म्हणजे एकतर तुम्ही डेव्हिड धवनचे कट्टर फॅन असणार किंवा सलमान किंवा करिश्माचे पंखे असणार किंवा तुमच्याकडे वेळ आणि पैसाही खूप झाले असणार, हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही.
कारण एकतर या सिनेमात वर उल्लेखलेल्या तीन सिनेमांपेक्षा वेगळं काही नाही. आणि या सिनेमांमध्ये ते पाहताना जी मजा आली होती, ती काही या सिनेमात येत नाही. अर्थात, तरीही तुम्हाला `दुल्हन...' पाहावासा वाटू शकतोच. कारण, डेव्हिड धवनच्या ब्रीदानुसार प्रेक्षकांच्या डोक्याला बिल्कुल ताप न देता अडीच तास (बिनडोकपणे का होईना) हसतखेळत घालवल्याचं फुटकळ समाधान देतोच हा सिनेमा. त्यातच समाधान मानणारा मोठा वर्ग आहेच आपल्याकडे.
पण, खरं सांगायचं, तर यशस्वी लेखक- दिग्दर्शक यशस्वी झाले, की धाडसी राहात नाहीत, आळशी होतात, जे खात्रीशीरपणे खपतं, तेच कसं खपवत राहतात, याचं दर्शन घडवतो हा सिनेमा. चांगल्यापैकी मनोरंजक कथाबाजीवरचा हा सिनेमा लेखक रुमी जाफरी आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन किती खुलवू शकले असते, याच्या काही खुणा तर याच सिनेमात दिसतातही, पण, तसा काही प्रयत्न करण्याऐवजी या द्वयीनं केवळ आपल्या आणि इतरांच्या सिनेमातल्या प्रसंगांवर डल्ला मारून गल्ला भरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे फसवाफसवीतून हसवाहसवी घडवू पाहणाऱया या सिनेमाची मांडणी फसते, आणि लेखक दिग्दर्शकांनीच आपल्याला गंडवल्याची भावना तीव्र होते.
तर ही कथा `एक फूल चार काँटे'चीच, फक्त इथे काटे तीन आहेत. फूल आहे नायिका सपना (करिश्मा कपूर) या अनाथ मुलीला लहानाची मोठी करणारे तिचे तीन मामा म्हणजे एकापेक्षा एक भारी नग. मोठा पूजापाठात रमलेला पंडित (परेश रावल), मधला मामा सतत व्यायाम करणारा पैलवान (ओम पुरी) आणि धाकटा हा छाकटा, पावली कम मॉडर्न नाच्या (अनुपम खेर). या तिघांचंही सपनावर जिवापाड प्रेम आहे. तिच्या लालनपालनात काही कमी पडू नये म्हणून तिघेही अविवाहित राहिलेलं. प्रत्येकाला वाटतं, की सपनानं फक्त आपल्यावर प्रेम करावं, आपला आदर्श बाळगावा. त्यामुळे जो तो तिला आपल्याबरोबर आपल्या छंदात ताबडवतो. तिच्या आवडीनिवडी आपल्या साच्यात घडवायला बघतो. या प्रकारात सपनाची त्रेधातिरपिट उडत राहते. शिवाय, आता तिचं लग्नाचं वय झालेलं असल्यानं तिच्यासाठी मुलगा शोधण्याचीही भानगड सुरू होते. हे अतिप्रेमळ आणि अतिहेकट, तऱहेवाईक मामा सपनाची आवडनिवड न विचारता, आपल्या पसंतीचा वर तिच्या गळ्यात बांधणार हे तिलाही स्वच्छ दिसत असतं.
इथे एन्ट्री होते राजाची (सलमान खान). हा नायक. श्रीमंत घरातला एकुलता एक लाडला. सपनाकडे पूर्वी काम केलेली हाऊसकीपर (हिमानी शिवपुरी) राजाच्या आईवडिलांपाशी (फरिदा जलाल आणि कादर खान) सपनाचं गुणगान करते. तिचा फोटो पाहताच आईवडील खुश होतात. त्यांच्या सुखातच आपलं सुख मानणारा राजा त्यांच्या पसंतीच्या मुलीशी (अर्थातच फोटोबिटो पाहून ती नाकीडोळी नीटस असल्याची खात्री करून घेतल्यावर) डोळे झाकून लग्न करायला तयार होतो. सपनाचे विक्षिप्त मामा राजाच्या वडिलांशी उद्धटपणे वागतात. तेव्हा करीन तर याच मुलीशी लग्न करीन, अशी प्रतिज्ञा करून तो वडिलांना हीच `दुल्हन हम ले आयेंगे' असं वचन देतो.
राजा ही कामगिरी तो कशी पार पाडतो, सपनाच्या मामांना कसा पटवतो, याची कहाणी म्हणजे हा सिनेमा.
रुमी आणि डेव्हिड यांना फुल बॅटिंग करता येईल, अशी मजा या कथानकात आहे. पण, ते काय करतात पाहा. सपनाला तिच्या मामांचा होणारा गंमतीशीर प्रेमळ जाच अगदी सुरुवातीला, दोनचार प्रसंगांमध्ये संपतो. राजानं कसम खाल्ल्यावर लगेच सपना एकटी परदेशीवारीवर पलायन करते. अर्थातच राजाही तिच्या मागावर तिच्याबरोबर जगप्रवास करतो. आधी खुन्नस, मग दोस्ती, मग प्रेम अशा क्रमानं प्रकरण जमतं, हाच कथाभाग इंटरव्हलपर्यंत चालतो. तोही अगदी सेम टु सेम `हीरो नं. 1' आणि `दिल है के मानता नही' मधल्या वाटेनं. त्यात डेव्हिड धवन टच काय, तर एका गाण्यानंतर जेमतेम एक प्रसंग होतो ना होतो, तोच दुसरं गाणं. बरं, तुम्ही पहिल्या गाण्यात काही अपरिहार्य कारणानं थिएटरबाहेर गेला असलात आणि दुसरं गाणं सुरू असताना आलात, तर फरक काही पडतो का? काही नाही. कारण, सगळी गाणी, त्यांची लोकेशन्स, त्यांचे नाच... सगळं सारखंच.
मध्यंतरानंतर असा `टाइमपास' केल्यावर लेखक- दिग्दर्शक एकदम मूळ मुद्दय़ाकडे वळतात. नायकानं नायिकेच्या खडूस मामांना पटवण्याचा उपक्रम सुरू होतो. इथेही एकेका प्रसंगात एकेक मामा पटतो, त्या आनंदात नायकनायिका नवं गाणं म्हणतात, नवा नाच करतात. पुढे दुसरा मामा. चुटकीसरशी तीन मामा पटवून सिनेमा क्लायमॅक्सकडे रवाना. या चटावरच्या श्राद्धांमुळे भलतीच गंमत घडते. सतत हसणाऱया इन्स्पेक्टरच्या भूमिकेतला सतीश कौशिक आणि परदेशातल्या टुअर मॅनेजरच्या भूमिकेतला जॉनी लिव्हर ही उपपात्रंच मुख्य पात्रांपेक्षा जास्त हशा पिकवतात. अनुपम खेरलाही जोरदार दाद मिळते, पण ती त्याच्या बायलेपणाच्या सोंगाला. या पात्राच्या रुपात काहीसा पाचकळपणा असला सिनेमात तरीही हा डेव्हिडच्या स्वच्छ सिनेमांमध्येच गणला जाईल, कारण, इथे द्वयर्थी गाणी, संवादांना फाटा दिलाय.
करश्मा कपूरला आता सिनेमा स्वबळावर बघणीय करण्याची कला साधली आहे. तिच्यात आणि सलमानमध्ये मस्त टय़ुनिंगही आहे. त्यामुळं ही जोडी शिळ्या प्रसंगांतही बोअर मारत नाही. बाकी सगळीच गँग तगडी असल्यानं आणि सिनेमाला वेग देण्यात डेव्हिड माहिर असल्यानं तो शेवटपर्यंत पाहवतो. तांत्रिक बाजू अर्थातच एकदम चकाचक, पॉश. नवोदित संगीतकार हिमेश रेशमियानं सगळी गाणी नाचऱया चालू ठेक्यावर बांधली आहेत. ती योग्य वर्गात लोकप्रिय झाली आहेतच. त्याची गुणवत्ता पार्श्वसंगीतात अधिक जाणवते.
एकूणात इतर बरा पर्याय उपलब्ध असेल (आणि तुम्ही अगदी सुरुवातीलाच सांगितलेल्या वर्गात मोडत नसाल), तर `दुल्हन हम...'कडे आवर्जून वळायची गरज नाही.
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment