Thursday, January 5, 2012

'मृत्युदाता'मध्ये बघण्यासारखा 'क्रांतिवीर'च

इन्साफ बिक रहा, इमान बिक रहा है, 
बाजार सा लगा है, सामान बिक रहा है...
 या `कविते'ने `मृत्युदाता'ची सुरुवात होते. एरवी अमिताभच्या भावनेनं ओतप्रोत भरलेल्या घनगंभीर खर्जातल्या आवाजामुळं उथळ असूनही प्रभावी वाटणारी सुरुवात `मृत्युदाता' पूर्ण पाहिल्यावर (खरं तर सहन केल्यावर) हास्यास्पद वाटू लागते.
  कारण विकाऊ झालेल्या आजच्या समाजाच्या स्थितीवरचं हे भाष्य स्वत: तीन कोटी रुपये वार्षिक भावानं स्वत:च्याच नावाच्या कंपनीला विकल्या गेलेल्या एका `प्रॉडक्ट'च्या तोंडून ऐकावं लागतं. पाच वर्षांत एकही सिनेमा न करता सुपरस्टारपदावर राहण्याची किमया करणारा अमिताभ इथं एक विकाऊ उत्पादन आहे. तेही स्वबळावर विकलं जाण्याची खात्री नसल्यानं `वॉशिंग पावडरबरोबर साबण फ्री' देतात तसं `अमिताभसोबत दलेर मेहंदी फ्री' अशी योजना राबवून विकायला काढलेलं उत्पादन.
  एरवी अमिताभच्या आर्थिक व्यवहारांशी प्रेक्षकांचं काही देणंघेणं असायचं कारण नाही... आपला मतलब अमिताभच्या अभिनयाशी, `मृत्युदाता' सिनेमा म्हणून कसा आहे याच्याशी. `एबीसीएल'नं अमिताभ या `अभिनेत्या'ला उत्पादन बनवलं असतं, तर आपल्यालाही इकडेतिकडे डोकावण्याचं कारण नव्हतं; पण `एबीसीएल'नं विक्रीला काढलीये अमिताभची अत्यंत हुशारीनं तयार करण्यात आलेली `लार्जर दॅन लाइफ' प्रतिमा.
  या प्रतिमेचे काही हमखास यशस्वी पैलू आहेत. दारू प्यायल्यानंतरचा अभिनय. आईवरचा प्रेमाचा उत्कट अविष्कार, संतापाचा थंड पण खदखदता अविष्कार, नंतर त्याचा सर्वनाशी उद्रेक, ते आग ओकणारे डोळे... तो काळजाचा ठाव घेणारा आवाज... ती मारामारीतली तडफ... ते एकमेवाद्वितीय असे धावणे... या सर्वांची गोळाबेरीज झाली की, `चाहत्यांचा लाडका' अमिताभ तयार होतो
त्याला एकटय़ालाच सलग तीन तास दाखवणं बरं दिसणार नाही (आणि आताशा प्रेक्षकांना सहनही होणार नाही) म्हणून इतर पात्रांची योजना होते. अमिताभचे हातखंडा खेळ तो जादूच्या खेळांसारखा एकापाठोपाठ एक सादर करू शकत नाही म्हणून कथानक, दिग्दर्शक वगैरे `दुय्यम' बाजू येतात. अमिताभचा सिनेमा तयार होण्याची ही चित्रपटकलेचे सगळे नियम धुडकावणारी अवमानास्पद पद्धत `मृत्युदाता'तही बदललेली नाही. जुन्या चुकांमधून बहुधा तो काहीही शिकलेला नसावा.
  `मृत्युदाता'मध्ये अमिताभचं नाव आहे डॉ. रामप्रसाद घायल. शल्यक्रियेच्या कसबामुळं अनेकांचे प्राण वाचविणारा डॉ. राम समाजाच्या दृष्टीनं `जीवनदाता' असतो. सावत्र आईच्या (फरिदा जलाल) निधनानंतर तो आणि पत्नी जानकी (डिंपल) रामच्या सावत्र भावाला, भरतला (अरबज अली खान) आईबापांचं प्रेम देतात. त्यासाठी 25 वर्षे स्वत: निपुत्रिक राहतात.
  इंजिनीयर भरतचं रेणुवर (करिश्मा कपूर) प्रेम असतं. ते राजा तुंगा (दीपक तिजोरी) या गुंडाला पाहवत नाही. मोहनलाल (आशिष विद्यार्थी) या राजकीय नेत्याच्या मार्गातही भरत काटय़ासारखा सलत असतो. मोहनलाल आणि राजाचा भाऊ, अंडवर्ल्डचा डॉन राणातुंगा (मुकेश ऋषी) मिळून भरतला खोटय़ा केसमध्ये अडकवून तुरुंगात डांबतात. भ्रष्ट इन्स्पेक्टर दानापानी (मुश्ताक खान) भरतचा खून करून आत्महत्येचा देखावा तयार करतो.
  भरतच्या वियोगाचं दु:ख सहन न होऊन जानकी त्याच्या अंत्ययात्रेतच मरण पावते. भरतविषयी गैरसमज झालेली रेणु राजाशी लग्न करते. एकटा पडलेला डॉ. राम अहोरात्र दारुत दु:ख बुडवू पाहतो. पाय डागमगले, जिव्हा अडखळली तरी त्याचे हात आणि बुद्धी स्थिर असते, `जीवनदाता' हा लौकिक कायम असतो.
  राणातुंगा आणि मोहनलाल यांच्यात काही कारणानी वितुष्ट आल्यानं मोहनलाल अंडरवर्ल्डचा बादशहा `टेरर' (त्रिलोकचन त्रिपाठीचंच वेगळं रुप) याच्या साह्यानं राजाचा काटा काढतो आणि आळ रामवर जाईल, अशी व्यवस्था करतो. रामला तुरुंगात हेरगिरीच्या आरोपावरून बंदिवान शास्त्रज्ञ (प्राण) भेटतो. तो रामला `मृत्युदाता' बनण्याची प्रेरणा देतो. राम त्याच्या मदतीनं तुरुंगातून पलायन करतो आणि आपल्यावरील किटाळ दूर करून अत्याचारांचा बदला घेतो, अत्याचाऱयांना यमसदनी धाडतो, ही `मृत्युदाता'ची कथा.
  ती सादर करण्याची जबाबदारी मेहुलकुमारवर सोपविण्यात आली आहे. मनोजकुमारनंतर देशभक्तीचं घाऊक कंत्राट मेहुलकडे आलंय. `क्रांतीवीर'चा जॅकपॉट लागल्यानं मेहुल `' वर्गातून `' वर्गात आला, तरी चित्रपटाची त्याची हाताळणी मात्र `' वर्गातलीच राहिली आहे... भडक आणि बटबटीत.
  नेते भ्रष्ट असतात, पोलिस भ्रष्ट असतात. अन्यायाविरुद्ध कुठेही दाद मागण्याची सोय नाही. त्यामुळं संपूर्ण समाजच पेटून उठावा लागतो. कुणीएक नाना किंवा अमिताभ येऊन दीड-दोन मिनिटं भडाभडा बोलला की, समाज खाडकन् जागा होतो, अशा मेहुलच्या बालिश आणि सोयीस्कर सामाजिक अंधश्रद्धा आहेत. त्या तो `मृत्युदाता'त कंठाळी पद्धतीनं मांडतो. उपकथानकांना उरकून टाकण्याकडे मेहुलचा कल. त्यामुळं रेणु-भरत यांच्यातलं प्रेम स्पष्टच होत नाही; पदरात तीन (न पाहवणारी न ऐकवणारी) गाणी मात्र पडतात.
   अमिताभ आता दिसतो कसा, बोलतो कसा, त्याचा अभिनय पूर्वीसारखाच आहे का, ही प्रेक्षकांमधली उत्सुकता आहे. आजतागायत अमिताभ पडद्यावर जे जे करत आलाय ते ते पडद्यावर त्याला अजूनही तसंच करता येतं, ही त्यांच्यासाठी खुशखबरी. त्यापलीकडे काय? तर काही नाही.
   अरबाज अली खानचं पदार्पण ठोकळेबाज व्यक्तिमत्त्वामुळं फारसं आश्वासक वाटत नाही. डिंपल करिश्मापेक्षाही सुंदर दिसली आहे. करिश्माला नाचगाणी आणि विधवेच्या भूमिकेत एक सीन अभिनय, अशी भूमिका मिळालीये, तिचे तेच तेच नाच, स्वित्झर्लंडमधल्या त्याच त्याच चित्रणस्थळांवर चित्रित झालेत. तिथले लोक आता `आमच्या इथे रोज नाचते ही' असं ओळखू लागले असतील तिला.
  परेश रावळनं साकारलेल्या त्रिलोचन त्रिपाठीला `टीटी' असं `व्हीपी'शी जुळणार नाव आणि व्ही.पी.सिंगासारखा गेटअप देऊन अमिताभच्या वतीनं मेहुलनं खुन्नस काढली आहे, ते अशोभनीय आहे. लालूप्रसाद यादवांवर बेतलेला मोहनलाल, आशिष विद्यार्थीनं इतका `लाऊड' केलाय की, त्यापेक्षा लालू परवडले.
  आनंद-मिलिंद यांच्या संगीतात दम नसल्यानंच दलेर मेहंदीला पाचारण करून `ना ना ना रे' हे हिट गाणं घुसवण्यात आलंय. ते पटकथेतही घुसवलेलं स्पष्ट समजतं.
 तुरुंगातून अमिताभ पलायन करतो तेव्हा कैदी, जेलर, रक्षक व्हिडिओवर `क्रांतीवीर' पाहात असतात. तो बोटं फोडून रक्त मिसळण्याचा `हिंदूका खून, मुसलमानका खून' वाला सीन सुरू असतो. तो पाहण्यात तुरुंगातले रक्षक इतके गुंग झालेले असतात की, त्यांच्या कंबरेची किल्ली काढून अमिताभ पळ काढतो तरी त्यांना पत्ता लागत नाही.
 त्या रक्षकांचा यात दोष नाही. संपूर्ण `मृत्युदाता'त खिळवून ठेवणारा फक्त हा `क्रांतीवीर'चाच सीन आहे, याला ते काय करणार?

          मृत्यूदाता
निर्माता  - एबीसीएल
कथा-पटकथा-दिग्दर्शन - मेहुलकुमार
संवाद जलीस शेखानी
संगीत आनंद मिलिंद
कलाकार अमिताभ बच्चन, डिंपल कापडिया, करिश्मा कपूर, अरबाज अली खान, परेश रावळ, आशिष विद्यार्थी, मुकेश ऋषी.

No comments:

Post a Comment