Friday, January 20, 2012

मनात राहते फक्त काजोलच! (हम आपके दिलमें रहते है)


भयंकर नाटय़मय प्रसंग!
 `हम आप के दिल मे रहते है'च्या नायिकेला (काजोल) आतून खचवून टाकणारी घटना घडली आहे. ती जेमतेम उभी आहे. चेहऱयावर प्रचंड तणाव... दु:ख डोळ्यांत पाणी.
  कॅमेरा एकदा वरून खाली येतो... टॉप अँगल टू लो अँगल. मग तिच्या भोवती गरगर फिरून एक वर्तुळ पूर्ण करतो. मग कॅमेरा तिच्या समोर... एकदा डावीकडून उजवीकडे मध्यावर... एकदा उजवीकडून डावीकडे, पुन्हा मध्यावर, असा `पॅन' होतो. मग तिचा फक्त चेहरा फ्रेममध्ये... `बिग क्लोज अप'मध्ये... आधी मागची पार्श्वभूमी ठळक दिसते आणि तिचा चेहरा धुसर... हळूहळू तो `फोकस'मध्ये येतो...
  हे सगळं घडताना प्रत्येक `कट'ला कानावर आघात करणारं भरगच्च पार्श्वसंगीत... आणि सगळं घडतं अर्ध्या मिनिटात.
  नायिकेवर झालेला आघात एकदाचा प्रेक्षकापर्यंत पोहोचतो... पोहोचतो कसला प्रेक्षकावर आदळतोच.
 ही आहे कौटुंबिक मेलोड्रामा हाताळण्याची टिपिकल दाक्षिणात्य पद्धत. एवढं सगळं घडवल्याखेरीज प्रसंगाचा परिणाम प्रेक्षकांवर होणारच नाही, अशा खात्रीतून उत्पन्न झालेली दिग्दर्शनशैली. या खात्रीमागे तसं कारणही आहेत. कारण, मूळ प्रसंगात अंगभूत नाटय़ काहीच नसतं. ते या सगळ्या तंत्रभरताडीतून कृत्रिमपणे निर्माण करावं लागतं.
  `हम आपके दिलमें रहते है' हा असा कृत्रिम नाटय़ावर बेतलेला बटबटीत `मद्रासी' कौटुंबिकपट आहे. `पवित्र बंधनम्' या सुपरहिट तेलुगू सिनेमाचा `रिमेक' असलेल्या `हम आपके...'मध्ये दक्षिणी `प्रथे'प्रमाणे एका सामाजिक विषयावर एकतर्फी भाष्य आहे. हा विषय आहे लग्नाचा.
  `हम आपके...'चा नायक विजय (अनिल कपूर) हा अमेरिकेतून शिक्षण घेऊन आलेला एका बडय़ा उद्योगपतीचा (अनुपम खेर) मुलगा. त्याचा विवाहबंधनावर विश्वास नाही आणि (वडिलांनी कमावलेल्या) गडगंज संपत्तीत भर घालण्यासाठी जिवाचा आटापिटा करण्यापेक्षा त्या संपत्तीचा आरामशीर उपभोग घेण्याचा त्याचा विचार आहे. अशी मुलं `ठिकाणा'वर आणण्याचा एकच मार्ग पालकांना ठाऊक असतो... लग्नबंधन!
  वडिलांच्या इच्छेला मान देण्यासाठी विजय लग्नाला तयार होतो, पण `कॉन्ट्रक्ट मॅरेज'च करीन, अशी अट घालतो. एक वर्षाचा करार अशा स्वरुपाच्या या लग्नात एक वर्षानंतर कुणाही एका जोडीदाराला ते बंधन तोडावंसं वाटलं तर `घटस्फोट' घेता येईल, अशी तरतूद असते.
  विजयचे वडील आपल्या सुस्वभावी, सुंदर, कामसू आणि सालस अशा पर्सनल सेक्रेटरी पुढे, मेघापुढे (काजौल) या लग्नाचा प्रस्ताव ठेवतात. तिच्यासारख्या मुलीशी लग्न झाल्यावर विजय लग्नाचा करारही विसरून जाईल, अशी त्यांना खात्री असते. कौटुंबिक जबाबदाऱयांचा मोठा भार शिरावर असलेली मेघा आर्थिक प्रलोभनापायी या लग्नाला तयार होते.
  लग्नानंतरच्या एक वर्षात ती सासऱयाला खुश ठेवते, नवऱयाची काळजी घेते, एका अपघातात जबर जखमी झालेल्या नवऱयाला सेवासुश्रुषा, पूजापाठ, व्रतवैकल्यांमधून खडखडीत बरा करते. तरीही एक वर्षांनंतर विजय तिला सोडतोच. कारण, त्याला तिच्यात एक चांगली मैत्रीण दिसलेली असते `पत्नी' नाही.
  मेघा माहेरी परतल्यानंतर मात्र विजयला तिची उणीव भासू लागते. तिच्यासारखा सर्वगुणसंपन्न `पत्नी'चा त्याग केल्याबद्दल पश्चात्तापाची भावना निर्माण होते, तो तिला परत बोलावण्यासाठी जातो पण, तोवर ती भडकलेली असते. तो हर प्रकारे तिला मनवण्याचा प्रयत्न करत राहतो आणि ती त्याला दाद देत नाही... अगदी तिला दिवस गेले आहेत हे कळल्यानंतरही.
  शेवटी अति-भडक `क्लायमॅक्स'मध्ये एकीकडे मेघाचं बाळंतपण आणि खलनायकांकरवी विजयचं (कोथळा बाहेर काढणारं) `सिझेरियन' घडून दोघेही हॉस्पिटलात एकदाचे एकत्र येतात.
  खरंतर पारंपारिक विवाहपद्धतीचे गुणदोष हा आजचा ऐरणीवरचा विषय आहे. इतका महत्त्वाचा विषय केंद्रस्थानी असलेल्या `हम आपके...'च्या पटकथेत मात्र पारंपारिक विवाहपद्धतीचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा, तिला मूल्यांचं अधिष्ठान देण्याचा हास्यास्पद प्रयत्न करण्यात आला आहे.
  मुख्य घोटाळा आहे तो नायक-नायिकेच्या व्यक्तिरेखाटनात. लग्नाच्या एका वर्षात मेघाशी समंजसपणे वागतो. पत्नी हे पतीची सेवा करणारं यंत्र नसून बरोबरीच्या नात्याची जोडीदार आहे, असा उदार दृष्टिकोन बाळगतो. त्याचं हे वागणं मेघाबरोबरच प्रेक्षकांनाही भावून जातं. त्यामुळेच, त्यानं तिला सोडून देणं अतर्क्य ठरतं. या काळात त्याचा तिच्याशी शरीरसंबंध आलेला असतो, त्याच्यासारखा तरुण मनाची तार जुळल्याखेरीज `पत्नी'शी शारीरिक जवळीक साधेल, हे अशक्यप्रायच वाटतं.  
घटस्फोटानंतर सकाळी तयार चहा न मिळणं, सवयीनं बायकोला नकळत हाक मारली जाणं, तिच्या सेवासुश्रुषेचा डॉक्टरांनी कौतुकांन उल्लेख करणं आणि औट घटकेच्या लग्नामुळं तिच्यावर ओढवलेल्या बदनामीची माहिती मिळणं, अशा फुटकळ कारणांमधून विजयला तिच्या `पत्नी'त्वाचा आणि तिच्यावरच्या प्रेमाचा साक्षात्कार होतो, तेव्हा पटकथाकारांची पंचाईत फारच उघडी पडते.  
विजयनं सच्चा मनानं क्षमायाचना केल्यानंतरही मेघानं त्याला न स्वीकारणंही पटकथेच्या सोयीसाठीच घडतं. मध्यंतरापूर्वीची मेघा आणि मध्यंतरानंतरची मेघा यांच्यात जमीनअस्मानाचा फरक दिसतो. आपणही केवळ आर्थिक स्वार्था करताच लग्नाचा `करार' केला होता, हे विसरते, पती-पत्नींमधला संघर्षच तकलादू असल्यानं त्यांना एकत्र आणण्यासाठी पटकथाकारानं सहनशक्तीचा अंत पाहणारा अतिरंजित `क्लायमॅक्स' रचून स्वत:ची, दिग्दर्शकाची, कलावंतांची सुटका करून घेतली आहे. तो पार पडल्यावर प्रेक्षकही सुटकेचा नि:श्वास टाकतो.
  `हम आपके...' मधला आणखी एकआक्षेपार्ह भाग म्हणजे नायिकेच्या गरोदरपणात ती, तिची आई, सासरा आणि नवरा हे घरात `मुलगा' जन्मणार आहे, असं गृहीत धरून वागतात- बोलतात. (हातोही `मुलगा'!) यातून चित्रपटकारांची `संस्कृती' समजून जाते.
  मेघाच्या घरात उद्भवणारे आक्रस्ताळी नाटय़मय प्रसंग, मेघावर लाईन मारणारा शेजारचा बावळट-खुनशी बॉक्सिंग चँपियन (परमजीत सेठी) आणि विजयच्या गळ्यात उनाड भाजी (मिंक) मारू पाहणारा फॅक्टरीतला कर्मचारी (शक्ती कपूर) यांच्या रक्तरंजित कारवाया असला सगळा मसाला `हम आपके...'मध्ये ठासून भरला आहे. पुन्हा कथानकाशी काहीएक संबंध नसलेलं स्वत: सतीश कौशिक, राकेश बेदी आणि जॉनी लिव्हर या विनोदवीरांच्या आचरटपणाचं एक ठिगळही जोडलेलं आहे.
  संपूर्ण सिनेमाचं `टेकिंग' ही सुरुवातीलाच वर्णन केल्याप्रमाणं बाळबोध छापाचं. सतीशनं मूळ सिनेमावर काही संस्कार करण्याऐवजी सहीसही `कॉपी' मारली असावी, अशी शंका उत्पन्न करणारं. छायालेखक कबीर लालनं त्यातल्या त्यात उजवी कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मेघाच्या घराच्या प्रकाशयोजनेतून व्यक्त होणारी घुसमट, शीर्षकगीतामध्ये रंगच्छटातून प्रणयभावना गडद करणाऱया `फिल्टर'चा सुयोग्य वापर यातून कबीरची स्वतंत्र विचारशक्ती दिसते. पण दिग्दर्शकानं नाटय़ निर्माण करण्यासाठी त्याला पदोपदी `फिरव गरगर कॅमेरा' असा निर्बुद्धपणा करायला लावल्यावर तो तरी फार वेगळं काय करणार?
  `हम आपके...' सह्य होतो तो अनिल कपूर, काजोल आणि अनुपम खेर या प्रमुख कलावंतांच्या परिपक्व अभिनयामुळे. अनिल कपूर आक्रस्ताळेपणा न करता विजयच्या सगळ्या भावछटा सफाईनं दर्शवतो. अनुपम खेरनं `जाडय़ा' माणसाची शरीरभाषा सूक्ष्मपणे आत्मसात केली आहे. काजोलनं आपल्या अभिनयाची `रेंज' समृद्ध करण्यासाठी मेघाची भूमिका स्वीकारली असावी. पूर्वार्धातली `गुडीगुडी' मुलगी साकारणं तिला अवघड नव्हतंच. पण, उत्तरार्धात ती रडणे, ओरडणे, किंचाळणे वगैरे भरपूर आक्रस्ताळेपणा करण्याची हौस भागवून घेते
पारदर्शी आणि विलक्षण चैतन्यमय भावाविष्कारातून तीच प्रेक्षकाच्या मनात ठसते. साधु मेहेरसारख्या गुणी कलावंताला सतीशनं प्रदीर्घावधीनंतर रुपेरी पडद्यावर परत आणलंय खरं, पण, इमानी नोकराची साचेबंद भूमिका देऊन वायाही घालवलंय.
  `धिंगतारा, धिंगतारा', `छुप गया बदलीमे जाके', `पापा मै पापा बन गया' या गाण्यांना अनु मलिकनं `हिट' संगीत दिलंय. सर्वत्र गाजत असलेलं शीर्षकगीतही अतिशय गोड आहे. त्यात आणि `छुप गया'मध्ये अनुराधा पौडवालांचं पार्श्वगायन क्षेत्रातलं नव्या जोमाचं पुनरागमन सार्थकी लागलं आहे.
  भारतीय संस्कृतीच्या `फिल्मी' आकलनाचे कुसंस्कार स्वत:वर करून (आदळून) घ्यायचे असतील तरच `हम आपके...'च्या वाटेला जा.

No comments:

Post a Comment