Tuesday, January 17, 2012

अर्धीच आग, अर्धा `दाग' (दाग-द फायर)


`दाग-द फायर' हे सिनेमाचं नाव गोंधळात पाडणारं. `आग- द फायर'च्या ऐवजी चुकून छापलं गेलंय की काय, अशी शंका निर्माण करणारं.
  पण, सिनेमात एका निष्कलंक व्यक्तीवर लागलेला `दाग' आहे आणि ते पुसून काढण्यासाठी झालेल्या थरारक सूडसंघर्षाची `आग' ही आहे.
  अनवट, धाडसी कथानक आणि प्रेक्षकाच्या अपेक्षांना धक्के देणारी `ट्रीटमेंट', प्रमुख कलावंतांच्या रुपेरी प्रतिमांशी केलेला खेळ यामुळे मध्यंतरापर्यंत हा सिनेमा प्रेक्षकाला खिळवून ठेवतो.
  रोमँटिक स्वप्नील डोळ्यांचा चंद्रचूड सिंग इथे भेटतो रवी वर्मा व थंड रक्ताच्या निर्दय वकिलाच्या भूमिकेत. व्यावसायिक यशासाठी आणि आर्थिक उत्कर्षासाठी बऱयावाईटाचा विधिनिषेध न बाळगणारा हा तरुण वकील सतत असत्य तेच सत्य सिद्ध करून गुन्हेगारांना कायद्याच्या कचाटय़ातून सोडवत असतो. त्याचा सासरा सिंघाल (राज बब्बर) हा गैरमार्गानं संपत्ती गोळा केलेला एक लब्धप्रतिष्ठित गुन्हेगार. तो आणि त्याचे साथीदार (मोहन जोशी, दीपक शिर्के, हरीश पटेल) आपल्या काळ्या धंद्यांसाठी रवी वर्माच्या कुटील बुद्धिकौशल्यावर कायम अवलंबून असतात. रवीच्या पत्नीला- काजलला (महिमा चौधरी) आपल्या नवऱयाच्या बुद्धीचा हा अनिष्ट वापर पसंत नसतो पण तो तिची वरवर समजूत घालत राहतो.
   एका प्रकरणात सिंघालच्या चौकडीविरुद्ध उभ्या ठाकलेल्या प्रामाणिक कमिशनर सत्यप्रकाशला (शिवाजी साटम) धडा शिकवण्यासाठी रवी त्यांच्याविरुद्ध लाचखोरीचं कुभांड रचतो. सिंघालचे साथीदार तुरुंगात डांबलेल्या सत्यप्रकाशचा खून करतात आणि ती आत्महत्या असल्याचं भासवतात. सत्यप्रकाशचा कमांडो मुलगा करण (संजय दत्त) निरपराध वडिलांच्या हत्येमुळं पिसाटून या मृत्युला कारणीभूत असलेल्या रवी वर्माचा `वध' करण्याची प्रतिज्ञा करतो. एके रात्री तो रवी वर्माला सपत्नीक गाठतो आणि त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करतो. यात काजल मरते आणि रवी मेंदूला दुखापत होऊन स्मृती हरवून कसाबसा जिवंत राहतो... एखाद्या जिवंत प्रेतासारखा.
  मध्यंतरापर्यंतचं हे कथानक.
  मध्यंतरानंतर कथेला मिळणारं वळणही `इंटरेस्टिंग' आहे. स्मृती-बुद्धी गमावून खरंतर भूतकाळातील फक्त `काजल' या नावाचा-प्रतिमेचाच धागा मनात उरलेल्या रवीवर उपचार सुरू असताना करण तिथेही जाऊन पोहोचतो. तिथे डॉक्टरला (शक्ती कपूर) सांगतो की, याला लवकरात लवकर `जिवंत' कर, कारण मला याला मारायचंच.
  स्मृती परत आलेला रवी वर्मा हा वेगळाच माणूस आहे, सगळी पापं धुवून शुद्ध झालेला. भूतकाळात आपल्या हातून घडलेल्या पापांची माहिती मिळाल्यावर तो प्रायश्चित्त घ्यायला तयार होतो... करणच्या हातून मृत्यू स्वीकारण्याची तयारी करण्याइतकं निर्भय धाडस त्याच्यामध्ये जागं होतं. करणच्या वडिलांच्या चारित्र्यावर आपणच लावलेला डाग पुसून काढण्याचा बेत तो आखतो तेव्हा सिंघाल आणि मंडळी त्याच्याच जिवावर उठतात. यावेळी त्याच्या रक्षणासाठी सिद्ध होतो तो त्याचा कट्टर शत्रू करणच.
  दुष्प्रवृत्त माणसाविरुद्धचा लढा माणसाविरुद्ध नसून प्रवृत्तीविरुद्ध असतो, हे नाही. इमानदार म्हणून ख्यातकीर्त असलेल्या कमिशनरच्या पाठीशी कुणीच उभे राहताना दिसत नाही, जनताही त्याला दगड मारते, हे फारच फिल्मी. प्रेक्षकानं फार खोलात न शिरता ढोबळमानानंच कथा समजून घ्यावी आणि त्याचं मन मुख्य सूडसंघर्षावरच केंद्रित राहावं, अशा हिशोबानं लेखक-दिग्दर्शकांनी तर्कबुद्धीला फाटा देणारे प्रसंग रचले आहेत. म्हणूनच सूत्र मांडणारी ही कथा एरवी एखाद्या हॉलिवूडच्या थ्रिलरसारखी `स्टार्ट टू फिनिश' थरारक झाली असती.  
गाण्यांची भरताड गृहीत धरूनही मध्यंतरापर्यंत हा सिनेमा विलक्षण वेगवान झाला आहेच. घोटाळा होतो तो मध्यंतरानंतर. पटकथा लेखक रॉबिन भट आकाश खुराणा आणि दिग्दर्शक राजकंवर यांना व्यावसायिक हिंदी सिनेमा बनवायचा असल्यानं नायिकेला मध्यंतरातचं मारून टाकून कसं जमणार?
  (मध्यंतरानंतरची गाणी कोण म्हणणार?)
 इथे नायिकेचा डबल रोल सुरू होतो. हुबेहूब काजलसारखीच दिसणारी कजरी (महिमा चौधरी) ही राजस्थानी नायकीण रवीची स्मृती जागवण्यासाठी आणवली जाते. ती आधी हुमदांडगेपणा करून नंतर रवीच्या रीतसर प्रेमात पडते. आपण काजल नाही हे कळल्यावर रवी आपल्याला धिक्कारेल, याची कल्पना असतानाही त्याचं मूल पोटात वाढवते. नायिकेविना जीवन दु:सह झालेल्या रवीची आणि त्याहून अधिक नायिकेविना सिनेमा झूट मानणाऱया प्रेक्षकांची `सोय' यापलीकडे या कथाभागाला मूळ कथानकात अर्थ नाही.
  रवीचं वकिली कसब दर्शविण्यातही पटकथाकार कमी पडले आहेत. त्याचे न्यायालयातले युक्तिवाद, वकिली सल्ले, सत्यप्रकाशवरचे कुरघोडी यात प्रज्ञेची चमक नाही. कमिशनरच्या पदावरील व्यक्तीला न घेतलेल्या लाचेच्या आरोपाखाली अटक होण्यासाठी तो भक्कम पुरावाही मांडत काजल मेल्यावर लगेच कजरीचा शोध लागून पुढचा कथाभाग सुरळीत होऊन जातो. तरीही शेवटी सिंघाल स्वत:च्या बचावासाठी स्वत:च्या लहान नातीवर पिस्तुल रोखून तिला `ओलिस' ठेवतो. हे पटत नाही. जॉनी लिव्हर आणि कुनिका यांच्यातलं कथाबाह्य विनोदी अस्तर ग्राम्य विनोदामुळं आचरपणाच्या पातळीवर उतरतं. खलनायकांचा फौजफाटाही `फ्रेम' भरण्याच्या भव्यतेच्या हव्यासापोटी आलेला दिसतो. कथानकाचा मूळ पीळ सैलावणाऱया या खोगीरभरतीमुळे आणि गाण्यांच्या अतिरेकामुळे हा सिनेमा अकारण 18 रिळं लांबला आहे.
  तरीही प्रेक्षकाला 18 रिळं संपेपर्यंत थिएटर (एकूणात) सोडून जावंसं वाटत नाही, हे दिग्दर्शक राजकंवरचं कौशल्य. त्याच्याकडे कथानिवेदनाचं कसबही आहे आणि शैलीही. पार्श्वसंगीत आणि गाण्यांचा सिनेमाच्या परिणामात (त्याला अपेक्षित) वापर तो योग्य प्रकारे करून घेतो. संजय दत्तची एंट्री कशी होणार याच्या उत्कंठेत असलेल्या प्रेक्षकाला अनपेक्षित पद्धतीनं होणारं प्रथमदर्शन राजकंवरच्या सिनेमा माध्यमावरील हुकुमतीचं दर्शन घडवतं. सत्यप्रकाशला `पटवण्या'चा शेवटचा प्रयत्न करायला आलेला रवी त्याला `मी तुमच्या मुलासारखा आहे' असं मानभावीपणे म्हणतो तेव्हा उसळून सत्यप्रकाश `माझ्या मुलाच्या नखाचीही सर तुला येणार नाही' असं सांगताना करणचं गुणवर्णन करतो. त्यावेळी, सरहद्दीवर एका मोहिमेत बहादुरी गाजवणाऱया करणचं दर्शन प्रेक्षकाला काही `फ्लॅशेस्'मध्ये घडतं तेव्हा थिएटरात टाळ्या-शिटय़ांचा गजर होतो. संजय दत्तच्या एंट्रीपासून त्याच्या प्रत्येक वेळी धूमकेतूसारखं उगवण्याला राजकंवरनं दिलेल्या `ट्रीटमेंट'मुळं करणचा `सुपह्युमन'वावर तर्ककर्कश प्रेक्षकालाही खटकत नाही.
  पटकथा आणि दिग्दर्शकाचं शूटिंग स्क्रिफ्ट (एकेका प्रसंगाची दृश्यविभागणी आणि `ट्रीटमेंट' सविस्तर नमूद केलेली पटकथेची प्रत) यातील फरक `दाग-द फायर'मध्ये जागोजाग जाणवतो. पटकथाकारांनी गाळलेल्या जागा दिग्दर्शक कल्पक `टेकिंग'मधून भरून काढतो. यासाठी छायालेखक हरमीत सिंग यांच्या साह्यानं केलेली वातावरणनिर्मितीही लक्षणीय आहे. त्यांनी रवीभोवतीचं थंड कोरडं वातावरण, रवी-काजल यांच्या प्रणयप्रसंग आणि गाण्यांसाठी उबदार रंगछटांना उठाव आणि करणच्या खरतनाक वावराला दिलेल्या राकट करडय़ा छटा यातून सिनेमाचा माहौल उभा केला आहे. . मुथू यांनी संकलनातून कथानकाचा अंगभूत वेग पकडला आहे. बाष्कळ विनोद, भाषणबाजीप्रचुर संवाद आणि काही गाण्यांना कात्री लावण्याचा अधिकार त्यांच्याकडे नसल्यानं सिनेमाच्या वाढलेल्या लांबीचं खापर त्यांच्यावर फोडता येणार नाही.
  चंद्रचुड सिंगच्या छोटय़ाशा कारकिर्दीतली ही सर्वात समाधानकारक भूमिका असेल. त्याच्या लोकप्रिय `इमेज'शी पूर्णपणे विरोधी असा खलप्रवृत्त रवी वर्मा त्या थंड संयतपणे साकारला आहे. रवीमधलं परिवर्तन दाखवताना त्यानं आवाजाचा आणि चेहऱयाचा उत्तम वापर करून घेतला आहे. महिमाचा `परदेस' नंतरचा हा सिनेमा तिच्यातील अभिनयगुणांवर शिक्कामोर्तब करतो. काजलच्या भूमिकेत फारसं काही करायला न मिळाल्याची कसर ती ठसकेबाज कजरीमधून भरून काढते. या दोन व्यक्तिरेखांसाठी तिनं संवादफेकीबरोबरच आवाजाची पट्टीही बदलली आहे. संजय दत्तलची `पॉवर-पॅक्ड' भूमिका हे `दाग...'चं मुख्य आकर्षण राहणार आहे. त्याला अबोल करण साकारताना अभिनयाचे (आणि संवादफेकीचे) श्रम फारसे करावे लागलेले नाहीत. सतत सूडाच्या एकाच ध्येयानं पछाडलेल्या माणसाच्या चेहऱयावरचं वेडसर क्रौर्य तो शेवटपर्यंत परिणामकारकपणे वागवतो.  
रवीमधला बदल लक्षात आल्यावर झालेला बदल मात्र त्यानं दुखरी नजर निवळवून जाणकारीनं दाखवला आहे. अन्य कलावंतांमध्ये शिवाजी साटम यांचा प्रामाणिक सत्यप्रकाश (ही त्यांची इमेज होऊ लागली असली तरी) छाप पाडून जातो. संजय दत्तची एंट्री प्रभावी होण्यात त्यांच्या सत्विक संतापाचा उद्रेक दर्शविणाऱया संवादाचाही मोठा वाटा आहे. दीपक शिर्केचं `नक्षा' बदलण्याचं पालुपदही गंमतीशीर.
  राजेश रोशननं `प्यार हमें प्यार तुम', `दिल दीवाना ना जाने कब' आणि `परदेसिया' ही गाणी मधुर सुरावटींमध्ये गुंफली आहेत. `तेरा लकी कबूतर' हे भांगडागीत लोकप्रिय ठेक्याचं असलं तरी `संजय दत्तलाही द्यावं एक गाणं' म्हणून सिनेमात घुसवल्यासारख्यां वाटतं.
  व्यावसायिक चौकटीची सगळी (कु) पथ्यं पाळतानाच प्रमुख व्यक्तिरेखांच्या स्वभावरेखाटनात धाडसी प्रयोग करणारा `दाग'-द फायर' सर्व खटकणाऱया गोष्टींसहही एकदा पाहण्याजोगा आहे.

No comments:

Post a Comment