माणूस आपल्या दुष्कृत्यांपासून, पापांपासून, इतर
माणसांपासून दूर पळू शकतो पण त्याचं कर्म त्याला गाठतंच, त्याची
नियती त्याचा हिशोब चुकता करतेच आणि सगळ्यापासून दूर पळणारा माणूस स्वत:पासून पळणार कुठे?
`विश्व
विधाता'चा नायक जय वर्मा तर भूतकाळापासून दूर पळण्यासाठी प्लॅस्टिक
सर्जरी करवून घेऊन नव्या चेहऱयाचा, नव्या ओळखीचा, नव्या नावाचा संपूर्णपणे वेगळा भासणारा अजय खन्ना बनतो. पण त्याची नियती त्याला सोडत नाही. त्याचा मुलगा जन्म
घेतो त्याचाच मूळ चेहरा घेऊन... जय वर्माचा चेहरा घेऊन.
हा चेहराच जय वर्माच्या चेहऱयावरचा अजय खन्नाचा मुखवटा ओरबाडून काढतो.
प्रथमदर्शनीच वेगळी, सशक्त, आव्हानात्मक वाटणारी ही नाटय़पूर्ण कथा.
हिंदी सिनेमाच्या ठोकळेबाज फॉर्म्युल्यांना कंटाळलेल्या प्रेक्षकांना
तर वाळवंटात ओऍसिस सापडल्याचा आनंद देणारी. पण अनेकदा वाळवंटातल्या
ओऍसिसच्या जवळ गेलं की लक्षात येतं, हे तर मृगजळ. `विश्वविधाता' हे ओऍसिसचा मुखवटा घातलेलं मृगजळच ठरतं
कल्पनाशून्य हाताळणीमुळे.
जय वर्मा (शरद
कपूर) हा बेकार पण भला तरुण. आईच्या ऑपरेशनसाठी
अचानक पैसे देणाऱया देवतास्वरुप माणसाच्या, मुकेश माथुरच्या (अर्जुन) उपकाराखाली दबलेला. उपकारांची
फेड म्हणून मुकेश जयला एका दहशतवादी घातपातात सहभागी करून घेतो. या घातपातात अनेक शाळकरी मुलांचा मृत्यू ओढवतो. आपल्या
पापाची कबुली देऊन पोलिसांच्या स्वाधीन होऊ पाहणाऱया जयवर दहशतवादी हल्ला करतात.
त्यातून त्याला मुकेश् माथुरच वाचवतो.
साध्यासरळ जयचं दहशतवादाच्या चक्रात
विपाड होऊ नये, या सद्हेतूनं मुकेश त्याला शारजाला पाठवतो.
तिथेही दहशतवाद्यांचा नेता रायबहादूरचे (आशिष विद्यार्थी)
साथीदार त्याचा पिच्छा सोडत नाहीत. सगळीकडून कोंडी
झालेल्या जयला मुकेश माथुर मार्ग सुचवतो प्लॅस्टिक सर्जरी करून `नवा' माणूस बनण्याचा.
प्लॅस्टिक सर्जरी करवून घेऊन जय वर्मा
बनतो अजय खन्ना (जॅकी श्रॉफ). पाच वर्षांत
करोडपती बनून तो भारतात परततो. उद्योगधंद्यांचं जाळं पसरवतो.
पूर्वाश्रमीची त्याची प्रेयसी राधाही (आयेशा जुल्का)
त्याला भेटते. बदनामीचा डाग लागलेल्या जय वर्माला
ती स्वीकारणार नाही, या भीतीनं तो सच्चाई लपवून अजय खन्नाच्या
रुपातच तिच्याशी लग्न करतो, अजय खन्ना बनूनच तिच्याशी संसार करतो.
अजय खन्नाचा मुलगा रवी पोलिस ऍकॅडमीतलं
शिक्षण संपवून परततो आणि अजय - राधा यांना (वेगवेगळ्या कारणांसाठी) धक्काच बसतो. रवीनं तोंडवळा उचललेला असतो जय वर्माचा. मधली वर्षे परदेशात
काढून परतलेल्या रायबहादुरची दहशतवादी घातपाती कृत्यं पुन्हा सुरू होतात आणि जय वर्माचा
सहभाग असलेल्या जुन्या घातपाताची फाईल पुन्हा उघडते.
रवीकडेच ही केस सोपविली जाते.
जय वर्माच्या चेहऱयाशी त्याच्या चेहऱयाचं साधर्म्य असल्यामुळं.
या कोडय़ातला एकेक तुकडा जुळत जातो आणि रवीचा शोध स्वत:च्या वडिलांपाशीच संपतो. प्लॅस्टिक सर्जन रे यांनी दिलेल्या
केस फाईलच्या आधारावर अजय खन्ना हाच - आपला बापच जय वर्मा असल्याचं
रवीला उमगतं. मग खलनायकांचा नि:पात आणि
राधा - अजयचा मृत्यू हे प्रसंगोपात्त घडून येतंच.
या कथानकाचं कथाबीज (मूळ इंग्रजी चित्रपटावरून उचललेलं असल्यानं) चमकदार.
अनुवंशशास्त्राचा भक्कम आधार असलेलं. भरपूर नाटय़
भरता येण्याजोगं. पण त्याचं भारतीयीकरण करताना पटकथा-
संवादकार तलत रेखींनी हे बीज सुपीक मातीत न पेरता त्याच्यावर फॉर्म्युल्याचे
दगड रचून त्याचा जीव घुसमटवला आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून दिल्याबद्दल
स्वातंत्र्यसंगरातल्या तमाम हुतात्म्यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात
विविध कारणांमुळे पश्चात्ताप होत असेलच. या कारणांतलं एक प्रमुख
कारण म्हणजे हिंदी सिनेमांता उसळलेली बेगडी देशभक्तीची लाट. या
भाषणबाज, फिल्मी देशभक्तीचं टनभर खत घालून तलत रेखांनी मुळच सशक्त
कथाबीज दुबळं करून त्याला अंकुर फुटायला वावच ठेवलेला नाही.
मुळात एका माणसाचं प्लॅस्टिक सर्जरीद्वारे
दुसऱया माणसात परिवर्तन होणं हा या कथानकाचा गाभाच अतर्क्य अशक्यप्राय कोटीतला.
तो तर्काच्या पातळीवर, आणून स्वीकारार्ह बनवणं,
रेखी आणि दिग्दर्शक फरोग सिद्दीकी यांच्यापुढचं मुख्य आव्हान होतं.
हे आव्हान पेलणं तर सोडाच; लेखक- दिग्दर्शक या आव्हानाला भिडलेलेसुद्धा नाहीत.
जय वर्माचा अजय खन्ना बनविण्यासाठी
सोपी युक्ती होती मेकअपमधले फेरबदल वापरण्याची. म्हणजे शरद कपूरलाच
वेगळ्या गेटअपमध्ये सादर करण्याची. पण महत्त्वाकांक्षी रेखी-
सिद्दीकी त्याला वेगळा माणूस, जॅकी श्रॉफच बनवतात.
(कारण हाच तर सिनेमाचा `यूएसपी' आहे.) पण ते करताना अजय हा जयच आहे, हे पटवून देण्यासाठी ते करतात काय तर दोघांचा आवाज एकच (जॅकी श्रॉफचा) ठेवतात. आणि जयची
अस्वस्थ झाल्यावर माचिस उडवण्याची लकब कायम ठेवून अजयला तसाच लायटर उडवायला लावतात.
अजय हाच जय आहे, शरद कपूरच जॅकीच्या रुपात आहे,
हे `कन्व्हिन्सिंगली' प्रेक्षकांच्या
गळी उतरतच नाही आणि `विश्वविधाता'चा पाया
भुसभुशीत होऊन जातो.
जयवरची प्लॅस्टिक सर्जरी आणि त्याचं
अजयमधलं रूपांतर, हा या सिनेमाचा हायलाईट. तो सिनेमात `दिसत'च नाही.
जय ऑफरेशन थिएटरमध्ये जातो आणि एकदम पाच वर्षांनंतरचा अजय प्रेक्षकांना
दिसतो.
आजकालची शाळकरी मुलंसुद्धा टीव्हीवर
`डिस्कव्हरी'सारखे वैज्ञानिक कार्यक्रम
सादर करणारे चॅनेल पाहतात. इंग्रजी सिनेमांमधून विज्ञान सुगम
बनून त्यांच्यापुढे सादर होतं. आजच्या प्रेक्षकाची वैज्ञानिक
साक्षरता एवढी वाढली आहे, की जयवरची प्लॅस्टिक सर्जरी त्याला
विलक्षण थरारक नाटय़ानुभव देऊ शकली असती. तो थरारच लेखक-
दिग्दर्शकांनी अस्पर्शित ठेवला आहे.
कथानकातील अतर्क्य भाग तर्काच्या
पातळीवर आणण्यात अपयशी ठरणारे रेखी झ्र सिद्दीकी सिनेमातले उर्वरित घटकही (हिंदी सिनेमाची मापं लावूनही) अतर्क्य का करतात,
हेही अतर्क्यच. दहशतवाद्यांना आगापिछा नसणे,
जयच्या आईच्या मृत्युची स्वत: जयनेही दखल न घेणे,
असल्या अक्षम्य चुका किरकोळ वाटाव्यात, अशा घोडचुका
मध्यंतरानंतर घडतात.
आपण अजयशी एकरूप होऊन संसार केल्यावर,
जयला मनातून निपटून काढल्यानंतरही रवीचा चेहरा जयसारखा कसा, असा प्रश्न राधामाऊलीला पडत नाही. रवीनं स्वत:च्या आईवर जयशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केल्यावरही अजय स्वत:ची असलियत उघड करत नाही आणि नाटक टिकवण्यासाठीसुद्धा या `योगायोगा'बद्दल आश्चर्य व्यक्त करत नाही. राधाच्या वतीने स्पष्टीकरणही देत नाही.
प्लॅस्टिक सर्जननं रवीचा चेहरा ओळखल्यानंतर
आणि मुकेश माथुरनं रवीकडे प्लॅस्टिक सर्जरीचं गुपित उघड केल्यानंतरही रवीला जय-
अजयच्या खेळाचं साधं गणित उकलत नाही. त्यासाठी
शारजाला जाऊन फाईल पाहावी लागते, हेही गंमतीशीर. (निर्बुद्धपणाबद्दल त्रागा करण्याचा टप्पा ओलांडल्यावर सगळ्याची गंमतच वाटू
लागते ना!)
रवीला आपल्या चेहऱयाबद्दल पडणारे
प्रश्न आणि मिळणारी उत्तरं, त्यातून उद्भविणारा बापलेकांमधला
संघर्ष हे या कथानकातलं नाटय़ असल्या कर्मदरिद्री हाताळणीमुळे पातळ पचपचीत होऊन जातं.
सिनेमाच्या अखेरीस अजयला गाठणारी अटळ नियती निष्प्रभ वाटते. उलट, आपले कोणत्या जन्माचे हे भोग, कुठल्या पूर्वकर्मांचं हे फळ म्हणून हा सिनेमा पाहावा लागतोय, अशी भावना `विश्वविधाता'च्या प्रेक्षकाच्या
मनात निर्माण होते.
जॅकी श्रॉफचा सहज वावर, या पलीकडे `विश्वविधाता'मध्ये अभिनयाच्या आघाडीवरची खडखडाटच आहे.
शरद कपूरला कायम पारोसं दिसण्याचं दैवी वरदान लाभलंय. सतत डोळ्यातली चिपडं साफ करत कॅमेऱयासमोर वावरणारा मनोजकुमारसुद्धा शरदपुढे
`शूचिर्भूत' वाटेल, यात काय ते समजा. आयेशा जुल्कानं आईच्या भूमिकेत असा
काही विलक्षण चिरचिरा सूर लावलाय की ती स्फोटात मरण पावते, तेव्हा
प्रेक्षक हुश्श्।़।़ करतात. पूजा बात्रानं रवीच्या प्रेयसीची
चिंधीएवढी भूमिका स्वीकारून काय साधलं, देव जाणे!
खलनायकाच्या भूमिकेत आशिष विद्यार्थी
`प्रभात' युगाची आठवण करून देतो.
तेव्हा जशी `पात्र' अतिनाटकी
सुरात, चेहरा वेडावाकडा करून अभिनय करीत तसा अभिनय हा बदाबदा
ओततो. प्रेक्षकांना तो या दुर्गुणामुळे खलनायक भासतो,
हे काही भूषणावह नाही.
ए. आर.
रहमाननं कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला दिलेल्या `पुदिया मुघम' या तामिळ सिनेमांतल्या चालींवर `विश्वविधाता'ची गाणी रचली आहेत. चाली सुरेल आहेत; पण गाण्यांना ना धड सिच्युएशन्स आहेत,
ना टेकिंगमध्ये काही वेगळेपण.
असले सिनेमे विश्वात कुठेही न निघोत,
आणि कुठे निघालेच, तर ते पाहण्याची तोहमत आपल्यावर
न येवो, अशी ओरिजिनल `विश्व विधात्या'पाशी प्रार्थना करायला लावणारा हा `विश्वविधाता'
आहे.
No comments:
Post a Comment