Thursday, April 7, 2011

बाप सवाई बेटा (हिमालयपुत्र)

स्टारपुत्राचं आगमन ही आताशा फार औत्सुक्याची वा कौतुकाची बाब राहिलेली नाही.
एकेकाळी आपल्या लाडक्या नटाचा मुलगा दिसतो कसा, बोलतो कसा, बापाचे कोणते गुणदोष त्याच्यात उतरले आहेत, हे आवर्जुन पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असायची. ऋषी कपूर, कुमार गौरव, संजय दत्त आणि सनी देओल यांची पदार्पण प्रेक्षकांमधल्या याच उत्सुकतेनं गाजवली. पुढे देव आनंदपुत्र सुनील आनंद, मनोजकुमारपुत्र कुणाल गोस्वामी, जॉय मुखर्जीचा मुलगा सुजॉय आणि अगदी अलीकडे राजकुमारपुत्र पुरु यांना मुळात मर्यादित कुवतीच्या आपल्या पित्यांचीही उंची गाठता आली नाही आणि एक- दोन सिनेमांत प्रेक्षकांनी त्यांना इतर व्यवसायांकडे वळायला लावले. बॉबी देओलचा `बरसात'ही मारूनमुटकून `चालवला', अशी चर्चा होती.
विनोद खन्नानं आपल्या मुलाच्या अक्षय खन्नाच्या पदार्पणासाठी भरपूर गाजावाजा करून `हिमालयपुत्र' सुरू केला. पण मुहूर्तापासून प्रीमियरपर्यंत विनोदनं जंगजंग पछाडूनही अक्षयला तो `येणार येणार' म्हणून गाजवू शकला नाही. माफक लोकप्रिय झालेल्या `आय एम अ बॅचलर' या `हिमालयपुत्र'मधल्या गाण्यानंही अक्षयबद्दल हवा निर्माण केली नव्हती. अक्षयचं रुपेरी पडद्यावरचं आगमन मिळमिळीत ठरणार की काय, अशी शंका निर्माण झाली असतानाच `हिमालयपुत्र' मध्ये अक्षयनं सुखद धक्का दिला आहे. फारशी पूर्वप्रसिद्धी न झाल्यानं त्याच्याविषयी काही अपेक्षाच तयार झाल्या नव्हत्या, ही स्थितीही त्याच्या पथ्यावरच पडली आहे.
नवोदित नटाला एक वेळ अभिनय आला नाही तरी चालेल; पण उत्त्म रुपरंगाबरोबर पिळदार शरीरयष्टीचं भांडवल आणि शारीरिक कसरती, तरतऱहेच्या मारामाऱयांचं कसब, देशीविदेशी नृत्यांचे पदन्यास ही कौशल्यं आत्मसात असायलाच हवी, असा हल्लीचा दंडक आहे. सुदैवानं अक्षयकडे ही सगळी कौशल्यं तर आहेतच आणि अभिनयगुणांचा (विनोद खन्नालाही फारसा न लाभलेला) बोनस त्याला लाभला आहे. त्यामुळं रुपेरी पडद्यावरचं त्याचं पदार्पण सुसह्यच नव्हे, तर स्वागतार्ह ठरलं आहे. स्टारपुत्रांच्या पदार्पणासाठी `प्रेमकथा' हा हमखास यश्स्वी फॉर्म्युला. हल्ली त्याला ऍक्शन दृश्यांची पर्यायानं हिंसाचाराची जोड असावी लागते. त्यामुळे हल्ली `ऍक्शनपॅक्ड लव्ह स्टोरी' किंवा `व्हायोलंट लव्ह स्टोरी' असा एक नवाच चित्रपट प्रकार उदयाला आला आहे. `हिमालयपुत्र'ही याच श्रेणीतला सिनेमा आहे.
स्टारपुत्रावर प्रेक्षकांची मने जिंकण्याबरोबरच चित्रपट वितरकांमध्येही स्वत:ला `खपाऊ' सिद्ध करण्याची जबाबदारी असते. त्यामुळं संपूर्ण सिनेमात `आमचा अक्षय पाहा किती छान नाचतो, मारामाऱयांचं त्याचं कौशल्य पाहिलंत ना; आता हा पाहा भावूक प्रसंग, आणलं ना अक्षयनं (त्याच्या आणि तुमच्या ) डोळय़ांत पाणी आणि हा क्रोधाचा आविष्कार पाहिलात ना किती प्रभावी,' अशी विनोद खन्नाची अनुच्चारित रनिंग कॉमेन्ट्रीच सुरू असल्याचा भास होतो
एकाच सिनेमात 25 सिनेमांचा ऐवज कोंबण्याचा बापांचा अट्टाहास बहुतेक वेळा पोरांच्या कारकिर्दीचं मातेरं करतो; पण अक्षयनं स्वत:वर ती वेळ येऊ दिलेली नाही.
