Tuesday, January 10, 2012

प्रेमाचा खेळ, सिनेमाचा खेळखंडोबा (प्यार कोई खेल नहीं)


अंतरिक्षाचं दृश्य... पृथ्वीचा फिरता गोल... पार्श्वनिवेदन...
 ``खुशनशीब होते हैं वो लोग जो प्यार करते है...
 खुशनसीब होते हैं वो लोग जिन्हे प्यार मिलता है...
    मगर दुनियामे कुछ लोग ऐसे भी होते हैं, जो प्यार तो करते हैं, मगर उनका प्यार रिश्तोंमे बदल नही सकता...''
   कट....
 सनी देओल कॅमेऱयाकडे पाहून किंचाळून विचारतोय... ``तो क्या उनका प्यार प्यार नहीं होता.''
  सुभाष सहगल निर्मित- लिखित- दिग्दर्शित- संकलित `प्यार कोई खेल नहीं'च्या श्रेयनामवलीच्याही आधी हा प्रसंग घडतो. या सिनेमात आपल्याला काय पाहायला मिळणार (किंवा `लागणार') आहे, याची प्रेक्षकाला पूर्वकल्पना देण्याचा हा उपक्रम स्तुत्यच म्हणायला हवा.
  इथे एक नायिका, दोन नायक असा त्रिकोण आहे. पण, लेखक सुभाष सहगल यांनी अशा काही सिच्युएशन्स जुळवून आणल्या आहेत की, नायिका एकाच वेळी दोन्ही नायकांची पत्नीही बनते आणि भाभीसुद्धा.
  म्हणजे दोन्ही नायक एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत, हे उघड आहे. हे आहेत आनंद (सनी देओल) आणि सुनील (अपूर्व अग्निहोत्री) हे एका उद्योजक घराण्याचे वारसदार. सुनीलचं निशावर (महिमा चौधरी) मन जडतं. निशाही सुनीलच्या प्रेमात पडते. पण, कुटुंबासाठी खस्ता खाण्यात तारुण्याची होळी केलेल्या आपल्या मोठय़ा भावासाठी ही मुलगी सांगून आली आहे. हे कळल्यावर सुनील निशापासून दूर राहू लागतो. आतापर्यंत कोणत्याही मुलीबद्दल `तसं काही' न वाटलेला आनंदही पहिल्याच दृष्टभेटीत निशाला दिल देऊन बसलाय, हे उमगल्यावर तर सुनीलचा निर्धार पक्का होतो.
  निशा मात्र प्रेम एकावर आणि लग्न दुसऱयाशी (तेही त्याच घरात), अशी त्यागमय गोची करून घेऊ इच्छित नाही. ती आनंदला सरळ नकार देते. योगायोगानं आनंदला सुनील-निशाच्या प्रेमप्रकरणाची हकीकत समजते. तो पुढाकार घेऊन त्यांचं लग्न लावून देतो.
   निशा गरोदर असताना (खलनायकांनी घडवून आणलेल्या) एका अपघातात सुनीलचा मृत्यू होतो. घरातल्यांच्या आग्रहाखातर आनंद निशाशी लग्न करतो. मुलाचा (सिनेमात नायिकेला पहिली मुलगी झाल्याचं पाहिलंय कधी?) जन्म झाल्यावर अचानक सुनील पुन्हा सर्वांच्या आयुष्यात येतो.
  आता निशाची गोची. ``निशा तुम अपने कमरेमे (पक्षी : बेडरूम) जाओ'', असं सासूनं सांगितल्यावर ती विचारते, ``कौनसा कमरा मेरा है माँजी?'' एवढय़ा भीषण तिढय़ातून सुटका व्हायची, तर अर्थातच कुणीतरी `परमोच्च' त्याग करायला हवा. तो सिनेमात कोण करत असेल, याचा अंदाज बांधणंही काही कठीण नाही. हा त्याग घडतो आणि (हुश्श।़।़) सिनेमा संपतो.
   एका गोष्टीसाठी सुभाष सहगल यांचं कौतुक करायला हवं. नेहमीचे प्रेमत्रिकोण नायिका कुणातरी एकाच्या पदरात पडून संपतात. `प्यार कोई...'मध्ये हा प्रसंग मध्यंतराला घडतो. त्यापुढे त्रिकोणाची तीनही पात्रं एका छताखाली नांदवून त्यांच्यातल्या मानसिक उलघाली टिपण्याचा प्रयत्न (केवळ प्रयत्नाच्या पातळीवर) स्तुत्य आहे. सुनीलच्या मृत्यूनंतर आनंद पुतण्याच्या सुखासाठी निशाशी लग्न करतो, तिथेही सिनेमा संपू शकत होता. पण, सिनेमातलं नाटय़ गडदं करण्यासाठी सुनीलचा `पुनर्जन्म' घडतो, तिथे सिनेमाचा `पीळ' असह्य होतो.
  अशक्यप्राय वाटणारी ही सिच्युएशन वास्तवातही काही अगदीच अशक्य नाही. आणि रुपेरी पडद्यावर `प्रियकर परतुनी आला'च्या कथा कृष्णधवल सिनेमांपासून पाहत आलो आहोत आपण. मग, `प्यार कोई...'चा दोष काय? पहिला दोष आहे सरधोपटपणा. इथे आनंद निशाच्या, निशा आणि सुनील एकमेकांच्या प्रेमात पडतात ते पहिल्या दृष्टभेटीत; केळ्याच्या सालीवरून पाय घसरून पडल्यासारखी. माणसं पहिल्या नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडत असतीलही; पण तसं घडताना माणसाच्या बुद्धीच्या, आकलनाच्या पलीकडलं काहीतरी आतून उमलून येत असेल. `स्लो मोशन' आणि `घायाळ नजरां'च्या ठोकताळ्यांपलीकडे ते व्यक्त करण्याची, प्रेक्षकांसाठी विश्वासार्ह करण्याची काही कल्पकता दाखवाल की नाही? शिवाय, सुनील-निशाच्या प्रेमप्रकरणाचा सगळा भाग अगदी ठरीव फिल्मी पद्धतीनं घडतो. त्यातला हलकाफुलका भाग तर उबगवाणाच. आनंदच्या आगमनानंतर या बेचव कहाणीत काहीसा रस निर्माण होतो खरा; पण पुढे खलनायकांचं भारूड आणि सुनीलच्या `निर्गमन-आगमना'चा अतर्क्य प्रकार डोकं उठवतो.
  या कथाभागात लेखक म्हणून सहगल यांचा अप्रामाणिकपणा, भीरुता आणि मर्यादा स्पष्टपणे जाणवतात. सहगल प्रेमाच्या उलघालींचा वेध घेण्याचा आव आणतात. पण, प्रत्यक्षात मात्र या जबाबदारीपासून पळ काढतात. त्यांचं कथानक या तीन माणसांच्या आयुष्यावर केंद्रित होण्याऐवजी (नियतीचं सोयीस्कर रुप भासणाऱया) खलनायकांच्या मूर्ख कारवायांवर केंद्रित होतं. या तिघांमधल्या उलघालींना बाहेरचं कुणीतरी (म्हणजे नियती) जबाबदार असतं, हा पळपुटेपणा झाला.
  सुनीलशी लग्न होईपर्यंत ठाम असणारी, विचारी आणि धाडसी निशा आनंदशी मात्र पुनर्विवाहाला का तयार होते, हे स्पष्ट होत नाही. कदाचित, `त्या बिच्चाऱया बाळाला बाप मिळवून देण्यासाठी' हे प्रेक्षकांनी समजून घ्यावं, अशी त्यांची अपेक्षा असेल. पण, हाच बाप का? निशा आणि आनंद यांच्यात सहगल उपकारवजा उदात्त प्रेमापलीकडे कोणताच बंध निर्माण करत नाहीत. कारण तसं झालं तर या प्रेमाचा `पावित्र्यभंग'व्हायचा आणि रुढीवादी प्रेक्षकबिथरायचे. म्हणूनच, आनंद- निशाच्या लग्नाचा कालखंड निवडण्यात सहगल भेकड चतुराई दाखवतात. यातला मोठा काळ निशा गरोदर आहे आणि नंतर ओली बाळंतीण. म्हणजे आनंद-निशा यांच्यात शारीर-मानसिक जवळीक घडण्याचा `अति'प्रसंग आपोआप टळतो. नायिकेच्या मनाच्या चिंध्या झाल्या तरी चालतील, शरीर मात्र पवित्र राहायला हवं.
  प्रेम नावाच्या अजब, गहन भानगडीच्या अस्पर्श पैलूंचा वेध घेऊ पाहणारा हा सिनेमा शीर्षकातच प्रेक्षकाला `प्यार कोई खेल नही' असं कान धरल्यासारखा दटावतो. पण, सहगल यांनी पडद्यावर मांडलेला प्रेमाचा खेळ सिनेमाचा (आणि पर्यायानं प्रेक्षकाच्या भेजाचा) खेळखंडोबा करून टाकतो.
  अभिनयाच्या आघाडीवर तिघेही प्रमुख कलाकार प्रामाणिक प्रयत्न करतात, पण त्यात अपूर्व खूपच कमी पडतो. त्याच्या बोलण्याची अक्कडबाज ढब `परदेस'मधल्या भूमिकेला चपखल साजणारी होती. इथे मात्र त्याचं बोलणं पोटातून नव्हे तर ओठातून आपल्यासारखं वाटतं. नुकत्याच मिसरूड पुटलेल्या पोरानं खर्जातला खोटा आवाज काढायचा प्रयत्न करावा, तसा त्याच्या एकूण अभिनयाचा पोत वाटतो. महिमा चौधरी काही ग्लॅमरस वेषांमध्ये (विशेषत:, `याद पिया की'...च्या अंतिम कडव्यात) भयाण दिसते. मात्र, अभिनयाच्या आघाडीवर ती उत्तम कामगिरी पार पाडते
सिनेमात सर्वाधिक वाव आणि भाव अर्थातच सनीला आहे. सर्व मर्यादांच्या चौकटीत राहूनही भूमिका प्रभावी करण्याचा सराव त्याला झालेला आहेच. तो भावुक पण संयत, अबोल प्रेमिक गांभीर्यानं साकारतो. पण प्रेक्षकांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळवतं ते त्याचं खलनायकांच्या विरोधात दातओठ खात, नजरेतून अंगार उधळत उसळणारं रुपचं. रिमाला आईच्या पठडीबाज भूमिकेतही उत्तरार्धात काहीसे आव्हानात्मक प्रसंग लाभले आहेत, ते तिनं सफाईनं पेलले आहेत. बाकी मंडळींमध्ये सनी-अपूर्वच्या बहिणीचं काम करणारी चुणचुणीत मुलगी लक्ष वेधून घेते.
  संगीताच्या आघाडीवर शीर्षकगीत आणि फाल्गुनी पाठकच्या `याद पिया की आने लगी'चा अपवाद वगळता बाकी खडखडाटच आहे. `याद पिया की'चा मूळ गोडवा जतीन-ललीतकृत रिमिक्समध्ये पार मारला गेलाय, उरलेला खून पडद्यावर हाडमोडी नृत्यदिग्दर्शनानं पार पाडलाय.

No comments:

Post a Comment