या शतकातलं आणि पर्यायानं सहस्रकातलं शेवटचं
खग्रास सूर्यग्रहण नुकतंच झालं. तेजोनिधी सूर्याला किरकोळ,
फुटकळ चंद्रानं काही काळ ग्रासलं खरं, पण नंतर
क्षितिजावर नव्या दिमाखात अस्तमान झाला तो सहस्ररश्मी व्योमराज.
मेहुलकुमारचा `कोहराम' याच सुमारास
प्रदर्शित झाला आहे, हा एक गमतीशीर योगायोग आहे.
अमिताभ बच्चन आणि नाना पाटेकर हे हिंदी सिनेमातले दोन सूर्य. खणखणीत अभिनय आणि प्रेक्षकांना भूल पाडणारा जबरदस्त `लार्जर दॅन लाइफ' करिश्मा, यांचं
अंगभूत तेज लाभलेले हे कलावंत. पण, गेले
काही दिवस या दोघांच्याही कारकिर्दी झाकोळून गेल्या होत्या. दोघेही
आपापली जबाबदारी नेकीनं पार पाडत होते, पण कुठेतही, काहीतरी फसत-बिनसत होतं. दोघेही
निस्तेज वाटत होते.
`कोहराम'मध्ये ते प्रथमच एकत्र आले आहेत आणि ग्रहण सुटलेल्या
सूर्याप्रमाणं त्यांनी या सिनेमात डबल धमाका करून दाखवलाय.
अर्थात, हा धमाका मेहुलकुमार यांच्या दिग्दर्शकीय जातकुळीच्या
मर्यादित चौकटीत घडतो, हे या ठिकाणी ध्यानी घेतल्यास उत्तम.
मेहुलकुमार यांच्या, विशेषत: `क्रांतिवीर'पासूनच्या सिनेमांमध्ये एक ढोबळ सूत्र आहे. समाजातली
विषमता, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आदी ऱहासलक्षणांचं अतिसुलभ आणि फिल्मी विश्लेषण हा या सूत्राचा
गाभा आहे. म्हणजे, सगळे राजकारणी देश विकायला
निघालेले, भ्रष्ट. सगळे पोलिस लाचखाऊ लाचार.
सगळे लष्करी जवान नेकदिल, कर्तव्यनिष्ठ.
आणि यांच्याव्यतिरिक्तची आम जनता अडाणी, डोळे असून
आंधळी, गरीब-बिच्चारी.
मेहुलकुमारकृत हे विश्लेषण बाळबोध आणि वरवरचं आहे, हे
समजायला काही खास बुद्धिमत्तेची आवश्यकता नाही. मात्र,
हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकाला पडद्यावर असंच तीन तासांत सर्व प्रश्नांची
समाधानकारक उत्तरं' देणारं सोपंसोपं जग पाहायला आवडतं,
ही खूणगाठ मनाशी बांधली, तरच `कोहराम'चा आनंद घेता येतो. त्यातही,
मेहुलकुमार यांचा नायक अन्यायाचं एकहाती निर्दालन करताना मुक्या-बिचाऱया जनतेमधलं सत्त्वाचं स्फुल्लिंग चेतवण्याचा प्रयत्न करतो; त्यासाठी प्रसंगी या जनतेला (पक्षी : प्रेक्षकांना) थेट शिवीगाळही करतो, तीही प्रेक्षकांना फारच भावते. कुणाकडून तरी दटावून घेण्यातही
एक प्रकारचं सुख असतंच ना!
`कोहराम'मध्ये मेहुलकुमारनं `नायका'चे गुण दोघांत विभागलेले आहेत. पहिला आहे कर्नल बलबीरसिंग
सोधी (अमिताभ बच्चन) हा बहादुर लष्करी अधिकारी.
अतिरेक्यांविरुद्धच्या एका मोहिमेत त्याला वीरभद्रसिंग (डॅनी डेन्झोप्पा) या राजकारणी नेत्याची असलियत समजते.
वीरभद्रचं अतिरेक्यांशी असलेलं संगनमत बलबीरच्या एका शूर सहकाऱयाच्या
मृत्यूस कारणीभूत ठरतं, तेव्हा बलबीर लष्करातून पलायन करून वीरभद्रच्या
हत्येचे अयशस्वी प्रयत्न करतो. अशा एका प्रयत्नानंतर झालेल्या
अपघातात तो मारला जातो.
या घटनेनंतर तीन वर्षांनी वीरभद्रज्या
राज्याचा मुख्यमंत्री असतो, त्याच राज्यात दादा-भाई नावाचा एक `मसीहा' उगवतो.
बलबीरच्या चेहऱयाशी मिळत्याजुळत्या चेहऱयाचा दादाभाई हाच बलबीर आहे,
अशी ब्रिगेडियरना (कबीर बेदी) शंका आहे. तिची खातरजमा करण्याची जबाबदारी ते मेजर अजित
आर्यवर (नाना पाटेकर) सोपवतात. बासू चट्टोपाध्याय ऊर्फ `बीबीसी' या बंगाली पत्रकाराचं सोंग सजवून अजित दादाभाईच्या जवळ जातो. त्याच्या सगळ्या सवयी पारखतो. तो बलबीर असूच शकत नाही,
अशी अजितची खात्री पटत आलेली असतानाच...
...
पुढे काय काय होत असेल, याचा सर्वसामान्य हिंदी
प्रेक्षकाचा ठोकताळा चुकणार नाही, अशा वाटेनं हे कथानक पुढे जातं.
सज्जनांचा विजय आणि दुर्जनांचा नि:पात होतो.
अमिताभ-नाना यांचं एकत्र येणं- वावरणं, हा या सिनेमाचा मुख्य आकर्षणबिंदू आहे,
हे ध्यानात घेऊनच कथा- पटकथाकार मेहुलकुमार यांनी
सिनेमाची चतुर रचना केली आहे. अमिताभ-नाना
यांच्या अभिनयाचे काही रंग प्रेक्षकांना अतिपरिचित आणि अतिप्रिय आहेत. त्याच छटा मेहुलकुमार यांनी काहीशी वेगळी डूब देऊन वापरल्या आहेत. दादाभाईच्या रुपातला अमिताभ त्याची `हिट' पुरभय्या बोली आणि लवचिक अभिनयशैली वापरून हलकीफुलकी विनोदनिर्मिती करतो आणि
बलबीरच्या रुपात जोशपूर्ण, करारी, खदिरांगारी
अभिनयदर्शन घडवतो. `बीबीसी'च्या सोंगातला
नाना पाटेकर फर्मास बंगाली उच्चारांतून आणि स्लॅपस्टिक वावरातून धमाल उडवतो आणि कडक,
निधडय़ा छातीच्या मेजर अजित आर्यच्या कर्तव्यनिष्ठ सैनिकाच्या गुणवैशिष्टय़ांची
कमाल दाखवतो.
या दोन्ही मुरब्बी अभिनेत्यांच्या अष्टपैलू अभिनयकौशल्याला वाव देणाऱया भूमिका
रचण्यात मेहुलकुमारांनी निम्मी बाजी मारली आहे. दादाभाई आणि `बीबीसी' यांच्या भेटी, त्यांची
चक्रम मैत्री, त्यातून चाललेली एकमेकांची चाचपणी, एकमेकांची `ओळख' पटल्यानंतर जमणारं
रसायन हा सगळा भाग काहीसा क्लृप्तीबाज असला, तरी या दोघांना `फुल्ल फॉर्मा'त सादर करतो.
सहसा असे दोन अभिनेते एकत्र आले की, प्रेक्षकांना `कोण कुणाला खातंय', याची फार (आणि
अकारण, अन्याय्य) उत्सुकता असते.
पटकथा- संवादकार आणि दिग्दर्शकांचाही तोल अशा वेळी
ढळतो आणि पडद्यावर `मांसाहारी' स्पर्धा
रंगू लागते. मेहुलकुमार यांनी हा मोह टाळला आहे. त्यांच्याइतकाच संयम इक्बाल दुर्राणी यांनी संवादलेखनात दाखवून तमाम `पंचेस'चं समसमान वाटप केलंय. दोघांनाही
पुरेसा आणि समान वाव ठेवलाय. शब्दांची आतषबाजी करायला लावून `शेवटचा पंच ज्याचा तो श्रेष्ठ' असली `त्रिशूल' छाप समीकरणं मांडायची संधी त्यांनी प्रेक्षकांना
दिलेली नाही.
त्यामुळं `कोहराम'मध्ये अमिताभ-नाना यांची खुन्नस नव्हे, तर प्रेक्षणीय जुगलबंदी दिसते. फक्त शेवटचा `क्रांतिवीर'चेच संवाद नानाकडून वदवून घेणारा प्रसंग अमिताभवर
अन्याय करून जातो. अर्थात, अमिताभचे दोन
साधे कटाक्षही `हिसाबकिताब बराबर' करून
टाकतात, हा भाग वेगळा.
भरताडभरती हा मेहुलकुमार यांच्या सिनेमांचा आणखी एक दुर्गुण. इथेही दादाभाईनं प्रतिपाळ केलेल्या अनाथ माँटी-ची (मुकुल देव) अनावश्यक भरताड सिनेमात आहे. त्याचं प्रेमपात्र (आयेशा जुल्का), एक डिस्कोथेकमधलं बोगस गाणं, हा सगळा भाग मूळ कथानकात
संपूर्णतया अनावश्यकच होता. सिनेमा सर्वसमावेशक करण्याच्या हट्टातून
आलेला हा कचरा आहे. अन्यथा, आवर्जून मुकुल
देव आयेशा जुल्का ते गाणं यातलं काहीही पाहण्यासाठी `कोहराम'ला जाणारा प्रेक्षक देवीच्या रोग्याइतकाच दुर्मिळ आहे.
कमरेखालचे विनोद हाही खास पिटातल्या पब्लिकसाठी केला जाणारा गैरप्रकार.
तब्बू आणि नाना यांच्या पहिल्या भेटीत आणि बाथरूमी प्रेमप्रसंगात किमान
दोन वाक्यं अभिरुचीहीन आहेत. तीही नसती, तर फारसं काही बिघडलं नसतं.
बलबीरला वीरभद्रचा पर्दाफाश करण्यासाठी इतर मार्ग का सुचत नाहीत, काश्मीरमधले खरतनाक अतिरेकी कोणत्याही मोहिमेवर भर जंगलातून एकमेकांमागे मालगाडी
करून धावत का जातात, (नायकानं त्यातल्या एकेकाला मागच्या मागे
`उडवावं,' ही सिनेमाची सोय सोडून व्यावहारिक
कारण काय?) मध्यंतरानंतर माँटी आणि मंडळी कुठं गायब होतात,
वगैरे प्रश्न पाडून घेणाऱयांनी या सिनेमाच्या वाटेला जाऊ नये.
या सगळ्या `सिनेमॅटिक लिबर्टीज्' मान्य केल्या, तर पुरेसा वेगवान, घटनाप्रधान, आटोपशीर, रंजक आणि
माफक थरारक सिनेमा पाहिल्याचं समाधान `कोहराम' देतो. एरवी अनावश्यक ठरणारा नाना-तब्बूच्या प्रेमप्रकरणाचा भाग विनोदी डूब दिल्यानं मजा आणतो. सिनेमाच्या शेवटी होणारा दुर्जनांचा नि:पातही `डोकॅलिटी' लढवून केल्यानं उत्कंठावर्धक झाला आहे.
अमिताभ बच्चनचं खरं पुनरागमन् `कोहराम'मध्ये झालं आहे. `मेजरसाहब', `मृत्युदाता'
वगैरे `आपत्ती' पटांमध्ये
अमिताभ कॅमेऱयासमोर हरवल्यासारखा वाटत होता. पाटय़ा टाकल्यासारखा
अभिनय करत होता. सुदेश भोसलेनं अमिताभसाठी काढलेला नकली आवाजच
देहरूप धारण करून पडद्यावर वावरतोय, असं वाटायचं हा अमिताभ पाहताना.
`कोहराम'मध्ये `ही इज बॅक
इन हिज एलिमेन्टस्'. समरसून आणि मनापासून काम करणारा हा अमिताभ
पाहणं आल्हाददायक आहे.
विनोदाचं टायमिंग, अजोड संवादफेक, संयत आणि उत्कृष्ट भावदर्शन ही सगळी अस्त्रं
अमिताभनं परजून चकचकीत केली आहेत, या सिनेमात. तीच गोष्ट नानाची. नानाला पडद्यावर नवनवी सोंगं काढण्याची
हौस आहे. इथे त्याचं बोंगाली रुप अगदी `भीषण' (बंगाली अर्थानं) शुंदोर!
दाढी, पोनी- टेलधारी रुपात
तो झकास दिसतो, खुलून वावरतो, तब्बूबरोबर
एकदम `सुटेश' नाचबीच करतो. तब्बूबरोबरच्या, विशेषत: बाथरूममधल्या
प्रेमप्रसंगात त्याच्या क्रिया-प्रतिक्रिया दिल खूश करून टाकतात.
अजित आर्यच्या रुपात तो कडक दिसतो- वागतो.
अन्य कलाकारांमध्ये तब्बू, डॅनी, मुकेश ऋषी आणि खास वाव नसलेला मुकुल देवही समाधानकारक साथ देतात. जयाप्रदाची भूमिका जेमतेम तीन-चार वाक्यांची असली,
तरी कथानकातल्या स्थानामुळे ती लक्षात राहते.
रसूल इल्लोर यांचं छायालेखन, युसूफ शेख यांचं संकलन,
भिखू वर्मा यांची साहससदृश्यं या भक्कम तांत्रिक बाजूंमुळे सिनेमाचं
एकूण रुपडं देखणं आणि बंदिस्त झालं आहे. संगीताला फारसा वाव नसलेल्या
या सिनेमात संगीतकार दिलीप सेन- समीर सेन यांची कामगिरी अगदीच
सुमार आहे.
मेहुलकुमार यांनी `मृत्युदाता'मध्ये
केलेल्या पातकांचं परिमार्जन करण्याच्या जिद्दीनं `कोहराम'
काढला असावा, अशी सफाई या सिनेमात आहे.
अमिताभ आणि नाना यांच्या चाहत्यांचे पैसे वसूल करून देणारा `टाईमपास' त्यांनी पुरवलाय हे नक्की.
No comments:
Post a Comment