Monday, April 11, 2011

एक दिवस असा येतो... (बडा दिन)


सुनो जरा, सुनो जरा
हवाओं मे ये कैसी है सदा
कोई तो है, जो है ये कह रहा
के राहमें वो मोड आ गया
केजिसके आग हैं जमीं ना आसमाँ
न मंझिले... ना रास्ता...
`... प्रत्येकाच्याच आयुष्यात येतं हे वळा, ही परिस्थिती. कधी लवकर, कधी उशिरा पण उन्मळून पडणं असतं अपरिहार्य, निश्चित. ना जगण्याचं कारण उरलेलं ना नजरेसमोर काही ध्येय आणि वाटा तर सगळय़ाच खुंटलेल्या.. ना मंझिले, ना रास्ता.
या स्थितीत कोण काय करील हे ज्याच्या-त्याच्या पिंडावर, घडणीवर ठरत. विझून-संपून मातीत मिळून जाणं सहज शक्य असतं आणि सोपंही. पण ज्याच्यासाठी जगावं असं काहीही न उरणं कधी कधी अलौकिक धैर्यही निर्माण करतं, `नंगेसे खुदाभी डरता है' म्हणतात त्या जातीचं, मरणावर मात करणारं.
कारण, मरणावर मात कधीच कुणी करू शकत नाही, ते अटळ आहे. माणसाला जिवंतपणी मारते ती मरणाची भीती. पण, जगण्यासाठी काहीही न उरण्याचा क्षण एखाद्याची मरणची भीतीही मारतो... त्याच्यासाठी खऱया अर्थानं `बडा दिन' ठरतो.
`बडा दिन' म्हणजे ख्रिस्मस. बंगालमल्या ख्रिश्चनांच्या बोलीभाषेत ख्रिस्मसचा उल्लेख होतो `बडा दिन' असा. अलौकिक मरण लाभून अजरामर झालेल्या देवपुत्र येशूच्या या सणाभोवती अंजान दत्त यांच्या `बडा दिन'ची कथा फिरते, हे सूचक आहे.
छोटय़ाशा बारमध्ये गाणी गाऊन पोट भरणाऱया, मोठा स्टार बनण्याची स्वप्नं पाहणाऱया अँग्लो-इंडियन डेव्हिड डॉसनच्या (मार्क रॉबिन्सन) आयुष्यात ख्रिस्मरपूर्वीची एक सकाळ विलक्षण वेगळी उजाडते. त्याची जुन्या वळणाची संथ गाणी पसंत न पडल्यानं मालकानं नोकरीवरून काढून टाकलंय. नंदिनी (तारा देशपांडे) ही प्रेयसी आदल्याच वर्षी ख्रिस्मसरच्याच दिवशी कायमची सोडून गेली आहे. दारू पिण्यात पैसे उडवल्यानं वर्षाचं घरभाडं थकलंय, अशी भणंग अवस्था.
डेव्हिडची घरमालकीण, कॅथलिक बाई. नवऱयानं टाकलेली, एकाकी म्हणून कडवट, कटकटी.
डेव्हिडच्या रोजच्या चहापाण्याच्या हॉटेलातला मुका- बहिरा पोऱया राका (संजय पाठक) ख्रिस्मसच्या आदल्या सकाळी एका सलूनमध्ये एकाचा खून झालेला पाहतो. त्यानं खून पाहय़लाय हे लक्षात आल्यावर खुनी त्याचा पाठलाग करतात. तो डेव्हिडला `असेल हिंमत तर पोलिसात तक्रार कर' म्हणून सांगते. डेव्हिड राकाला घेऊन पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवतो.
राकानं पाहिलेला खून म्हणजे अंडरवर्ल्डमधल्या गुंडांनी आपल्याच टोळीतल्या गद्दाराची केलेली हत्या आहे. टोळीचा मुख्य डॉन शंकरबाबू (आलोकनाथ) याला या प्रकरणी पोलिसात तक्रार झालेली परवडणार नाही. खून करणारा गुंड सनी (अभय चोप्रा) आणि त्याच्या साथीदारालाही राकाची साक्ष फासावर लटकवू शकेल, अशी भीती आहे. हे डेव्हिडच्या घरात घुसून डेव्हिडला मारहाण करतात. आजच्या दिवसात तक्रार मागे घे, असा दम भरतात.
हल्यानं हादरलेला डेव्हिड पोलिसांची मदत मागतो. शंकरबाबूशी साटंलोटं असलेले पोलिस ती देत नाहीत. सनी आणि त्याच्या साथीदाराच्या दहशतीला घाबरणारे लिलियनचे शेजरी-पाजारी राकाला हालकण्याची मागणी करतात. पण, आता लिलियनही राकाचा जीव वाचवण्याचा पण करते.
गुंडांचा मार खाल्लेला डेव्हिड लिलियनला सांगतो, की मी मार खाल्लाय. किती दुखतं ते मला ठाऊक आहे. उत्तरादाखल लिलियन आपल्या मांडीवरचे नवऱयानं दिलेल्या सिगरेटच्या चटक्यांचे वण दाखवते. नवऱयानं केलेल्या शारीरिक- मानसिक छळाचं गुपित पहिल्यांदाच उघड करते. तिची ताकद प्रथमच कळालेल्या डेव्हिडमध्येही हिंमत येते. घराच्या दाराशी उभे राहून अर्वाच्य शिव्या देणाऱया सनीला तो पहिल्यांदाच भिडतो.
सनीमला बेदम मारल्यावर डेव्हिड जे सांगतो ते फारच महत्त्वाचं. तो म्हणतो,. की सनी तू फार मोठी चूक केलीस. माझ्या आयुष्यात ना प्रेम राहिलं होतं, ना नोकरी, ना पुढे काही ध्येय. राहिली होती ती फक्त मरण्याची भीती. तिही तू घालवून टाकलीस.. चूक केलीस.
हे सांगून तो भरलेलं पिस्तूल सनीच्या हातात देतो आणि सांगतो, चालव गोळी. आतापर्यंत छोटा माणूस असलेला मी या भीतीवर मात करुन `बडा आदमी' झालोय, माझा `बडा दिन' खऱया अर्थानं `बडा दिन' ठरलाय.
अन्यायाविरुद्ध एकाकी लढणारे नायक आपल्याला नवे नाहीत. खरंतर अजीर्ण झालंय. आपल्याला त्यांचं पण आपण हिंदी सिनेमात नेहमी पाहतो ते नायक `महानायक' असतात. त्यांच्यावर होणारे अत्याचारही भकड- तर्कविसंगत असतात आणि त्यांनी दिलेला लढाई पोकळ आणि नाटकी असतो. आपण अशा स्थितीत सापडलोच चुकून तर...? ही भावनाच विलक्षण भयकारी असते. तिचं भांडवल करतात सिनेमावाले. मग आपला प्रतिनिधी असलेला नायक जे काही  शक्तीचे- बुद्धीचे अचाट आणि अकल्पनीय प्रयोग करून दाखवतो त आपण पटवून घेतो, आवडून घेतो.
महानायकाला आपण दाद देतो ती `आपणही असेच वागू' म्हणून नसते तर कुणीतरी असं वागणारा असायला हवा म्हणून दिलेली असते.
`बडा दिन'चा डेव्हिड वेगळा ठरतो तो इथे. त्याच्यावर कोसळणारी आपत्तीही शक्यतेच्या पातळीवरची आहे आणि तिचा मुकाबला करण्याचं धैर्य अंगी येण्यापर्यंतचा प्रवासही तर्कसुसंगत आहे. तो सामान्य माणूस आहे. पडद्यावर तो पचंवीस-तीस गुंडांना लोळवत नाही. पिस्तूल हातात आल्यावर गुंडांना धाडधाड गोळय़ाही घालत नाही. तो त्यापलीकडे पोहोचतो. मारण्यापेक्षा मरण्यासाठी जास्त धैर्य लागतं. ते तो कमावतो.
आश्चर्य म्हणजे प्रेक्षकालाही `क्लासमॅक्स'मध्ये डेव्हिडकडून कोणत्याही `हिरोइक्स'ची अपेक्षा नसते. त्यानं गुंडांचा खात्मा करावा, अशी अपेक्षा प्रेक्षकाच्या मनात उमटू नये, यात दिग्दर्शक अंजान दत्त यांचं यश सामावलंय.
कारण, इथल्या खलनायक सनीही माणूसच आहे. क्रूरकर्मा पण माणूसच. शंकरबाबूनं `पाळलेला' अनाथ पोरगा. त्यानं छू।़।़ म्हटलं की धावणारा पाळीवर कुत्रा. `बडा दिन' असा डेव्हिडला पालटवतो तसाच सनीलाही स्वत्त्वाची जाणीव करून देतो.
मोजक्याच पण निश्चित आकार आणि व्यक्तिमत्त्व लाभलेल्या पात्रांच्या साहय़ानं अंजान दत्त यांनी `बडा दिन'चा पट विणला आहे. त्यांच्या प्रत्येक पात्राच्या त्या क्षणाच्या वागण्याबोलण्याला काही कारण आहे, पत्येकाचं स्वतंत्र तर्कशास्त्र आहे. लिलियनवर लहानपणी बलात्कार झालाय. तिच्याच सावत्र आईनं घडवलेला. तरीही तिला `पवित्र' मानून मोठय़ा मनानं स्वीकारणारा निचा नवरा दारू प्यायल्यावर मात्र तिला `रंडी' म्हणत होता, मारझोड करीत होता, हे ज्या क्षणी सर्वाधिक परिणामकारक ठरेल त्याच क्षणी प्रेक्षकाला कळतं.
आयुष्यात जबाबदारीचं झेंगट नको, म्हणून प्रेयसीशी लग्न न करणरा डेव्हिड आयुष्यात पहिल्यांदाच जबाबदारी स्वीकारतो... राकाला जगण्याची. डेव्हिडला नाकारून लग्न केल्यावरही सुखी न झालेली नंदिनी आपलया नवऱयापाशी कबूल करते, की मी चांगली पत्नी होऊ शकले नाही आणि तूही एक चांगला पोलिस अधिकारी नाहीस. आता दोघं मिळून एक चांगलं काम करूयात. एक जीव वाचवूयात.
बेगम अख्तरच्या गझला जाणकारीनं ऐकणारा शंकरबाबू खलनायक असूनही असहाय्यच. त्याचा धंदाच असा आहे की तयाला जगायचं असेल तर माणसं मारावी लागतात, नाईलाजानं.
`गॉडफादर'सारख्या हिंसाचारामागची मानसिकता उलगडू पाहणाऱया चित्रणशैलीतून `बडा दिन'चा उत्तरार्धा प्रभावी होतो. अनावश्यक गाणी आणि लांबट प्रसंगामुळे फिकट झालेल्या पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्धात कथा पकडही घेते आणि वेगही. बाहय़ाचित्रणात दिग्दर्शक दत्त कलकत्याच्या परिसराचा उत्तम वापर करून घेतात. `इनडोअर'मध्ये प्रकाशयोजनेतून प्रसंगांचा
परिणाम गडद करण्यात त्यांना छायालेखक सुदीप चॅटर्जी यांची जबरदस्त साथ मिळाली आहे. बंगाली अभिनेते असलेले अंजान दत्त आणि सुदीप यांचा तसेच संकलक संजीव दत्त यांचा हा पहिलाच सिनेमा; पण तिघांचीही कामगिरी नवखेपणाची शंकाही न येऊ देणारी.
मॉडेलिंगमधून अभिनयक्षेत्रात आलेल्या मार्क रॉबिनचाही हा पहिलाच सिनेमा. सुरुवातीला काही काळ त्याचे अति- आंग्ल उचार खटकतात; पण भूमिकाच अँग्लो-इंडियन असल्यानं ते सिनेमात सुसंगतच वाटतात. पूर्वार्धात कमकुलत वाटणारा मर्का उत्तरार्धात मात्र शबानासारख्या मातब्बर अभिनेत्रीपुढे लीलया वावरतो. शबानानं लिलियन सहजभिनयातून प्रभावी केली आहे. आलोकनाथच्या वाटय़ाला दोनच प्रसंग आले आहेत; पण सज्जन माणसाच्या छापाबाहेरचा त्याचा थंड रक्ताचा खलनायक कमी लांबीच्या भूमिकेतही छाप पाडून जातो. तारा देशपांडे आणि इरफान खान (नंदिनीचा नवरा) यांनी अपाल्या भूमिका नेटक्या साकारल्या आहेत.
संजय पाठक या पोरसवदा युवकानं राकाचं सशासारखं भेदरलेपण, त्याची हिंस्र आक्रंदनातून व्यक्त होणारी असहाय्यता यथातथ्य साकारली आहे; पण `बडा दिन'मध्ये लक्षात राहतो विकी ऊर्फ  अभय चोप्रा. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रांचा हा पुतण्या दिसतो बराचसा काकासारखा. त्याच्याकडे ना उंची आहे ना पिळदार शरीर. तरीही फक्त शारीरिक वावरातून तो आपल्या `खतरनाक' असण्याची जाणीव करून देता. शंकरबाबूनं त्याच्या अनाथ असण्याचा उल्लेख केल्यावर येणारा विद्ध भाव, साथीदाराला घाबरवतानाची वेडसर झाक आणि क्लायमॅक्सला होणारा कमकुवतपणाचा साक्षात्कार अभयनं अफलातून व्यक्त केलाय.
बंदुकीच्या, उसन्या ताकदीच्या बळावर दशहत गाजविणारा प्रत्येक `बलदंड' खलनायक प्रत्यक्षात माणूस म्हणून किती `किरकोळ' असतो, हे दाखविण्यासाठी दिग्दर्शकानं `किरकोळ' शरीराच्या अभयची निवड केली असावी.
`बडा दिन'मध्ये खरंतर गाण्यांना जागा नाही. ती निर्माण करण्यासाठी दिग्दर्शकानं नायकाला गायक बनवलंय की काय, अशी शंका येते. तरीही जावेद अख्तर यांची अर्थघन शब्दरचना, जतीन- ललित यांचं सुस्वर संगीत आणि फरहा खानने नृत्यदिग्दर्शन यामुळे `मेरी आँखो मे तुम हो', `सुनो जरा', `ना कोई तेरा यहां' ही गाणी श्रवणीय - प्रेक्षणीय झाली आहेत.
सर्वसाधारणपणे वेगळया वाटेनं जाणाऱया सिनेमांना व्यावसायिक सिनेमांच्या घटकांचे वावडं असतं. `बडा दिन'मध्ये प्रेम, संगीत, थरारक, हिंचासार वगैरे सर्व घटक आहेत, थरारक, हिंसाचार वगैरे सर्व घटक आहेत आणि तथाकथित कलापटांप्रमाणे तो कोरडा, भावशून्य नाही. हृदयाला हात घातला की `इंटेलेक्चुअल अपील' संपलं, अशा बाष्फळ समजुतीत न अडकलेला प्रभावी सिनेमा म्हणून `बडा दिन' पाहायला हवा.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment