्र `चॅट'ची ओळख करून देतो. गंमतीगंमतीत राजा नेटवरून कुसुम नामक मुलीशी संपर्क साधतो. ही असते टोपणनावानं `चॅट'मध्ये सहभागी झालेली रोजा. एकमेकांना जोखण्यासाठी दोघेही आधी खोटी माहिती देतात. विश्वास बसल्यावर मात्र खऱया नावांनी नेटभेटी सुरू होतात. यथावकाश रोजाचं रुपही (फोटोमधून) राजाला दिसतं. दोघांनी आपण अनुक्रमे लंडन आणि अमेरिकेत असल्याच्या थापा मारल्या असल्या, तरी प्रत्यक्षात दोघे एकाच सायबर कॅफेमधून, एकमेकांपासून काही फुटांच्या अंतरावरून एकमेकांशी प्रेमसंवाद साधत असतात.
हे बिंग फुटतं राजानं स्वत:चा फोटो पाठवल्यावर. रोजा तो फोटो न्याहाळत असतानाच राजा अपघातानं तिच्यासमोर येतो. दोघेही थक्क होतात.
`इ-मेल'च्या माध्यमातून दिल देऊन बसलेले हे दोघेजण समोरासमोर मात्र एकमेकांशी काहीच बोलत नाहीत. इतके दिवस आपण एकाच स्टेशनवरून (वांद्रे), एकाच लोकलमधून, एकाच डब्यातून रोज प्रवास करत होतो, हे त्यांच्या लक्षात येतं. मग स्टेशनवर रोज वाट पाहणं, डोळ्यांनीच एकमेकांच्या आगमनाची दखल घेणं, एकमेकांच्या आवडीचे कपडे परिधान करणं वगैरे प्रेमसूचक प्रकार सुरू होतात. एकमेकांशी बोलण्याचं धाडस मात्र दोघांनाही होत नाही. अधूनमधून केलेले प्रयत्न काही अनपेक्षित घडामोडींनी फसतात.
शेवटी रामचंद्रच्या सल्ल्यानं राजा आणि स्वत:च्या मनानं रोजा `व्हेलेंटाइन्स डे'च्या मुहूर्तावर एकमेकांना शुभेच्छापत्रं देऊन मनातल्या भावना व्यक्त करायचं ठरवतात...
... त्याच दिवशी नाटय़मय रीतीनं राजाला हे कळतं की, रोजा ही त्याच्या उपकारकर्त्या रामचंद्र यांचीच मुलगी आहे आणि त्यांनी तिचं लग्न एका कोटय़धीश मुलाशी ठरवलंय... पुढे या प्रेमकथेत काय होत असले, हे सांगायची गरज नाही.
`दिल ही...' चा कथा-पटकथाकार- दिग्दर्शक कादिर हा तामिळनाडूचा `लव्ह स्पेशालिस्ट. `दिल ही...' हा त्याच्या `कादल दिनैन'चा हिंदी अवतार.
नववर्षदिनी मुंबईत, व्हीटी स्थानकात जल्लोष सुरू असताना एका सैनिकाला (अनुपम खेर) एका बाकडय़ावर उदास बसलेला राजा भेटतो. राजाच्या तोंडून फ्लॅशबॅकमध्ये ही कहाणी उलगडते. त्याला ऍडमिशन मिळेपर्यंतचा कथाभाग वेगानं सरकतो. पंचाईत सुरू होते ती त्यापुढे. कॉम्प्युटरशी फारसा परिचय नसलेल्यांना इंटरनेट- इ मेल -चॅट वगैरे तांत्रिक गोष्टी समजावून देण्यासाठी कादिरनं एका वात्रट विद्यार्थी (राजू श्रीवास्तव), राजाचा मित्र (राजू सुंदरम) आणि एक सटकू प्रोफेसर (जॉनी लिव्हर) यांची योजना केली आहे. कथानकात `हलकेफुलके' क्षण निर्माण करण्याची जबाबदारीही या `विनोदी' त्रिकुटावर सोपवली आहे. इथेच सगळा घोटाळा झाला आहे.
एकतर राजा आणि त्याचा मित्र यांच्यातले प्रसंग थेट तामिळमधून डब केलेल आहेत. तामिळ शब्दांच्या उच्चारांनुसार होणाऱया ओठांच्या हालचालींशी सुसंगत हिंदी शब्द योजताना संवादलेखकांची पंचाईत झाल्यामुळे `छोकरियाँ पटती है इस चॅट से, बता रहा हूँ मै तुम्हे' असे विचित्र संवाद ऐकावे लागतात. शिवाय राजू श्रीवास्तव आणि जॉनी लिव्हर यांच्यातले हिंदीतलेच असले, तरी या विनोदाचा बटबटीत दक्षिणी बाज डोकं उठवतो. मध्यंतरापर्यंत चालणारा हा प्रकार आणि राजा- रोजा यांच्यातल्या सायबर प्रेमाचे जरा जास्तच ताणलेले प्रसंग यामुळं पूर्वार्ध सपाट झाला आहे.
कथानकातली सगळी वळणं येतात, ती उत्तरार्धात. इथे सिनेमा बऱयापैकी वेग घेतो. पण, इथेही `क्लायमॅक्स'ला भाषणबाजी करण्यात वेळ दवडणारी पात्रं, दक्षिणी लग्नसोहळ्याचं तपशीलवार चित्रण, रामचंद्रच्या बालपणाचा भडक फ्लॅशबॅक यांनी अडथळे आणले आहेत. शिवाय इथपर्यंत येईतोच सिनेमातलं नाविन्य संपून सिनेमा नेहमीच्या वाटेवर येऊन थडकलेला असतो.
प्रेमकथा म्हणून अखेरीस हा सिनेमा फार संस्मरणीय परिणाम घडवत नसला, तरी रोजाचा फोटो राजाच्या कॉम्प्युटरवर उमटण्याचा प्रसंग, दोघांची पहिली थेट भेट, त्यानंतर न बोलता एकमेकांशी नजरेनं बोलणं स्टेशनवर वाट पाहणं, खुलणं- हिरमुसणं, हा भाग कादिरनं नजाकतीनं चित्रित केलाय. त्याभोवती कादिरनं रचलेलं मुंबईतल्या लोकल्सचं, स्टेशन्सचं वातावरण तर झक्कच. मुंबईकर प्रेक्षकाला मुंबईत तयार झालेल्या सिनेमातही इतक्या वास्तव पद्धतीनं इतका काळ लोकदर्शन घडलं नसेल. प्रचंड व्यापाच्या या चित्रीकरणातून (मग भले त्यात लांब पल्ल्याची गाडी लोकल प्लॅटफॉर्मवर लागताना दिसली तरी) कादिरनं नेहमीच्या कथाभागाला मुंबईचा `टच' दिला आहे.
रामचंद्रला राजा प्रेयसीचं नाव कसं सांगत नाही, त्याच्या इतक्या जवळ जाऊनही घरी वगैरे कसा जात नाही. गरीब मुलाला डिझायनर कपडे, चॅट वगैरे खर्चिक प्रकार कसे परवडतात, वगैरे प्रश्न पाडून न घेणंच इष्ट. सोनाली या सिनेमात गोड दिसली आहेच; अस्फुट प्रेमाचा आविष्कारही तिनं तयारीनं घडवलाय. नवोदित कुणाल हा प्रामाणिक अभिनेता आहे. तो साधाभोळा, निरागसही वाटतो. पण गुबगुबीत देहयष्टी. कोवळा चेहरा आणि केसांचा मश्रूम कट यामुळं दूरदृश्यांत तो सोनाली बेंद्रेची धाकटी बहीण वाटतो आणि समीपदृश्यांत धाकटा भाऊ. दोघे एकत्र असताना तो तिचा `हिरो' काही वाटत नाही. त्यामुळेही ही प्रेमकथा मनाचा ठाव घेत नाही. नझीर, अनुपम खेर यांची कामं ठाकठीक.
ए. आर. रहमाननं `ऐ नाझनीं सुनो ना' आणि `चांद आया है जमींपर' ही गाणी लौकिकाला साजेशी दिली आहेत. अनुक्रमे अभिजीत आणि उदित नारायण यांनी ही गाणी खुलून गायली आहेत. `ओ मारिया' हे रेमोचं गाणं नेहमीच्या रहमानी ठेक्याचं. `रोजा, रोजा'चा गोड मुखडा हरिहरननं गोड गायलाय. पण, अंतरे फारच क्लिष्ट झाले आहेत. `डोला डोला डोला मन डोला डोला डोला' हे गाणं `डोली सजा के रखना' मधल्या `झूला बाहों का' वर सहीसही बेतलंय. रहमानचं पार्श्वसंगीत नेहमीप्रमाणं ए-वन आहे. पी.सी. श्रीराम यांच्या छायालेखनासह सर्व तांत्रिक बाजू चकाचक आहेत. बरेचसे स्पेशल इफेक्ट्स मात्र बालिश वाटतात.
जेमतेम पंधरा रिळांत 21 रिळांची लांबण पाहिल्याचा भास घडविणारा हा सिनेमा सरधोपटच असला, तीर नकळत एकदम भविष्यवेधी प्रश्न मांडून जातो. कॉम्प्युटर स्क्रीनच्या जगात वावरणारी मुलं उद्या समोरासमोरचा संवाद विसरून जातील का? `दिल ही...'चे नायक नायिका याच सिंड्रोममधून जाताना दिसतात. त्यामुळे, प्रेमात पडल्यावर या संपर्कमाध्यमांवर विसंबण्यापेक्षा आवडलेल्या व्यक्तीला थेट भिडून `दिल की बात', बोलून टाकण्याची `सदियों पुरानी' रीतच बेस्ट, असा `संदेश' घेता येईल या सिनेमातून.
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment