Thursday, January 19, 2012

जया अंगी पोरपण, तया(च) ‘बादशाही’ रंजन (बादशाह)


वेळ मिळेल तसं आणि जिथे तिकीट मिळेल तिथं तिकीट काढायचं, थेटरात बसून गारेगार व्हायचं, डोकं बाजूला ठेवून हसायचं झ्र खिदळायचं, मारामाऱयांना खुर्चीत उसळायचं, गाण्यांवर थिरकायचं, क्लायमॅक्सला थोडी नखं खायची आणि सिनेमा संपताच `साई सुटय़ो ।़।़' करून मोकळं व्हायचं... थेटरबाहेरच्या पहिल्या वळणावर सिनेमा पूर्णपणे विसरून जायचा...
  आपल्यापैकी बहुसंख्य प्रेक्षकांची हिंदी सिनेमा पाहण्याची ही आवडती पद्धत. रोजचं जग विसरायला लावणारी दोन घटकांची करमणूक, यापलीकडे सिनेमाकडून फारशा अपेक्षा न बाळगणारी.
  या आणि एवढय़ाच अपेक्षा ठेवून थेटरात शिरलेल्या प्रेक्षकाला अब्बास- मस्तान दिग्दर्शित `बादशाह' निराश करत नाही. मात्र, `बादशाह'कडून पूर्ण मनोरंजन करून घ्यायचं असेल, तर वास्तवाला कल्पनेचं अद्भुताचं परिमाण देणाऱया विनोदाची, अतिरंजकतेची सवय हवी, आवड हवी. जत्रेतल्या आरशातला बेढब चेहरा पाहून हसण्याची क्षमता हवी. कारण, `बादशाह'चा पूर्वार्ध अशा फँटसीप्रधान घटनांनी भरलेला आहे. त्याला सहजच कुणी `पोरकट' म्हणून नाक मुरडू शकतं.
  आपल्या प्रेक्षकांना निखळ फँटसी पाहण्याची सवय नाही, हे लक्षात घेऊनच की काय, लेखक नीरज व्होरा आणि श्याम के. गोयल यांनी `बादशाह'च्या कथानकात पूर्वार्धातच `थ्रिलर'चीही बीजं रोवली आहेत आणि उत्तरार्धात प्राधान्यानं थ्रिलरच घडवलाय.
 इथे `बादशाह' (शाहरुख खान) आहे एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. जेम्स बाँड, शेरलॉक होम्स आणि मुख्यत्वेकरून पिंक पँथरच्या छटा असलेला हा येडचाप डिटेक्टिव्ह आणि त्याचे सहकारी ओव्हरस्मार्ट कारवायांमधून संकटं ओढवून घेतात आणि त्यातून सुटकाही करून घेतात. गोव्याच्या मुख्यमंत्री गायत्री बच्चन (राखी) यांची हत्या करण्याचा कट एका उद्योगपतीनं (अमरिश पुरी) आखलेला असतो. त्याचा सुगावा सीबीआयला लागल्यावर ते हा कट उधळण्यासाठी ज्या एजंटाची नेमणूक करतात, त्याचं कोडनेम असतं `बादशाह' गायत्रीदेवींचे मारेकरी आणि संरक्षक यांच्या शहकाटशहाच्या खेळींमधून प्रत्यक्ष गोव्यात अवतरतो, तो आपला हीरो - बादशाह डिटेक्टिव्ह. हा नेमका कोण आहे; मारेकरी की रक्षक, याचे घोटाळे सुरू होतात. तो आलेला असतो वेगळ्याच कामगिरीसाठी, पण अडकतो या झेंगटात.
अर्थात ही कामगिरी त्याला फत्ते करावी लागतेच.
 `बादशाह'ची सगळ्यात मोठी गंमत आहे पूर्वार्धात. घरात खाऊ, खेळणी आणणारे पाहुणे आले, की घरातलं लहान मूल जसं `वाघ कसा बसतो', आई कशी दटावते' वगैरे नकला करून दाखवतं, बरा होऊनही बराच काळ लोटलेला `बाऊ' दाखवून सहानुभूती उकळू पाहतं. गाणीबिणी उत्साहानं म्हणून दाखवतं... थोडक्यात `हमखास यशस्वी' बाळलीला दाखवून पाहुण्यांना खुश करून टाकतं; तशा लोभस लीलांनी हा भाग प्रेक्षकाला खुदखुदवतो. त्यासाठी पुरेसा सुनियोजित बालिशपणा बिनदिक्कत करण्याचं धाष्टर्य़ लेखकद्वयीनं आणि दिग्दर्शद्वयीनं दाखवलंय. हाच बालसुलभ निरागसपणा नंतरच्या थ्रिलरमध्येही पेरलेला आहे; तो सिनेमाचा एकसंध पोत पाहता आवश्यकच ठरतो.
  पूर्वार्धात हा `बादशाह' चोरीचे हिरे परत मिळवून देण्यासाठी पत्त्यांचा जुगार खेळतो. हाणामाऱयांमधल्या मोडतोडीचं बिल भरण्यात सगळी कमाई उधळतो, पकडायला आलेल्या पोलिसांसमोर गाऊन-नाचून त्यांना नाचवतो आणि अल्लाद सटकतो. प्रेमलग्नाचाच अट्टहास धरून बसलेल्या फडकिल्या छोकरीचं (ही नायिका- ट्विंकल खन्ना) दिल तोडण्याची सुपारी घेतो. तिचं दिल तोडतो; पण, स्वत:चं दिल गमावून. तत्पूर्वी, तिला पटवण्यासाठी आंधळयाचं झकास नाटकही वठवतो आणि जाताजाता `फिल्मी' आंधळ्याची झक्क टोपी उडवतो.
 या सगळ्या कल्पनारंजनात नितीन देसाई यांच्या कल्पनेतून साकारलेला `बादशाह'च्या एजन्सीचा सेट एखाद्या पात्राइतकीच महत्त्वाची भूमिका बजावतो. हे ऑफिस म्हणजे धमालच आहे. इथे `बादशाह'ला जगभरातनं नकली फोन येत असतात. गिऱहाईकानं पाऊल ठेवताच दरवाजा आपोआप उघडतो. `बादशाह' विचित्र स्टायलीच्या वेशभूषेत, कधी आकाशातनं अवतरतो, तर कधी थेट पाताळातून. फिरत्या रंगमंचासारख्या या ऑफिसच्या भिंती फिरवल्या, की लगेच ते आंधळ्या राजूचं (हे बादशाहनं नायिकेला गटवण्यासाठी घेतलेलं सोंग) घर होतं; पुन्हा फिरवल्या की डोळ्यांचं हॉस्पिटल. इथे नायिकेला नायकाच्या घरात यायला भाग पाडण्यासाठी पाऊस पाडण्याचीही सोय आहे. मूळ ऑफिसमधल्या एकेका छोटय़ा छोटय़ा वस्तुमध्ये, रंगसंगतीमध्ये `क्रॅक'पणाच्या खुणा दिसतात; ही नितीन देसाइभची कमाल. सिनेमाची नस सापडलेला कलादिग्दर्शक त्या सिनेमाचा दृश्यात्मक परिणामावर केवढी हुकूमत गाजवतो, हे इथं दिसतं.
 उत्तरार्धात, `बादशाह' आणि गायत्रीदेवींचा मारेकरी (शरद सक्सेना) यांच्यातली गोव्यातली दण्णादण्णी, त्यात कुत्र्याच्या आगमनानंतर `गाणं गायलं की कुत्रा काही करत नाही', या समजुतीतून उडणारा हलकल्लोळ, गोव्यात गुंडांनी अपहरण केलेल्या नतद्रष्ट पोरटीचा आगाऊपणा, असल्या हुकमी हास्योत्पादक घटनांची पेरणी आहे. थ्रिलरचा भागही अब्बास-मस्तान यांनी खास त्यांच्या सफाईनं हाताळलाय आणि त्यात शेवटी एक `धक्का' ही  दिलाय.
  `गोष्ट' नावाची गोष्ट काहीशी बासनात गुंडाळून ठेवून लेखक-दिग्दर्शकांनी `बादशाह'मध्ये सुरुवातीला कल्पनेचं वारु चौखूर उधळवलंय. पण, `सेफ गेम' म्हणून गोष्टवादी प्रेक्षकांसाठी थ्रिलरही गुंडाळून दिलाय. पूर्वार्धातला मॅडकॅपपणा आणि थ्रिलरमधली अपरिहार्य गंभीरता यांचा मेळ फारसा चपखल बसला नसला, तरी ही उणीव डोळेझाक करण्याजोगी आहे. फक्त `एक्स रे' चष्म्या' बाजारू सवंगपणा खटकतो.
  लेखक-दिग्दर्शकद्वयीला अपेक्षित परिणाम साधण्यात सर्वाधिक साह्यभूत झालाय शाहरुख खान. त्याच्या व्यक्तिमत्त्वात `पब्लिकला खुश करण्या'ची प्रबळ, बालसुलभ प्रेरणा आहे. जिम कॅरीपासून पीटर सेलर्सपर्यंत तमाम पाश्चात्य विनोदवीरांच्या छटा मस्तपैकी आत्मसात करून तो `बादशाह'चा चक्रमपणा सहज साकार करतो, तेही `नायका'चा आब राखून. त्याचा लवचिक वावर, चेहरा वाकडातिकडा करण्यास बिल्कुल न लाजण्याची वृत्ती आणि सफाई `बादशाह'मध्ये जान भरते
त्याच्या सहाय्यकाच्या भूमिकेतला जॉनी लिव्हरही हुकमी साथ देतो. ट्विंकल खन्नाला तंग कपडय़ांमध्ये भरगच्च शरीर (आवश्यक प्रमाणात) दाखवण्याचं काम आहे. ते तिला करावं लागत नाही, आपोआपच घडत राहतं. अमरिश पुरी, शरद सक्सेना, `व्हॅम्प' दीपशिखा आणि राखी वगैरे मंडळी आपापली कामं सराईतपणे पार पाडतात. गायत्रीदेवीच्या पतीच्या भूमिकेतला सचिन खेडेकर `धक्कादायक' कामगिरी आरामसे करून जातो.
  अब्बास-मस्तान यांच्यासाठी अनु मलिक नेहमीच खास ठेवणीतलं ठेकेबाज, सुश्राव्य, पण थिएटरबाहेर फारसं लक्षात न राहणारं संगीत देतो. इथेही `टायटल साँग', `वो लडकी जो सब से अलग है' आणि `मै तो हूँ पागल' ही गाणी त्यानं खणखणीत दिली आहेत. `हम तो दिवाने हुए यार' आणि `मुहोब्बत हे गयी है' ही प्रेमगीतंही `चालसे' पद्धतीची. समस्त लोकप्रिय गीतांच्या मुखडय़ांना एकत्र आणणाऱया `जुम्मा दे गई चुम्मा' या गमतीशीर गाण्यात अनुनं स्वत: `रेकण्या'ची हौस पुरवून घेतली आहे.
  थॉमस झेवियर यांचं छायालेखन, फरहा खान, गणेश आचार्य, रेखा प्रकाश यांचं नृत्यदिग्दर्शन, दिवंगत अकबर बक्षी आणि कौशल्य-मोझेस यांची `ऍक्शन', हुसेन बर्मावाला यांचं संकलन, या तांत्रिक बाजूंनी सिनेमा वेगवान, चटपटीत बनवलाय.
  प्रेक्षकाच्या मनावर ठसण्याची वगैरे महत्त्वाकांक्षा न ठेवणारा प्रामाणिक करमणूकपट म्हणून `बादशाह' एंजॉय करता येईल. त्यासाठी थोडं पोरपण मात्र अंगी असायला हवं.

No comments:

Post a Comment