Sunday, April 10, 2011

कादंबरी `पाहावी' वाचून! (द ग्रीन माइल)


स्टीफन किंग लिखित `द ग्रीन माइल' या विक्रमी खपलेल्या कादंबरीवरचा याच शीर्षकाचा फ्रँक दरबाँ दिग्दर्शित चित्रपट पाहिल्यावर कादंबरी वाचलेल्या प्रेक्षकाचा बराचसा अपेक्षाभंग होतो. हा अपेक्षाभंग तसा अपेक्षितही आहे.
कारण, मुळात एखाद्या गाजलेल्या, विक्रमी खपलेल्या साहित्यकृतीवर चित्रपट काढणं, ही दिग्दर्शकाची कसोटीच असते. असंख्य वाचकांनी ती वाचतानाच अनुभवसंचित, ज्ञान आणि कल्पनाशक्ती यांच्या डोळ्यांनी मनाच्या पडद्यावर `पाहिलेली' असते. हा अनुभव ज्याचा- त्याचा स्वतंत्र, स्वयंभू असतो. पण जिथे स्वत:च्या मनातल्या सिनेमाही तो कधी शंभर टक्के यथातथ्य स्वरुपात पडद्यावर साकारू शकत नाही, तर इतर वाचकांनी `पाहिलेला' सिनेमा तो कसा बनविणार?
याच कारणांमुळे वाचकांचीही अशीच पंचाईत होते. पडद्यावरचा सिनेमा जेव्हा त्याच्या मनातल्या सिनेमापेक्षा वेगळा `दिसतो', तेव्हा तो हिरमुसतो. मूळ साहित्यकृतीइतकाच प्रभावी अनुभव देणारी चित्रपटीय किंवा अन्य माध्यमातली रुपांतरं अगदीच घडत नाहीत. असंही नाही- `गॉन विथ द विंड'सारखा कालखंडपट, `डे ऑफ द जॅकल', `व्हेअर ईगल्स डेअर' आदी थरारपट, `गॉडफादर'सारखा स्वतंत्र शैली जन्माला घालणारा गुन्हेगारीपट कॉनन डॉयलच्या शरलॉक होम्सची टीव्हीवरची मालिका, ऍगाथा ख्रिस्टीच्या पॉयरॉ आणि मिस मार्पलच्या कथा आदी सुखद अपवाद आहेत, पण, हे समाधान तसं दुर्मिळच.
किंग हा बऱयाचदा बीभत्सतेकडे झुकणाऱया भयप्रद (हॉरर) लेखनासाठी प्रसिद्ध आणि अत्यंत लोकप्रिय असलेला लेखक. त्याच्या 49 साहित्यकृतींची चित्रपट आणि दूरचित्रवाणी माध्यमात रुपांतरं झाली आहेत. ब्रायन डि पामा (कॅरी) आणि स्टॅन्ली कुब्रिक (द शायनिंग) यासारख्या नामांकित दिग्दर्शकांनाही किंगच्या लेखनाची ताकद रुपेरी पडद्यावर रुपांतरित करावीशी वाटली होती. फ्रँक दरबाँ यानं सहा-सात वर्षापूर्वी किंगच्या `रिटा हेवर्थ अँड द शॉशँक रिडेम्प्शन' या लघुकथेवर `द शॉशँक रिडेम्प्शन' हा चित्रट काढला होता. एका तुरुंगात घडणारी ही कथा होती. `द ग्रीन माइल' हीसुद्धा एका तुरुंगातच घडणारी कादंबरी आहे. हा योगायोग नाही. 1996मध्ये सहा पेपरबॅक खंडांच्या मालिकेच्या स्वरुपात प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीनं खपाचा उच्चांक गाठला होता.
`द ग्रीन माइल' ही कहाणी आहे देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांच्या एका तुरुंगाची. त्यांच्या मरणापर्यंतच्या प्रवासातला हा अखेरचा टप्पा शेवटचा मुक्काम. या टप्प्याला एरवी `लास्ट माइल' म्हटलं जातं. `द ग्रीन माइल'मध्ये कैद्यांच्या कोठडय़ा ते त्यांना विजेचा झटका देऊन मारणारी `ओल्ड स्पार्की' ही खुर्ची, या मार्गावर पायतळी आहे एक ओंगळवाणा हिरवा गालिचा. त्यामुळे इथे `लास्ट माइल'ला नाव पडलंय `ग्रीन माइल'
हा दक्षिण अमेरिकेतला `कोल्ड माउंटन' तुरुंग. 1930च्या आसपासचा काळ. पॉल एजकोम्ब (टॉम हँक्स) हा देहदंड विभागाचा प्रमुख रक्षक. अशी निर्दय जबाबदारी पेलतानाही माणुसकी जपणारा, कैद्यांच्या गरजा- इच्छांना मान राखणारा. `द ग्रीन माइल'चा हाच निवेदक- नायक. ब्रुटल (डेव्हिड मोर्स), डीन (बॅरी पेपर) आणि हॅरी (जेफ्री डिमन) हे त्याचे विश्वासू सहकारी रक्षक. पर्सी वेटमोर (डो हचिन्सन) हा किडकिडीत पोरसवदा रक्षक मात्र पॉलसाठी त्रासदायक ठरतोय. गव्हर्नरच्या पत्नीचा भाचा असल्याचा गैरफायदा घेऊन तो कैद्यांशी क्रूरपणे आणि निष्काळजीपणे वागतो, पॉल आणि इतर रक्षकांवर दादागिरी करू पाहतो.
आर्लेन बिटरबक (ग्रॅहॅम ग्रीन) या रेड इंडियन कैद्याचा देहदंड जवळ आलाय. त्यात नतद्रष्ट पर्सीइतकंच मूत्रमार्गाच्या विकारानं पॉलला रंजीस आणलंय. अशाच तुरुंगात नवा कैदी दाखल होतो... जॉन कॉफी (मायकल क्लार्क डंकन). अवघ्या नऊ वर्षांच्या जुळ्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याबद्दल या भीमकाय काळ्या कैद्याला देहदंड सुनावण्यात आलाय. कॉफीचं आडमाप शरीर त्याचा वर्ण (आणि त्या वर्णाला, `निग्रों'ना बिरुद) गृहीत धरूनही पॉलला कॉफी काहीसा वेगळा, साधा वाटतो. तुरुंगातल्या अंधाराला घाबरणाऱया, अश्राप दिसणाऱया कॉफीला भेटल्यावर पॉल त्याची अधिक माहिती मिळवतो. कॉफीविरुद्धचा सगळा परिस्थितीजन्य पुरावा भक्कम असला तरी या सगळ्या केसमध्ये काहीतरी गडबड आहे, अशी पॉलची खात्री पटत असतानाच तुरुंगात दाखल होतो तो स्वत:ला `बिली द किड' समजणारा विल्यम व्हार्टन (सॅम रॉकवेल) हा तरूण पण महाखतरनाक गुन्हेगार. तुरुंगात आल्याक्षणीच तो पॉलला हिसका दाखवतो. रक्षकांना बेसावध ठेवून त्यांच्यावर हल्ला करतो. त्याला काबूत आणण्याच्या प्रयत्नात त्यी लाथ पॉलच्या `वर्मी' बसते आणि आधीच दुखण्यानं बेजार झालेला पॉल गुरासारखा कळवळतो...
... हा `ग्रीन माइल'चा टर्निग पॉइंट. इथे जॉन कॉफी पॉलला जवळ बोलावतो... त्याचा हात हातात घेऊन त्याला अगदी जवळ खेचतो...
... इथून पुढे या सिनेमात जे घडतं, ते अतिमानवी चमत्कारांच्या पातळीवरचं, अविश्वसनीय आणि अतर्क्य असं आहे. जॉन कॉफीचा सहवास पॉलच्या आयुष्यात आणि `ग्रीन माइल'मध्येही प्रचंड उलथापालथ घडवून आणतो. पॉलचे सगळे सहकारी, पर्सी, बिली, पॉलची पत्नी जॅन (बॉनी हंट), पॉलचा बॉस हाल मूर्स (जेम्स क्रॉमवेल), त्याची ब्रेन टय़ुमरनं मृत्युपंथावर नेलेली पत्नी मेलिंडा (पॅट्रिशिया क्लार्कसन), टूट-टूट (हॅरी डीन स्टँटन) हा कैद्यांना तरतऱहेच्या वस्तु विकणारा चक्रम फेरीवाला, एदुआर्द `डेल' देलाक्रो (मायकल जेटर) हा फ्रेंच कैदी, इतकंच नव्हे, तर डेलनं माणसाळवलेला `मिस्टर जिंगल्स' हा लोकविलक्षण चतुर उंदीर या सगळ्यांचं जग आणि जगणं बदलून जातं.
