Tuesday, January 3, 2012

बीज ना अंकुरले (प्रेमांकुर)


एका तिकिटात एकसुद्धा `धड' मराठी सिनेमा पाहायला मिळत नाही, अशी तक्रार करणाऱया प्रेक्षकांना निर्माते-दिग्दर्शक- संकलक संजीव नाईक यांनी `प्रेमांकुर' काढून सडेतोड उत्तर दिलंय.
  त्यांनी एकाच तिकिटात दोन सिनेमे पाहण्याची व्यवस्था केलीये.
  म्हणजे मध्यंतरापर्यंत एक विनोदपट आणि त्यानंतर एक रहस्यपट. शिवाय मध्यंतरापर्यंतच्या सिनेमात नंतरच्या सिनेमाचे छोटेछोटे ट्रेलरही घालायला विसरलेले नाहीत नाईक.
  खरं तर मराठी विनोदपट म्हटलं की प्रेक्षकांच्या चेहऱयावर सुतकी कळा पसरावी, अशी कामगिरी मधल्या काळात काही सिनेमांनी करून ठेवलीये. त्या तुलनेत `प्रेमांकुर'मधला पहिला अर्धा विनोदपट अगदी खळखळून हसवणारा झालेला आहे. त्याची कथा-कल्पना गमतीशीर आहेच आणि पटकथाकार संजित नार्वेकर यांनी ती खुलवलीयेही मस्त.
  अनिल चिपळूणकर (अशोक सराफ) हा  श्रीमंत बांधकाम व्यावसायिक आपल्या बंगल्यात बापूराव (सुधीर जोशी) या एकनिष्ठ पण विक्षिप्त नोकराबरोबर एकटाच राहणारा. एकटा राहून यंत्रवत झालेल्या अनिलला शिस्तीचा `रेग' आहे. ऑफिसात तो शिस्तीचा अतिरेक करतो आणि घरातही.
 एका पार्टीत त्याचे काही मित्र सॉफ्टड्रिंकमधअये मिसळून त्याला दारू पाजतात. `टाईट' अवस्थेतला अनिल योगायोगानं एका लग्नमंडपात पोहोचतो. तिथे हुंडा न मिळाल्यानं नवरदेव ऐनवेळी पळून गेलेला. एरवी लग्नाचा विषयच डोक्यातून काढून टाकलेला अनिल दारूच्या नशेत थेट लग्नच करून मोकळा होतो.
  सकाळी जाग आल्यानंतर शेजारी नववधू दिसल्यावर अनिलला खरी `जाग' येते त्याची ही बायको कृष्णप्रिया (निशिगंधा वाड) असते कानडी. तिला मराठीचा गंधही नसतो. ताबडतोब तिला घटस्फोट द्यायला निघालेल्या अनिलला त्याचा वकील मित्र अविनाश (प्रशांत दामले) आणि त्याची बायको (नंदा शिंदे) सबुरीचा सल्ला देतात. हळूहळू त्याला कृष्णप्रिया आवडूही लागते. पण, तिच्या येण्यानं बापूराव निघून जातात, शिस्त संपते, व्यवसायात काही फटके बसतात; त्यामुळे चिडलेला अनिल तिच्यापासून फारकत घेण्याचा विचार अविनाशपाशी बोलून दाखवतो. ते कृष्णप्रिया चोरून ऐकते. आणि रागावून दुसऱयाच सकाळी घर सोडून माहेरी धारवाडला निघून जाते. पुन्हा स्वातंत्र्य मिळालं म्हणून अनिल सॉलिड खुश होतो.
  इथपर्यंत झाला पहिला सिनेमा. आता मध्यंतरानंतर दुसराच सिनेमा सुरू होतो. मध्यंतरापूर्वीच कुणातरी कुख्यात डॉनचे तीन साथीदार न्यायालयात त्याचा पर्दाफाश करणार असल्याची बातमी आपल्याला कळते. नंतर एक मारेकरी (शिवाजी साटम) वेगवेगळ्या वेषांमध्ये पोलिस पहारा पार करून त्यापैकी दोन साथीदारांचा खून करताना दिसतो. हाच मारेकरी नंतर कृष्णप्रियाचा सख्खा भाऊ म्हणूनही आपल्यासमोर येतो. (म्हणजे आपल्याला शंका. हा डबल रोल की दोघे एकच?)
  मध्यंतरानंतर अनिल बायकोला परत आणण्यासाठी धारवाडला येऊन एका हॉटेलात उतरतो. त्याच्या शेजारच्या रूममध्ये तो मारेकरी उतरलेला असतो; तिथून समोरच्या न्यायालयाच्या आवारात येणाऱया तिसऱया साक्षीदाराचा खून करण्यासाठी. योगायोगानं अनिलची मारेकऱयाशी ओळख होते-मैत्री होते. ऐन वेळेला अनिल मारेकऱयाला खुनापासून परावृत्त करू पाहतो पक्ष साक्षीदार मरतोच. अनिलनं एकटय़ानंच मारेकऱयाला पाहिलेलं असल्यानं आता जिवाला धोका असतो. त्याला पोलिस संरक्षण पुरवल्यानंतरही मारेकरी घरात घुसतोच. तो नक्की कोण असतो? शेवटी काय होतं? सहज अंदाज बांधून उत्तर मिळेल. असलं माफक रहस्य उलगडेपर्यंत सिनेमाचा आणि `प्रेमांकुर' नावाचा काहीही संबंध राहात नाही.
  वेगळ्या वळणाच्या उत्तम प्रेमकथेचं बीज हातात असताना ते फुलवायच्या ऐवजी त्यावर रहस्यकथेचं कलम करण्याची दुर्बुद्धी कथा-पटकथाकार-दिग्दर्शकाला का झाली, हे `प्रेमांकुर'मधलं सर्वात गूढ रहस्य आहे. संजीव नाईक यांच्या दिग्दर्शनात तांत्रिक सफाई आणि संकलनात गतीचे भान असले तरी मूळ कथा-पटकथेत प्रेम-रहस्याची न बसलेली सांगड त्यांना पुढेही बसवता आलेली नाही.
 खरंतर, `प्रेमांकुर'मध्ये सर्व कलाकारही `-वन' आहेत. प्रथमच दारू प्यायल्यानंतरचा आवेश, नशेतून जाग आल्यावर बिछान्यात `बायको' पाह्यल्यावर होणारी भंबेरी आणि ती कानडी आहे हे समजल्यावर होणारा त्रागा अशोक सराफ अशा काही बहारीनं खुलवतो की त्याला तोड नाही. त्याला निशिगंधा वाडनंही मस्त साथ दिली आहे. तिचा तो बावरलेला चेहरा, ते कानडी वळणाचे उच्चार धमाल उडवून देतात. बापूराव या पुणेरी वळणाच्या विक्षिप्त पात्राच्या भूमिकेत सुधीर जोशीही हास्यकल्लोळ उडवून देतात. मध्यंतरानंतर या अफलातून बापूरावाला न्याय देण्यात `प्रेमांकुर'कार फारच कमी पडले आहेत.
  प्रशांत दामलेला फारसा वाव नसला तरी त्याचा मोकळाढाकळा वावर लक्षात राहतो. शिवाजी साटमना खलनायकाची मोठी भूमिका मिळाली असली तरी मुळात तो सगळा कथाभागच सिनेमात उपरा वाटत राहिल्यानं त्यांची कामगिरी वाया जाते.
 उर्वरित महाराष्ट्रात पाच वर्षांपूर्वीच प्रदर्शित झालेला `प्रेमांकुर' एवढय़ा वर्षांनंतर मुंबई परिसरात आला आहे. या `जुने'पणाच्या खुणा सिनेमात दिसतात; विशेषत: गाण्यांमध्ये.
  एकाच तिकिटात दोन अर्धवट सिनेमे दाखविण्याचा अट्टहास करण्याऐवजी प्रेक्षकाला एकच सिनेमा पूर्ण दाखविला असता तर त्याच्याही मनात `प्रेमांकुर'बद्दल `प्रेमांकुर' फुलला असता.

No comments:

Post a Comment