`हिमालयपुत्र'मध्ये आधी अक्षयची प्रेक्षकांपुढे सादर करण्याची कसबं ठरवून मग त्या सगळय़ा कसबांना न्याय देईल, असे कथानक रचल्याचं स्पष्टपणे जाणवतं. नाकायकाला एकदा `सुपरमॅन'च करायचा म्हटल्यावर कथा-पटकथेपासून दिग्दर्शनापर्यंत सर्वच अंगांमध्ये साचेबंदपणाही स्वाभाविकपणेच येतो. अक्षयचा पहिलाच सिनेमा असल्यानं कोणताही प्रयोग करण्याचा धोका विनादनं आणि दिग्दर्शक पंकज पराशयं पत्करलेला नाही. भरपूर टीव्ही पाहणारा एखादा तिसरीतला मुलगाही सहजगत्या सांगू शकेल अशा ठरीव वळणांनी `हिमालयपुत्र'चा प्रवास होतो. प्रेक्षकांना पुढे काय काय होणार, हे आधीच ठाऊक असतं. शेवही ठाऊक असतो. अगदी `क्लायमॅक्स'बद्दलही उतसुकता वाटू नये, इतकी सरधोपट कथा अपयच्या सहज, मोकळय़ा आज्णि आत्मविश्वासपूर्ण वावरामुळेच प्रेक्षणीय झाली आहे.
`हिमालयपुत्र'ची कथा आहे बापबेटय़ाच्या वियोग-मीलनाची. सीमा (हेमामालिनी) आणि सूरज खन्ना (विनोद खन्ना) हे प्रेमिक सीमाच्या वडिलांच्या (अमरीश पुरी) कारस्थानांमुळे एकमेकांशी विवाहबद्ध होऊ शकत नाहीत. सूरजबद्दल गैरसजम झालेल्या सीमाच्या उदरात त्याचा गर्भ वाढत असतो. वडिलांच्या निधनानंतर सीमा डलहौसीला जाऊन आपल्या मुलाला अभयला जन्म देते. बापविनाच तयाला वाढवून मोठा करते. बापाचं नाव ठाऊक नसलेलया अभयच्या मनात बापताविषयी विलक्षण तिरस्कार भरलेला असतो. दिल्लीला कॉलेजशिक्षण घेणाऱया अभयची (अक्षय खन्ना) इन्स्पेक्टर सूरजशी योगायोगानं गाठ पडते. दोस्ती होते. त्याच्या कॉलेजात शिकरणारी रुबी (शाजिया) अभयवर एकतर्फी प्रेम करत असते. ड्रग स्मगलर राणाच्या (डॅनी) टोळीची ती एक सदस्य असते. डलहौसीमधल्या सीमाच्या मालकीच्या सफरचंदाच्या मळय़ातून, सफरचंदांच्या डब्यांमधूनच सीमाच्या नकळत अमली पदार्थांची तस्करी सुरू असते.
शिक्षण संपवून डलहौसीला परतलेला अभय मेजर माथरुरची (सतीश शाह) परदेशातून परतलेली मुलगी ऐशा (अंजला जव्हेरी) हिच्या प्रेमात पडतो. भारताबद्दल तिरस्कार वाटणाऱया ऐशाच्या मनात लवकरच मायदेशाबद्दल आणि अर्थात अभयबद्दल प्रेम निर्माण होते. अंमली पदार्थांच्या तस्करीचा मागोवा घेत घेत सूरज डलहौसीला पोहोचतो. अभयची त्याची पुन्हा गाठ पडते. सीमा-सूरज समोरासमोर येतात; पण गप्प राहतात. ऐशा-अभयच्या साखपुडय़ाच्या वेळीच राणाचा पर्दापाश होतो. ऐन क्लायमॅक्समध्ये सूरज आपला बाप असल्याचं अभयला समजतं, गैरसमज वितळतात आणि बापलेक मिळून खलनायकांची नि:पात करतात, असं हे सर्वपरिचित कथानक.
पण या कथानकात अक्षयला काय काय करावं लागतं? विनोद खन्नानं आपल्या संपूर्ण कारकीर्दीत घेतले नसतील एवढे कष्ट अक्षयला एकाच सिनेमात करायला लागतात. मारामाऱया, स्टंटसीनच्या कसरती, नृत्यांच्या कवायती यांच्याबरोबरच त्यालाड नायिकेचं मन जिंकण्यासाठी साधूचं वेषांतर करावं लागतं. उंच डोंगरावर उभारलेल्या शिवाच्या भव्य मूर्तीपाशी जाऊन आपल्या न पाहिलेल्या बापाबद्दलचा तिरस्कार, राग व्यक्त करावा लागतो. मस्तवाल नायिकेला वठणीवर आणण्यासाठी तिच्याशी कठोर वागण्याचं नाटक करावं लागतं. तिचा गैरसमज झाल्यावर तिची आर्जवं करावी लागतात, स्वत:ला जखमी करून घेऊन तिला रक्ताचा टिळा लावावा लागतो. साखरपुडय़ाच्या नृत्यगीतात बापाची आठवण झाल्यावर तांडवनृत्य करावं लागतं, नायिकेचा बाप हे सिनमातलं विनोदी पात्र असल्यानं त्याच्याबरोबरच्या प्रसंगांमध्ये माफक हशाही पिकवावा लागतो.
मुळात हिंदी सिनेमाचा नायक हा दुर्गुणांचा वाराही न लागलेला, चुकाही नेहमी `बरोबर'च करणारा महामानव असतो. त्यात स्टारपुत्राचा पहिला सिनेमा म्हणजे कॅमेऱयाचे कोनही त्याला पडद्याहून मोठा करणारे. आपण इक सामान्य, मत्यू मानव आहोत हे विसरून `सुपरमॅन'चा आविर्भाव निर्माण करणं आणि तो सातत्यानं बाळगणं हे काम वाटतं, तेवढं सोपं नाही. हा आविर्भाव नीट पेलता आला नाही, तर सगळा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतो. नायकासाठी बेतलेले प्रसंग हास्यास्पद ठरू शकतात. अक्षयचा सराईत वावर `हिमालपुत्र'वर ही वेळ येऊ देत नाही.
विनोद खन्याची आठवण करून देणारा देखणा चेहरा, रुबाबदार उमदं व्यक्तिमत्त्व अक्षयला आपसूकच लाभलंय. त्याला आकर्षक, लोभस हास्याची दैवदत्त देणगीही लाभलीये. देखणा असूनही तो बॉबी देओलप्रमाणं परदेशातला किंवा परग्रहावरचा `ग्रीक गॉड' वाटत नाही. आपल्यातला एक वाटतो. भावनिक प्रसंगांमध्ये आणि विनोदी दृश्यांमध्ये तर त्यानं बापावरही मात केली आहे.
घरच्याच सिनेमा (तोही लाडक्या लेकासाठी खास बनवलेला) असल्यानं की काय, विनोद खन्यानंही लेकाला जोमदार, संयत साथ दिली आहे. सीमाच्या भूमिकेसाठी हेमानं आपली निवड सार्थ ठरवली आह. `हिमालयपुत्र' विनोदनं आपल्या मुलासाठी काढलाय; शाजिया किंवा अंजलाच्या वडिलांनी आपल्या लेकीसाठी काढलेला नाही. त्यामुळं त्या दोघींना फारसा वाव नाही. अंजलाचं व्यक्तिमत्त्व, विशेषत: हास्य प्रसन्न आहे. तिच्यापेक्षा शाजियाच्या भूमिकेत अभिनयाला थोडा जास्त वाव आहे. टिपिकल नायिकेपेक्षा वेगळं, थोडंसं पुरुषी, आक्रमक व्यक्तिमत्त्व लाभलेल्या शाजियानं रुबीची भूमिका समजून केली आहे.
अनु मलिकाच्या संगीतापेक्षा वनराज भाटियांचं पार्श्वसंगीत जास्त प्रभावी आहे. डॉल्बी स्टीरियो तंत्रामुळं पडद्यावरच्या भव्य प्रतिमांना साजेसा परिणाम साधणारं भरगच्च पार्श्वसंगीत त्यांनी दिलं आहे. हनी इराणीची कथा-पटकथा आणि कमलेश पांडेंचे संवाद यात काहीच नाविन्य नसल्यानं (आणि ते नसणारच हे आधीच ठरलेलं असल्यानं) दिग्दर्शक पंकज पराशरला `ऑर्डरनुसार' नेत्रसुखद आणि गतिमान सिनेमा साच्यातून काढावा लागला आहे. ते काम त्यानं चोखर बजावलं आहे.
जाहिरातपटांमधला सर्व अनुभव पणाला लावून त्यानं भरपूर दृश्यविभागणी करून चित्रपटाला विशेष वेग आणि लय मिळवून दिली आहे. त्याची विनोदाची जाण चांगली असल्यानं (जॉनी लिव्हर असूनसुद्धा) विनोदी दृश्यं संयमित आणि चमकदार झाली आहेत. कलादिग्दर्शक नितीन देसाइभनी उभारलेली शंकराची भव्य मूर्ती सिमेमातलं एक जिवंत पात्रच वाटावी, अशा खुबीनं पंकजनं तिचा वापर केला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या सामान्य वकुबाच्या अक्शनकुमार आणि ऍक्शन कपूर मंडळींची गर्दी आहे. पदार्पणातच अक्षय खन्ना ही गर्दी ओलांडून आमिर, शाहरुख, चंद्रचूड या `स्टार-ऍक्टर' मंडळींच्या रांगेत जाऊन पोहोचला आहे. विनोद खन्नानं अक्षयच्या पदार्पणासाठी केलेला खर्च आणि घेतलेली मेहनत अक्षय वाया जाऊ देणार नाही, याची खात्री `हिमालयपुत्र'नं दिली आहे
..........................................................................
चौकट

निर्माता : विनोद खन्ना
दिग्दर्शक : पंकज पराशर
छायाचित्रण : धरम गुलाटी
संगीत : अनु मलिक
कलाकार : अक्षय खन्ना, अंजला जव्हेरी, विनोद खन्ना, हेमामालिनी, शाजिया, डॅनी.
........................................................................
(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment