ती : गेली सात वर्षं आपण एकत्र फिरतोय.
एकमेकांबरोबर झोपतोय. आता मला मूल हवंय.
तू माझ्याशी लग्न कधी करणार आहेत?
तो : माझा लग्नबिग्न
भानगडींवर विश्वास नाही. आपण आहोत असे ठीक आहोत.
---------------------------
दुसरा तो : माझं तुझ्यावर प्रेम आहे.
पहिलीच ती : पण तू माझ्यापेक्षा वयानं खूप लहान आहेस.
दुसरा तो : माझी हरकत नाही. सगळ्यांनी ठरीव पद्धतीनं लग्न करावं,
असा काही नियम नाही.
----------------------------
पहिला तो : तू त्या लहान पोराबरोबर फिरतेस हे काही मला बघवत नाही. त्यातून तो बिचारा आशेवर टांगून राहील आणि मलाही उगाच असूया वाटत राहील.
आपण लग्न करूया.
---------------------------
दुसरा तो : माझ्या
पुराणमतवादी आजीचं मन मी वळवलंय. आपल्या लग्नाला तिची परवानगी
आहे. आपण करूया लग्न.
----------------------------
ती कुणाबरोबर लग्न करणार? पहिल्याबरोबर की दुसऱयाबरोबर?
----------------------------
`जहाँ तुम ले चलो'च्या कर्त्यांनी ठरवलं असतं, तर हा सिनेमा या चार प्रसंगांमध्येच
आटोपला असता. कारण सगळ्या सिनेमाचं सार या चार प्रसंगांमध्ये
सामावलंय. शेवटचा प्रसंग प्रश्नार्थक असला, तरी चाणाक्ष प्रेक्षकांना त्या प्रश्नाचं उत्तर एवढंच वाचूनही कळेल आणि ते
बरोबर असेल. मग, एवढय़ाशा जिवाच्या कथानकावर
संपूर्ण सिनेमाचा वेळ (आणि पैसा, अभिनय
वगैरे बरंच काही) कशाला खर्च केलाय?
हा सिनेमा पाह्यल्यावर हाच प्रश्न
पडतो.
आता कुणी म्हणेल की, वास्तवातले नातेसंबंध काही इतके त्रोटक आणि व्यवहार कठोर नसतात. त्यांत काही आंदोलनं, चढउतार आणि (सिनेमासाठी उपयुक्त) नाटय़ असतं. तेच सिनेमात दिसले, तर प्रेक्षक आशयाशी तादात्म्य पावू
शकतो. सिनेमाचा आनंद लुटू शकतो.
अगदी बरोबर! पण `जहाँ तुम ले चलो'मध्ये दोन-अडीच तास अनेक प्रसंग, गाणीबिणी घडूनही त्या अर्थानं
काहीच घडत नाही. साबणाच्या फेसाचा बुडबुडा कुशलतेनं खूप फुगवला,
त्याच्यावर इंद्रधनुष्यही चमकलं, तरी तो बुडबुडा
क्षणजीवीच राहतो. त्याचा साधा फुगासुद्धा होत नाही. तशी या सिनेमाची गत आहे. त्याचा कुठलाच परिणाम प्रेक्षकांवर
राहत नाही.
नम्रता शौरी (सोनाली कुलकर्णी) ही एक नामांकित पत्रकार आणि स्त्राeवादी चळवळीतली कार्यकर्ती. शांतनु आर्य (निर्मल पांडे) या फॅशन फोटोग्राफरबरोबर तिचे प्रेमसंबंध
आहेत... आधुनिक `लिव्ह इन' स्वरुपाचे. तिला मूल हवंय, त्यासाठी
लग्न हवंय. शांतनुला मात्र मॉडेल्सबरोबर मजा मारण्याचं स्वातंत्र्य
हवंय. तो लग्नाच्या बेडीत अडकू इच्छित नाही.
शांतनुच्या `व्यस्त' दिनक्रमामुळे एकटय़ा पडलेल्या नम्रताची अचानक
आकाशशी (जिम्मी शेरगिल) भेट होते.
तो तिच्यावर प्रेम करतो, लग्न करू इच्छितो.
तो तिच्यापेक्षा वयानं लहान, पोरसवदा आहे.
पण त्याची प्रेमभावना प्रबळ आणि परिपक्व आहे. आपली
आकाशशी झालेली जवळीक शांतनुला खटकते, हे लक्षात आल्यावर ती वाढवून
शांतनुला लग्नासाठी तयार करण्याची खेळी नम्रता नकळतच खेळून जाते. ती यशस्वी होऊन शांतनु तिच्याशी लग्न करायला तयारही होतो. पण तोवर आकाशही तिच्यात गुंतून जातो.
आता नम्रतापुढे प्रश्न आहे,
लग्न कुणाशी करायचं हा!
व्यावसायिक हिंदी सिनेमांनी `य' वेळा चघळून चोथा केलेला हा प्रेमत्रिकोण इथे आधुनिक
पेहरावात येतो. नम्रता-शांतनुचे लग्न न
करताचे शारीर संबंध, नम्रता-आकाश यांच्यांतली
वयाची तफावत या घटकांमधून ही कथा आधुनिक आणि `बोल्ड' होते, अशी समजूत पटकथाकार सूरज-सनीम आणि दिग्दर्शक देश दीपक यांनी करून घेतली आहे. प्रत्यक्षात
मात्र हा सिनेमा ठरलेल्या वळणांनी ठरलेल्या शेवटाकडे जातो, तेव्हा
त्याच्यातल्या वेगळेपणाची कलाबूत उघडी पडते.
नम्रताचं पत्रकार आणि स्त्राeवादी चळवळीची कार्यकर्ती असणं दाखवतानाच पटकथाकारांचं अज्ञान उघडं पडतं.
नम्रता दैनिकात काम करताना दाखवली आहे. या दैनिकाच्या
कार्यालयातले कर्मचारी बँकेतल्यासारखे सहा वाजता घरी जातात, ऑफिस
ओस पडतं. नम्रता आपले लेख `डिक्टेट'
करते आणि ते शॉर्टहँडमध्ये उतरवून घ्यायला एक लेखनिकही नेमली आहे.
देशभर नाव असलेल्या स्तंभलेखिकेला संपादक `कुकरी
शो'च्या रिपोर्टिंगला पाठवतात आणि तीही जाते. हे लेखकद्वयींनं कोणत्या दैनिकाच्या कार्यालयात पाहिलंय देव जाणे!
राज्याचा एक मंत्री घरातल्या कामवालीवर
बलात्कार करतो. त्यावर नम्रतानं काढलेला मोर्चाचा उपाय,
तो मार्चा, मंत्र्याच्या माणसांनी केलेली मारहाण
वगैरे प्रसंग लेखकाचं राजकीय अज्ञानच दर्शवतात. या प्रसंगामुळे
नम्रताची व्यक्तिरेखा पोकळ होऊन जाते. तिची पत्रकार- कार्यकर्ती म्हणून परिपक्वता कुठेच दिसत नाही.
स्वतंत्र बाण्याची स्त्राe
म्हणून ती व्यक्तिगत संबंधांमध्येही धड स्पष्ट होत नाही. तिच्या घरी (वेळ मिळेल तेव्हा) रात्री येणारा शांतनु प्रत्येक वेळी आल्या-आल्या तिच्या
शरीराशी लगट करतो. तिच्यावर प्रेम असल्याची काव्यात्म शब्दांतून
ग्वाही देत राहतो आणि लग्नाचा विषय टाळून सकाळी निघून जातो. सात
वर्षांच्या सहवासानंतरही ज्याचं प्रेम शारीर असोशीपलीकडे गेलेलं नाही, त्याच्याशी लग्न करण्याचा नम्रताचा अट्टाहास प्रेक्षकाला समजू शकत नाही.
`दिल की मजबुरी' म्हणून तोही मान्य केला,
तरी इतका उठवळ माणूस आपल्याशी लग्न करेल, असा विश्वास
नम्रताला कसा वाटतो? तो इतर मैत्रिणीबरोबरही शरीरसंबंध ठेवून
आहे, हे नम्रताला इतक्या वर्षांत कळत कसं नाही? हे प्रश्न सिनेमात अनुत्तरीत राहतात. अनुत्तरीत राहणारा
सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे नम्रतासारखी सुजाण स्त्राe नेमक्या
कोणत्या धाग्यानं शांतनुशी बांधली गेलीये, हा आहे.
नम्रताचं आकाशबरोबरचं वर्तनही असंच
कोडय़ात पाडणारं. आधी त्याला स्पष्ट नकार देणारी नम्रता नंतर मात्र
त्याच्याशी जवळीक वाढवत राहते. तो लहान आहे, त्याचा गैरसमज व्हायला नको, याची खबरदारी घेत नाही.
शांतनुशी लग्न ठरल्यावर ती एक रात्र आकाशबरोबर बाहेर राहते. ती आपल्याशी लग्न करणार, असा आकाशचा झालेला गैरसमज ताबडतोब
दूर न करता हळहळं-हळुहळुं बोलत राहते आणि भल्या सकाळी त्याच्यावर
लग्नाच्या बातमीचा बॉम्ब टाकते, तेव्हा तर ती क्रूरच वाटते.
आकाश आणि नम्रता यांच्यातील संबंधांना
आक्षेप घेताना शांतनु `मी पुरुष आहे. मी
काहीही केलं, तरी क्षम्य आहे. मी `आसमाँ' आहे, तू धरती आहेस.
उद्याची पिढी जन्माला घालणारी धरती पवित्र असली पाहिजे,' वगैरे पुरुष वर्चस्ववादी बकवास बकतो. तरीही नम्रता त्याच्याशीच
लग्न करण्याचा निर्णय घेते, हे ही अनाकलनीय आहे.
कथानकाच्या ठरीव साच्यानुसार प्रसंग
बेतताना त्यात काही कार्यकारणभाव आणि तर्कशुद्धता असायला हवी, याचं लेखकांनी भान बाळगलेलं नसल्यानं `जहाँ तुम...'
विशविशित आणि खोटाखोटा वाटत राहतो. मुद्दा सोडून
भरकटत राहणारी अतिकाव्यात्म संवादभाषाही यादृष्टीनं मारकच ठरते. कथा एका दिशेला, पटकथा दुसऱया दिशेला, संवाद तिसरीकडे आणि दिग्दर्शन चौथीकडे अशी दिशाहीन स्थिती झालेला हा सिनेमा
प्रेक्षकाला कुठेच घेऊन जात नाही.
दिग्दर्शक देश दीपक यांनी तंत्रशुद्ध
सफाई म्हणजेच दिग्दर्शन अशी समजूत करून घेतली आहे. एकीकडे ते
`बोल्ड' होण्याच्या हव्यासापायी (तेही गल्लापेटीवर डोळा ठेवून) अर्धावृत्त मॉडेल्सचं गाण्यांमध्ये
अंगप्रदर्शन घडवतात. नम्रता-शांतनु यांच्यातला
(संपुर्णतया अनावश्यक) बेडसीन तपशीलवार
दाखवतात. गंमत म्हणजे हा सीन त्यांच्या अपेक्षेनुसार गरमागरम
न होता हास्यास्पदच झाला आहे. नम्रता-शांतनुच्या
चेहऱयावरचे तेच ते कथित इरॉटिक भाव, ती अर्धवट चुंबनं,
सेन्सॉरच्या चौकटीत राहण्यासाठी दिवा विझवून केवळ शरीराच्या प्रकाशमान
बाह्यरेषांमधून दिसणारी साचेबंद झटापटी... हरे राम! या एका प्रसगांमुळे नम्रता-शांतनु यांची सात वर्षांची
`ओळख' आहे, हे गृहीतकच
कोलमडून पडेल इतक्या अपरिपक्व पद्धतीनं तो चित्रित झालाय.
नम्रताच्या मनानं आरशातून तिच्याशी
वाद घालणं, तिच्या फडताळावर एकीकडे शांतनुची तस्वीर आणि समोरच
आकाशनं भेट देलेली परफ्यमूची `प्रतिस्पर्धी' बाटली, शांतनुच्या फोटोप्रदर्शनात नम्रताचा फोटो आकाशनं
विकत घेणं आणि फोटोच्या रुपकातून दोघांमध्ये घडणारा (`तस्वीर
तुम्हारे पास है लेकिन निगेटिव्ह तो मेरे पास है' वगैरे)
बालिश खटकेबाज संवाद आणि त्यांच्याशी त्रिकोण साधून तो ऐकणारी नम्रता
वगैरे पारंपारिक ढोबळपणा हा आधुनिक सिनेमा टाळू शकलेला नाही.
त्यातल्या त्यात आकाशचं व्यक्तिरेखाटन
(तो बालिशच असल्यामुळे की काय?) बऱयापैकी
जमलेलं आहे. घरचं बक्कळ असल्यानं त्याला उत्कट प्रेमाची चैन परवडते
आणि निष्फळ ठरत चाललेल्या प्रेमात त्यानं गुंतून राहणं वयामुळं क्षम्य वाटतं.
नम्रताशी लग्नाला परवानगी न दिल्यास घराच्या छतावरून उडी मारण्याची त्यानं
दादीला (निरुपा रॉय) दिलेली धडकी आणि दादीनं
त्याला `मार उडी' म्हणून खिजवण्याचा प्रसंग
बऱयापैकी खुसखुशीत झालाय.
एकूणातच डळमळीत वाटेनं जाणाऱया `जहाँ तुम...'चा क्लायमॅक्स तर फारच भुसभुशीत आहे.
नववधूच्या वेशात भटजीसमोर बसलेली नम्रता शांतनुची वाट पाहते आहे.
तो घरून निघतो तेव्हा (तोवर शांतनुला न `बधलेली') एक मॉडेल मैत्रीण त्याला घरातच गाठते.
तोही लग्न सोडून हाती आलेल्या संधीचा `लाभ'
घ्यायचं ठरवतो. हे अतर्क्य मानलं नाही,
तर पुढे काय घडतं ते पाहावं. नववधू नम्रता आणि
वऱहाडी मंडळी दोन तास खोळंबून राहतात. (एकालाही शांतनुच्या घरी
जाऊन यावंसं वाटत नाही.) दिवसाची रात्र होते, वऱहाडी निघून जातात तरी शांतनु येत नाही. शांतनुच्या
अमानवी `पौरुषा'बद्दल अत्याधिक आदरच निर्माण
करणारा प्रसंग आहे हा! चार-सहा तास...?
आता पुढे काय घडतं हे सांगायला नकोच.
हा सिनेमा `बघवतो'
ते सोनाली कुलकर्णीच्या पारदर्शी भावदर्शनामुळे. लेखकदिग्दर्शकांनी तर्काचं कोणतंच अधिष्ठान न दिलेली नम्रताची भूमिका सोनालीनं
जास्तीत जास्त समजून घेऊन साकारली आहे, भावभिव्यक्तीतून तिच्या
व्यक्तित्त्वाचं काही `इटरप्रिटेशन' करण्याचा
प्रयत्न केला आहे. ती आकाशपेक्षा (सांगते
तेवढी) मोठी दिसत नसतानाही तशी भासते, हे
तिचं यश. `शौक ख्वाब का है तो' या गाण्यात
आरशातला चेहरा आणि खरा चेहरा यांच्यातला झर्रकन् घडणारा भावबदल `गिमिकी' असला, तरी कौतुकास्पद.
निर्मल पांडेचा शांतनु लेखकानं ढकललेल्या
गर्तेतून बाहेर पडत नाही. एकसुरी भावहीन संवादफेकीला तो नैसर्गिक
अभिनय मानतो, असं वाटतं. त्या तुलनेत जिम्मी
शेरगिल या नवोदित अभिनेत्यानं पहिल्याचं सिनेमात समंजस अभिनयदर्शन घडवलंय. आकाशच्या भूमिकेत फिट्ट बसणारा चेहरामोहरा त्याला लाभलाय आणि सर्वात चमकदार
संवादही त्याच्याच वाटय़ाला गेले आहेत. निरूपा रॉय दादीच्या भूमिकेत
बऱयाच दिवसांनी रुपेरी पडद्यावर दिसल्या आहेत. ही त्यांची हातखंडा
भूमिका त्यांनी सराईत गोडव्यानं साकारली आहे.
तांत्रिक बाजूंमध्ये सर्वात उल्लेखनीय
आहे छायालेखक राजन किनागी यांची कामगिरी. उच्चभ्रू वातावरणात
घडणाऱया या सिनेमाचं दृश्यरुप केवळ चकाचक नाही. बंदिस्तचित्रणात
(इनडोअर) प्रकाशयोजनेतून आणि बाह्यचित्रणात
योग्य वेळा निवडून त्यांनी त्या-त्या प्रसंगांचा मूड पकडला आहे.
बंदिस्तचित्रणात बिस्वजीत रॉय यांच्या अभिरुचीसंपन्न कलादिग्दर्शनाचीही
साथ त्यांना लाभली आहे, `देखो तो आसमाँ' आणि `थक गई हो तो सुनो' ही आऊटडोअर
गाणी देखणी झाली आहेत. त्यात अहमद खानच्या सहजस्फूर्त नृत्यदिग्दर्शनाबरोबरच
राजन किनागींच्या दृश्यचौकटींचा वातावरणनिर्मितीचा मोठा वाटा आहे.
गुलजार यांची गाणी आणि विशालचं संगीत
हे `कॉम्बिनेशन' आता `रिपिटिटिव्ह' होऊ लागलंय. सर्व
गाणी खास गुलजार पद्धतीनं अर्थवाही असली, तरी संगीतरचना मात्र
(विशेषत: वाद्यवृंद संयोजन) एकसाची वाटते. तो साचाही `सत्या'च्या `ये मुझे क्या हो गया'चा.
`चाहने'से चाहा जाना' ज्यादा
अच्छा होता है। चाहना चाहनेवालेको कभीकभी बहुत जलील करता है।' हा व्यवहारसिद्ध शहाणपणा या सिनेमात नेमक्या शब्दांत व्यक्त होतो तो अगदी शेवटीशेवटी.
या `संदेशा'साठी संपूर्ण
सिनेमा पाहण्याची, म्हणजेच `जहाँ डायरेक्टर
ले चले' तिथे (म्हणजे कुठेच न) जाण्याची तयारी हवी.
:) masta khuskhushit lihiley. aavadale.
ReplyDelete