Monday, January 2, 2012

'हसीना' म्हणते हसा ना! (हसीना मान जाएगी)


डेव्हिड धवन हा विनोदाचा एका कारखानदारच झाला आहे.
 कोणत्याही मोठय़ा कारखान्यात प्रॉडक्शन लाईनवर जसा विशिष्ट काळात, विशिष्ट प्रमाणात एखाद्या उत्पादनाचा एखादा सुटा भाग तयार होतो, तसा डेव्हिड धवनच्या कारखान्यात मिनिटाला एक विनोद तयार केला जातो. अशा विनोदांची एकापुढे एक जुळणी करून त्याचा सिनेमा तयार होतो. `हसीना मान जाएगी' हे या कारखान्याचं नवं उत्पादन `मिनिटाला एक हशा'च्या निकषांवर सर्व चाचण्या पास होतं, हे मानायलाच हवं.
  मात्र, सिनेमात काही कथानक, काही तर्कसंगती, काही भावपरिपोष वगैरेंची जुनाट, फजलू अपेक्षा बाळगणाऱया प्रेक्षकानं या सिनेमाच्या वाटेला न गेलेलंच बरं! आंटीच्या अड्डय़ात पावशेर नवटाकच मागायची असते तिथं पियुष मागणारा येडाच ठरणार.
  एकदा सिनेमानिर्मितीचं हे अधिष्ठान पक्कं झालं की, डेव्हिडसकट सगळे `कामगार' ठेवून आपापल्या पातळीवर भरपूर मेहनत घेतात, हे सिनेमात दिसतंच. पण, प्रॉडक्शन लाईनवर तयार होणाऱया सर्व उत्पादनांची ठळक वैशिष्टय़ं जशी एकसारखीच असतात, तसाच `हसीना मान जाएगी' ही डेव्हिडच्या `हमखास यशस्वी' साच्यातून उतरलेला दिसतो.
`हसीना...'चे विनोद गुंफण्यासाठी इम्तियाज पटेल आणि युनुस सजावल यांनी डेव्हिडच्या सुपरहिट `आँखे' आणि जुन्या `प्यार किये जा'ची सर-मिसळ करून एक कथानक रचलंय. सोनू (संजय दत्त) आणि मोनू (गोविंदा) हे एका बडय़ा बापाचे बिगडे छोकरे. पाच कंपन्या आणि तीन बंगले असणाऱया त्यांच्या बापाला- सेठ अमीरचंदलाच (कादर खान) उद्योग-व्यवसाय सांभाळण्याचं काम कुठे दिसत नाही, तर वयानं वाढूनही बालिश, वाह्यात चाळे करणारी इरसाल पोरटी कुठून आणि कसला कामधंदा करणार? सतत आचरटपणा करून आपल्या बापाला आणि त्याच्या दिवाणजी-कुंजबिहारीला (सतीश कौशिक) वारंवार गोत्यात आणणारी ही मुलं गोव्याच्या गुलझारीलाल नामक (अनुपम खेर) धनिकाच्या मुलींच्या प्रेमात पडतात. सोनू गोव्यात पूजाला (पूजा बात्रा) पटवतो, तर मोनू मुंबईत रितूच्या (करिश्मा कपूर) प्रेमात पडतो
गुलझारीलालवर इंप्रेशन मारण्यासाठी सोनू गोव्यात आपल्या `काका'ला बोलावून घेतो, म्हणजे अर्थातच मोनूलाच दाढी-मिशी चिकटवून काका बनवण्यात येतं. पूजा-रितूची प्रौढ-अविवाहित आत्या (अरुणा इराणी) या काकाच्या प्रेमात पडते. अमीरचंद आणि कुंजबिराही मुलांच्या शोधात गोव्यात येतात. पाठोपाठ खंडणी वसूल करणारा एक भाई (आशिष विद्यार्थी) येऊन दाखल होतो. या सगळ्या झमेल्यातून हसत-खेळत सोनू-मोनूची नय्या पार होते.
  या कथासूत्राभोवतीचा `हसीना...' म्हणजे विविध `आयटेम्स'नी सजलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे. संपूर्णतया विवंचनामुक्त अशा तकलादू आयुष्याची स्वप्नं पाहणारे प्रेक्षक या देशात भरपूर आहेत. `हसीना...' ही त्यांची तीन तासांची स्वप्नपूर्ती. डोक्याला कसलं झंझटच नाही. विनोदांना हसायचं आणि गाण्यांना ठेका धरायचा, एवढंच काम ते काम! तर्कशुद्धतेचा अडसर दूर केल्यामुळं वेगवान झालेली पटकथा, कायिक-वाचिक- प्रसंगनिष्ठ वगैरे हर तऱहेच्या विनोदांचा खच्चून भरणा आणि दणकेबाज गाणी यांच्या बळावर `हसीना...' ईप्सित कार्य शोधण्यात यशस्वी होतो.
  रूमी जाफ्री यांच्या चुरचुरीत (काही वेळा निर्लज्ज) संवादांमधून `हसीना...'चा प्रेक्षकवर्ग खदखदत राहतो. गोविंदा दोन्ही भूमिकांमध्ये, विशेषत: काकाच्या सोंगामध्ये धमाल उडवतो. इथे त्याची नियुक्ती अभिनेता म्हणून नाही, तर सोंगाडय़ा म्हणूनच आहे, हे ध्यानात ठेवलेलं बरं. संजय दत्तनं गोविंदापुढे दुयम स्थान मोकळेपणानं स्वीकारलंय, त्याचाही वावर मजेशीर ठरला आहे. करिश्माच्या सफाईपुढे पुजा बात्रा काहीशी फिकी पडते. कादर खान आणि सतीश कौशिक ठरीव साच्यातली गंमत करतात. अनुपम खेरचा स्लॅपस्टिक कायिक अभिनय, अरुणा इराणीची प्रौढ वयातली `ग्रेस' आणि सहजता आणि परेश रावलनं नेपाळी रखवालदाराच्या भूमिकेत पकडलेला अफलातून सूर या कलावंतांचा अव्वल दर्जा सिद्ध करून जातो.
  अनू मलिकनं मस्तीभरा ठेका हा पाया धरून रचलेली गाणी `फंक्शनल' म्हणावी, अशी तात्पुरती आवश्यक कामगिरी करतात. संजय दत्त-गोविंदा यांनी गायलेलं `शर्माना छोड डाल' हे गाणं टपोरी शब्दकळा आणि नृत्यदिग्दर्शनामुळं काहीसं वेगळं झालंय शीर्षक गीतही शंकर महादेवन- सोनू निगम यांच्या बेफाट गायकीमुळे धमाल उडवून देतं.
असं म्हणतात की, सतत टीव्ही पाहणाऱया प्रेक्षकाचा टीव्ही पाहतानाचा मेंदूच्या कार्याचा आलेख आणि त्याचा गाढ झोपेतला आलेख तंतोतंत सारखाच असतो. डेव्हिडला अपेक्षित प्रेक्षकवर्ग हाच आहे. या वर्गाबाहेरच्या प्रेक्षकांनी डोळे-कान उघडे ठेवून मेंदू संपूर्णपणे निद्रावस्थेत जाण्याची अवस्था काय असते, याचा अनुभव घ्यायचा असेल, तरच वाट वाकडी करावी.

No comments:

Post a Comment