Tuesday, January 17, 2012

दात दाखवून अवलक्षण (लहू के दो रंग- नवा)


मेहुलकुमार हा फारच समंजस दिग्दर्शक आहे बुवा! प्रेक्षकांची एवढी काळजी घेणारा दिग्दर्शक आजच्या युगात दुसरा सापडणं मुश्किल. म्हणूनच तर त्याचा `लहू के दो रंग' हा नवा सिनेमा अनेक अर्थांनी `व्ह्यूअर फ्रेंडली' झाला आहे.
  समजा, तुम्ही `लहू के दो रंग'चं तिकीट काढलंत. ट्रफिकच्या गर्दीतून वाट काढताना वेळ झाला आणि सिनेमा सुरू झाल्यावर 10-15 मिनिटांनी पोहोचलात. तर पिक्चरची सुरुवात बुडाली म्हणून तुमचं काही बिघडलं का? काहीच नाही. कारण मेहुलचं `व्ह्यूअर फ्रेंडली' दिग्दर्शन.
  दहा-पंधरा मिनिटंच कशाला, आपल्या आवडत्या टीव्ही सिरियलचा एखादा एपिसोड बघून आरामात अर्धा-पाऊणतास उशिरा पोहोचलात तरी काही हरकत नाही. तिथून पुढेही तुम्ही सिनेमा पाहू शकता. आधी काय घडलं असेल याचा अंदाज बांधू शकता.
  `लहू के दो रंग' ला खरंतर मध्यंतरानंतरच गेलेलं बरं. कारण सिनेमाच्या कथानकात जे काही `घडतं' ते मध्यंतरानंतरच. तोवर पात्रपरिचय सुरू असतो. आणि एका इमानदार कस्टम अधिकाऱयानं एका बेईमान धंदेवाईक साक्षीदाराच्या साथीनं खलनायकांचा नि:पात केल्याची कथा चितारणाऱया `लहू के दो रंग' मधील पात्रं आपल्या इतक्या परिचयाची आहेत, की खास तेवढय़ासाठी वेळात वेळ काढून मध्यंतराआधी येण्याची गरज नाही. केवढी ही सोय!
  आता मध्यंतरानंतर तरी `लहू के दो रंग' पाहायला जाण्याची गरज काय? तर खलनायकांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्यामुळे सुडानं पेटलेला कस्टम अधिकारी खलनायकांकडून आणि नायकाच्या हातून स्वत:चा खून करवून घेतो. त्यानंतर एकेका खलनायकाचा मुडदा पाडतो, असं इंटरेस्टिंग वाटणारं कथानक मध्यंतरानंतर आहे म्हणून. पण काळजी करू नका. त्यातही आपल्याला नावीन्य वाटेल असं किंवा चुकलं तर हळहळ वाटेल, असं काहीही न घडवण्याची खबरदारी मेहुलनं घेतली आहे.
  एखाद्या निर्दय दिग्दर्शक असता तर त्यानं हा प्लॉट खुलवण्याची भानगड केली असती. कस्टम अधिकाऱयाकडून खलनायकांचा नि:पात कसा होतो, तो भाग रंजक, उत्कंठावर्धक वगैरे करण्याचा प्रयत्न केला असता. पण मेहुल सहृदय दिग्दर्शक आहे. आपले प्रेक्षक बुद्धी गहाण ठेवून फक्त टाईमपाससाठी सिनेमाला येतात, याची कल्पना आहे. कथानकात धक्के, वळणं वगैरे आणून प्रेक्षकांच्या बुद्धीवर आणि हृदयावर ताण आणण्याचं पाप तो करीत नाही. दोन्ही नायकांनी घेतलेला सूडही इतका ठोकळेबाज पद्धतीचा की मध्यंतरानंतरही तुम्ही थिएटरवर पोहोचू शकता. त्यानंतरचा सिनेमा आरामात पाहू शकता.
  बरं थरूनभागून थिएटरमध्ये पोहोचल्यावर तुम्हाला सिनेमा सुरू असताना डुलकी लागली, डोळे मिटले, तरी वांधा नाही. नासिरुद्दीन शाह, अक्षयकुमार, करिश्मा कपूर, सुरेश ओबेरॉय, फरिदा जलाल वगैरे मंडळींनी मेहुलचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून `व्ह्यूअर फ्रेंडली' अभिनय केलाय. म्हणजे बघितलात तरी तुमची अडचण नाही. संवाद, गाणी, गोळीबाराचे आवाज, मारामारीचे आवाज नुसते कानावर पडत राहिले तरी तुम्हाला सिनेमा समजतो; त्यासाठी डोळे उघडे ठेवण्याची गरज नाही. कारण सिनेमात आवर्जून समजून घ्यावं, असं काहीच नाही.
  मेहुलकुमारची एकूण दूरदृष्टी वाखाणण्याजोगीच आहे. कथा-पटकथा-छायाचित्रण- संकलन-संगीत वगैरे सिनेमाची इतर अंगही त्यानं अशीच बेतास बात, ठेवली आहेत. त्या त्या तंत्रज्ञांनी मेहुलचा उदात्त हेतू लक्षात घेऊन खास कसब वगैरे दाखवण्याचा मोह मनोनिग्रह ठेवून टाळला आहे, हे विशेष कौतुकास्पद.
त्यामुळं `लहू के दो रंग' पाहायला जसं तुम्ही थिएटरवर केव्हाही पोहोचलात तरी चालतं; तसं तुम्ही थिएटरवर पोहोचलाच नाहीत, सिनेमा पाहिलाच नाहीत तरीही चालतं.
  त्यातून तुम्ही `लहू के दो रंग' पाहायचा निर्धारच केला असेल, तर सिनेमातली अक्षयकुमारची एक लकब तुम्हाला सांगायलाच हवी. अक्षयला `लहू के दो रंग'मध्ये प्रत्येक सिच्युएशनला म्हणी उलटय़ापालटय़ा करून सांगायची सवय असते. म्हणजे `उलटा कोतवाल चोर को डांटे' अशी उलटी सांगतो. मग एखाद्या पात्रानं त्याला सुलटी म्हण सांगितली की `तुला कळलं ना मला काय म्हणायचंय ते', असं सांगून तो वेळ मारून नेतो.
  आता तुम्ही `लहू के दो रंग' पाहायचं ठरवलंच असेल, तर अक्षयच्या या लकबीचा आधार घेऊन मायमराठीतली एक म्हण सांगतो... दात दाखवून अवलक्षण.
  काय म्हणालात, ही म्हण चुकीची आहे. खरी म्हण वेगळीच आहे. असो, असो. आम्हाला काय म्हणायचंय हे तुम्हाला कळलं ना; मग झालं तर!

        लहू के दो रंग

निर्माता : . जी. नडियादवाला
लेखक - दिग्दर्शक, मेहुलकुमार
संवाद : अन्वर खान
छायाचित्रण : रुसी बिलिमोरिया
गीते : समीर
संगीत : आनंद मिलिंद
कलाकार : नासिरुद्दिन शाह, अक्षयकुमार, करिश्मा कपूर, सुरेश ओबेरॉय, फरिदा जलाल, फराह.

No comments:

Post a Comment