`द ग्रीन माइल'चा घाट आणि आवाका नेहमीच्या गूढ-कूट- रहस्यकथा/कादंबऱयांपेक्षा वेगळा आहे. परिचयातलं उदारहण द्यायचं, तर नारायण धारपांच्या `समर्थ'कथांसारखा मंत्रभारला माहौल आणि जी..कुलकर्णीच्या कथांमधला क्रूर- कठोर नियतीवाद यांचं मिश्रण `द ग्रीन माइल'च्या कथानकात पाहायला मिळतं. (किंगच्या लेखनशैलीत जी.एं.ची रुपकसृष्टी आणि श्री.दा.पानवलकरांची शब्दकळा यांची एकत्रित आठवण करून देण्याचा वकूब आहे. ती तिखट- तिरकस भाषा अर्थातच रुपेरी पडद्यावर रुपांतरित होऊ शकत नाही.)
चित्रपट सुरु होतो. म्हातारा पॉल जिथे आयुष्य कंठत असतो त्या वृद्धाश्रमात. एलेन या जिवलग मैत्रिणीला तो आपली चित्तरकथा सांगत असताना. कादंबरी वाचलेल्यासाठी हा प्रथमग्रासे मक्षिकापातच आहे. कारण, कादंबरीतलं पॉल आणि एलेन यांच्यातलं हळुवार नातं, पर्सीची आठवण करून देणारा वृद्धाश्रमातला सेवक ब्रॅड डोलन यातलं काहीच सिनेमात दिसत नाही. फ्लॅशबॅकसाठी हल्ली तिय्यम दर्जाचे हिंदी सिनेमेही वापरत नाहीत असा `एकदा काय झालं...' छापाचा घाट रसभंग करून जातो. दरबाँची अडचण समजण्यासारखी आहे. कारण, बक्कळ सातशे पानांचा, शब्दाशब्दांत बारूद भरलेला आशय तीन तासांत मांडणं निव्वळ अशक्य आहे. (तीन तास हा अवधीही पाश्चात्य प्रेक्षकाची परीक्षाच पाहणारा आहे.)  
त्यामुळे, पॉलचं म्हातारपण आणि पूर्वायुष्य यांच्यात आंदोळणाऱया कादंबरीचा फील सिनेमात नसणंही चालवून घ्यावं लागतं. कादंबरी सहा हप्त्यांमध्ये प्रकाशित झालेली असल्यानं किंगनं प्रत्येक खंड स्वतंत्र कादंबरीसारखा वाचनीय होईल, त्याच्या शेवटी वाचकाला एक धक्का बसेल आणि पुढच्या भागाविषयी उत्सुकता निर्माण होईल, अशा रीतीनं तिची मांडणी केली आहे. हा एपिसोडिक घाट तीन तास सलग चालणाऱया सिनेमात कसा आणता येणार? शिवाय किंगनं एकापाठोपाठ एक चढत जाणारे सहा कळसाध्याय रचले आहेत. ते या सपाट चालणाऱया सिनेमात जाणवतच नाहीत. कारण, कादंबरीतला आशय आहे मानवी बुद्धीच्या, आकलनाच्या परिघाबाहेरचा आणि नाटय़ आहे गडद- गहन; मात्र, ते टिपण्यासाठी दरबाँनं निवडलेली शैली मात्र नाटय़ाला फाटा देणारी, `जे घडले, जेथे घडले तसे' तत्त्वावर वास्तवाचं चित्रण केल्यासारखी आहे. कॅमेऱयाच्या हालचाली, पात्रविरेचन, प्रकाशयोजना, संकलन, संगीत यातून किंगच्या शब्दकळेतला माहौल आघाती पद्धतीनं जिवंत करण्याचे कष्ट त्यानं घेतलेले नाहीत.
त्याचवेळी, दरबाँनं कॉफीकृत चमत्कारांचं चित्रण मात्र भडक नाटकी पद्धतीनं (ठिणग्यांचा चकचकाट, दिवे तेजाळणे, स्फोट झाल्यासारख्या वस्तु, दिवे फुटणे वगैरे) केलं आहे. भिंत चालवणारे ज्ञानेश्वर, तुकारामांना सदेह वैकुंठाला विमान, या आणि अशा गोष्टी रुपेरी पडद्यावर सतत पाहिलेल्या भारतीय प्रेक्षकाला तर हे चित्रण नवलाईचंही नाही. एका सामान्य माणसाला मिळालेली दैवी शक्तीची देणगी कथानकाच्या केंद्रस्थानी असली, तरी ही माणुसकीच्या आंतरिक उमाळ्याशी जोडलेली शक्ती आहे, याचं भान दरबाँनं ठेवलेलं नाही. त्या आंतरिक शक्तीला चमत्कारपटांच्या, अगदी खालच्या पातळीवर आणून ठेवतो तो नकळत.
मृत्युपंथाच्या अखेरच्या टप्प्यावरचं जीवन अंधारमय, निस्तेज, निराश असणं अपेक्षित असताना चित्रपटात मात्र कैद्यांच्या कोठडय़ा चांगल्या प्रकाशमान दिसतात. एकूणच चित्रपटात नको इतका उजेड आणि परिणामकारकतेत मात्र अंधार, असा प्रकार आहे. कादंबरी वाचताना येणारा सुन्नपणा आणि खिन्नपणा चित्रपटात क्वचितच जाणवतो.
सगळ्यात धक्कादायक आहे. तो सिनेमाचा शेवट. केवळ देहदंडाची शिक्षा झालेले कैदीच काही मृत्युची वाट (लास्ट माइल-ग्रीन माइल) चालत नसतात, तर सगळीच माणसं अपरिहार्यपणे या वाटेवर असतात. दैवी शक्तीचं वरदान लाभलेला पुण्यात्मा असो, पर्सीसारखा दुरात्मा असो, की पॉलच्या पत्नीसारखी आदर्श पत्नी...प्रत्येकाचा शेवट निश्चित आहे. ग्रीन माइलमध्ये घडलेल्या त्या नाटय़ातून पॉलला निरोगी प्रदीर्घ आयुष्य लाभलंय. हे वरदान भासतं, पण पॉलला आयुष्यात प्रियजनांच्या मृत्युसारखे दु:खद प्रसंग निव्वळ साक्षीभावानं पाहावे लागतात. तो या लांबलचक आयुष्यातून सार्थ काही घडवू शकत नाही तरीही त्याला बरंच जगायचं आहेच. त्याचा हा लांबलचक लास्ट माइल त्याच्यासाठी शापासारखाच आहे. सिनेमात मात्र मिस्टर जिंगल्स आणि पॉल हे दोघेही अजरामर झाले आहेत, अशा आशयाचा टिपिकल आशावादी शेवट कादंबरीच्या आशयाशी पूर्ण फारकत दर्शवतो.
कलावंताची अत्यंत चपखल निवड ही या सिनेमाची सर्वात जमेची बाजू. कादंबरीतल्या वर्णनाबरहुकूम बाह्यरूप लाभलेले अभिनयकुशल कलावंत या सिनेमात आहेत. म्हणूनच तो शेवटपर्यंत पाहवतो. पॉल एजकोम्बचं वर्णन वाचलं की डोळ्यांसमोर टॉम हँक्सचाच चेहरा येतो. साहजिकच ही भूमिका त्याच्या पदरात पडली आहे आणि त्यानं ती नेहमीच्या गांभिर्यानं, अभ्यासानं साकारल्याचं जाणवतं. जॉन कॉफी ही या कादंबरीचा प्राण असलेली व्यक्तिरेखा. मायकल क्लार्क डंकनसारखा अगदी फिट दिसणारा आणि अभिनयाचं मूलभूत ज्ञान असलेला कलावंत लाभल्यानं या भूमिकेचं सोनं झालंय. अर्थात, कॉफी साकारताना अभिनयकौशल्य कसाला लावणारं काहीही आव्हान नव्हतं. मायकल डंकन हा हुबेहूब जॉन कॉफीसारखा दिसला नसता, तर त्यानं कितीही अभिनयाचा पाऊस पाडला असता, तरी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकाला भावली नसती. त्याला मिळणारी दाद ही त्याच्या दिसण्याला आहे.
ज्यांनी ही कादंबरी वाचली असेल, त्यांनी, प्रयोग म्हणून हा चित्रपट आवर्जून पाहावा. मनातलं आणि पडद्यावरचं यांची तुलना करण्यासाठी. या रसास्वादातल्या मतांचा प्रभाव पाडून न घेता. कारण, हेही शेवटी एका वाचकाचंच मत आहे. ते दुसऱयाशी जुळावंच, असं काही बंधन नाही.
कादंबरी न वाचलेले कादंबरीनंतर सिनेमा पाहण्याचा किंवा सिनेमानंतर कादंबरी वाचण्याचा प्रयोग करू शकतील. त्यातही मजा आहे. कारण, कादंबरी न वाचता हा सिनेमा पाहणाऱयांना याच सिनेमातून सर्वस्वी सिनेमानिष्ठ असा सघन, सकस अनुभवही मिळू शकेल कदाचित. आणि त्या अनुभवाच्या अस्सलपणाबद्दल शंका तरी कशी घेणार?

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment