Friday, January 6, 2012

ना लय ना 'ताल'


खरंतर आताआतापर्यंत सुभाष घई यांचा `ठेका' अगदी वेगळा होता.
  ते होते भव्यपटांचे ठेकेदार... `शोमन.' अतिमानवी स्वरुपाच्या पात्रांमधला गडद संघर्ष, अतिभव्य पातळीवरचं चित्रण, सुश्राव्य संगीत, दिलखेचक, नेत्रदीपक चित्रणानं सजलेली गाणी ही घईपटांची वैशिष्टय़ं.
  `परदेस'पासून घईनी ठेका बदलला आणि ते मानवी भावभावनांचे सांद्र सूर आळवू लागले. `ताल' हे `परेदस'च्या पुढचं पाऊल, पण एकूण परिणाम पाहता ते मागचं पाऊल ठरण्याचीच शक्यता अधिक.
  आपला पहिलावहिला निखळ प्रेमपट करण्यासाठी घईनी प्रेमत्रिकोणाचा सदाबहार विषय निवडलाय. हा विषय जेवढा सार्वकालिक तितकाच जुनाट; जितका परिचित तितकाच घिसापिटाही. दुर्दैवानं `ताल'ला सार्वकालिकतेपेक्षा जुनाटपणाचं आणि परिचयापेक्षा घिसेपिटेपणाचंच परिमाण लाभलंय.
  प्रेमत्रिकोणामध्ये दोन कोन मिळून अंतिमत: एक जोडी तयार होणार आणि एक कोन एकाकी लोंबकळत राहणार, हे प्रेक्षकाला तिकीट खरेदी करायच्या आधी माहिती असतं; अनेकदा जोडी कुणाची होते हेही. तरीही तो तिकीट काढतो, कारण या प्रकियेमधल्या भावनिक उलघाली त्याला आकृष्ट करून घेतात. त्याला मिलन झालेल्या नाटक-नायिकांच्या सुखात डुंबायचं असतं किंवा एकाकी राहणाऱया त्यागी नायकाच्या दु:खाची धग भोगायची असते; अनेकदा (आपल्याला असाध्यच असा) सर्वस्व-रुप नायिकेचा त्याग करू धजणाऱयाला मनातल्या मनात सलाम ठोकायचा असतो.
 `ताल'चा प्रेक्षकही याच अपेक्षांनी चित्रपटगृहात प्रवेश करतो, `ताल'मध्ये घडतंही हेच सगळं; पण प्रेक्षकाला ना जोडी जमल्याचा आनंद होत, ना एकाकी प्रेमवीराच्या वेदनेचं दु:ख कोरडा गेलेला प्रेक्षक कोरडाठाकच बाहेर येतो. कोणत्याही पात्राविषयी प्रेक्षकाच्या मनात आस्था, आत्मीयता, ममत्व, सहानुभव ना वाटणं, हे `ताल'चं सगळ्यात मोठं अपयश आहे.
 या त्रिकोणाचे दोन कोन आहेत मानव (अक्षय खन्ना) आणि मानसी (ऐश्वर्या राय). मानसी ही हिमाचल प्रदेशातल्या चंबामधल्या ताराबाबू (अलोकनाथ) या लोकगीत गायकाची रुपवान, नृत्य-गाननिपुण मुलगी. या भागात एक बडा प्रकल्प उभारण्यासाठी आलेल्या जगमोहन मेहता (अमरिश पुरी) या धनाढय़ उद्योगपतीचा मुलगा- मानव परदेशातून चंबामध्ये येतो; मानसीच्या प्रेमात पडतो.
मानसीही त्याच्यावर प्रेम करू लागते. दोन घराण्यांच्या आर्थिक स्तरातला फरक या प्रेमाआड येणार नाही, असं वचन देऊन मानव मुंबईला परततो. मानसीच्या घरी हे प्रेमप्रकरण कळाल्यावर हलकल्लोळ उडतो. मानव खरोखरीच मानसीचा स्वीकार करणार आहे का, याची खात्री करून घेण्यासाठी ताराबाबू तिला घेऊन मुंबईत येतात आणि उच्चभ्रू मेहता खानदानाकडून अपमानित होतात.  
वस्तुस्थिती ठाऊक नसलेला मानवही ताराबाबूंचा मानभंग करतो; तेव्हा मानसी मनातून दुखावते, मानवपासून दुरावते.
याचवेळी मानसी आणि ताराबाबूंना भेटतो विक्रांत कपूर (अनिल कपूर) हा रिमिक्सकार, नृत्यदिग्दर्शक, गायक, स्टुडिओचालक, टीव्हीस्टार, काहीसा विक्षिप्त पण अतिशय व्यवहारी विक्रांत मानसीला आपल्या पथकात सहभागी करून घेतो. ती रातोरात पॉपस्टार बनते, आंतरराष्ट्रीय कीर्ती संपादन करते. विक्रांत तिच्या प्रेमात पडतो ताराबाबूंकडे तिला मागणी घालतो.
मानसी-विक्रांत यांचं लग्न ठरतं. दरम्यान, मानसीला निखळ प्रेमाच्या बळावर पुन्हा जिंकू पाहणारा मानव सतत तिच्या अवतीभवती घोटाळत राहतो, मनातही रेंगाळत राहतो. केवळ कर्तव्यभावनेपोटी प्रेम त्यागून विक्रांतशी लग्नाला तयार झालेली मानसी त्याच्याशी विवाहबद्ध होते की, मानवकडे- प्रेमाकडे परतते? या प्रश्नाचा (अपेक्षितच) उलगडा कळसाध्यायाला होतो.
  स्वत: सुभाष घई यांनी लिहिलेल्या या कथेत, त्यांनीच सचिन भौमिक यांच्या साथींनं लिहिलेल्या पटकथेत आणि जावेद सिद्दीकींबरोबर लिहिलेल्या संवादांमध्ये ताज्या टवटवीत प्रेमस्पर्शाचा अभाव जाणवतो. मध्यंतरापर्यंतची मानव-मानसीची प्रेमकहाणी इतक्या साचेबंद, निर्जीव पद्धतीनं, संथ गतीनं चालते, की प्रेक्षक कंटाळतो आणि विक्रांतच्या दणकेबाज आगमनानं खाडकन् जागा होतो, सुखावतो.
  मध्यंतरानंतर विक्रांत काही काळ सिनेमाचा ताबाच घेतो. पण, पुन्हा एकदा (विक्रांतनं मानसीला मागणी घातल्यानंतर) कथा रूढ चक्रात घरंगळत जाते आणि अत्यंत विस्कळित क्लायमॅक्समध्ये विखरून पडते.
  मध्यंतरापूर्वीच्या भागात मानव-मानसीची पहिली भेट, मानवनं उष्टावलेला कोकाकोला पिऊन मानसीनं प्रेमाचा `इजहार' करणं, उंच कडय़ावर मानसीनं मानवला `योगा' शिकवण्याचा नर्मशृंगारिक प्रसंग, मानवच्या घरी ताराबाबूंची होणारी मानहानी आणि विक्रांतची ऐन मध्यंतराला होणारी जबरदस्त एन्ट्री, यासारख्या प्रसंगांमध्ये घई `टच' जाणवतो, पण फारच हलका.  
या भागात दोन्ही घरांमधल्या भाराभर नातेवाईकांची, त्यांच्या हितसंबंधांची, संहर्षाची खोगीरभरती प्रेमकहाणीला गुदमरवून टाकते. मध्यंतरानंतरही हायफाय टेक्नोसंगीत, भव्य अत्याधुनिक नेपथ्याच्या पार्श्वभूमिवर घडणारी संगीत-चकचकीत नृत्यं, यांच्या भपकेबाज सजावटीत प्रेमाचा तिढा नगण्य होऊन बसतो.
 मानवी भावभावनांच्या सूक्ष्म पैलूंचा वेध घेण्यासाठीही भव्यच कॅनव्हास निवडण्याच्या घईच्या अट्टाहासामुळं `ताल'चा ताल हरवलाय. त्यांची प्रमुख पात्र पडद्यावर सर्व स्वभाववैशिष्टय़ांनिशी ठसठशीतपणे उमटत नाहीत. म्हणूनच भावतही नाहीत.
  मानव हा अतिशय समंजस, ऋजु स्वभावाचा मुलगा. आपल्या घराण्यातल्या माणसांची आढय़ता त्याला ठाऊक असते. तरीही ताराबाबूंवर भडकताना, यांना कुणी दुखावलं असेल, असा विचार एक क्षणभरही त्याच्या मनाला शिवत नाही. मानसी दुरावल्यानंतर तो तिची वाट पाहण्याचा निर्णय घेतो. `मी वडिलांविरुद्ध बंड करणार नाही, ड्रामेबाजी करणार नाही, घर सोडून जाणार नाही. माझ्या मनात ईश्वर असेल आणि प्रेमात सच्चाई असेल, तर तुम्हीच मानसीला माझ्यापर्यंत आणून पोहोचवाल,' असं वडिलांना आणि विक्रांतलाही तो ऐकवतो
ही प्रेमाची आदर्शवादी भाषा बोलायला सोपी, तेवढीच कृतीत आणायला अवघड. मानवचं हे वाट पाहणं सिनेमात मानवी पातळीवर राहात नाही; कारण, लेखक-दिग्दर्शक घई मानवची उलघाल, झुरणं, मानसीला `मिस' करणं, हे कुठे दाखवतच नाहीत. अति आदर्शवादी प्रेमिकालाही विरहाच्या यातना होतातच ना? सिनेमात मात्र मानव इतकं महामानवी पातळीवरचं काहीतरी भकत राहतो की, हा आता खादीचे कपडे घालून उपोषणाला बसेल की काय, अशी भीती वाटते.
 शिवाय त्याला सोडून स्वत:चं करियर घडवायला निघालेल्या मानसीचा हा निर्णय कितीही चुकीचा वाटला; तरी तो तिचा निर्णय आहे, त्याचा आदर करायला हवा, असं त्याला वाटत नाही. `तू भारतीय नारी आहेस, या ग्लॅमरस जगात तू रमू शकत नाहीस, तुझं खरं स्थान घरात (तेही माझ्याच) आहे, ' अरे बाबा, तुझ्याइतक्या संतपदाला पोहोचलेल्या माणसाच्या प्रेमात पडण्याइतकी सुबुद्ध आणि कायद्यानं सज्ञान आहे ती! बरंवाईट काय ते ठरवू देत तिचं तिला. आयुष्याचे टक्केटोणपे खाल्ल्यावर तिला सच्च्या प्रेमाची मातब्बरी उमगली, तर येईल ती आपसूक तुझ्याकडे. तोवर तू तुझा कोपरा पकडून राहा ना गप!
   मानसीची तर शेवटपर्यंत टोटलच लागत नाही. एकतर घइभना गाण्याबजावण्यातून त्यांच्या नायिकांचं शरीरसौंदर्य (हिणकसपणे नव्हे, तर कलात्मकतेनं का होईबना) टिपण्याचा सोस आहे. तोही असायला आपली हरकत काय? दृष्टीसुख ते दृष्टीसुख; पण, या भानगडीत तिचं व्यक्तिमत्त्व उलगडण्याची जबाबदारी ते पार पाडत नाहीत.
  वडिलांच्या अपमानानंतर तेजस्विनी भासणारी मानसी पुढच्या नृत्य-गाण्यांमध्ये एखाद्या पॉप-स्टारसारखीच खोटी-खोटी, कचकडय़ाची होऊन जाते. मानववर तिचं खरं प्रेम असेल, तर त्याच्याकडून वडिलांचा अपमान गैरसमजुतीतून झालाय, हे तिला उमगायला हवं. मानव क्षमा मागत असतानाही ती बधत नाही, हे एकदोन वेळा ठीक आहे; पण, त्याच्या सच्चेपणाची खात्री पटल्यावर ती त्याला क्षमा का करत नाही? खरंतर प्रेम माणसाला त्यानं न केलेल्या चुकीचीही क्षमा मागण्याएवढं मोठं करतं. त्यामुळेच मानसीसारख्या तोवर संवेनदशील भासणाऱया मुलीचा हा कठोरपणा तकलादू वाटतो.
   आंतरराष्ट्रीय पातळीवर करीयर घडवण्याची धमक बाळगणारी ही मुलगी, मनात मानवच भरून उरलेला असताना विक्रांतला थेट नकार का देऊ शकत नाही, हेही तितकंच अनाकलीनय.
   आपल्या मुलीचे (पूर्ण कपडय़ातले) चोरून फोटो काढले, म्हणून मानवला दटावणारे ताराबाबू मुंबईत आल्याबरोबर तिला तंग-तोकडय़ा वस्त्रांमध्ये नटून नाचगाणी करण्याची परवानगी कशी देतात, हे कळत नाही. त्यानंतर मुलगी करियर घडवत असताना, तिला न आवडणाऱया माणसाशी लग्न करण्याची (पर्यायानं सुखी, निष्क्रिय संसारात `सेटल' होण्याची) गळ ते घालतात; तेव्हा त्यांच्या एकंदर बौद्धिक कुवतीविषयी शंका निर्माण होते. इथे ताराबाबूंच्या आडून `मुलींचे खरे स्थान नापसंतीच्या, बिनसुखाच्या का होईना, पण संसारातच,' असं धमकावरणारा भारतीय पुरुषवर्चस्ववादी दृष्टीकोन डोकावतो.
प्रेक्षकांना सगळ्यात दु:खद धक्का देतो विक्रांत. मानव आणि मानसी प्रेक्षकाला (त्यांच्या `कन्फ्युजन'मुळे) कायम परकेच राहतात. विक्रांत हा अस्सल मातीचा माणूस मात्र आगमनानंतर काही क्षणांतच प्रेक्षकाशी नातं जोडतो. आत्मकेंद्रित, पराकोटीचा स्वार्थी, बेपर्वा, उद्धट, पैशाला- यशाला सर्वस्व मानणारा, छानछोकीत- दाखवेगिरीत मनापासून रमणारा विक्रांत स्वत:च्या सर्व दुर्गुणांशी प्रामाणिक असल्यानंच `लव्हेबल' वाटतो. त्याचे पाय जमिनीत भक्कमपणे रोवलेले वाटतात. त्याचं बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्व सिनेमात चैतन्य आणत असतानाच त्याला मानसीला प्रपोज करण्याची दुर्बुद्धी सुचते आणि तोही मनातून उतरतो. दुर्बुद्धी अशासाठी की, `हम दर्द बेचते हैं, खरीदते नहीं', असं लाघवी निरर्गलपणे सांगणारा विक्रांत, मानसीचा सर्व पूर्वेतिहास ठाऊक असताना, मानवमधली तिची गुंतवणूक दिसत असताना अचानकच तिच्या प्रेमात कसा पडतो?  
विक्रांत हा खरोखरीच भावनांच्या जंजाळापार पोहोचलेला कलंदर फकीर असेल, तर हे घडणं अशक्यच. जगाचे चटके सोसून पोळलेली संवेदनशीलता छपवण्यासाठी त्यानं कलंदरपणाचा मुखवटा घेतला असेल, तर त्याआडचा चेहरा लेखक-दिग्दर्शक कधीच दाखवत नाहीत. `सिनेमातल्या जगा'ला तो दिसत नसेल, पण विक्रांतच्या बाजूनं सिनेमा पाहणाऱया प्रेक्षकाला तरी त्याचा अंदाज यायला हवा.
  बरं विक्रांत आपल्यावर यत्किंचितही प्रेम नसलेली `सुबक बाहुली' केवळ जगापुढे मिरवण्यासाठी मिळवू पाहतो, असंही नाही. त्याचं तिच्यावर खरोखरीचं प्रेम जडतं. विक्रांतची आटाढील स्वभावरचना पाहता ही प्रक्रिया अधिक खुलायला हवी होती.
  स्वत:ही गोंधळलेल्या आणि प्रेक्षकालाही बुचकळ्यात पाडणाऱया या तीन प्रमुख व्यक्तिरेखांच्या असमतोलामुळं `ताल' प्रेमभावनेच्या अंतरंगापर्यंत पोहोचत नाही. तो सुभाष घई स्टाईल शोमनशिपच्या चकाचौंधीत अडकून पडतो.
  कबीर लाल यांनी नजाकतीनं टिपलेलं पूर्वार्धातलं हिमाचल प्रदेशाचं सौंदर्य आणि उत्तरार्धात शमिष्ठा रॉयकृत भव्य, आकर्षक नेपथ्याला प्रकाशयोजनेतून दिलेला न्याय, .आर.रहमानचं कितीही शैलीबाज वाटलं, तरी ठेका धरायला लावणारं संगीत आणि गाण्यांचं उत्तम टेकिंग, असल्या सजावटीतूनच `ताल' काहीसा वरवरचा आल्हाद देतो. कबीर लाल यांच्या छायालेखनावरच्या संतोष सिवन प्रभृतींच्या उघड प्रभावामुळं काही दृश्यरचना `मणिरत्नम' शैली'तल्या भासतात; दिग्दर्शकाच्या शैलीवर छायालेखकानं गाजवलेला हा प्रभाव मनोरंजक आणि उद्वोधकही आहे.
  घईमधला लेखक आणि संकलक निष्प्रभ झाल्याचा सर्वाधिक फटका बसला आहे अक्षय खन्नाला. तो सच्चा प्रेमिकाची एकरंगी भूमिका `डोली सजा के रखना'च्या पानावरून पुढे चालवतो. मानवची आदर्शवादी प्रेमकल्पना मनापासून व्यक्त करतो. पण, मुळात मानवच्या या भूमिकेतच काही भक्कमपणा नसल्यानं त्याचे उदात्त संवाद बोअर भाषणबाजी वाटता आणि मानसीच्या लग्नप्रसंगातली तगमग लुबऱया लुडबुडीच्या पातळीवर उतरते
तीच गत ऐश्वर्याची. ती नाचगाण्यांमध्ये उत्फुल्लपणे वावरते, पण बाहुलीसारखी तिला मॉडेलिंगमधल्या बेतशीर भावदर्शनातून बाहेर काढण्यात घई अपयशी ठरलेले आहेत. (हे `घईचं' अपयश अशासाठी की, संजय लीला भन्साळीनं `हम दिल दे चुके सनम'मध्ये अशाच स्वरुपाच्या भूमिकेत ऐश्वर्याला `जिवंत' केलं होतं.) `ताल'मध्ये आश्चर्यकारकरीत्या बाजी मारून जातो अनिल कपूर. लेखकांनी त्याच्या व्यक्तिममत्त्वाला दिलेली विक्षिप्त छट `लाऊड' करून, `झँग' चक्रमपणाच्या तऱहा दाखवून ते प्रेक्षकांना ताब्यातच घेतो. अनुभवाच्या बळावर त्यानं विक्रांतला दिलेलं रंगरूप या अभिनेत्याची परिपक्वता दाखवून जातं.
  घईच्या सिनेमातली गाणी हा नेहमीच स्वतंत्र नोंदीच विषय असतो. कथानकातूनच फुलणारी, शंभर टक्के श्रवणीय आणि प्रेक्षणीय गाणी, हे त्यांच्या सिनेमांचं मुख्य आकर्षण राहिलं आहे. `ताल'मध्ये घई आणि रहमान प्रथमच एकत्र आले आहेत. निव्वळ शब्दसुरावटींच्या निकषांवर `इश्क बिना क्या जीना यारो,' `नहीं सामने ये अलग बात है', `ताल से ताल मिला' आणि `करिये ना' ही गाणी गोड चालींची आहेत. `रमता जोगी', `कही आग लगे लग जाए' आणि `ताल से ताल मिला'ची पाश्चात्य ठेक्यातली आवृत्ती, या गाण्यांना सिनेमाचं नाव सार्थ करणारा थिरकता ताल लाभलाय.  
तालवाद्यांवर अद्वितीय हुकूमत असलेल्या रहमाननं मटक्यापासून इलेक्ट्रॉनिक ऱिहदमपर्यंत आणि हिमाचल प्रदेशातलं लोकसंगीत, रांगडी पंजाबी गाणी, रवींद्रसंगीत यापासून सिंफनीपर्यंत तालासुरांचा अद्भुत मेळ घातलाय; अपवाद फक्त `छैय्या छैय्या'ची सुमार नक्कल मारणाऱया `नि मै समझ गयी'चा. ही सर्वच गाणी श्रवणीय आणि प्रेक्षणीय आहेत. `ताल ते ताल मिला'चं पावसाळी, कुंद हवेतलं, ऐश्वर्याला संपूर्ण कपडय़ांमध्येही उन्मादक भासवणारं चित्रण सर्वात उजवं. पण, सिच्युएशन म्हणून या गाण्याची पाश्चात्य आवृत्तीच अधिक प्रभावी ठरते. कारण तिथे, ऐन मध्यंतराला चक्रम विक्रांत पडद्यावर प्रथम अवतरतो.
 `इश्क बिना' हे गाणं तर अगदी `आता तू गाणं म्हणं बाई' छापाच्या आग्रहातून घडतंघईवर एवढी वेळ येईलसं वाटलं नव्हतं. आक्रमक, दिलखेचक `रमता जोगी'ची सिच्युएशन तर सहीसही `परदेस'च्या `मेरी मेहबूबा'ची आहे. हरिहरननं ताकदीनं मांडलेली `नही सामने ये अलग बात है'ची समंजस विरहवेदना घईना सिच्युएशनच न सापडल्यानं पडद्यावर नीरस होते; त्यात हे गाणं पडद्यावर एका कडव्यापुरतंच दिसतं. बाकी सरोज खान, अहमद खान आणि श्यामक दावरकृत भपकेबाज गाणी डोळ्यांना-कानांना सुखावतात, मनात उतरत नाहीत.
 आनंद बक्षी यांच्या या वायतही लखलखीत असलेल्या प्रतिभेतून उमटलेली आणि रहमाननं प्रयोगशील, अनवट सुरावलींमध्ये बांधलेली ही गाणी सीडी/कॅसेटमध्ये जो आनंद देतात, तो `ताल' हिरावून घेतो. सीडी/ कॅसेटच्या तुलनेत सिनेमा थिटा पडतो आणि `ताल से ताल मिला'च्या चालीवर `तालचा ताल चुकला हो ।़  हो ।़।़  तालचा तोल ढळला' अशी ओळ ओठांवर येते.

No comments:

Post a Comment