Friday, April 1, 2011

बोलपट नव्हे, अस्सल सिनेमा (मृगजळ)


मराठीत सिनेमाला `बोलपट' असा एक प्रतिशब्द आहे. बहुतेक मराठी सिनेमे हा प्रतिशब्द सार्थ ठरवतात. सिनेमा हे दृकश्राव्य माध्यम असलं, तरी ते शब्दांपेक्षा अधिक दृश्यांच्या भाषेतून उलगडायला हवं, ही प्राथमिक अपेक्षाही सहसा पूर्ण होत नाही.
ही अपेक्षा पूर्ण करणारा `मृगजळ' म्हणूनच वेगळा आणि वेधक ठरतो. या सिनेमाचा कथा- पटकथा- संवादकार- दिग्दर्शक- संकलक सतीश राजवाडे हा मुंबईच्या नाटय़- चित्रपटसृष्टीत धडपणाऱया गुणी मुलांपैकी एक. आपल्या पहिल्याच प्रयत्नात सिनेमानिर्मितीतल्या या पाच प्रमुख जबाबदाऱया पेलण्याच्या महत्त्वाकांशी परीक्षेत तो डिस्टिंक्शनमध्ये पास झालाय.
`मृगजळ'च्या कथानकाचा जीव अगदी छोटा आहे. `एक नसलेलं अस्तित्व' अशी शब्दचमत्कृतीपर कल्पना हा या कथानकाचा पाया, म्हणूनच `मृगजळ' हे शीर्षक. सिनेमा सुरू होतो तो शांतनु (तुषार दळवी) आणि शर्मिला (रेशम टिपणीस- सेठ) यांच्या नव्या बंगल्यातल्या गृहप्रवेशापासून. या दाम्पत्याला मीरा नावाची आठ वर्षांची गोड मुलगी आहे.
गृहप्रवेशाच्या रात्री मीरा चटका बसल्याच्या स्वप्नामुळं ओरडत जागी होते...
... दुसऱया दिवशी शर्मिलाला `तो' दिसतो आणि ती भयभीत होते...
... हा तो (सचिन खेडेकर) गेले काही दिवस सतत आपला पाठलाग करतो, अशी शर्मिलाची धारणा आहे...
... मनोविकारातज्ञ असलेल्या शांतनुला मीराची स्वप्नं आणि शर्मिलाचा `तो' हे दोन्हीही शास्त्राeय विश्लेषण करता येण्याजोगे भास वाटत असतात...
... पण, एका रात्री हा `तो' थेट त्यांच्या दारातच येऊन उभा ठाकतो तेव्हा मीराची स्वप्नं, तिचं `आग, आग' ओरडत जागं होणं आणि शर्मिलाचे `भास' यांची एक विलक्षण अद्भुत सांगड बसते...
... सिनेमाचा गाभा म्हणता येईल, असा कथाभाग खरंतर यानंतर (म्हणजे मध्यंतरानंतर) घडतो. पण, तो शब्दांत सांगितला तर पडद्यावर पाहून बसणाऱया धक्क्य़ाची मजा जाईल. परीक्षणं वाचून सिनेमा `पाहिल्या'चा आनंद मिळवू पाहणाऱया वाचकांची गैरसोय करून इथे इतकंच सांगता येईल, की एका शरीरात दोन व्यक्तींचं अस्तित्व, ही कल्पना `मृगजळ'च्या केंद्रस्थानी आहे. एक अस्तित्व त्या देहात, देहाबरोबरच वाढलेल्या व्यक्तिमत्त्वाचं; तर दुसरं या देहाच्या जन्मापूर्वीच मरण पावलेल्या एका परक्याच व्यक्तीचं, या शरीरात आश्रयाला आलेलं.
या असामान्य समस्येतून मार्ग कसा निघतो, याची अनोखी कहाणी म्हणजे सिनेमाचा उत्तरार्ध.
ही गोष्ट वेगवान, उत्कंठावर्धक करणं आणि चटकन विश्वास बसणार नाही असा कथाभाग (एका शरीरात दोन अस्तित्वांचा) विश्वसनीय करून दाखवणं, ही लेखक- दिग्दर्शकावरची मुख्य जबाबदारी होती; ती त्यानं उत्तम पार पाडली आहे.
कथाबाजीला कथानकाचं, पुढे पटकथेचं रुप देताना सुटसुटीत आटोपशीरपणा ठेवण्यात सतीश यशस्वी झालाय. शांतनु-शर्मिला यांचा सुखी संसार, आधुनिक घरात शोभतील, असे कुटुंबातल्या सर्वांचे मोकळेढाकळे संबंध, शांतनु- शर्मिलाच्या प्रेमप्रकरणाचं- मोजके प्रसंग आणि गाण्यातून- `फ्लॅशबॅक' तंत्रानं घडवलेलं दर्शन, लग्नानंतर इतक्या वर्षांत टिकून राहिलेली एकमेकांबद्दलची ओढ दर्शवणारं `रात्री'चं गाणं या `नॉर्मल' छानछान कथाभागात मीराची स्वप्नं आणि `तो'चा वावर या माफक भयकारक, थरारक घटकांची गुंफण त्यानं सफाईनं केली आहे मीरा आणि शर्मिला यांच्या भासविश्वाचा वारंवार होणारा- कथानकात आवश्यक असलेला- उल्लेख वगळता फापटपसारा कुठेच नाही. मूळ कथानकात थेट गरजेचा नसलेला शांतनु- शर्मिलाच्या प्रेमप्रकरणाचा भाग टवटवीत हाताळणीमुळे आणि एकदम `हिंदौष्टाईल' नृत्यगीतामुळे प्रेक्षणीय झाला आहे.
बोलीभाषेतले, `नाटकी'पणा नसलेले संवाद हेही या सिनेमाचं वैशिष्टय़. शांतनु- शर्मिला यांच्या आईवडिलांचा घरगुती वावर यादृष्टीनं पाहण्यासारखा आहे. त्यांचं एकमेकांशी आणि इतरांशी बोलणंवागणंही अगदी नॉर्मल सहजस्फूर्त आहे. अन्य शब्दबंबाळ मराठी सिनेमांच्या तुलनेत ही भाषा उठून दिसते, जवळची वाटते.
सतीश राजवाडेचं लेखक- दिग्दर्शक असं एकसंध व्यक्तिमत्त्व सिनेमातून जाणवतं. कथा- पटकथा लिहितानाच त्यानं सिनेमा `पाहिलाय' याची खूण त्याच्या टेकिंगमधून पटते. सिनेमास्कोपची रुंद चौकट चपखलपणे वापरून, पात्रांच्या- कॅमेऱयाच्या हालचालींमधल्या समन्वय साधून, आत्मविश्वासानं समीपदृश्यं चित्रित करून त्यानं या दृश्यमाध्यमाची उत्तम जाण असल्याचं दाखवून दिलंय. कैसर हाश्मी यांच्या साथीनं संकलनही त्यानंच केलं असल्यानं प्रसंगांच्या लांबीत नेमकेपणा आलाय.
या कथानकात काही प्रश्नच पडत नाहीत, असं नाही. आपल्या लाडक्या लेकीला पडणाऱया दु:स्वप्नांचं गंभीर स्वरूप पाहूनही शांतनु- शर्मिला तिला स्वतंत्र खोलीत झोपवतात, ते केवळ तिच्या ओरडत उठण्यातून मिळणाऱया `सिनेमॅटिक' परिणामासाठी. शांतनु हा सायकोऍनालिस्ट आहे, हे तसा उल्लेख होण्याआधी त्याच्या बोलण्यावागण्यातून लक्षात येत नाही. त्यानं बायकोचा पाठलाग करणारा `तो' हा तिचा भासच मानत राहणं, हे- त्याचा व्यवसाय लक्षात घेता- पटत नाही. अकारण संशयाचा काटा त्याच्या दिशेनं रोखण्यासाठीची ही क्लृप्ती असावी. तरीही या सगळ्याचा सिनेमाच्या आस्वादावर फार परिणाम होत नाही, हे सतीशच्या वेगवान पटकथेचं यश आहे.
उत्तरार्धात दुहेरी व्यक्तिमत्त्वावर शांतनुसारख्या तज्ञानं शोधलेला उपाय तर्काला पटणारा नाही. त्या उपचाराचं दर्शनही फार `ऑथेंटिक'नाही. पण, सिनेमाच्या सगळ्यात शेवटच्या दृश्यात, शेवटच्या क्षणाला, एका छोटय़ाशा कृतीतून त्यानं दिलेली `टीझर' पद्धतीची कलाटणी पाहिली, की त्याला हाच परिणाम अपेक्षित असावा, अशी समजूत होते. रूढ अर्थानं कथानकाचा शेवट झाल्यानंतर येणारी ही कलाटणी झक्कच. एक भुंगा प्रेक्षकाच्या मागे लावून देण्याचं काम करणाऱया या शेवटानं सिनेमाचा परिणाम दुणावलाय.
तुषार दळवी, रेशम टिपणीस-सेठ आणि सचिन खेडेकर यांनी सतीशला अपेक्षित असलेला सिनेमाचा बाज अचूक पकडून मस्त साकारलेल्या भूमिका हेही `मृगजळ'चं बलस्थानं आहे. तुषार आणि रेशम हे नवरा- बायकोचं नातं आणि आई- बापांची तगमग या दोन्ही पातळ्यांवर लिलया वावरले आहेत. धास्तीपोटी शर्मिलानं मीराला पिकनिकला जाण्यासाठी मनाई केल्यानंतर शांतनुनं शर्मिलाची समजूत काढण्याचा प्रसगं या दोघांच्या सुरेख भावदर्शनानं यादगार झाला आहे. एका क्षणात आयुष्य उद्धवस्त झालेल्या माणसाची तगमग, त्याचे असहाय्य उद्रेक सचिन खेडेकरनं सगळ्या व्यक्तिमत्त्वातून, चित्तवृत्ती एकवटून साकारले आहेत. सर्वात अवघड आणि म्हणूनच सर्वात कौतुकास्पद कामगिरी मीराची व्यक्तिरेखा साकारणाऱया छोटय़ा कालावतीची. लहान वयात खूपच प्रगल्भ आविष्कार तिनं घडवला आहे.
श्रीमंत निर्मितीमूल्यं, दिग्दर्शकाची माध्यमाची समज यांना तांत्रिक गुणवत्तेची साथ मिळाल्यानं या सिनेमाचं दृकश्राव्य रूप देखणं झालं आहे. चोकस भारद्वाज (कला- दिग्दर्शन), सुहास गुजराथी (छायालेखन) या तंत्रज्ञांच्या कामगिरीचा सिनेमाच्या परिणामकारकतेत मोठा वाटा आहे. सतीश राजवाडे आणि प्रेमकुमार बारी यांनी लिहिलेली गाणी मात्र `चालसे' छाप. `जीवन हे ऊन सावली' या तत्त्वज्ञानप्रचुर गाण्यात `हर्षाचे अन दु:खाचे कधी आपुल्यावरती सावट आले जरी' अशी ओळ आहे. हर्षाचं `सावट' मराठीत कधीपासून यायला लागलं? `रात्री'च्या प्रेमगीतात `श्वास रोखुनी तन स्पर्शाने धुंदित होऊन बावरली', अशी शब्दबंबाळ रचना आहे. शिरीष राजवाडे यांच्या संगीतात हिंदी छापाचा ठरीव ठेका आणि ठरीव गोडवा आहे.
तरीही विषय, सादरीकरण आणि दहा रिळांचा आटोपशीरपणा या गुणांनी हा सिनेमा प्रेक्षणीय केला आहे. पहिल्याच प्रयत्नात मराठीत वेगळी वाट धुंडाळू पाहणाऱया तरूण लेखक- दिग्दर्शकाचं स्वागत करण्यासाठी- ही वाट मळवाट व्हावी, अशी इच्छा असणाऱयांनी- `मृगजळ' पाहायला हवा.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment