Thursday, April 28, 2011

`अचानक' कसला? भयानकच!


`अचानक' हा गोविंदाचा सिनेमा असूनही विनोदपट नाही किंवा आचरटपट नाही; गोविंदाला वेगळ्या नायकाच्या भूमिकेत पेश करणारा `सस्पेन्सफुल ऍक्शन थ्रिलर' आहे.
`अचानक' पाहताना प्रेक्षक कायम हतबुद्ध किंवा साध्या भाषेत भांजाळलेल्या अवस्थेत असतो, आता पुढे काय घडणार, असा प्रश्न त्याला सतत पडत असतो.
तुम्ही म्हणाल, वा! `सस्पेन्सफुल ऍक्शन थ्रिलर' पाहताना प्रेक्षकाची अशीच स्थिती व्हायला हवी.  मुद्दा बरोबर आहे. फक्त `अचानक' पाहताना `पुढे काय घडायचं ते एकदा घडून जाऊदे आणि या चरकातून सुटका होऊ दे', अशी भावना निर्माण होते. हे काही `अचानक'चं यश म्हणता येणार नाही.
ना धड रहस्य, ना धड मारामारी, ना धड उत्कंठावर्धक रोमांच, असलं हे विलक्षण बेचव कडबोळं (बि) घडवण्यात सर्वात मोठा वाटा आहे बुजुर्ग पटकथाकार सचिन भौमिक यांचा. काही माणसांना झोपेत चालण्या-बोलण्याची सवय असते. एकेकाळी बऱयापैकी मनोरंजक सिनेमे लिहिलेल्या भौमिकसाहेबांना अलीकडे झोपेत लिहिण्याची सवय जडलेली दिसते. त्यांनी `अचानक' जागेपणी लिहिलाय यावर `अचानक' पाहिलेला माणूस झोपेतदेखील विश्वास ठेवणार नाही.
`अचानक' नाव `अचानक'का, तर नायकावर `अचानक' संकटांची पेचप्रसंगाची मालिका कोसळते म्हणून अरे, पण प्रेक्षकाला काही अचानक घडल्यासारख वाटू द्याल की नाही?
`अचानक'चा नायक अर्जुन नंदा (गोविंदा) हा बडय़ा घराण्यातला धाकटा खुशालचेंडू कुलदीपक. वडील (सईद जाफ्री), मोठा भाऊ (राहुल रॉय), वहिनी (फरहा), पुतण्या अशा सुखी, आनंदी कुटुंबातला `लाडला बेटा' सिमल्यात एका मोटार शर्यतीच्या वेळी त्याची पूजाशी (मनीषा कोईराला) नजरानजर होते. तो तिच्या प्रेमात पडतो. येन केन प्रकारेण तिलाही आपल्या प्रेमात पाडतो. आणि अचानक सिमल्यात या प्रेमी युगुलावर प्राणघातक हल्ला होतो. त्यातून दोघे केवळ सुदैवानेच बचावतात.
नंदा कुटुंबाचा पातळयंत्री वकील सागरच (परेश रावळ) या हल्ल्याचा सूत्रधार असतो. अर्जुन आणि त्याचा भाऊ विजय यांना ठार मारून नंदा मंडळींची सर्व मालमत्ता हडप करण्याचा त्याचा कट असतो. अर्जुन उच्च क्षिणासाठी परदेशात गेलेला असताना विजयचा त्याच्याच पत्नीच्या (फरहाच्या) हातून अपघाती मृत्यू होतो. त्याच वेळी, मुंबईत आलेल्या पूजाला या खुनाचा आरोप स्वत:वर घ्यावा लागतो. परदेशातून परतलेल्या अर्जुनला हा विचित्र प्रकार समजल्यावर तो पूजाला तुरुंगातून पळवून नेतो. इतक्यात त्याच्या वडिलांचाही मृत्यू होतो आणि तो खून असल्याचंही उघडकीला येतं. सागरच या खुनांचा सूत्रधार आहे, हे समजल्यावर अर्जुन आणि पुजा एक नाटक रचतात आणि सागरला रंगेहाथ पकडतात, हे `अचानक'चं कथानक.
 त्यावर पटकथा रचताना भौमिक यांनी अतर्क्यतेची परिसीमा गाठली आहे. मुळात, हा `रहस्यपट' करायचा की `थ्रिलर' याचाच गोंधळ उडालाय. कारण, हा `रहस्यपट' असता, तर खुनी माणसाची ओळख अन्य पात्रांप्रमाणेच प्रेक्षकांपासूनही गुप्त राहायला हवी होती. पण इथे नायकावरच्या पहिल्या हल्ल्यानंतर लगेचच खलनायक स्वत:ची ओळख करून देतो आणि आपल्या भावी कुटिल कारस्थानांचीही वेळोवेळी प्रेक्षकांना माहिती करून देतो.
आणि दिग्दर्शक नरेश मल्होत्रांचीही त्रेधातिरपिट पाहा. नायकावरच्या हल्ल्याची तयारी सुरू झाल्यापासून हल्ला फसेपर्यंत ते खलनायकाला कॅमेऱयाकडे पाठ करायला लावून, अंधारलेल्या चेहऱयाचे अँगल लावून लपवून ठेवतात. आपल्याला वाटतं, आता खलनायक शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहणार बहुतेक! आणि पुढच्याच प्रसंगात परेश रावळ थेट नंदा खानदानाच्या बरबादीचा `ब्लू-प्रिंट'च मांडतो. मग, आदल्या प्रसंगात एवढा आटापिटा करून लपवाछपवी केलीत ती कशाला?
 आणि या खलनायकाची कारस्थानं, तर `भयानक विनोदी' आहेत. विजयचा स्वत:च्या बायकोकडून होणारा खून आणि त्याचा आळ पूजावर जाणे, हा या सिनेमातलाच नव्हे, तर आजतागायतच्या सर्व फसलेल्या, रहस्यपटांमधला सर्वात हास्यास्पद पटकथालेखनाचा नमुना आहे. या खून प्रकरणात कुठेही, ना तपास करणारे पोलिस दिसत ना न्यायालय! इथं नंदा कुटुंबाचे सदस्यच मिळून मधूला वाचवायचा निर्णय घेतात. सिमल्याहून पहिल्यांदाच मुंबईत आलेली पूजा सागरच्या जाळ्यात सापडते आणि कुंटणखान्यातून सुटका करून घेण्यासाठी थेट खुनाचा आरोप पत्करायला तयार होते, हे तर्कबुद्धीला पटत नाही. तेही पटवून घेतलं, तरी विजयचा खून तिनं- एका सर्वस्वी अनोळखी मुलीनं केलाय, हे पोलिसांना- न्यायालयाला कसं पटतं? विजयचा खून करण्यासाठी पूजाकडे काय कारण होतं, याचा तपास कुणी का करत नाही? हे प्रश्न प्रेक्षकांना पडूच नयेत, अशी भौमिक- मल्होत्रांची अपेक्षा दिसते. कारण, यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर न देता ते तिला थेट खुनाबद्दलची शिक्षा भोगायला तुरुंगात पाठवतात.
अर्जुनच्या वहिनीचे संशयास्पद वर्तन आणि त्याचा शेवटी होणारा उलगडा यातच `अचानक' मधलं माफक रहस्य आणि थोडाफार धक्का आहे. पण, पटकथेच्या झोपाळू मांडळीमुळे चाणाक्ष प्रेक्षकांना मधूच्या वर्तनाबद्दल अंदाज येतोच आणि ज्यांना तो येत नाही ते तोवर एकूणच सिनेमाबद्दल बेफिकिरीच्या अवस्थेला पोहोचलेले असतात.
 नायक- नायिका पोलिसांच्या गोळयांना बळी पडलेले दाखवताना प्रेक्षकांना आपण काय हुशारीनं गंडवतोय, असा पटकथाकार- दिग्दर्शकाचा अविर्भाव आहे. पण, हिंदी सिनेमात नायक- नायिका (प्रेमपट वगळता) कधी मरत नसतात, हे साधं गणित न समजण्याइतका प्रेक्षक दुधखुळा आहे काय? नायक-नायिकेचं नाटक आणि सिनेमाचा ताणताण ताणलेला कळसाध्याय (क्लायमॅक्स) या प्रसंगातच उघड होतो.
 पूजाला गटवण्यासाठी अर्जुननं उधारीवर कुत्रा घेऊन तिच्या (जनावरांच्या) दवाखान्यात जाण्याचा प्रसंग आणि जॉनी लिव्हरची तिळ्या भावांच्या भूमिकेतली धमाल अदाकारी वगळता `अचानक'मध्ये पाहण्यासारखं काहीही नाही. त्यात `ये दिल्लगी'कार नरेश मल्होत्रांचा सिनेमा भरमार आहेच. `एक सोणी कुडी दिला दे', `जाने जाना', `दिल ले के गया चोर' ही उडत्या ठेक्याची गाणी सिनेमाच्या प्रेममय `चित्रहार' सदृश पूर्वार्धात धडाधड येऊन जातात. पुढे कथानकाच्या थ्रिलर भागात मल्होत्रा अक्षरश: गाणी `घुसवतात.' तुरुंगात खितपत पडलेल्या पूजाला अर्जुन जिवावर उदार होऊन सोडवतो. मागे पोलिसांचा ससेमिरा, विदेशात घेऊन जाणारी बोट गाठण्याचं मनावर दडपण अशा स्थितीतल्या धावपळीतही एके ठिकाणी पूजा घसरून पाण्यात पडते. ओलेती होते. दोघे एकमेकांकडे पाहतात आणि वेळात वेळ काढून `दुनिया भुला के' हे स्वप्नगीत सुरू!
 `अचानक'मध्ये गोविंदा आपल्या वाटय़ाच्या सर्व प्रसंगांमध्ये समरस होऊन अनिनय करण्याचा प्रयत्न करतो. पण, एकूण सिनेमातच सुसंगती नसल्यानं त्याचा प्रयत्न थिटा पडतो. मनिषा काही सिनेमे अभिनय करण्यासाठी. हा तिच्या दुसऱया `कॅटेगरी'तला सिनेमा आहे. राहुल रॉयने हल्ली व्यवस्थित कटिंग करायला सुरूवात केली आहे. त्याची झुलपं हटल्यानं हल्ली पूर्ण चेहरा दिसू लागलाय. त्यावर पुढेमागे भावही उमटतील कदाचित. परेश रावळ, फरहा सफाईदारपणे वावरतात. सईद जाफ्रींनी मात्र अनाहूतपणे जॉनी लिव्हरला विनोदी अभिनयात मात दिली आहे. अर्जुन-पूजा पळून आल्यावरच्या गंभीर प्रसंगामध्ये पोलिस आले म्हटल्यावर हे गृहस्थ चिरक्या तारस्वरात रेकत आणि कमालीचे हास्यास्पद हातवारे करीत जो काही भयाण अभिनयानुभव देतात, तो पाहून हसूनहसून मुरकुंडी वळते.
आपल्या साध्या, सरळ आयुष्यात अचानक काहीही, कसंही घडू शकतं, हे `अचानक' कथासूत्र लक्षात ठेवा.
 कोण जाणे! उद्या कदाचित कुणी खलनायक `अचानक' तुमच्यापुढे उभा ठाकून `अचानक'ची टिकिट देऊ करेल... तुम्हाला `अचानक' पाहण्याचा मोहही पडेल... तेव्हा आत्ताच सावध व्हा... जागे राहा.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment