एक हसरी, बडबडी, आनंदी व्यक्तिरेखा घ्यायची. कथानकातल्या इतर पात्रांबरोबर प्रेक्षकांनाही तिच्यात गुंतवायचं. मग क्रूर नियतीच्या कठोर प्रहारानं तिला सगळ्यांमधून ओढून काळाच्या उदरात गडप करायचं...
`आनंद', `मिली', `अनुराग'पासून `काश'पर्यंत हिंदी सिनेमांमध्ये परिणामकारकरीत्या वापरलेला हा फॉर्म्युला. मरणाऱया व्यक्तिरेखेकडून जगणाऱयांना आनंदानं जगण्याचा धडा देऊन जीवनमृत्यूचा काळापांढरा खेळ अधिक गडद करणारा.
सुभाष फडकेलिखित- दिग्दर्शित `हसरी'मध्ये याच फॉर्म्युलाचा मराठी अवतार सादर करण्यात आलाय. इथे `हसरी' (मानसी आमडेकर) ही आहे.
पाच-सहा वर्षांची गोड, लाघवी छोकरी. तिचे आईबाबा (पूजांगी बोरगावकर, सुनील बर्वे) तिच्या लहानपणीच देवाघरी गेले आहेत. तिचा मामा आबामा- अविनाश (अविनाश नारकर) आजोबांच्या आश्रमशाळेतून तिला मुंबईला घेऊन येतो. त्याचा हसरीवर आणि हसरीचा त्याच्यावर विलक्षण जीव. पण, स्वतंत्र्य व्यवसाय सुरू करण्याच्या गडबडीत गुंतलेल्या अविनाशला हसरीला कसं सांभाळायचं, तिच्या शाळेचं काय करायचं, हा प्रश्न भेडसावत असतो.
अविनाशचा ज्येष्ठ मित्र आणि मार्गदर्शक डॉ. विजय (दिलीप कुलकर्णी) आणि त्याची पत्नी सुरेखा (नीना कुलकर्णी) यांच्या बंगल्याजवळच अविनाशचं घर. चुणचुणीत हसरी विजयच्या बंगल्यात प्रवेश करते आणि या अपत्यहीन दांपत्याचं आयुष्य पालटवते. सुरेखाला हसरीबद्दलच आईची माया वाटू लागते; पण विजय मात्र तिच्यापासून फटकून वागतो.
दोघांच्याही वर्तनाचं कारण एकट आहे. अपत्यप्राप्ती होऊनही मुलं न जगल्यानं दोघांना अपत्यसुख लाभलेलं नाही. हसरीच्या रूपानं सुरेखाला मुलगी मिळाल्याचा आनंद होतो. तर, आपल्याला मूल धार्जिण नाही, या कल्पनेनं कुढणाऱया विजयला हसरीमध्ये गुंतण्यात धोका वाटतो. सुरेखानंही तिच्यात फार गुंतू नये, अशी त्यांची इच्छा असते.
पण, स्वत:चं दु:ख कुरवाळत बसलेल्या विजयलाही हसरी आपल्या अवखळ लीलांनी जिंकून घेते. त्याला लळा लावते. हसरीच्या प्रयत्नामुळे स्मिता (स्मिता अल्मेडा) या तिच्या अंध मैत्रिणीला डोळे मिळतात. विजयचा मित्र डॉ. गोम्स (सुधीर जोशी) हसरीला दत्तक घेण्याचा सल्ला त्याला देतो. अविनाशही या प्रस्तावाला आनंदानं राजी होतो.
सारे काही आलबेल होणार, अशी चिन्हे असतानाच हसरीला कॅन्सर झाल्याचं उघडकीस येतं. देवाघरचं फूल बनून आलेली हसरी देवाघरी जाते, पण विजय- सुरेखाच्या आयुष्यात चिरस्थायी आनंदाची पखरण करूनच.
मराठी सिनेमा काढणं, हेच धाडस झालेलं असताना पदार्पणातच वेगळ्या स्वरुपाच्या कथानकावर सिनेमा निर्माण करण्याचं धाडसं (छोटय़ा मुलीला केंद्रस्थानी ठेवल्यामुळं दुहेरी धाडस) केल्याबद्दल लेखक- दिग्दर्शक सुभाष फडके आणि निर्माते जी.एल.अल्मेडा अभिनंदनास पात्र आहेत. विशेष म्हणजे स्वत:च्या मुलीला (स्मिता अल्मेडा) संधी देण्यासाठी निर्मितीक्षेत्रात उतरले असताना ती कथानकास अनुरूप नाही, म्हटल्यावर त्यांनी तिलाच प्रेक्षकांवर लादण्याचा हट्ट केलेला नाही.
लेखक-दिग्दर्शक फडके यांना हसरीच्या निवडीबद्दलही शंभर टक्के गुण द्यायला हवेत. मानसी आमडेकरनं त्यांच्या मनातली हसरी यथातथ्य पडद्यावर साकारली आहे आणि आपल्या चिमुकल्या खांद्यांवर संपूर्ण सिनेमा पेलला आहे. कॅमेऱयाशी दोस्ती असल्यासारखा तिचा विलक्षण नैसर्गिक वावर आणि गोजिरवाणं रूपडं ही `हसरी'ची प्रमुख बलस्थानं आहेत.
सहसा सिनेमातली लाघवी मुलं आगाऊ असतात, हा नियमच आहे. `हसरी'ही परक्या माणसांसमोर चुणचुणीत आगाऊपणाचंच दर्शन घडवते. पण, तिच्या आगाऊपणामध्ये नैसर्गिक गोडवा आहे. ती अधिक हजरजबाबी आणि चौकस वाटते. यात फडकेंनी लिहिलेल्या चुरचुरीत संवादांचाही मोठा वाटा आहे.
बऱयाचदा बालकलाकारांमध्ये उपजत असलेली चुणचुणीत धिटाईच अभिनयकौशल्य म्हणून प्रेक्षकांच्या माथी मारली जाते. पण, `हसरी'मध्ये मानसीने आजारी पडल्यानंतरच्या प्रसंगांमध्ये थकवा आणि आजारलेपणाचं उत्तम भावदर्शन घडवलं आहे. तिचा आजार मेकअपच्या साह्यानं डोळ्यांभोवती आखलेल्या काळ्या वर्तुळांपुरता मर्यादित राहात नाही; ते डोळे निस्तेज होतात. हा बारकावा दिग्दर्शकाची आणि `अभिनेत्री'ची गुणवत्ता सिद्ध करतो. सिनेमाचं शीर्षक आणि त्या व्यक्तिरेखेचं व्यक्तित्व सार्थ ठरवण्याकरता तिला सतत (आणि काही ठिकाणी उगाचच) हसवत ठेवलंय, तसंच काहीवेळा तिच्या वयाला न शोभणारे `परोपकारी' वगैरे शब्द तिच्या संवादांना कृत्रिम बनवतात. हे गालबोट वगळता `हसरी'च्या व्यक्तिरेखेला लेखक-दिग्दर्शकानं पुरेपूर न्याय दिलाय.
मात्र, दुर्दैवानं संपूर्ण सिनेमाबद्दल तसं म्हणता येत नाही. रमेश तलवार यांच्यासारख्या हिंदीतील मातब्बर दिग्दर्शकाकडे प्रमुख सहाय्यकपद भूषविलेल्या फडके यांनी पदार्पणात तांत्रिकदृष्टय़ा स्वच्छ, सफाईदार सिनेमा देऊन चुणूक दाखवली आहे; पण ही सफाई पटकथा रचनेत कमी पडते. `केवळ काही क्षणांपुरतं लाक्षणारं सुखही संपूर्ण आयुष्य उजळून टाकू शकतं', हा सिनेमाचा संदेश मोलाचा आहे. पण, उपकथानकांनी व्यापलेली जागा यांनी तो पातळ होतो आणि गोंधळात पाडणाऱया `झटपट' शेवटामुळे तर पारच निष्प्रभ होऊन जातो.
मुळात `हसरी'च्या आगमनापूर्वीच विजय अपत्यहीनतेच्या दु:खानं एककल्ली, तिरसट झाला आहे. हसरीचं आगमनही तो सावधपणेच स्वीकारतो. तिचा त्याला लळ लागतो ना लागतो इतक्यात तिच्या दुर्धर आजाराची बातमी त्याच्या आनंदावर कुऱहाड कोसळविते. या वेळेच्या त्याच्या संवादांमधून `आपल्याला मूल धार्जिणं नाही' ही भावना कशी बरोबर होती, हेच तो असहाय्य उद्वेगानं सांगतो. हसरीचं देवाघरी जाणं त्याला उद्ध्वस्त करेल, अशीच आपली खात्री पटते.
पण, शेवटच्या प्रसंगात पन्नाशी ओलांडलेलं हे दांपत्य त्यांच्या मुलीसह दिसतं तेव्हा आपण गोंधळात पडतो. ही त्यांची मुलगी हसरी `ताई'ची पायलट होण्याची इच्छा पूर्ण करून आता (तिचंच) अंतराळवीर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे, असं सांगते, तिथं सिनेमा संपतो.
स्वत:च्या मुलांपाठोपाठ हसरीलाही गमावलेला विजय पुढे मूल जन्माला घालण्याचा धोका पत्करेल, हे त्याचा स्वभाव पाहता अशक्यप्रायच वाटतं. हसरीमुळे त्याची याही संदर्भातली मनोभूमिका बदलली असेल तर ते कुठेही स्पष्ट होत नाही.
हसरीच्या आईवडिलांचं फ्लॅशबॅकमधलं दर्शन संवादांविना केवळ पार्श्वसंगीताच्या साथीनं `मोन्ताज' सदृश्य प्रसंगावलीतून परिणामकारकपणे घडवणाऱया फडकेंनी उपकथानकांना मात्र कात्री लावलेली नाही. अविनाश आणि नर्स `ओन्ली विमल'चं (सुरेखा कुडची) प्रेमप्रकरण, अंध स्मिताची मैत्री आणि दृष्टीलाभ, अविनाशनं वडिलांच्या मृत्यूनंतर खचणं-सावरणं, विजयच्या डॉ.गोम्सकडील फेऱया हे प्रसंग आणि कथाभाग अधिक आटोपशीर झाले असते. तर सिनेमाचा पसरटपणा कमी झाला असता.
अविनाश नारकर, दिलीप कुलकर्णी, सुधीर जोशी आणि विशेषत: नीना कुलकर्णी या मातब्बर अभिनेत्यांनी या कथाभागांमध्ये रंगत आणल्यानं ते असह्य होत नाहीत. वडिलांच्या मृत्यूनंतर खचलेला अविनाश, हसरीमध्ये स्वत:ची मुलगी शोधणारी नीना आणि कॅन्सरच्या बातमीमुळे हादरून डॉ. गोम्सवर राग काढणारा दिलीप हे कलावंत तो-तो प्रसंग/ कथाभाग संस्मरणीय करतात.
स्मिता अल्मेडाच्या ख्रिश्चन मराठी उच्चारांना ख्रिश्चन पार्श्वभूमी दिल्यानं ते खटकत नाहीत.
हबीब खान यांचं छायालेखन मराठी सिनेमाच्या (निळ्या, पिवळ्या, हिरव्या, लाल... कधीही, कोणत्याही) `छटा'पासून मुक्त आहे. छेल-परेश यांचे कला दिग्दर्शनही नाटकी, डुगडुगत्या नेपथ्याला फाटा देणारे आहे. `साथसाथ' प्रसिद्ध संगीतकार कुलदीप सिंग यांनी `हसरी'तून मराठीत पदार्पण केले आहे. त्यांच्या चाली नि:संशय श्रवणीय आहेत, पण, `नभ निळे', `तू तुझ्या स्वप्नात आता' आणि `नसे ज्यास कोणी' या चालींवर अमराठी छाप जाणवते. `नभ निळे' मधला `नीळे' हे दीर्घ उच्चारण तर खटकतंच. त्यांनी धमाल केलीये ती `लब्बाड मांजरीसारखी वेड पांघरून' आणि `अरे माझ्या मंकू' या खोडकर गाण्यांमध्ये. सुभाष फडकेंनी ही संवादी गाणी सुरेख लिहिली आहेत आणि त्यांचं चित्रणही कल्पक-फ्रेश आहे.
वेगळ्या धाटणीचं कथानक, सफाईदार हाताळणी आणि मानसी आमडेकरचा फुलपंखी निरागस भावविष्कार यासाठी `हसरी' पाहायला हरकत नाही.
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment