कोलंबिया ट्रायस्टारचा
`डान्स विथ मी' हा नावात स्पष्ट झाल्याप्रमाणे नृत्यप्रधान सिनेमा आहे. पण, `फास्ट फॉरवर्ड', `डर्टी डान्सिंग'
वगैरे नृत्यपटांपेक्षा वेगळा. एकतर इथलं केंद्रस्थानी
असलेलं नृत्य आधुनिक `हाडमोडी' नृत्य नाही;
ते आहे लॅटिन अमेरिकन `लोक'नृत्य आणि अभिजात वळणाचं `बॉलरुम' नृत्य. आणि कथानकातही एक संथ वळणाची प्रेमकथा गुंफली
आहे.
राफाएल एन्फान्ते (शायॅन) हा एक क्यूबन तरुण आपल्या आईच्या निधनानंतर अमेरिकन
वडिलांना भेटायला निघतो तेथे ही कहाणी सुरू होते. अमेरिकेत एक्सेलसियर
हा मोडकळीला आलेला `डान्स स्टुडिओ' (नृत्य
प्रशिक्षणशाळा) चालविणाऱया राफाएलच्या बापाला- जॉन बर्नेटला (क्रिस क्रिस्टोफर्सन) राफाएल हा आपला मुलगा असल्याची जाणीवच नसते. त्याच्या
लेखी राफाएल हा तरुणपणातल्या एका `मैत्रिणी'चा मुलगा.
राफाएल या स्टुडिओमध्ये `अटेंडंट' सदृश नोकरी मिळवतो. तिथे
त्याला भेटते रुबी (व्हॅनेसा एल. विल्यम्स)
ही बॉलरुम नृत्यातली आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेली नृत्यांगना.
ही कृष्णवर्णीय नृत्यांगना बॉलरुम नृत्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची
तयारी करते आहे. तिचा पूर्वीचा `डान्स पार्टनर'
स्टेफानो (विल्यम मार्क्वेझ) हा तिच्या पदरात एक मुलगा टाकून नामानिराळा राहिलाय. या मुलाचं भवितव्य डोळ्यासमोर ठेऊन ती स्पर्धा जिंकून आर्थिक सुरक्षितता मिळवू
पाहतेय.
लॅटिन अमेरिकन `साल्सा' नृत्य अंगात भिनलेला राफाएल रुबीच्या `यांत्रिक' नृत्यावर टीका करतो. ती त्याच्यावर चिडते. तो तिला लॅटिन-अमेरिकनांच्या क्लबमध्ये नेऊन तिथलं मुक्त नृत्य दाखवतो. भांडाभांडीतून प्रेम फुलू लागतं. पण, रुबी एका मर्यादेपलीकडे राफाएलला स्वीकारत नाही. दुर्दैवानं
नृत्यस्पर्धेसाठीचा जोडीदार योग्य नसल्यानं रुबीला पुन्हा स्टेफानोशीच जोडी जुळवावी
लागते. त्याची कुजकट आत्मप्रौढी सहन करावी लागते. नवशिक्यांसाठीची स्पर्धा राफाएल सहज नृत्याविष्कारानं जिंकतो. रुबी स्टेफानो यांना अंतिम फेरीत अचानक क्यूबन सुरावटींवर नृत्य करावं लागतं.
राफाएलच्या आठवणींनी विद्ध झालेली रुबी सर्व संकेत मोडून आतून उसळणारा
नैसर्गिक नृत्यविष्कार सादर करते आणि स्पर्धा जिंकते. राफाएल
- रुबी पुन्हा `डान्स- फ्लोअर'वरच एकत्र येतात. दरम्यानच्या
काळात जॉननंही आपला मुलगा म्हणून राफाएलचा स्वीकार केलेला असतो.
सरळ सोऱया पद्धतीनं उलगडणारी ही कहाणी
दिग्दर्शिका रँडा हेन्स हिनं काहीशा संथगतीनं मांडली आहे. मात्र,
त्यासाठी अतिलोकप्रिय आणि अतिवेगवान नृत्यप्रकारांना फाटा देऊन सौम्य
स्वरुपाचे `बॉलरुम' नृत्य निवडण्यात चलाखी
दाखवली आहे. हा संपूर्ण सिनेमा बॉलरुम नृत्याच्या लयीतच उलगडतो.
राफाएलला काहीशा अपरिचित पण विलक्षण
चैतन्यमय साल्सा नृत्याची पार्श्वभूमी देण्यातही रँडानं डोकं लढवलंय. सुरुवातीच्या दृश्यांमध्ये क्युबाच्या रस्त्यांवर सायंकाळनंतर जमणारा वादकांचा
ताफा, त्यांची ऍफ्रो अमेरिकन तालावर रंगणारी धुंद समूहगीतं आणि
लय अंगात भिनवून अनौपचारिक नैसर्गिक नृत्याविष्कार साकारणारी सामान्य माणसं हे वातावरण
विलक्षण संमोहक आहे.
एक्सेलसिएर नृत्यशाळेतील वातावरणात
राफाएलनं घडवलेला बदल, रुबीशी त्याचं प्रांजळ `बॉईश' वर्तन, त्याच्या अंगात मुरलेली
नैसर्गिक लय, या सगळ्यांच्या वापरातून तिनं कथा फुलवली आहे.
नृत्यशाळेतल्या प्रसंगांमधून हलकाफुलका विनोदही सिनेमात रिलीफ देतो आणि
नृत्यरसिकांना `ठेक्यावर' ताल धरण्याची
संधीही मिळते. त्यातून राफाएल - रुबी यांच्यातलं
हळुवार नातंही खुलतं. रुबीला रात्री सुरू झालेल्या बागेतल्या
स्प्रिंकलर्समधून तुषारांचा वर्षाव होतो तेव्हा तो खजील न होता पर्जन्यनृत्याचा उत्स्फूर्त
अविष्कार घडवतो, हा प्रसंग विशेष उल्लेखनीय.
सिनेमा नृत्यप्रधान असल्यानं शेवटच्या
अर्ध्या तासात `संवादी' प्रसंग फारसे घडतच
नाहीत. सगळा कथाभाग उलगडतो डान्स फ्लोअरवर... नृत्याच्या माध्यमातून. तिथेही राफाएलची नैसर्गिक शैली
आणि रुबी स्टेफानोचं अत्यंत आकर्षक पण ठरीव साच्यातलं नृत्य यांच्यातला विरोधाभास वेगळ्या
प्रकारचं संघर्षनाटय़ घडवतो.
त्या मानानं राफाएल आणि जॉन यांच्यातल्या
नात्यावर घालवलेला वेळ अनावश्यक वाटतो.
शायॅन या लॅटिनो पॉप स्टारचं हॉलिवुडमधलं
पदार्पण या सिनेमातून झालंय. तो अभिनेता निश्चितच नाही;
पण दिसतो गोड विशेषत: गालाला खळ्या पाडणारं त्याचं
हसू अतिशय लोभस आहे. दिग्दर्शिकेनं त्याचा कॅमेऱयासमोरचा अवघडलेपणा
राफाएलच्या पात्रात मुरवून झाकून टाकला आहे. अभिनय करायला लावणारे
प्रसंगही त्याला न देण्याची चतुराई दाखवली आहे. त्यामुळे शायॅनचं
नवखेपण खटकत नाही. शिवाय, सहजस्फूर्त साल्सा
नृत्यावरचं त्याचं प्रभुत्वही वादातीत आहे.
`डान्स विथ मी'चं खरं आकर्षण आहे व्हॅनेसा विल्यम्स ही कृष्णवर्णीय तरतरीत नायिका.
ती उत्तम नर्तकी तर आहेच, शिवाय मादक सौंदर्यवती
आणि मेहनती अभिनेत्रीही आहे. माजी `मिस
अमेरिका' आणि ख्यातनाम पॉप गायिका म्हणून विख्यात असलेल्या या
कलावतीच्या व्यक्तिमत्वात नर्तकीची नजाकत आहे आणि मदनिकेचं आवाहनही. `डान्स' मध्ये सर्वाधिक भावाविष्काराची जबाबदारी तिच्यावर
आहे.
ती व्हॅनेसानं समर्थपणे पेलली आहे.
राफाएलबरोबर शारीरिक जवळीकीची सीमापार करण्यापूर्वीच तिचं भानावर येणं,
त्याच्याबद्दलची ओढ लपवून नाचावर लक्ष केंद्रित करणं आणि अखेरच्या कासाविशीतून
साकारणारा नृत्यविष्कार यातून व्हॅनेसा अभिनयाची बाजी मारून जाते. तिचा नृत्याविष्कारही आंतराष्ट्रीय स्पर्धेच्या दर्जाचा भासतो. तिच्या आणि शायॅनच्या नृत्यांच्या प्रसंगांमध्ये तांत्रिक क्लृप्त्या लढवून
`डमी नर्तक' वापरलेले नसल्यानं त्यांच्या
अविष्काराची पातळी उंचावते.
उत्तम नृत्यासाठी उत्तम संगीत अत्यावश्यक
असतं. `डान्स...'मध्ये लॅटिन आणि ऍफ्रो
- क्युबन संगीताची मेजवानी आहे. थालिया,
ऍना गॅब्रिएल, रुबेन ब्लेडस, सार्गियो मेंडीस हे लॅटिन पॉप स्टार, माकिना लोका,
जॉनी पोलॅन्को, कॅचाओ हे साल्सा आणि क्युबन संगीतातले
लोकप्रिय गायक, `डीएलजे' हा वाद्यवृंद यांचं
उत्तम संगीत निवडून सिनेमात वापरलंय. लिझ कर्टिस आणि डॅरिल मॅथ्युज
यांचं नृत्यदिग्दर्शन संबंधित नृत्यप्रकारांचे दर्शन घडवताना त्या नृत्यांमधून कथाभागाची
गती कायम ठेवतो.
नृत्यपटांच्या चाहत्यांनी आवर्जून
पाहावा, असा हा सिनेमा आहे. मात्र अन्य
नृत्यपटांप्रमाणं आधुनिक डिस्कोथेक्सचा चकचकाटी, झगमगाटी `फील' या सिनेमात नाही, हे ध्यानात
ठेवावं. मंद सुरावटीवर मेणबत्त्या मंद प्रकाशात प्रियतमेचा हात
हातात धरून चवीचवीने चाखलेच्या मेजवानीचा हा संरजाम आहे. `फास्टफूड'च्या चाहत्यांनी या वाटेला न गेलेलंच बरं!
No comments:
Post a Comment