Friday, April 1, 2011

चमत्काराला नमस्कार (तोचि एक समर्थ)


सामान्य माणूस ऐहिकाच्या गर्तेतून सहजासहजी भक्तिमार्गाकडे वळत नाही. त्याचं भावविश्व जेव्हा `अभावविश्व' होतं, काही विवंचना ग्रासतात, लौकिक उपाय थकतात; तेव्हाच तो देवाला शरण जातो. अशावेळी काही अवतारी सिद्धपुरुष चमत्कार घडवून त्याचं दु:ख क्षणार्धात दूर करतात आणि त्याची देवावरची श्रद्धा दृढ करतात; मग, आस्तेआस्ते तो भक्तिमार्गाकडे वळतो, अशी परंपरा सांगितली जाते.
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे याच परंपरेतले चमत्कारी, अवलिया, अवतारी पुरुष. भक्तजनांनी नोंदविलेल्या त्यांच्या चरित्रपर गाथेत अशाच चमत्कारांचा भरणा आहे. त्यामुळेच, स्वामी समर्थांवर किंवा अशा अवतारी पुरुषांवर विश्वास आणि श्रद्धा असलेल्या भाविकांसाठीच बनविलेल्या `तोचि एक समर्थ' या पितांबर काळे दिग्दर्शित भक्तिपटातही भर आहे, ती स्वामींनी घडवलेल्या चमत्कारांवर.
सिद्धपुरुषावर श्रद्धा नसलेल्या एखाद्या आधुनिक नास्तिकाच्या आयुष्यात चमत्कार घडवून त्याला त्या सत्पुरषाचा भक्त बनवण्याचा, `शिर्डीके साईबाबा'पासून रूढ झालेला, फॉरमॅट `तोचि एक ...'च्या पटकथेत वापरण्यात आलायं.
इथे ज्योति ही डॉक्टर युवती आपल्या आईच्या आजारपणात वैद्यकीय उपाय थकल्यावर स्वामी समर्थांना शरण जाते. त्यांच्या चमत्कारानं तिची आई बरी होते. (म्हणजे आईचं स्वरयंत्रांचं दुखणं डोक्यावर फटका बसून दूर होतं.) तिचा वाग्दत्त वर अविनाश (अंकुश चौधरी) हा नास्तिक. तो अनिच्छेनंच तिच्याबरोबर अक्कलकोटला जातो. तिथे चाललेल्या पारायणातून त्याच्यापूढे स्वामींचं चरित्र उलगडतं आणि सिनेमाच्या शेवटी तोही स्वामी समर्थांचा भक्त बनून जातो, हा कथेचा प्रारंभ आणि शेवट. मध्ये स्वामींचं चरित्र उलगडतं. एका बनात लाकुडतोडय़ाच्या हातून कुऱहाड एका वारुळावर पडली आणि त्यात तपश्चर्या करीत बसलेले स्वामी समर्थ भूतलावर प्रकटले. इथपासून ते अक्कलकोटमध्ये त्यांच्या महानिर्वाणापर्यंतचा कथाभाग या चरित्रपटात आहे.
साधारणपणे अशा सत्पुरुषांच्या गाथांच्या रचनेचा एक ढाचा असतो. एखाद्या गावात देहभानहीन उन्मनी स्थितीत `प्रकटणाऱया' या अवलियांना काही भक्त भेटतात, तर काही कुचाळखोर. अनेकदा भाविकही शंकेखोरच असतात. त्यांच्या शंका फेडण्यासाठी हे सत्पुरुष चमत्कार घडवतात. अनेकदा त्यांचं वर्तन बाह्यत: विक्षिप्त, अनाकलनीय आणि प्रसंगी संतापजनकही असतं, पण या वर्तनातही काही कूटार्थ दडलेला असतो, हे भक्तांना नंतर ध्यानी येतं. स्वामी समर्थांच्या अशाच स्वरुपाच्या सुटय़ासुटय़ा लीलांची ही गाथा त्याच सरळसोट पद्धतीनं सिनेमात मांडण्यात आली आहे.
त्यामुळेच, स्वामी समर्थांना (दाजी भाटवडेकर) सर्वप्रथम अक्कलकोटमध्ये पाहणारे मुस्लिम तरुण, त्यांना घरी घेऊन जाणारा चोळाप्पा (गिरीश ओक) हा भक्त, त्याचे कुटुंबिय (अलका कुबल- आठल्ये व इतर), सुंदरा (प्रेमा किरण) आणि अन्य काही सेवेकरी यांचाच सिनेमात सुसूत्र वावर आहे. बाकी एकेका प्रसंगापुरत्याच येणाऱयाच व्यक्तिरेखा अधिक आहेत. चढत्या श्रेणीनं नाटय़निर्मिती करून कळसाध्याय गाठण्याचा नेहमीचा रुपबंध इथे नाही. सिनेमा एकाच पातळीवर पुढे सरकत राहतो. स्वामी समर्थांच्या गाथेतले चमत्कार विशेष दृक्परिणामांच्या साह्यानं पडद्यावर साकार करणं, हाच लेखन- दिग्दर्शकांचा मुख्य उपक्रम आहे. काही तुरळक ठिकाणी प्रताप गंगावणे यांनी स्वामी समार्थांचं व्यवहारी आणि परखड तत्त्वज्ञानही संवादांमधून मांडलंय. पण, पटकथेत अशा जागाच फार नसल्यामुळे, स्वामी समर्थांची शिकवण काही सिनेमातून ठसत नाही.
अर्थात, लेखक- दिग्दर्शकांनी गाथेशी प्रामाणिक राहून स्वामीचरित्र पडद्यावर आणल्यानं, विचारी प्रेक्षकाला स्वतंत्रपणे काही शिकवण मिळविता येते. स्वामींच्या चमत्कारानं दु:खनिवारण झालेले भक्तही थोडा काळ जाताच त्यांच्याबद्दल शंका घेतात ( एका चमत्कारानं त्यांचे डोळे उघडत नाहीत.) स्वकर्तृत्वावर काही कमावण्यापेक्षा स्वामींच्या आशीर्वादानं आयतं सुख मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. स्वामींच्या सामर्थ्याची खात्री पटल्यानंतरही त्यांच्याशी खोटेपणा करू धजणारे भक्त, लौकिक स्वार्थ सुटल्यानंतरही स्वामींच्या सहवासाच्या मोहात गुंतलेला, सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून राहणारा `स्वामीसुत', स्वामींच्या मठात त्यांच्याच सेवेकऱयांनी त्यांच्या डोळ्यांदेखत चालविलेले गैरप्रकार, त्यांच्यातल्या कलागती हा सगळा कथाभाग विषण्ण करणारा आहे. सत्पुरुषांकडे पाहण्याचा सामान्य भाविकांच्या व्यवहारी उपयुक्ततावादी दृष्टीकोनावर त्यातून नकळत प्रकाश पडतो. आपल्या शिकवणीचा जवळच्याच मंडळीवर काही परिणाम घडत नाही, हे पाहून व्यथित अंत:करणानंच स्वामींनी अवतारसमाप्तीचा निर्णय घेतला असावा, अशी शंका येते हे भक्तीचं विरुपदर्शन पाहिल्यावर.
दाजी भाटवडेकरांची स्वामी समर्थांची भूमिका हे या सिनेमाचं मुख्य आकर्षण. या सिनेमाचं मुख्य आकर्षण. या वयात दाजींनी अतिशय चपळ आणि तरतरीत वावरानं स्वामी समर्थ साकारले आहेत. उन्मनी अवस्थेतल्या स्वामी समर्थांच्या विक्षिप्त भासणाऱया लीलांचा दाजींनी घडवलेला लोभस अविष्कार खास पाहण्याजोगा आहे. स्वामींचं भक्तजनांना फटकारणं, त्यांच्या चिंतेन व्याकुळ होणं, भक्तांच्या `लीलां'नी व्यथित होणं, हे दाजींनी जिवंत केलंय. अन्य कलावंतांमध्ये गिरीश ओक, प्रेमा किरण, अलका कुबल-आठल्ये, जयवंत वाडकर यांचा सफाईदार वावर लक्षात राहतो.
चंद्रशेखर शिंदे यांच्या संगीतात वासुदेवगीत, कव्वाली, नृत्यगीत आणि अर्थातच आरत्या- भक्तिगीतं यांचा वैविध्यपूर्ण वापर आहे. नंदू होनप यांचं पार्श्वसंगीतही भावपरिपोषक.
एकूणात चमत्काराला नमस्कार करणाऱया भाविकांना स्वामी समर्थांच, अक्कलकोटचं थिएटरबसल्या दर्शन घडविण्याचं काम दिग्दर्शक पितांबर काळे यांनी चोख बजावलंय. अन्य जातकुळीच्या प्रेक्षकासाठी मात्र त्यात काही नाही.

 (महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment