Friday, January 13, 2012

जरतारी किनारीची गोधडी (जख्म)


मुंबईत भीषण दंगल सुरू आहे.
  एकाच्या वृद्ध आईला माथेफिरू जमावानं पेट्रोल ओतून पेटवून दिलंय.
 आई अत्यवस्थ स्थितीत हॉस्पिटलात मृत्यूशी झगडा देत आहे. अचानक आईच्या मारेकऱयांपैकी एकजण हाती लागला आहे.
  त्या आईचा मुलगा काय करील?
  आपल्या प्राणप्रिय आईच्या मारेकऱयाला ठार मारून सूड घेईल की, त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करील?
 दंगलीची प्रत्यक्ष झळ पोहोचलेल्या सामान्य मुंबईकराचं किंवा देशातल्या कोणत्याही दंगलग्रस्त भागातल्या नागरिकाचं या प्रश्नाचं उत्तर कदाचित हिंसक अशू शकेल. पण `जशास तसे'चा न्याय व्यक्तिगत सूडापलीकडे काही साधतो का?
 हा अस्वस्थ करणारा प्रश्न पडतो महेश भटचा `जख्म' पाहिल्यावर. कारण `जख्म'चा नायक आपल्या आईच्या मारेकऱयाला हिंस्र जमावापासून, स्वत:च्याच पिसाळलेल्या भावापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. धर्माच्या आधारावरची माणसांची विभागणी त्याला मान्य नाही. त्याच्या या मनोधारणेला कुठल्याही `सेक्युलर' विचारधारेपेक्षा मोठा असा स्वत:च्याच आयुष्याचा मोठा आधार आहे.
  या एका दिवसात घडणाऱया सिनेमाचा नायक आहे अजय देसाई (अजय देवगण). नावंत गायक- संगीतकार. सिनेमा सुरू होतो तेव्हा तो तणावात आहे. एकीकडे मुंबईत दंगलींचा वणवा पेटलाय. त्याची गरोदर पत्नी (सोनाली बेंद्रे) आपल्या मुलाला अशा वातावरणात जन्म देऊ इच्छित नाही. ती अजयच्या इच्छेविरुद्ध बाळंतपणासाठी लंडनला निघाली आहे.
 अजयच्या वृद्ध आईला काही मुस्लिम तरुण पेट्रोल ओतून जिवंत जाळतात. त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये हलवल्यावर ही घटना अजयला कळते. तो हॉस्पिटलकडे धाव घेतो. आई अखेरच्या घटका मोजते आहे. त्याचा भाऊ आनंद (अक्षय आनंद) हा एका जहाल हिंदू संघटनेचा सदस्य आहे. हिंदू- मुस्लिम तेढ वाढवणाऱया सुबोध मुळगावकर (आशुतोष राणा) या नेत्याचा डावा हात. तो प्रक्षुब्ध स्थितीत आपल्या सहकाऱयांसह हॉस्पिटलमध्ये येतो. तशात त्याच्या आईला पेटवून देणाऱया जमावापैकी एकजण त्यांच्या हाती लागतो. आनंद त्याला जिवे मारण्यासाठी धावतो; पण अजय मध्ये पडतो. त्या पोराला वाचवतो. आनंदला आपल्या भावाच्या वर्तनाचा अर्थच कळत नाही.
  अजय असं वागतो, याचं कारण आहे त्याच्या भूतकाळात. फ्लॅशबॅकमध्ये. लहानगा शाळकरी अजय (कुणाल खेमू) आणि त्याची लोकविलक्षण आई (पूजा भट) यांचं गहिरं नातं उलगडू लागतं. अजयची आई त्याच्या डॅडींची- रमण देसाइभची (नागार्जुन) प्रेमिका आहे. अजय हा प्रेमसंबंधातून जन्मलेला मुलगा आहे; पण लौकिकार्थानं अनौरस. कारण, रमणनं त्याच्या आईशी कायदेशीर लग्न केलेलं नाही. तो त्यांना भेटायलाही फारसा येत नाही; पण तिचं मात्र त्याच्यावर एकनिष्ठ आणि प्रगाढ प्रेम आहे.
 `रमणचं दुसरं लग्न झालंय, त्याच्यावर आपला अधिकार उरलेला नाही, तेव्हा मन मारून जगायला शीक' असं ती अजयला समजावते तेव्हा तो चक्रावतो. एवढा अन्याय होऊनही आपल्या डॅडींची `भक्ती' कशी करते, हे त्याला उमगत नाही. हा उलगडा होतो धाकटय़ा भावाचा आनंदचा जन्म होतो तेव्हा.
  आनंदला पाहण्यासाठी निघालेला रमण मोटार अपघातात मारला जातो. त्याच्या चौथ्यासाठी अजयची आई त्याला आणि आनंदला घेऊन जाते तेव्हा रमणची आई त्यांची निर्भर्त्सना करते. त्यातच अजयला समजतं की, त्याची आई एक मुसलमान स्री आहे. म्हणूनच हिंदू ब्राह्मण असलेला रमण तिच्याशी लग्न करू शकत नव्हता.
 रमणशी लग्न होईल, या आशेनं धर्म दडवून ठेवलेली आई अजयला सांगते, `धाकटय़ा आनंदला हे कधीच कळू देऊ नकोस. मात्र, मी मेल्यावर माझं दफन कर.' `जन्नत'मध्ये रमण भेटेलच, याची खात्री असते तिला.
  हे सर्व अजयला हॉस्पिटलमध्ये आठवतं. त्याच्या आईचं निधन झाल्यावर सुबोधला वातावरण पेटवण्यासाठी आयतं कोलित मिळतं. आईच्या निधनाची माहिती कळल्यावर सूडानं पिसाटलेल्या आनंदला शांत करताना अजय पिसाटलेल्या आनंदला शांत करताना अजय सांगतो, `तुला या देशातले सगळे मुसलमान मारायचेत? त्यांचा नि:पात करायचाय? मग स्वत:चा अर्धा भागही मारून टाक, मलाही निम्मा मारून टाक कारण, आपण दोघेही निम्मे मुसलमान आहोत. ज्या आईच्या मृत्युमुळं तू पिसाटलायस ती तर पूर्ण मुसलमान होती.'
  अजय सुबोधसारख्या माथेफिरुंशी लढा देऊन, आनंदलाही आपल्या बाजूला वळवून तिची दफनविधीची इच्छा कशी पूर्ण करतो, याची कहाणी `जख्म'मध्ये मांडली आहे.
  `जख्म' हा महेश भटच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीतला शेवटचा सिनेमा. (असं त्यानंच जाहीर केलंय.) आत्मनिवेदनात्मक सिनेमांसाठी मशहूर असलेल्या या दिग्दर्शकानं कारकिर्दीच्या शेवटासाठीही आत्मनिवेदनात्मक कथा निवडली आहे. स्वत: महेश भट हा एका दिग्दर्शकाचा `अनौरस' मुलगा आणि त्याची आईही मुस्लिम होती. आत्मप्रचितीचा एवढा भक्कम आधार हे `जख्म'चं बलस्थान आहे आणि तीच त्याची मर्यादाही आहे.
 कारण, आई-मुलाचं जगावेगळं स्वत: जगलेलं नातं अतिशय हृद्यं आणि प्रभावी करणारा महेश भट आत्मनिवेदनाला दिलेली `कल्पित वास्तवा'ची जोड रंगवताना मात्र दुबळा होऊन जातो. त्यातली कारागिरी दिसत राहते आणि दिग्दर्शकाच्या मर्यादा उघडय़ा पडतात.
  `जख्म'चं कथासूत्र विलक्षण ताकदीचं आहे, पण त्याचा जीव एखाद्या लघुकथेचा आहे. महेशनं आई-मुलाचं नातं आणि तिच्या दफनातून उद्भवलेला संघर्ष यावरच लक्ष. केंद्रित केलं असतं, तर `जख्म' जबरदस्त प्रत्ययकारी होऊ शकला असता. पण, पूर्ण लांबीचा कथापट (फीचर फिल्म) करण्यासाठी महेशनं केलेली भरताड भरती सिनेमाचा परिणाम पातळ करते.
  मूळ कथेतून प्रेक्षक हवा तो बोध घेऊ शकतील, असा विश्वास महेशला नसावा बहुतेक! तो प्रेक्षकांना अल्पमती गृहीत धरून उपदेशकाच्या भूमिकेत शिरतो आणि तिथेच फसतो.
  इथे अजयच्या शेजारी ईसाभाई (अवतार गिल) दंगलींमुळे देश सोडून निघालाय. त्याला रोखण्याकरता दुसरा एक शेजारी गुरुदयालसिंग (सौरभ शुक्ला) जी काही भाषणबाजी करतो ती फारच बटबटीत वाटते. शिवाय अशा चर्चांना दंगलीच्या प्रत्यक्ष चित्रणाची पार्श्वभूमी नसल्यानं ते अधांतरी लटकत राहतात. अजयची प्रत्यक्षात मुसलमान असलेली आई हिंदू समजून मुसलमानांकडूनच मारली जाते ती एका चर्चच्या दारात. हा सर्वधर्मसमभावी `महेश भट टच' उत्तरकालीन `व्ही. शांताराम टच'सारखाच बेगडी आणि अतिरंजित वाटतो.
 आनंदची आई मरण्यातच आपलं हीत कसं आहे, हे एका धर्मांध पोलिस इन्स्पेक्टरला फोनवरून सांगणारा सुबोध राजकीय नेत्यांच्या कार्यप्रणालीविषयीचं महेशनं अज्ञान स्पष्ट करतो आणि सुबोधला `फिल्मी' व्हिलन बनवून टाकतो.
  अजयच्या आईच्या दफनविधीवरून होणारा संघर्षही शेवटाला अगदी अचानकपणे संपतो. आपल्या आईच्या मृतदेहाला धक्का लावला म्हणून सुबोधच्या अंगावर धावून जाणारा आनंद तर त्या क्षणीच खोटा होतो. हाच आशय अधिक संयमित रितीनं प्रभावी होऊ शकला असता.
  अजय आणि त्याच्या पत्नीच्या दुराव्यावर खर्च केलेला सिनेमाचा सुरुवातीचा भाग तर सरळसरळ अनावश्यक वाटतो. त्यामुळे सुरुवातीची 20-30 मिनिटं सिनेमा पकडच घेत नाही. त्यात खास महेश भट पद्धतीचा रोमान्स (फ्लॅटभर मेणबत्त्या आणि मध्ये शय्येवर नायक-नायिकेचा शृंगार) दाखवणारं गाणं तर वात आणंत. अजयच्या `फ्लॅशबॅक'मध्ये `रात सारी बेकरारी में गुजारी' हे गाणं त्याच्या आईनं डॅडींची केलेली प्रतीक्षा चितारतं. हाच आशय `तुम आये तो आया मुझे याद' या गाण्यातूनही तसाच व्यक्त होत  असल्यानं पहिलं गाणं अनावश्यक वाटतं. त्याची चाल आणि ऱिहदममधला ड्रम्सचा वापर सिनेमातल्या काळाशी विसंगत वाटतो.
  आपल्या मित्रासह वडिलांचं ऑफिस असलेल्या स्टुडिओत गेलेला शाळकरी अजय तिथल्या दरवानानं अडवल्यावर सरळ ओळख संगात नाही. मित्राबरोबर उगाच पळापळी करतो. विनोदनिर्मितीसाठी रचलेल्या या प्रसंगाचा परिणाम हास्यास्पद होतो. अत्यंत गुंतागुंतीच्या मानवी भावनांनी विणलेली ही कथा मांडताना अजयच्या आईवडिलांकडे `माणूस' म्हणून सहृदयतेने पाहणारा दिग्दर्शक सुबोधबरोबरच रमणच्या आईचंही ठोकळेबाज चित्रण करतो. भेसूर चेहऱयानं सतत कर्कश्श करवादणारी ही म्हातारी 50-60 च्या दशकांतील फिल्मी सासवांचीच कृत्रिम आवृत्ती वाटते.
  असल्या चिरगुटांनी गोधडीची कळा आणलेला `जख्म' तरीही प्रेक्षणीय ठरतो तो काही जरतारी कथाभागामुळं. आधीच सांगितल्याप्रमाणं शाळकरी अजय, त्याची आई आणि डॅडी यांच्यातलं नातं महेशनं विलक्षण ताकदीनं रंगवलं आहे.
अजयचा शाळकरी मित्र आणि स्वत: अजय ही वास्तवातली मुलं वाटतात. अजय त्याच्या वयापेक्षा अधिक समजूतदार वाटला, तरी आगाऊ वाटत नाही. त्याची समजूत त्याच्या लोकविलक्षण जगण्यातून आलेली जाणवते. मुलापासून लपून नमाज पढणारी आई आणि अपरिचित उच्चारांमुळे त्या बंद दरवाजाकडे खेचला जाणारा मुलगा, स्वप्नात येऊन भेटणारा गणपती `खोटारडा' वाटल्यावर त्याची मूर्ती विसर्जित करून `मैत्री' तोडणारा, एक धार्मिक ओळखच नकळत विसर्जित करणारा अजय, आईला बाळंतपणासाठी हॉस्पिटलात दाखल करणारा, भाऊ झाल्याची बातमी आपल्या डॅडींच्या `बायको'ला फोनवरून सांगणारा अजय, रमणच्या लग्नाची बातमी अजयनं सांगितल्यावर होणारी त्याच्या आईची अवस्था हे प्रसंग मृदू- स्नेहार्द्र- समंजस हाताळणीमुळं परिणामकारक होतात.
 हॉस्पिटलमध्ये अजय आपल्या आईच्या मारेकऱयाला संतप्त भावाच्या तावडीतून सोडवून ऍडमिट करतो. तिथे तो पोरगा पोलिसांना `मैंने कुछ नहीं किया साब, सिर्फ पेट्रोल डाला बुढिया पर,' असं सांगतो, तेव्हा अजय उसळून त्याच्या एक कानफटात भडकवतो. या एका कृतीतून अजय संत-महात्मा बनण्यापासून `वाचतो.' त्याचं माणूसपण लख्खपणे व्यक्त होतं.
 सिनेमाच्या शेवटी आईचं दफन झाल्यावर अजय तिचं मंगळसूत्र विसर्जित करतो. तेव्हा ढगांच्या वर स्वर्गात त्याच्या आई आणि डॅडींचं मीलन होताना दिसतं. वरवर पाहता हे चित्रण फारच प्रतिकात्मक वाटेल, पण त्यातली महेशची `कॉमेन्ट' महत्त्वाची आहे. हिंदू नवऱयाला स्वर्ग आणि मुस्लिम पत्नीची `जन्नत' एकच आहे, असं थेटपणे सांगण्याचं धाडस केलंय महेशनं.
  सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय ही `जख्म'ची आणखी एक उजवी बाजू. इथे कथानकात बिल्कुल स्थान नसलेली सोनाली बेन्द्रेही मोजक्या प्रसंगात परिपक्व अभिनयाचं दर्शन घडवते. नागार्जुनला केस कमी करायला लावून आणि चष्मा देऊन मवाळ बनवण्याची क्लृप्तीही योग्य ठरली आहे. तो बोलतो- वागतोही स्निग्ध शांत. उरात जखम लपवून शांत- समंजसपणे वावरणारा अजय देसाई अजय देवगणनं संयत मुद्राभिनयांतून आणि गहिऱया संवादफेकीतून सुरेख साकारला आहे. त्याच्यावरचा तणाव त्याच्या चालीतूनही दिसतो.
  `जख्म' हा पूजा भटच्या अभिनय कारकिर्दीतला सर्वेत्कृष्ट सिनेमा ठरावा. `डॅडी'नंतर तिच्या अभिनयाची दखल प्रकर्षानं घ्यायला लावणाऱया या सिनेमात पूजामधील अभिनेत्रीमध्ये `डॅडी'नंतर झालेला विकासही दिसतो. खरं तर तिचं रंगरुप, वय शाळकरी मुलाच्या आईसारखं नाही. पण, याची जाणीव ती कमालीच्या पारदर्शी भावाविष्कारानं पुसून टाकते. तिच्या प्रगल्भ अभिनयामुळेच तिची भूमिका रखेलीऐवजी अस्वीकृत प्रेमिकेच्या आणि `अविवाहित पत्नी'च्या उंचीवर जाते. `हम है राही प्यार के'मध्ये चमकलेल्या कुणाल खेमूचंही विशेष कौतुक करायला हवं. आपल्या आईवरचं प्रगाढ प्रेम, बापाबद्दल आदरमिश्रित कुतूहल आणि परिस्थितीचं प्रौढ भान दाखवताना त्यानं सगळ्या बालसुलभ वृत्तीही योग्य प्रमाणात दर्शविल्या आहेत. त्याचे डोळेही बोलके आहेत.
  निर्मल जानी यांचं छायालेखनही विशेष उल्लेखनीय आहे. प्रकाशयोजना आणि रंग-छटांच्या वापरातून त्यांनी दोन काळांमधला फरक स्पष्ट केला आहे. गप्पा चक्रवर्ती यांचं कलादिग्दर्शनही त्यासाठी साह्यकारक झालं आहे. आनंद बक्षी यांचं `गली में आज चाँद निकला' हे एम.एम.करीम यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं अलका याज्ञिकनं गोड गायलंय आणि त्याचं चित्रणही उत्कृष्ट. एम.एम.करीम यांनीच गायलेले `माँने कहा. मुझसे सदा' या चारोळीसदृश्य छोटय़ामोठय़ा कवनांचा पार्श्वसंगीतासारखा करून घेतलेला वापरही वेधक. बाकीची गाणी मात्र नसती तरी चालली असती.
  सिनेमा म्हणून `जख्म' कलात्मक पातळीवर मध्यम प्रतीचाच वठला आहे. पण, त्यातला सामाजिक आशय मोलाचा आहे. तो महत्त्वाचा मानत असाल, तर `जख्म' किमान अस्वस्थ तरी करून जाईलच.

No comments:

Post a Comment