Tuesday, January 3, 2012

पडद्यावरचा 'भाद्रपद' (जुडवा)


हिंदी सिनेमाकडून मनोरंजन करून घ्यायचं तर आपल्या निर्बुद्धतेचं प्रमाणपत्रच सादर करायला हवं का?
  कबूल बुद्धीला चालना वा खाद्य देण्यासाठी  हिंदी   सिनेमा काढायची-पाहायची परंपरा नाही. ती डोकं घरी ठेवूनच पाहायची-भोगायची चीज आहे. हिंदी सिनेमाची दुनिया कल्पिताची, अवास्तवाची, अद्भुताची अजब दुनिया आहे... एका आटपाटनगर... फँटसीलँड.
  प्रेक्षकाला जे जे भोगावंसं वाटतं त्याचं प्रतीक असलेली नायिका, जे जे नाकारावंसं, फोडून काढावंसं वाटतं त्याचं प्रतीक असलेला खलनायक आणि जे जे करण्याची वांझ इच्छा असते त्याची पूर्ती करणारा अतिमानवी (प्रसंगी दैवीसुद्धा) नायक... अशी पुराणकथांपासून चालत आलेली मांडणी हिंदी सिनेमानं जपली आहे. त्यासाठी अतर्क्याचा आधारही क्रमप्राप्तच.
   पण अतर्क्याचीही एक तर्कसंगती असतेच. अतर्क्य व्यावसायिक हिंदी सिनेमाचे परमआचार्य गणल्या गेलेल्या मनमोहन देसाइभसारख्या गणल्या गेलेल्या मनमोहन देसाइभसारख्या `निझाम ऑफ नॉन्सेन्स' म्हणवल्या जाणाऱया दिग्दर्शकानं `लहानपणीच दुरावलेले आप्तजन' या एकाच फॉर्म्युल्यावर सतत यशस्वी चित्रपट दिले ते या तर्कसंगतीच्या आधारे. आज मनमोहन देसाइभचा वारसा सांगणाऱया डेव्हिड धवनसारख्या दिग्दर्शकाला मात्र ही तर्कसंगती सापडलेली नाही हेच `जुडवा'मधून स्पष्ट होतं.
  `जुडवा' दैवयोगानं लहानपणीच दुरावलेल्या जुळ्या भावंडांची गोष्ट आहे. हिंदी सिनेमातल्या जुळ्यांच्या यशस्वी फॉर्म्युल्याच्या परंपरेनुसार एक टपोरी बनतो. दुसरा अमेरिकेत जाऊन उच्चविद्याविभूषित होतो. टपोरीची नायिका करिश्मा कपूर. उच्चशिक्षिताची नायिका रंभा. दोन्ही नायक (सलमान खान) एका शहरात एकत्र आल्यानं समज-गैरसमजांची मालिका निर्माण होते. एकाला ओळखणाऱयांपुढे दुसरा आल्यावर मंडळी वारंवार चक्रावून जातात. यथावकाश दोघांचा सामाना होतो. दोघे मिळून खलनायकांचा नि:पात करतात आणि पुढे साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण वगैरे नेहमीचाच सरधोपट मामला.
  आता जुळ्यांची कथा हे हिंदीतल्या नेहमीच्या सत्-असत् प्रवृत्तींच्या संघर्षाच्या मांडणीचा एक प्रकार आहे. इथे एकसारख्याच दिसणाऱया दोन माणसांना दोन भिन्न प्रवृत्तींचा मुखवटा चढवला जातो. दोघेही `नायक' असल्यानं (किंवा `सिता और गीता'मध्ये `नायिका' असल्यानं) असत् प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करणाऱया भावंडालाही `मनानं चांगलं' असण्याचं बंधन असतं. दोघांना पूर्णपणे काळ्या-पांढऱया रंगात रंगवून एकाची दुसऱयावर मात दाखवण्याचं धाष्टर्य़ हिंदी सिनेमानं फारसं दाखवलेलं नाही.
  जुळ्यांची कथा सादर करताना मुख्य उद्देश असतो गंमत घडवून आणण्याचा. एखाद्या चेहऱयाचं एक विशिष्ट व्यक्तिमत्व गृहीत धरणाऱया अन्य पात्रांसमोर तोच चेहरा विरोधी व्यक्तिमत्त्वासह आला तर जी धमाल उडेल ती दाखविण्याचा. `जुडवा'चंही हेच माफक उद्दिष्ट आहे. पण जुळ्यांची धमाल `डेव्हिड धवन शैली'त दाखवण्याच्या हव्यासामुळं `जुडवा' बीभत्स झाला आहे.
 संस्कृती नव्हे विकृतीच
  डेव्हिड धवनला हिंदीतला दादा कोंडकेही म्हटलं जातं. (त्याची जोडी दादांचा `जुळा भाऊ' दिसणाऱया गोविंदाशी जास्त जमते हा योगायोग नाही.) दादांच्या सिनेमाला, त्यांच्या द्व्यर्थी संवादांना निदान रांगडय़ा मराठी ग्रामीण संस्कृतीचा, मराठी भाषेतील लवचिकतेचा आधार तरी आहे. हिंदी भाषेत ती `मजा' नाही आणि डेव्हिडच्या सिनेमातली संस्कृती भारतातल्या कोणत्याही कोपऱयात आढळणार नाही अशी विकृतीच आहे.
  डेव्हिडची एक नायिका करिश्मा कपूर टपोरी सलमानवर प्रेम करते. तिचा प्रेमाची व्याख्या काय तर शक्य तेव्हा, शक्य तिथे नायकाला शक्य तेवढय़ा मिठय़ा मारणे
  करिश्माचे वडील (कादर खान) आणि दुसरी नायिका रंभा हिची आई (बिंदु) यांच्यात अहमहमिका सुरू असते अमेरिकेतल्या सलमानला जावई म्हणून गटवण्याची. त्यासाठी बिंदू सलमानला वारंवार आपल्या मुलीच्या अंगावर ढकलते. भावी जावई आणि आपली मुलगी यांना बेडरूममध्ये पाठविण्याचा दोघांचा अट्टाहास सुरू असतो आणि तो पूर्ण झाला की, दोघांनाही कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.
  मनुष्यप्राण्यांचा `भाद्रपद'
  मनुष्यप्राण्यांच्या या डेव्हिड धवनकृत `भाद्रपदा'त डेव्हिडचा लाडका शक्ती कपूरही टपोरी सलमानच्या तोतऱया मित्राच्या भूमिकेत येतो. दादा कोंडकेंप्रमाणे `नाडा' बाहेर लोंबणारी चड्डी त्यानं परिधान केलेली असते, हाही इथं योगायोग नाही. त्याच्या तोतऱया बोलीतून इशे वसूल करण्याचा डेव्हिडचा प्रयत्न शक्तीच्या बोलीतच सांगायचं, तर `तोतरा' (तोकडा) पडतो.
  हास्यनिर्मितीसाठी डेव्हिडनं जुळ्यांमधल्या आंतरिक जोडणीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यातल्या एकानं एखादी `ऍक्शन' केली की, दुसऱयाकडून नकळत आणि आपोआप ती तीच ऍक्शन घडते, हे या जोडणीचे सूत्र. `शेरदिल'मध्ये कादर खाननं जुळ्या खलनायकांच्या भूमिकेत ही गंमत पूर्वी केली आहे.
  अनुपम खेर आणि सतीश शाह या पोलिसांच्या विनोदी जोडीतील सतीशचा खलनायकानं मुडदा पाडल्यावर अनुपम दु:खाचा गंभीर भावविष्कार करतो आणि दुसऱयाच सीनमध्ये हसत खेळत डेव्हिडच्या `गंमती'त सामीलं होतो. दोन्ही नायिकांची अदलाबदल होते तेव्हा याची नायिका त्याच्याकडे गेली म्हणून किंवा त्याची त्याच्याकडे आली म्हणून नैतिकदृष्टय़ा काही गैर घडलं, असं आपल्याला वाटत नाही; कारण सगळे एकाच माळेचे मणी.
जुडवा सलमान भरपूर गोंधळानंतर एकमेकांना समोरासमोर भेटतात एकमेकांना पाहून आश्चर्य व्यक्त करणं, आतापर्यंत झालेल्या गोंधळाचा उलगडा होणं आणि पुढचा कार्यक्रम आखणं, हा सगळा कार्यभाग ते `तेवढय़ाशा' वेळात उरकून निरोपही घेतात. कारण दिग्दर्शकाला `वेगवान' सिनेमा बनवायचाय.
  आधुनिक तंत्र वायाच
 कोणतेही बौद्धिक कष्ट न घेता रचलेल्या सरधोपट पटकथेवर हिणकस विनोदांचा हुकमी आधार घेऊन डेव्हिड धवननं `जुडवा' बनवलाय. निर्माता साजिद नडियादवालानं तो `लॅव्हिश' व्हावा, यासाठी भरपूर पैसा ओतलाय. डिजिटल साऊंड'चं अत्याधुनिक तंत्र ध्वनीपरिणामांतून प्रभावी करण्याची ताकद असलेलं हे तंत्र `जुडवा'मध्ये गाढवापुढे वाढलेला गूळ ठरतं. ठणठणाटी पार्श्वसंगीत आणि कर्कश्श् गाणी कर्णभेदी करण्यापुरता त्याचा वापर करून दिग्दर्शकानं हे तंत्र पूर्णपणे वाया घालवलं आहे.
  सलमान खानचा डेव्हिडनं `जुडवा'त पुरता `गोविंदा' केला आहे. सुरुवातीला टपोरीच्या भूमिकेत थोडा बुजलेला सलमान नंतर चांगलाच `सुटला' आहे. त्याच्या चॉकलेटी चेहऱयामुळे एकंदर सिनेमाची बीभत्सता थोडी कमी झाली आहे, हे त्यातल्या त्यात बरे. करिश्मा आणि रंभा यांना तोकडय़ा, घट्ट कपडय़ांमध्ये घडीघडीला नायकांना बिलगण्याचं किंवा त्यांना बिलगायला भाग पाडण्याचं काम आहे. बाकीच्यांबद्दल बोलायलाच नको.
  नृत्ये वेगळेपणामुळे प्रेक्षणीय
 अनु मलिकनं सिनेमाच्या `प्रकृती'ला साजेशी ठेकेबाज गाणी दिली आहेत. `तू मेरे दिल मे बस जा', `इस्ट ऑर वेस्ट', `उंची है बिल्डींग' आणि `टन टना टन टन टन टारा' ही गाणी लोकप्रियही झाली आहेत. नृत्यदिग्दर्शक गणेश आणि `रंगीला' फेम अहमद खान यांनी गाण्यांची भरपूर दृश्यांत विभागणी करून वेगवान संकलनातून गाणी गतिमान करण्याची चालू परंपरा मोडली आहे. एकाच मोठय़ा दृश्यात नर्तकांच्या समूहाकडून वेगवान हालचाली करवून घेऊन गाण्यात वैविध्य आणण्याचा त्यांचा प्रयत्न वेगळा असल्यानं प्रेक्षणीय आहे.
 हिंदी सिनेमाकडून मनोरंजन करवून घेण्यासाठी आवश्यक निर्बुद्धतेचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता धावाधाव करायला नको. `जुडवा'चं तिकीट त्यासाठी पुरेसं आहे.

No comments:

Post a Comment