Tuesday, January 3, 2012

शीबाबाची चारसोबीसी (मिस 420)


`शीबाबा' म्हणजे शीबा आणि बाबा (सहगल). `मिस 420'चे नायिका-नायक.
 त्यांना मजकुरात `शीबा आणि बाबा' असं किती वेळा म्हणायचं? त्यासाठी `आणखी' किती कागद वाया घालवायचा? म्हणून हे सुटसुटीत लघुरूप... शीबाबा. शिवाय `मिस 420' पाहून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या मनात या लघुरुपाचं `शी बाबा!' असं भावदर्शक उद्गारूप उमटतं आणि जास्तच अन्वर्थक ठरतं.
  खरंतर `मिस 420'ला काही अर्थ असलेली आणि किमान उत्कंठावर्धक रहस्य टिकवणारी कथा लाभली आहे. पण ढिलीढाली पटकथा, फुसक्फटाकडे संवाद, सातरस्त्याच्या मध्यावर नेमलेल्या ट्रफिक हवालदाराच्या हातवाऱयांसारखं दिग्दर्शन आणि अभिनय करण्याच्या मोहावर निग्रहानं विजय मिळवून, निर्विकल्प समाधी अवस्था साधल्यासारखा `शीबाबा'चा मख्ख वावर, यामुळे या कथानकाचा सगळा प्रवास सार्थ ते निरर्थ असा होतो. (आणि प्रेक्षक तात्पुरते `निरर्थ' होतात ते वेगळेच.)
  `मिस 420' म्हणजे शीबा. भारतीय गुप्तचर खात्यातील एजंड सुंदरी. गुप्तचर खात्यातील काही घरभेदी देशाची सुरक्षाविषयक गोपनीय माहिती परदेशी दलालांना विकत असल्याने गोपनीय कागदपत्रे घेऊन जाणाऱया व्हॅनमध्ये `मिस 420'ची नेमणूक होते. ही व्हॅन अडवून कागदपत्रे पळवण्याचा खलनायक डीके (मोहन जोशी) आणि गँगचा (महेश आनंद, अनंत महादेवन, अमिता नांगिया) प्रयत्न फसतो. ते स्फोट घडवून व्हॅन उडवून देतात... `मिस 420' सह.
  इकडे मुंबईत कॉलेजात सडकछाप रोमियोगिरी करत फिरणाऱया विक्की (बाबा सहगल) आणि वरुण (जीन उपेंद्र) या मित्रांना समुद्रकिनाऱयावर अनामिकेचं (पुन्हा शीबा) सुस्नात दर्शन घडतं. विक्की अनामिकेच्या प्रेमात पडतो. आधी वैर, मग प्रेम या क्रमात तीही त्याच्या प्रेमात पडते.
  तिकडे गोव्यात अनामिकेचा भाऊ अरविंद (आसिफ शेख) खलनायक डीकेच्या कृष्णकृत्यांचे फोटो घेताघेता त्याच्या जाळ्यात सापडतो. त्याला भेटण्यासाठी गोव्यात आलेल्या अनामिकेला आणि तिचा विरह सहन न होऊन तिच्यामागे आलेल्या विक्कीला अरविंद गायब झाल्यानं धक्का बसतो.
  अनामिकेला पाहून हीच `मिस 420' अशी जॉनी आणि वकार (मुश्ताक खान, अरुण बक्षी) या गोव्यातल्या गुप्तचरांची समजूत होते. ते आपल्या बॉसला, मिस्टर खानला (टिनू आनंद) ही माहिती देतात. तो अनामिकेला पकडून ती `मिस 420' नाही, अशी खात्री करून घेऊन तिला मदत करतो.
  अनामिका खानच्या मदतीनं डीकेच्या अड्डय़ात पोहोचते. तिथे तिला स्मृतीभ्रंश झालेला अरविंद भेटतो. त्यानं काढलेल्या फोटोंचा रोल गायब आहे.
  पुढे काय होतं???
  हिंदी सिनेमाच्या सुखांत चौकटीतलं या प्रश्नाचं उत्तर बऱयापैकी धक्के देणारं आहे, कारण, मूळ कथानकातली रहस्याची वीण बऱयापैकी घट्ट आहे. मात्र, या रहस्याच्या भेदापर्यंत पोहोचेस्तोवरची पडद्यावरची अनागोंदी कोणी पैसे दिले तरी पाहणारं नाही. (मग, स्वत:च पैसे दिलेल्या प्रेक्षकांची तरी बातच सोडा.)
  सहस्यमय-संगीतमय-ऍक्शनमय प्रेमकहाणी बनवायची, की प्रेममय संगीतमय-ऍक्शनमय रहस्यकथा बनवायची, की... या घोळात दिग्दर्शक आकाशदीपनं `मिस 420'चा `ट्रफिक जॅम' करून टाकलाय. पहिला सिनेमा असल्यानं काय करू अन् काय नको, असं झालंय त्याला. त्यातून हाच शेवटचा सिनेमा ठरण्याची तजवीज फक्त करू शकलाय बिचारा.
  अरविंदनं डीकेच्या अड्डय़ात फोटो काढणं, अनामिकेनं इन्स्पेक्टरच्या जीपवर झोपून डीकेच्या अड्डय़ापर्यंत पोहोचणं, वगैरे प्रकार तर `फिल्मी'सुद्धा म्हणता येणार नाहीत, इतके बालिश आहेत. तीच गत प्रेमप्रकरणाची. रहस्यकथा मांडण्यासाठी आवश्यक आटोपशीरपणा हा शब्द तर आकाशदीपच्या शब्दकोशातच नाही.
  तसाच `अभिनय' हा शब्द बाबा सहगलच्या शब्दकोशात नाही आणि शीबाकडे `अभिनय' शब्द असलेला शब्दकोश कधीकाळी असणार; पण, आता हरवलाय बहुतेक.
  `बाबा गाणी गातो तोवर ठीक वाटतो कारण त्याला तसं पाहण्याची आपल्याला सवय झालीये. पण तो मठ्ठ-हसऱया चेहऱयानं संवाद `फेकतो,' तेव्हा सहन होत नाही. शीबाकडे देहसौंदर्याची संपदा आहे. अपऱया नाकाचा तिचा चेहराही मादक आकर्षक आहे. ती `मिस 420'मध्ये सुंदरही दिसली आहे. तिला कमी कपडय़ांमध्ये भिजवून, वाकवून, उभवून, निजवून, नाचवून आकाशदीपनं शीबाच्या `प्रेक्षकां'चा पैसा वसूल करून दिलाय.
  `मिस 420'ला फारसे संवादच नसल्यानं तिचा बेबंद, बेदरकारभाव त्या रुपात साजतो. पण पंचाईत होते अनामिकेच्या रुपात. सहजाभिनय आणि न- अभिनय यात तिची गल्लत झालीये; तिनं न- अभिनय केलाय. संवादांचं संथगतीनं अवघडल्यासारखं केलेलं उच्चारणही ती जांभया देत (किंवा झोपेत) बोलतीये की काय, अशी शंका निर्माण करता आणि पाहणाऱयांना अनुक्रमे जांभया आणि झोप येते.
  अनु मलिकचं संगीत आणि आगंतुक भूमिकेत जॉनी लिव्हरनं उडवलेली धमाल एवढंच काय ते प्रेक्षकांची झोप चाळवून जातं. `आजा मेरी गाडीमे बैठ जा', `मेमसाब,' `धक धक' ही दोन-तीन वर्षांपूर्वीची गाणी आजही आकर्षक वाटतात. `झूम झूम रे बाबा' हे नव्यानं जोडलेलं हेमा सरदेसाईचं गाणंही उडत्या चालीचं आहे. `आजा मेरी गाडी में'च्या चित्रणात मोटारींचे भाग आणि स्त्राeदेहाची `सचित्र' तुलना करण्याचा प्रकार मात्र सरळसरळ अश्लीलच.
   आकाशदीपनं आपल्या पत्नीला शीबाला मध्यवर्ती भूमिका देऊन, बाबा सहगलला नायक बनवून `इतिहास' घडवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली असणार. पण बहिऱयानं लंगडय़ाच्या पाठुंगळी बसून आंधळ्याला रस्ता पुसत शर्यतीत उतरल्यासारखी `मिस 420'ची दु:स्थिती झाली आहे. लवकरात लवकर `इतिहासजमा' होण्यापलीकडे काही इतिहास घडविणे या सिनेमाला शक्य होणार नाही.

No comments:

Post a Comment