Monday, January 2, 2012

...कधीकधीच! (प्यार में कभी कभी)


दोन मित्र रात्रीच्या वेळी कॉलेजच्या इमारतीच्या घुमटावर बसले आहेत. एकाची प्रेयसी काही गैरसमजुतींमुळे दुरावलीये. तो तिच्या विरहात रडतो आहे. त्याचा मित्र याच्या दु:खामुळे रडतो आहे आणि...
  ...आणि पडद्यावरचा हा भावपूर्ण प्रसंग पाहताना प्रेक्षक खदखदा हसताहेत.
  हा विलक्षण अनुभव `प्यार में कभी कभी' हा तरुणाईचा `ताजा तवटवीत' म्हणून गाजावाजा केलेला सिनेमा पाहताना मिळतो. एखाद्या प्रेमपटाचं याहून मोठं अपयश ते काय असेल?
  `टायगर प्रॉडक्शन्स' या बॅनरनं कलावंत- दिग्दर्शकापासून स्पॉटबॉयपर्यंत सर्वांना पहिली संधी देणारा हा सिनेमा निर्माण केला आहे खरा, पण `पहिलं दान देवाला'च द्यावं असा.
 एका कॉलेजच्या उत्फुल्ल वातावरणात फुलणारी प्रेमकथा हे या सिनेमाचं साधारण स्वरुप. `परफॉर्मिंग आर्ट्स'च्या या कॉलेजात मोठा गायक बनू इच्छिणारा सिद्धांत ऊर्फ सिद्ध (सिद्धांत) आणि गिटार घेऊन फिरणारा पण (बहुधा) काहीच न बनू इच्छिणारा बग्ज (संजय सुरी) हे जिगरी दोस्त. त्यांच्या वर्गात खुशी (रिंकी खन्ना) ही सुंदर, निरागस, गोड वगैरे वगैरे मुलगी येते आणि दोघांच्या मनात हलचल मचवून देते. सिद्धांत खुशीच्या प्रेमात पडतो, तीही त्याला प्रतिसाद देते. पण, सिद्धांतचं स्वप्न रॉक्सी नामक कुणा मादक पॉप गायिकेबरोबर एकत्र कार्यक्रम सादर करण्याचं आहे. त्याच्या मनावर या गायिकेचं अधिराज्य आहे. त्यामुळे, तो खुशीवरचं प्रेम स्वत:च समजू शकत नाही, मान्य करू शकत नाही. या भानगडीतून खुशी त्याच्यापासून दुरावते.
  खुशीवर मनोमन प्रेम करणारा पण ती आपली नाही, याची पक्की जाणीव असणारा बग्ज चांगल्या मित्राचं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करतो. खुशी आणि सिद्धांत यांच्यातला दुरावा दूर करण्यासाठी झटतो. एका एड्सग्रस्त मित्राच्या उपकथानकाच्या साथीनं हे `कार्य' आणि सिद्धांतचं मोठा गायक बनणं कसं सिद्धीस जातं, हे `प्यार में कभी कभी'मध्ये चितारलंय.
  पाहिलटकर दिग्दर्शक राज कौशल यानं स्वत:च्या कथा-पटकथेवर हा सिनेमा बेतलाय. आधुनिक कॉलेजचं आंग्लाळलेलं मुक्त वातावरण आणि अगदीच सामान्य-सरधोपट प्रेमत्रिकोण यांच्या ताणात तो अडकलेला दिसतो. त्याच्या कथेतल्या `परफॉर्मिंग आर्ट्स'च्या कॉलेजाचा माहौल गंभीर शिक्षणसंस्थेपेक्षा मुंबईतल्या गल्लाभरू, उथळ `फिल्म ऍक्टिंग स्कूल्स'शी जास्त जुळणारा आहे
इथले विद्यार्थी सर्जनशील कलावंत न वाटता कलाबाह्य `गुणा'वर ग्लॅमरच्या जगात घुसू पाहणारे बडय़ा घरचे बेटेबेटय़ा वाटतात. कॅन्टीनमध्ये, कॉलेजच्या आवारात आणि `म्युझिक रुप'मध्ये गाणी म्हणण्यापलीकडे काही `किएटिव्ह' काम त्यांच्याकडून होत असल्याचं दिसत नाही. येऊन-जाऊन   मुलामुलींनी उखाळ्यापाखाळ्या काढणं आणि रात्रीचे (पब्ज वगैरे ठिकाणी भटकण्याचे) कार्यक्रम ठरवणं, यात विद्यार्थ्यांचा सगळा वेळ जातो.
  अशा खोटय़ा कॉलेजातले विद्यार्थी मात्र बऱयापैकी खरेखुरे आहेत. सिद्ध, खुशी, बग्जचा संपूर्ण ग्रुप आजच्या उच्चभ्रू कॉलेज तरुणांची `लिंगो' बोलतो, मुला-मुलींची लिंगभेदनिरपेक्ष दोस्ती दाखवतो, तश्शीच धमाल उडवतो.
   या खऱया विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा खोटेपणाचा शिरकाव होतो तो खुशीच्या रुपानं. या एका व्यक्तिरेखेच्या चित्रणातच पटकथाकार-दिग्दर्शकाचा सगळा गोंधळ समजून जातो. ही आंग्ल पद्धतीनं हिंदी कष्टपूर्वक बोलणारी मुलगी दिसायला स्मार्ट असली तरी सुंदर म्हणावी अशी नाही. शिवाय, ग्रुपमधल्या इतर मुलींच्या तुलनेत तिच्यात काही असामान्य गुण, आकर्षण असल्याचंही दिसत नाही. ती सिद्ध आणि बग्ज या दोघांना एकदम एवढी आवडून जावी, याची पटण्याजोगी कारणमीमांसा पटकथेत नाही;
  खरंतर इथेच हा सिनेमा वेगळा आणि खरोखरीच ताजा होऊ शकला असता. कारण, प्रेमात पडणारी सगळीच माणसं काही फिल्मी पद्धतीनं सुंदर, ग्लॅमरस असत नाहीत. आधुनिक युगातल्या प्रेमाला तर हळहळेपणापलीकडे कितीतरी `सेन्सिबल' छटा असतात. रुढ अर्थानं सुंदर नसलेली नायिका घेऊन दिग्दर्शक या अद्याप न मळलेल्या वाटेवर जाऊ शकला असता. पण, ते न करता तो साचेबंद प्रेम त्रिकोणांच्या मासळी बाजारात उतरतो आणि अख्ख्या सिनेमासह गर्दीत हरवून जातो.
  खुशी, सिद्धांत यांनी एकमेकांच्या प्रेमात पडण्यापासून ते त्यांच्यातला दुरावा आणि मीलनापर्यंत कोणत्याच कथाभागात प्रेक्षकाला त्यांच्याविषयी, त्यांच्या प्रेमाविषयी यत्किंचितही आस्था-आत्मीयता वाटत नाही, हे पटकथेचं मोठं अपयश आहे. (म्हणूनच तर नायक रडत असताना प्रेक्षक हसतात.)
  बग्जचं मुग्ध प्रेम हाही एक विनोदाचा भाग. एकीकडे तो सिद्ध आणि खुशी एकत्र यावेत म्हणून झटतो, प्रेमातल्या त्यागाचं, संधी मिळेल तेव्हा चेहरा थबथबवून दर्शन (प्रदर्शनच!) घडवत राहतो. पण, खुशी खरोखरच सिद्धपासून दुरावली तर हा लेकाचा `चान्स' मारल्याखेरीज राहणार नाही, अशी खात्री प्रेक्षकाला सतत वाटत राहते. इतक्या पडेल चेहऱयानं प्रेम केल्यावर पुढे `त्यागा'चीच पाळी येणार, हेही या बग्जला कळत नाही. त्याच्या त्यागातही कसलीच `ग्रेस' नाही.
  या गोंधळलेल्या प्रेमप्रकरणापेक्षा उर्वरित सिनेमाच जास्त रंजक होतो. सतत `आय लाइक इट' किंवा `आय डोंट लाइक इट' म्हणत विक्षिप्त `फंकी' वेशभूषेत, भयंकर हातवारेबाज स्टायली मारत स्वत:च्याच मस्तीत जगणारा जेट्सी आणि उत्साहानं फसफसणारा, हजरजबाबी वागण्या-बोलण्यातून उत्तम विनोदनिर्मिती करणारा रॉनी ही दुय्यम पात्रंच `प्यार में कभी कभी' मध्ये सार्वाधिक भाव मारून जातात, नायक-उपनायक- नायिकेला झाकोळून टाकतात.
  टायगर प्रॉडक्शनच्या किएटिव्ह टीमनं लिहिलेले (बहुधा सेटवर सर्वांनी मिळून उत्स्फूर्तपणे घडविलेले) संवाद, तांत्रिक सफाईयुक्त दिग्दर्शन, निर्देष छायालेखन, समाधानकारक निर्मितीमूल्यं आणि संगीत या सिनेमाच्या बऱया बाजू. `मुसुमुसुहासी' आणि `वो पहली बार' ही या सिनेमातली बेस्ट गाणी. नेपाळी लोकधुनेवर आधारलेलं (आणि `हम है राही प्यार के'च्या `चिकनी सूरत तू कहाँ था'ची आठवण करून देणारं) `मुसुमुसुहासी' हे गाणं शानच्या दमदार उमद्या आवाजामुळं आरामसे ओठांवर रुळतं. या दोन गाण्यांखेरीज इतर गाण्यांमध्येही तरुणाईची टवटवी आहे, पण `इंडिपॉप'च्या चाहत्यांना () भावेल अशी.
  राजेश खन्ना आणि डिंपल यांची द्वितीय कन्या रिंकी खन्ना पदार्पणात काही प्रभाव पाडू शकलेली नाही. ती `स्मार्ट' दिसते एवढंच. सिद्धांत या देखण्या नायकानं त्या मानानं खूप उजवी कामगिरी केली आहे. संजय सुरीच्या बग्जला पटकथेतच शहीद केल्यानं फारसा वाव नाही. यांच्यापेक्षा रॉनी, जेट्सी प्रभृती इतर गँगच मोकळंढाकळं वावरून माफक मजा आणते.
  शहरी कॉलेजच्या `क्राऊड'नंही बघायचाच ठरवला तर हा सिनेमा या गँगसाठीच पाहावा लागेल.

No comments:

Post a Comment