Tuesday, January 31, 2012

तीन बायका, फसगत ऐका (गॉडमदर आणि संघर्ष)


 विनय शुक्ला दिग्दर्शित `गॉडमदर' आणि तनुजा चंद्रादिग्दर्शित `संघर्ष' हे दोन चित्रपट एकाच आठवडय़ात एकाच वेळी देशभर प्रदर्शित झाले. दोन स्त्रियांच्या चाकोरीबाहेरच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखा, हे या दोन चित्रपटांमधील महत्त्वाचे साम्य आणि एकाची तर दिग्दर्शकही एक स्त्रीच, म्हणून या तीन बायका. त्यांच्या दोन्ही चित्रपटांचा 'परिणाम'ही साधारण एकाच पातळीवरचा म्हणूनच या चित्रपटांचा हा एकत्रित ताळेबंद.
................................................................................. 
 गॉडमदर
पहिली बाई आहे विनय शुक्ला यांच्या सहा राष्ट्रीय पारितोषके पटकाविणाऱया `गॉडमदर'मधली राम्भी (शबाना आझमी). हीच सिनेमातली `गॉडमदर.' यातला `गॉड' हा `ऍज इन गॉडफादर' आहे.

  माफिया डॉन पुरुषांच्या कहाण्या आपल्याला चिरपरिचित आहेत. विनय शुक्लांनी `गॉडमदर'मध्ये एका बाईला माफियाराणी बनवून अंमळ वेगळी डिश पेश केलीये. दुर्दैवानं, हा वेगळेपणा फारच वरवरचा आहे.

 गुन्हेगारीपटांचा आपल्याकडे एक ठरलेला रुपबंध आहे. मुळात वाईट प्रवृत्तीचा नसलेला माणूस अन्यायामुळं इच्छा नसताना गुन्हेगारी विश्वात फेकला जातो. तिथेच अडकतो. त्या विश्वात स्वत:चा उत्कर्ष घडवून `उच्चपदा'ला पोहोचतो. मूळ प्रवृत्ती चांगुलपणाची असल्यानं तो श्रीमंतांना लुटून गरीबांचं भलं करणं, कायद्याच्या कक्षेबाहेरच्या अन्यायांचा न्यायनिवाडा करणं, अशी धर्मादाय कार्य करतो. समाजाच्या एका वर्गाचा `रॉबिनहूड' छाप नेता बनतो. त्याला काही कारणवश (विशेषत: आपल्याच जिवलगांच्या, पुत्रपौत्रांच्या वर्तनामुळं) उपरती होते. पण, तोवर उशीर झालेला असतो. गुन्हेगारी विश्वाचा त्याग करण्याचा, निवृत्तीचा प्रयत्न एकंदर जगातूनच निवृत्ती मिळवून देतो.

  `गॉडमदर'मध्ये तत्त्वत: यापेक्षा वेगळं काय घडतं?

  काहीच नाही. जो काही वेगळेपणा आहे तो या मूळच्या साच्यावर केलेल्या प्रादेशिकतेच्या आणि कृतक स्त्राeवादाच्या रंगरोपणात. तेही रंग धड थापले न गेल्यानं सिनेमाभर पोपडे उडत राहतात आणि तो परिचित सांगाडा उघडा पडत राहतो.

  राम्भी ही गुजरातमधल्या `मेर' समाजातली एक विवाहित स्त्राe. तिचा नवरा वीरम (मिलिंद गुणाजी) एका सामान्य माणसावर होत असलेल्या अत्याचार सहन न होऊन एका खतरनाक गुंडाला अपघातानं ठार मारतो. या खुनामुळं त्याचा अकारण दबदबा निर्माण होतो. केसुभाई (गोविंद नामदेव) हा कावेबाज वकील या दबदब्याचा दहशतीसाठी वापर करून वीरमला बडा व्यावसायिक आणि माफिया डॉन बनवतो. या `कर्तबगारी'च्या आधारावर मेर समाजात दोघांचंही स्थान उंचावतं. केसुभाई राजकारणात शिरून मंत्रीही बनतो. आर्थिक गैरव्यवहारांची कक्षा रुंदावते.

  एकदा संतापाच्या भरात हातून निर्देष व्यक्तीची हत्या घडल्यावर वीरम पश्चात्तापदग्ध होतो, शस्त्रत्याग करतो. तो निकम्मा साधुपुरुष झाल्यावर `दुश्मन'डोकं वर काढतात. वीरमचा खून करतात.

  वीरमच्या मृत्यूनंतर त्याच्या एकनिष्ठ अंगरक्षकाच्या (निर्मल पांडे) साह्यानं राम्भी वीरमच्या मारेकऱयांनी यमसदनी धाडून सूड घेते. ही `कर्तबगारी' आणि स्त्रियांसाठी राखीव जागांमुळे मिळालेलं सरपंचपद यातून राम्भी स्वत:चा दबदबा, दहशत निर्माण करते. केसुभाईच्या साथीनं भरभर उत्कर्ष साधून घेते.

  तिचा `आदर्श' डोळ्यासमोर ठेवून मवालीगिरी करत वाढलेला तिचा मुलगा करसन एका सालस मुलीच्या - सेजलच्या(रायमा सेन) एकतर्फी प्रेमात पडतो. तिच्या मुस्लिम प्रेमिकाची हत्या करण्याचा प्रयत्न करतो. स्वत: एक स्त्राe असलेल्या राम्भीला दुसऱया स्त्राeचा स्वयंनिर्णयाचा अधिकार पायदळी तुडवल्याचं सहन होत नाही. मुलावर आपल्यामुळं चुकीचे संस्कार झाले आहेत, असं तिच्या लक्षात येतं. ही चूक दुरुस्त करण्यासाठी ती सेजलचं तिच्या प्रेमिकाशी लग्न लावण्याचं ठरवते आणि संपूर्ण मेर समाजाचा रोष ओढवून घेते... पुढे जे अपेक्षित तेच घडतं.

  या कथानकाची गुंफण करताना लेखक-दिग्दर्शक विनय शुक्ला यांनी चतुराईनं गुजरातची प्रादेशिक पार्श्वभूमी अस्सल भासेल, अशी वापरली आहे. पात्रांना मेर समाजातले कपडे, घरं, रंगभूषा आणि त्या वळणाची भाषा देऊन वातावरणनिर्मिती केली आहे. शिवाय सिगरेट ओढणारी, विधवा झाल्यानंतर आपल्या स्त्राeत्वाचा वापर करून उन्नती करून घेणारी, रणमर्दिनीसारखी शत्रूवर गरजणारी, हल्ला करणारी, तडफदार नायिका रेखाटून त्यांनी हा वेगळेपणाचा देखावा परिपूर्ण केला आहे.

  शिवाय अत्यंत `देखणी' हिंसादृश्यं, चटपटीत पण स्वाभाविक भासणारे संवाद, खटकेबाज संघर्षप्रसंग, त्यांचं `वास्तव' भासणारं चित्रण, व्यावसायिकपटांच्या गरजेतून पेरलेली पण अभिजनांच्या पसंतीस उतरतील, अशी लोकधुनांवर आधारलेली गाणी, यांच्या पेरणीतून त्यांनी (पूर्वार्धाचा काही भाग वगळता) सिनेमा सफाईदार, प्रेक्षणीय आणि श्रवणीय केला आहे. पण, हेच आणि असंच शुक्लांना करायचं साधायचं होतं, स्त्राeची मध्यवर्ती व्यक्तिरेखा फक्त क्लृप्ती म्हणून वापरायची होती, असं मान्य केलं, तरी निखळ व्यावसायिकपटाच्या पातळीवरही `गॉडमदर' असमाधानच पदरात टाकतो. व्यावसायिक माफियापटाची चौकट शुल्कांनी सहीसही स्वीकारल्यानं ही फसगत झाली आहे. खरंतर प्रादेशिकतेचा संदर्भ आणि केंद्रस्तानची स्त्राe व्यक्तिरेखा यांचा वापर करून शुक्ला ग्रामीण भारतातल्या माफिया विश्वाच्या अंतरंगाचा वेध घेऊ शकले असते. एका बेडर आणि हिंस्र स्त्राeची समर्थ व्यक्तिरेखा उभारू शकले असते. पण त्यांना धोपटमार्गच प्यारा दिसतो.

  आपला तो बाब्या, या उक्तीप्रमाणं व्यावसायिक माफियापटांना प्रमुख गुन्हेगारी व्यक्तिरेखेला `नायकपद' द्यावं लागतं. इथे शुक्लांनी `आपल्या बाबी'ला `नायिका' बनवली आहे. हेसुद्धा प्रेक्षकाला तात्पुरतं का होईना, पटवायची कारागिरी मात्र त्यांना साधलेली नाही.

 त्यांचा वीरम एक अत्याचार पाहून भावनेच्या भरात खून पाडतो. ही मानवी स्खलनशीलता झाली. पण पुढे केसुभाईच्या साथीनं तो गैरधंदे करतो, खूनबाजी करतो, ती विचारपूर्वकच. हा प्रवृत्तीचा भाग झाला. कारण, अन्यायात पिचणारा प्रत्येक माणूस काही याच बेकायदा मार्गांनी बंड करीत नाही. शुक्लांची तात्काळ उघडी पडणारी चतुराई अशी की, ते वीरमचं एकही `अन्याय्य' कृत्य दाखवतच नाहीत. जे एकच कृत्य दाखवतात, त्यामागे गरम डोकं आणि गैरसमजाची सबब उभी करतात. शिवाय त्याला पश्चातापही करताना दाखवतात.

  राम्भीही सुरुवातीला नवऱयाच्या हत्येनं वेडीपिशी होऊन सूडापोटी हत्या घडवून आणते. स्त्राeला कमी लेखली गेल्यानं चवताळून सरपंचपद मिळवते. अंगभूत कर्तबगारीवर, बुद्धीचातुर्याच्या बळावर राजकारणात यशस्वी होत जाते. पण तिच्या यशाची वीरममुळे झालेली पायाभरणी दहशतीच्या जोरावरची आहे. हीच दहशत ती कायम ठेवते, वाढवते. शुक्ला इथेही तिच्याकडून होणारा न्यायनिवाडा, बायकांना पाणी भरावं लागतं, म्हणून तिनं `सोडवलेला' हातपंपांचा प्रश्न, अशी उदात्त कृत्यं दाखवतात. तिच्याकडून घडणारे अपराध टाळून थेट तिचा उत्कर्ष झालेला दाखवतात.

  राम्भीचा `ड्रायव्हिंग फोर्स' काय? समाजजागृती महत्त्वाकांक्षा, पैशाची हाव की सत्ताकांक्षा, की हे सगळंच? या प्रश्नाला `गॉडमदर' थेट भिडत नाही. ज्यानं-त्यानं आपल्या समजुतीनं अर्थ काढावा. पण त्यासाठी आवश्यक तटस्थपणाही शुक्लांच्या मांडणीत नाही. ते वर उल्लेखलेली छपवाछपवी करतात आणि वीरमच्या हिंसादृश्यांमध्ये `स्लो मोशन', उदात्तीकरणकारक `लो अँगल्स' आणि वीरश्रीयुक्त पार्श्वसंगीतातून त्याला नायक बनवतात. राम्भीची तडफदार चाल, चेहऱयावरचे जग जिंकल्याचे भाव, पुन्हा `लो अँगल्स', `स्लो मोशन' वगैरे क्लृप्त्या वापरून तिला `नायिका' करू पाहतात.

 त्यांची सर्वात मोठी गफलत दिसते `क्लायमॅक्स'ला. पश्चात्तापदग्ध राम्भी संतप्त मेर जनसमुदारापुढे `कबुलीजबाब' वजा भाषण देते तेव्हा `तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला आणि मी तुम्हाला फसवलं', असं वक्तव्य करते. हे खास फिल्मी पद्धतीनं आम जनतेला `मुकी बिचारी कुणी हाका' असं गृहीत धरणं झालं एखादा नेता व गावगुंड जेव्हा एखाद्या समाजावर `राज्य' करतो, तेव्हा तो समाजही जाणीवपूर्वक त्या नेत्याला `वापरून'च घेत असतो. राम्भीची दहशत ही `आपली' दहशत समजण्याची चूक मेर समाज काही दुधखुळेपणातून करत नाही. घटनादत्त सत्ता बळकट करण्याऐवजी घटनाबाह्य सत्ताकेंद्र निर्माण करणारा समाज न्याय- अन्यायाच्या, सत्ता- अधिकार याविषयीच्या भ्रामक कल्पनांमधून हे भस्मासुर जन्माला घालतो. राम्भीकडे न्याययाचना करण्यासाठी येणारा प्रत्येक माणूस गरीब, पापभिरू, सालस माणूस कसा असेल? तो स्वत:पुरता न्याय चाहून कुणाची मुंडी मुरगळ्यासाठी राम्भीचे `कानून से लम्बे' हात वापरत असेल, तर तो `गरीब- बिच्चारा' कसा ठरेल? हा समाजही बेरकी आणि `पहुँचेला'च असणार.

  या बेतशुद्ध भाबडेपणामुळंच राम्भीची सेजल प्रकरणातली स्त्राeवरच्या अन्यायाची जाणीव निष्प्रभ वाटते. तिची मुलासमोरची मानवी हतबलता `सौ चुहे खाके' हजला निघालेल्या बिल्लीसारखी खोटी वाटते.

  बाप्ये बघून कंटाळलात, तर आता बाप्या करतो, ते सगळं करू धजणारी दमदार बाई बघा; असला `बिनधास्त'पणा वगळता `गॉडमदर' प्रेक्षकाच्या अनुभवभांडारात कसलीही भर घालत नाही.  
 शबाना आझमीची राष्ट्रीय पारितोषिकविजेती शीर्षकभूमिका हे `गॉडमदर'चं मुख्य आकर्षण. तिच्या वकुबाची कोणतीही अभिनेत्री ती सहज साकारू शकली असती. खरंतर राम्भीचं बाईपण आणि त्यापलीकडचं निखळ `माणूस'पण शबाना उत्तम साकारू शकली असती पण शुक्लांनी तिची अभिनयक्षमता पुरेपूर वापरून घेतलेली नाही. `राजा की कहानी पुरानी हो गयी' या `सत्या'तल्या `गोली मार भेजे में'ची `ऑल विमेन' आवृत्ती भासणाऱया, पण कमालीच्या झिंगबाज गाण्यात शबानानं दाखवलेला सत्तेचा मद पाहा. अशा खास जागा तिला सिनेमात फारशा मिळालेल्याच नाहीत. तिच्या सिग्रेट ओढण्याची कारणमीमांसा, हा त्यातल्या त्यात `मानवी' भाग. बाकी सगळी `हिरॉईन'गिरी.

  मिलिंद गुणाजी, गोविंद नामदेव, निर्मल पांडे, रायमा सेन, करसन झालेला नवा छोकरा आणि वीरमचा भाऊ रेखाटणारा नवोदित अभिनेता यांच्यासह सर्वच सहकलावंतांचा समाधानकारक अभिनय, ही `गॉडमदर'ची जमेची बाजू. छायालेखक राजन कोठारी आणि पडद्यामगच्या अन्य तंत्रज्ञ कलावंतांनी `गॉडमदर'ला वास्तवाभासी दृश्यपरिणाम दिला आहे. विशाल भारद्वाजनं सालाबादप्रमाणं `माचिस'च्या `पानी पानी रे'ची पुनरावृत्ती `माटी रे माटी रे'मधून केली आहे. मात्र, `राजा की कहानी', `सुनो रे सुनो रे' या अन्य गाण्यांमध्ये गुर्जर लोकसंगीताचा बाज त्यानं सुरेख वापरला आहे. संजीव अभ्यंकरचा दमदार आवाज `सुनो रे सुनो रे'ला वेगळ्या उंचीवर नेतो.

  लेखक म्हणून चतुराई पूर्वीच सिद्ध केलेल्या शुक्लांनी दिग्दर्शकीय पदार्पणातही चतुराई सिद्ध केली आहे, पण फक्त चतुराईच सिद्ध केली आहे.
........................................................................................
संघर्ष
याच आठवडय़ात प्रेक्षकांसमोर आलेली दुसरी मध्यवर्ती स्त्राeव्यक्तिरेखा म्हणजे तनुजा चंद्रा दिग्दर्शित `संघर्ष'मधली रीत ओबेरॉय (प्रिटी झिंटा). या व्यक्तिरेखेची एकच समस्या आहे, पण ती दुर्धर, असाध्यच. ही व्यक्तिरेखा तनुजा चंद्रा दिग्दर्शित असण्याबरोबरच, किंबहुना त्याहूनही अधिक महेश भट लिखित आहे, हीच ती अडचण. महेश भटच्या स्वत:च्या उत्तरकालीन सिनेमांमध्ये वेडगळ व्यक्तिरेखांचा भरणा हळूहळू वाढत गेला आणि त्याच्याच प्रकृतीबद्दल प्रेक्षकांना काळजी वाटू लागली. `संघर्ष'मध्ये अशा मनोरुग्णांचा ताफा आणून त्यानं संपूर्ण सिनेमाचं वेडय़ाचं इस्पितळ करून टाकलंय,तेही `फिल्मी' वेडय़ांचं.

  मुळात या सिनेमाची `प्रेरणा' ऑस्कर विजेत्या `सायलेन्स ऑफ द लॅम्ब'ची तुरुंगात बंदीवान असलेल्या मनोविकृत खुन्याची मदत घेऊन मोकाट फिरणाऱया दुसऱया मनोविकृत खुन्याचा माग काढण्याची जबरदस्त कथाकल्पना लाभलेल्या मूळ सिनेमातला बुद्धीगामी थरार `संघर्ष'मध्ये औषधालाही सापडत नाही. कारण, हाती पडलेल्या सोन्याचं तात्काळ कथील करण्याची अद्भुत किमया लाभलेल्या एतद्देशीय आधुनिक `मिडास' आणि त्याची शिष्योत्तमा यांच्या तावडीत ही कल्पना सापडली आहे.

  `संघर्ष'मध्ये मोकाट फिरणारा मनोविकृत खुनी आहे लज्जाशंकर (आशुतोष राणा) हा अमरत्वासाठी बालकांचे `बळी' देवीला देणारा अघोरी `दरिंदा.' त्याचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नाही, कारण तो एकटाच फिरतो. गुन्हेगारी जगतात प्रचंड मोठं `नेटवर्क' असलेला, `प्रोफेसर' या अभिधानानं ओळखला जाणारा अमन वर्मा (अक्षयकुमार) हा खरतनाक पण महाबुद्धीमान गुन्हेगारच तुरुंगात बसल्याबसल्या लज्जाशंकर काय करत असेल, हे सहजगत्या सांगू शकतो. पोलिसांनी फसवणूकीनं पकडल्यामुळं तो त्यांना सहकार्य करत नाही. ते सीबीआयची मदत मागतात. सीबीआयचा उच्चाधिकारी (विश्वजीत प्रधान) ही जबाबदारी संशोधन विभागातल्या नव्या रिक्रूट रीत ओबेरॉयवर टाकतो.

  रीत अंधाराला घाबरते. कारण, पंजाबमधल्या दहशतवादी कारवायांच्या काळात तिच्या दहशतवादी भावाला पोलिसांनी घरातच `एन्काऊंटर' करून ठार मारलेलं तिनं लहानपणी पाहिलेलं असतं, पाठोपाठ वडिलांची आत्महत्याही. तिच्या मनावर `त्या' दहशतीचा पगडा आहे आणि घराण्यावरचा कलंक पुसण्याची जिद्द.

  ही रीत तुरुंगात अमनला भेटते. त्याचा विक्षिप्तपणा, असहकार्याचं धोरण खपवून घेऊन चिकाटीनं त्याचा पिच्छा पुरवते. तिच्या प्रेमात पडू लागलेला अमन हळूहळू माणूस बनू लागतो. पण, तिचा दुस्वास करणारा पोलिस अधिकारी (मदन जैन) किरकोळ कारणावरून तिला केसमधून हटवतो. दरम्यान, लज्जाशंकर एका मंत्र्याच्या मुलाचं अपहरण करतो. या मुलाला वाचवणं, हे रीतचं व्यक्तिगत मिशन बनतं. ती त्यासाठी कायदा धाब्यावर बसवायला तयार होते.  
अमनही तुरुंग फोडून तिच्या सोबतीला बाहेर पडतो. दोघे मिळून लज्जाशंकरचा माग काढतात. या शतकातल्या सर्वात रक्तरंजित आणि उबळकारी `क्लायमॅक्स'च्या अखेरीस लज्जाशंकरचा सफाया होतो. अमनवर रीतचं मन जडलेलं असलं, तरी तिला पूर्वायुष्यातच एक `बॉयफ्रेंड' असतो, हे सांगितल्यावर अमनचं काय होतं, याची कल्पना आपोआप येईल.

  मनोविकृत व्यक्तिरेखा म्हटल्यावर महेश भटनं जोसात येऊन तऱहेवाईकपणाचा कळस करणाऱया पात्रांची जत्रा `संघर्ष'मध्ये भरवली आहे. लज्जाशंकर हा त्यांचा शिरोमणी भासला, तरी खरा शिरोमणी आहे अमन वर्मा. ही महत्त्वाची व्यक्तिरेखा महेश भटनं कमालीची धूसर ठेवली आहे. त्याला सगळे एवढे टरकतात का, हे शेवटपर्यंत कळत नाही. त्याचं कथित नेटवर्क पडद्यावर दिसत नाही. दिसतात ते दोन-चार किरकोळ गल्लीगुंड. रीतला साथ द्यायला तो बाहेर पडतो, तेव्हा तर शेवटपर्यंत दोघे एकटेच जातात, राहतात. त्यांच्या साह्यार्थ कोणी साथीदार दिसत नाहीत. मग, अमनची दहशत कशामुळं आहे?

  बरं हा तुरुंगात जो विक्षिप्तपणा करतो, तो सराईत गुन्हेगाराचा हातखंडा खेळही वाटत नाही. एखाद्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या तरुणाला नोकरी वा छोकरी न मिळाल्यानं केलेलं किरकोळ अकांडतांडव वाटतं. तुरुंगात त्यानं `सानु' नासिक स्वरात दर्दभरी गाणी म्हणणं, पुस्तकांचे गठ्ठे बाळगणं, रीतची जनरल नॉलेजची परीक्षा घेणं, तर विक्षिप्तपणापेक्षा बालिशच वाटतं.

  शिवाय तो वारंवार समाजातल्या अन्यायाबद्दल लेक्चर झोडतो. पलायन केल्यावर एका केमिस्टच्या दुकानात बेफाम मोडतोड करून `जीवनावश्यक औषधं महाग विकरणाऱया' केमिस्टांवर तोंडसुख आणि हातपायसुखही घेतो. सुविद्य तरुणांना गुन्हेगार बनवणारी समाजव्यवस्था, पोलिस आणि राजकारण्यांवर आगपाखड करतो. अरे, पण बाबा, तुझ्यावर असा कोणता अन्याय झाला, याची फिल्मी तरी कारणमीमांसा करशील की नाही?

   नाही करत. कारण, महेश - तनुजा द्वयीला अमन वर्माला `हीरो' करायचंय? तो खरतनाक गुन्हेगार आहे, असं पोलिस म्हणतात. महेश - तनुजा मात्र त्याला अदृश्य अन्यायाचा `बळी' दाखवतात. गुन्हेगारांना `ग्लॅमराईज' करताना महेश - तनुजाही प्रत्येक अन्यायग्रस्त माणूस गुन्हेगार का बनत नाही, याचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा वेध न घेण्याचा बेजबाबदारपणा करतात. `सिस्टीम'वर, नेत्यांवर, पोलिसांवर, केमिस्टांवर दुगाण्या झाडून मोकळे होतात.

   लज्जाशंकर हा त्यांनी घृणास्पद ठरवलेला अस्सल मनोविकृत गुन्हेगार. पण, त्याचं बाईचं सोंग घेऊन मुलगा पळवायला येणं, ओठांवर एक बोट वाजवून काढलेला कर्णभेदी, भयत्कारी चित्कार, त्याच्या विकृत वर्तनाभोवती प्रकाशयोजना, दृश्यकोन आणि `स्लो मोशन' वगैरे चमत्कृर्तीमधून निर्माण केलेला भेसूर माहौल, यातून लज्जाशंकर `आकर्षक' बनतो; कच्च्या मनांमध्ये विकृतीची आवड निर्माण करण्याइतपत आकर्षक.

  `संघर्ष'मध्ये रीत ओबेरॉय स्वत:शी, स्वत:च्या भूतकाळाशी, भयगंडाशी, `सिस्टीम'शो आणि लज्जाशंकरशी एकाच वेळी झगडा करते आहे. पण, तिच्या व्यक्तिरेखेत बळ दिसत नाही, दिसते ती फक्त कळकळ आणि हळहळ. एकतर, तिच्या अंधाराला घाबरण्याचं स्तोमच माजवलंय. महेश - तनुजा यांनी. बऱयापैकी प्रकाश दिसणाऱया तुरुंगालाही ती बॅटरीचा झोत टाकत फिरते. तिला खोटंखोटं घाबरवायला तुरुंगातले सगळेच कैदी अकारण वेडय़ासारखे पिसाट वागतात. घाबरायची हौस भागवण्याकरता पोलिस तिला एकटीलाच अमनकडे पाठवतात.

  पुढे ती सगळा `संघर्ष' अमनच्या कुबडय़ा घेऊन करते. डोक्याचं काम अमन करतो आणि ही करते निरर्थक धावाधाव. मुळात अमन जे काही डोकं लढवून सांगताना दिसतो, ते पोलिस खात्यातला शाधा रायटरसुद्धा अर्ध्या मिन्टात तर्क लढवून सांगू शकतो. लज्जाशंकरनं आधीचे सगळे खून ग्रहणाच्या दिवशी केले आहेत, हे पोलिसांच्या, सीबीआयच्या, रीतच्या लक्षात येत नाही एकटय़ा अमनलाच उमगतं, ही प्रेक्षकाला मूर्ख समजण्याची परिसीमाच झाली. त्याच्या `दिन मे तारे दिखेंगे'ची उकल रीतला होत नाही, तेव्हा सीबीआयमध्येही वशिल्याचे तट्टू भरतात की काय, अशीच शंका येते. आणि इतकी भुसभुशीत हुशारी दाखवणाऱया `प्रोफेसर'ला वास्तवात कुणी अंगणवाडीवर तरी नेमेल का?

   `संघर्ष'मध्ये सगळ्यात उबगवाणा आहे क्लायमॅक्स. कुंभमेळ्यासारखी गर्दी लोटलेल्या तीर्थस्थळी खास लज्जाशंकरला लपता यावं, म्हणून कलादिग्दर्शक गप्पा चक्रवर्तींनी उभारलेल्या ऐसपैस गुहेत प्रदीर्घ काळ हे रक्तरंजन घडतं. हिंसेची तीव्रता दाखवण्यासाठी ती तपशीलवारच दाखवावी लागते, अशी दिग्दर्शिकेची समजूत असावी. तिला शारीर हिंसेचं विलक्षण आकर्षण आणि लालजर्द गरम रक्ताची चटक असावी, अशी खात्री पटण्याइतक्या प्रच्छन्नपणे, चवीचवीनं हा क्लायमॅक्स चित्रित झालाय.

  मुळात काही ताकदच नसलेल्या पेंढा भरलेल्या व्यक्तिरेखा प्रमुख कलावंतांनी मनापासून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय, हीच त्यातल्या त्यात बरी बाजू. पैकी प्रिटी झिंटाच्या अविष्कारात नैसर्गिक गोडवा, निरागसता जाणवते. अक्षयकुमारनं मिशी लावून, शारीर हालचालींमध्ये बदल करून मोठं धाडस केलं आहे. पण त्याचा वकुब मर्यादित आहे आणि व्यक्तिरेखा तोकडी. आशुतोष राणा `दुश्मन' पाठोपाठ बीभत्सतेची पुढची पायरी गाठतो. पण अभिनेता म्हणून काही वेगळ्या छटा दाखवण्याची संधी त्यालाही नाही. बाकी मंडळींमध्ये लेखकानं सर्वाधिक एकांगी लिहिलेल्या व्यक्तिरेखेचीही चीड आणवण्यात मदन जैन यशस्वी झाला आहे.

  जतीन - ललित यांनी `संघर्ष'साठी केलेली गाणी सिनेमाबाहेर श्रवणीय वाटू शकतात. पण ही चिकचिकित, गोडमिट्ट, चॉकलेटी गाणी `संघर्ष'मध्ये साजत नाहीत. त्यांच्या सिनेमातल्या सिच्युएशन्सही बऱयाच ऑकवर्ड आहेत. `पहली पहली बार बल्लिए' ही सर्वात उजवी संगीतरचना. `मुझे रात दिन' हे तर `मुझे देखकर आपका मुस्कुराना' या `एक मुसाफिर एक हसीना'मधल्या गाण्यावरून सहीसही नकलून काढलंय.'

  `संघर्ष' पाहण्यात फायदा एकच. तो आवडला, तर लगेच बिनदिक्कतपणे नजीकच्या मनोविकारतज्ञाची अपॉइंटमेंट घेऊन टाकावी. त्याची गरज पुढेमागे भासणार, हे निश्चित.

 

No comments:

Post a Comment