Monday, February 6, 2012

उद्रेक आप-तेजाचा! (व्होल्कॅनो)


लातूर उस्मानाबाद परिसरात प्रलयंकारी भूकंप झाला. हजारो माणसं मृत्युमुखी पडली. गावंच्या गावं नामशेष झाली. बीबीसी - सीएनएनसारख्या वृत्तसंस्थांनी या हृदयद्रावक आपत्तीची चित्रं जगभर पोहोचविली. ती पाहून अमेरिकेतली माणसं हळहळली... निसर्गाच्या कोपाचं रौद्र तांडव पाहून. आणि या माणसांमधले `प्रेक्षक' हळहळले... असलं काही आपल्याला पाहायला- `अनुभवायला' मिळालं नाही म्हणून. माणसाच्या (तेही अतिप्रगत अमेरिकन माणसाच्या) जन्माला येऊन भूकंप पाहिला नाही, म्हणजे व्यर्थच गेला ना हा जन्म?
  प्रेक्षकांची ही हळहळ लक्षात घेऊन तिथल्या निर्माता - दिग्दर्शकांनी कंबरच कसली. `भूकंप-भूकंप काय करता? ज्वालामुखीच्या तोंडावरच नेऊन बसवतो तुम्हाला', असं आव्हानच स्वीकारलं त्यांनी; आणि जन्माला आला `व्होल्कॅनो.'
  `व्होल्कॅनो'च कशाला, हॉलिवुडमध्ये आपत्तीपटांची (डिझॅस्टर फिल्म्स) जी परंपरा आहे, ती प्रेक्षकांची ही प्रत्यक्ष संकटात न सापडता संकटाचा थरार अनुभवण्याची `सिनिकल' गरज भागवत असते. `टॉवरिंग इन्फर्ने', `जॉज', `पॉसिडॉन ऍडव्हेंचर, `वेस्टवर्ल्ड'पासून `जुरासिक पार्क', `लॉस्ट वर्ल्ड'पर्यंतचे आपत्तीपट आठवून पाहा. कुठे नैसर्गिक आपत्ती, कुठे निसर्गाच्या क्रमात माणसानं केलेली ढवळाढवळ किंवा कुठे माणसानंच निर्माण केलेल्या राक्षसी यंत्रांमधले बिघाड विनाशकारी आपत्तींला आमंत्रण देतात आणि मग माणूसच या आपत्तींशी धैर्यानं मुकाबला करून त्यांच्यावर (कायमची किंवा पुढचे भाग काढायच्या सोयीसाठी तात्पुरती) मात करतो.
  सुष्ट-दुष्ट प्रवृत्तींचा संघर्ष आणि सुष्टांचा (फक्त कल्पनेतच शक्य असलेला) अंतिम विजय, या सनातन कथानकाचं हे सुधारित, चतुर रुप आहे. इथे दुष्ट प्रवृत्तींचं प्रतिनिधित्व माणसं करत नाहीत तर निसर्ग किंवा मानवनिर्मित भस्मासूर `खलनायक' बनून सिनेमाला वेगळेपणाचा आभास देतात. आपत्तीपटांची ही परंपरा हल्ली इतकी सशक्त पण साचेबद्ध झाली आहे, की `व्होल्कॅनो'ही `मेड टू ऑर्डर' वाटतो.
  `व्होल्कॅनो'मध्ये ज्वालामुखी हा खलनायक आहे. घटनास्थळ आहे लॉस एंजेलिसमधला मध्य विल्शायर जिल्हा. वास्तवातही लॉस एंजेलिसला भूकंप, वादळं, दरडी कोसळणं अशा आपत्तींचा सामना करावा लागला आहे. एल. . भूकंपप्रवण आहे. या वास्तवावर ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या कल्पनेचं कलम करून `व्होल्कॅनो'चं कथानक रचण्यात आलं आहे.
  माईक रोआर्क (टॉमी ली जोन्स) हा एल. . च्या आणीबाणी व्यवस्थापन कार्यालयाचा प्रमुख. मध्यमवयीन... घटस्फोटित...13 वर्षांची केली (गॅबी हॉफमन) ही त्याची बंडखोर प्रवृत्तीची मुलगी त्याच्यासोबत राहते.
  भुयारी रेल्वेसाठी खणलेल्या भुयारांमुळे भूभाग कमजोर झाला आहे. आत सर्वभक्षी लाव्हा उकळतो आहे आणि डॉक्टर ऍमी बार्न्स (ऍन हेश) ही भूकंपशास्त्रज्ञ वगळता कुणालाही परिस्थितीच्या गांभीर्याचं आकलन झालेलं नाही. भुयारात काम करणारे आठ कामगार गूढरीतीनं बेपत्ता होऊनही प्रशासकीय पातळीवर योग्य दखल घेतली जात नाही. आणि अखेर ऍमीला वाटत असलेली भीती खरी ठरते. जगप्रसिद्ध ला ब्री टार पिटस्च्या परिसरात लाव्हा जमीन फोडून उसळतो. ज्वालामुखीचा शहराच्या मध्यवस्तीत उद्रेक होतो.
  ज्वालामुखीच्या मुखातून उसळून बाहेर पडणारे तप्त लाव्हारसाचे गोळे बॉम्बसारखे आसपासच्या परिसरातल्या इमारतींवर, रस्त्यांवर कोसळून हाहाकार उडवून देतात आणि लाव्हारसाचा सर्वभक्षी प्रवाह एल. . च्या रस्त्यावरून वाहू लागतो.
   केलीसोबत मोटीरीतून निघालेल्या माईकसमोरच हा उद्रेक होतो. लाव्हारसानं वेढलेल्या मोटारीतून तो केलीची सुटका करतो. तिला सेडार्स - सिनाई हॉस्पिटलमध्ये रवाना करतो आणि ऍमीच्या साथीनं ज्वालामुखीचा सामना करायला सिद्ध होतो.
  रस्ते दुभागण्यासाठी वापरले जाणारे सिमेंट काँक्रीटचे डिव्हायडर आडवे टाकून लाव्हारसाचा प्रवाह अडविण्याचा, त्याच्यावर अग्नीशामक बंब आणि हॅलिकॉप्टर्समधून पाणी फवारण्याचा माईकचा उपाय यशस्वी होतो... पण तात्पुरताच.
  ऍमी माईकला सांगते, की लाव्हारस आता इतर कोणता न कोणत्या ठिकाणाहून जमीन फोडून उसळेलं. तिच्या अभ्यासातून हे स्पष्ट होतं, की लाव्हारस आता रेल्वेसाठी खणलेल्या भुयारीतून प्रवाह करून हे भुयार जिथे अर्धवट राहिलंय त्या `डेड एंड'ला उसळून बाहेर पडेल, हा `डेड एंड' आहे बेव्हर्ली सेंटर आणि सेडार्स-सिनाई हॉस्पिटलपाशी, ज्वालामुखीच्या तडाख्यात होरपळलेल्या असंख्य जखमी माणसांना लाव्हार्स आता हॉस्पिटमध्येच गाठणार...
   या प्रलयापासून एल.. वाचविण्याचा एकच मार्ग उरलेला असतो. लाव्हारसाचा प्रवाह वळवून सांडपाण्याच्या कालव्यामागे समुद्रात सोडण्याचा. त्यासाठी हॉस्पिटलशेजारची गगनचुंबी इमारत कोसळविण्याचा अचाट उपाय माईकला सुचतो. अर्ध्या तासात या उपायाची अमलबजावणीही होते आणि रौद्रभीषण ज्वालामुखीवर माणसाची बुद्धीमत्ता मात करते.
  उत्तम आपत्तीपटाचे सगळे घटक असलेलं हे कथानक पटकथाकार जेरॉम आर्मस्ट्राँग आणि बिली रे यांनी बंदिस्त पटकथेतून खुलवलंय. क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंटा, मध्यावरच आपत्ती टळल्याचा होणारा भास, त्यातून सुटणारे सुटकेचे नि:श्वास आणि हे नि:श्वास रोखून धरायला लावणाऱया वेगानं पुन्हा दुप्पट जोराने येऊन आदळणारी आपत्ती हे गणित त्यांनी परफेक्ट जुळवलंय.
  आपत्काळात सामान्य माणसांचे `हीरो' होतात, हा सिनेमाकलेतला पुरातन सिद्धांत सिद्ध करणारे प्रसंगही त्यांनी चपखलपणे पेरले आहेत; पण, स्वत:चा प्राण देऊन भुयारातल्या ट्रेनच्या चालकाला वाचवणाऱया अग्नीशामक दलप्रमुखाची व्यक्तिरेखा हिंदी सिनेमातून घेतली असावी. इतकी ढोबळ आहे. क्लायमॅक्सला कोसळणाऱया इमारतीखाली केली उभी असणं, तिला वाचवण्यासाठी माईकनं धाव घेणं आणि ढिगाऱयाखालून दोघांनी सहीसलामत बाहेर येणं, हे या सिनेमातही अतिरंजित वाटतं.
  दिग्दर्शक मिक जॅक्सननं भव्यता, वास्तवाभास आणि परिणामकारक हे या सिनेमाच्या यशासाठी आवश्यक घटक व्यवस्थित पुरवले आहेत. भूकंपानं हलकल्लोळ उडालेला असताना अचानक जमिनीचे हादरे थांबणं, सर्वत्र सन्नाटा पसरणं, पात्रांनी आणि प्रेक्षकांनी सैलावणं आणि त्याच क्षणी भूकंपाच्या जागी ज्वालामुखीचा उद्रेक होणं, हा खास दिग्दर्शक `दिसण्या'चा प्रसंग. तिथे मिक दिसतो.
  टॉमी ली जोन्सच्या व्यक्तिमत्त्वात एक आश्वासकता आहे. कुणालाही त्याच्याबरोबर `सुरक्षित' वाटू शकतं. या वैशिष्टय़ाचा मिकनं पुरेपूर वापर केलाय. एरवी टॉमीची अभिनयक्षमता कसाला लावणारा एकही प्रसंग सिनेमात नाही. टॉमीसारख्या मुरब्बी नटापुढे ऍन हेश कुठेही कमी पडत नाही. ती रुढार्थानं सुंदर नाही. आपल्या शास्त्रावरचा तिच्या विश्वास आणि आपत्तीशी झगडण्याची जिद्द तिला `सुंदर' बनवते. केली झालेली गॅबी हॉफमन आणि माईकच्या उपप्रमुखाचं काम करणारा डॉन शीडल्ही लक्ष वेधून घेतो.
  `व्होल्कॅनो'चा खरा नायकं आणि खलनायक आहे ज्वालामुखी आणि लाव्हारस. विलशायरचा तंतोतंत उभारलेला सेट आणि अप्रतिम दृक्परिणामांनी (स्पेशल इफेक्टस्) `व्होल्कॅनो'चा थरार वास्तवाच्या पातळीवर आणलाय. जो दृक्परिणाम `स्पेशल इफेक्ट' आहे. असं प्रेक्षकाला कळतच नाही. तो `स्पेशल इफेक्ट' यशस्वी झाला. असं मानतात. या निकषांवर `व्होल्कॅनो'कारांनी केलेली कामगिरी अद्भुत, अफलातून आहे. अल्ट्राव्हायोलेट किरण, रंग, संगणकीकृत इफेक्टस् मिनिएचर सेटस् यांचा वापर करून बनवलेला लाव्हारसाच्या प्रवाहाचा `इफेक्ट'असा रसरशीत आहे की, हा निराकार, विलक्षण लोभस धगीचा द्रवपदार्थ `व्होल्कॅनो'मध्ये (गरम रक्ताचा) खलनायकच बनून जातो. निसर्गक्रमाचं पालन करणाऱया एका निर्जीव द्रवावर खलप्रवृत्ती मानवी संकल्पनेचं आरोपण यशस्वी होतं, ते स्पेशल इफेक्टस्वाल्यांनी बजावलेल्या बिनतोड कामगिरीमुळं.
  चाळीस हजार वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडल्यामुळे रांचो ला ब्री परिसराला भूगर्भशास्त्राeय महत्त्व आहे. त्याचा ज्वालामुखीच्या पहिल्या उद्रेकासाठी केलेला वापर `व्होल्कॅनो'ला वास्तवाचं परिमाण देतो.
   `व्होल्कॅनो' एल..मध्येच घडवण्याचं आणखी एक कारण आहे. मुंबईव्यतिरिक्तच्या भारतातल्या मंडळींना मुंबईबद्दल किंवा महाराष्ट्रातल्या अन्य शहरवासियांना पुण्याबद्दल जशी सुप्त असूया वाटते. तशी अमेरिकनांना एल.. वासियांबद्दल वाटते. एल..ला आपल्यापेक्षा काहीतरी जास्त लाभलेलं आहे आणि लायकी नसताना लाभलेलं आहे. अशी एल.. बाहेरच्यांची धारणा आहे. त्यामुळं एल.. वासियांवर कोसळणारं (काल्पनिक का होईना) संकट उर्वरित अमेरिकनांना सुप्त आनंद देऊन जातं.
तेव्हा आता हा आनंद मिळवण्यासाठी नाशिकच्या एखाद्या निर्मात्यानं पुण्यातल्या पानशेत प्रलयाच्या आपत्तीवर मराठीत आपत्तीपट काढण्याची वाट पाहायची, की सरळ `व्होल्कॅनो' पाहून टाकायचा, हे ज्याचं त्यानं ठरवायचं.

No comments:

Post a Comment