Saturday, January 14, 2012

पोंगा पंडित (अर्जुन पंडित)


``जो कुछ भी हुआ, उसके लिए मै तुमसे माफी माँगती हूँ...''
  `अर्जुन पंडित' या सिनेमात, शेवटच्या रिळाच्या शेवटी, सिनेमाची नायिका नायकाला उद्देशून हा माफीनामा सादर करते. त्यावेळी दिग्दर्शक राहुल रवैल यांनी एक करायला हवं होतं. हे वाक्य तिचा क्लोजअप घेऊन, कॅमेऱयाला (पर्यायानं प्रेक्षकांना) उद्देशून बोलायला लावायला हवं होतं. कारण, `अर्जुन पंडित'मध्ये जे काही होतं, त्याबद्दल या मंडळींनी खरंतर प्रेक्षकांचीच माफी मागायला हवी आहे.
 `अर्जुन पंडित'ची सगळी कथा दोन सूत्रांभोवती आहे. एक आहे माणूस गुन्हेगार का होतो, याचा मनोविश्लेषणात्मक पातळीवरचा शोध. दुसरं सूत्र आहे प्रेम या भावनेची तीव्रता माणसाकडून काय करवून घेते, त्याला `क्या से क्या' बनवू शकते, याचं.
 हिरद्वारच्या कॉलेजात `योगशास्त्र' श्किवणारा पापभिरू, भ्याड, नेभळट प्राध्यापक अर्जुन दिक्षित (सनी देओल) हा या सिनेमात एका वर्षात `पंडित' या नावानं ओळखला जाणारा मुंबईतला सर्वात खतरनाक गुंड बनतो. हे परिवर्तन घडवून आणतं प्रेम- अर्जुनचं निशावरचं (जुही चावला) प्रेम.
 ही मुलगी योगावर संशोधन करण्याच्या मिषानं त्याच्या सान्निध्यात येते. त्याला ठरवून, रीतसर प्रेमात `पाडते.' हरिद्वारचा गावगुंड असलेल्या संजय शर्मा (शहाबाज खान) या आमदारपुत्राविरुद्ध त्याला भडकवते, त्याच्याशी पंगा घ्यायलाच भाग पाडते. अर्जुनच्या हातून संजयचा खून होतो तेव्हा मात्र ती `संजयची चूक नसताना अर्जुननं त्याला मारलं,' असा पवित्रा घेऊन अर्जुनाला खुनाच्या गुन्ह्यात अडकवते.
  हे ती का करते? तिच्या बहिणीवर संजय शर्मानं केलेल्या बलात्काराचा साक्षीदार असलेल्या अर्जुननं त्या वेळी पोलिसांकडे तशी साक्ष न दिल्यानं तिच्या बहिणीनं आत्महत्या केलेली असते. ती अर्जुनकडून संजयचा खून करवून घेऊन एका दगडात दोन पक्षी मारते.
  आता अर्जुननं त्यावेळी साक्ष का दिलेली नसते? तर संजयनं त्याच्या बहिणीची अब्रू लुटण्याची धमकी दिलेली असेत म्हणून. हेच निशाला सांगून तिची माफी मागण्याच्या (आणि `ती खरोखरच आपल्या प्रेमात पडली होती', या भ्रमामुळे तिला मनवण्याच्या) उद्देशानं तो मुंबईत येतो. इथल्या गँगवॉरमध्ये अडकतो. मात्र, गुन्हेगारी जगतात `टेरर' पंडित म्हणून वावरतानाही तो निशाची त्याच्यापरीनं `काळजी' घेत असतो. म्हणजे, तिला जबरदस्तीनं उचलून, आपल्या अड्डय़ात आणून तिचा वाढदिवस साजरा करतो. ती अर्धवस्त्रांत मॉडेलिंग करते, म्हणून ते कपडे तिच्याच घरात जाळून टाकतो. ती एका डॉक्टरशी लग्न करायला निघाल्यावर भर मंडपात घुसून, लग्न उधळून तिचं अपहरण करतो. तिच्याविरुद्ध ब्र काढणाऱया प्रत्येक माणसाचं डोकं फोडून टाकतो आणि `तुझं लग्न माझ्याशीच होणार', असं तिला धमकावत राहतो. शेवटी तिच्या भावाच्या डोक्यावर पिस्तुल टेकवून तसं लग्न करतोही.
  हे सगळं झाल्यावर त्याला साक्षात्कार होतो, की `अरे, हिचं तर आपल्यावर प्रेमच नव्हतं.' लगेच उपरती! तिला गाडीत भरून त्या डॉक्टरकडे घेऊन जाऊन `कर आता हिच्याशी लग्न' अशी त्याला दरडावणी! पण, ते लग्न (अर्थातच) होत नाही. खलनायक आणि अर्जुन पंडित यांनी समसमान जबाबदारी उचलून पुढे पाडलेल्या रक्ताच्या पावसात न्हाताना निशाला आपणही अर्जुनच्या प्रेमात पडलो आहोत, असा साक्षात्कार होतोच.
  मुळात या कथानकात प्रेम हा अर्जुनचा `ड्रायव्हिंग फोर्स' आहे, असं क्षणभरही वाटत नाही. कारण सोप्पं आहे. तो जे व्यक्त करतो ते `प्रेम' नाही, तर पराकोटीची आसक्ती आहे आणि पुरुषी स्वामित्वभावना. या भावनांचा अतिरेक विकृतीच्या पातळीवर जातो आणि अर्जुनला मनोरुग्ण बनवतो.
  एकतर जिथे निशा थंडपणे त्याला खुनाच्या गुन्ह्यात अडकवते, तिथेच त्याला `तिचं आपल्यावर प्रेम नाही, असलीच तर घृणा आहे', आहे कळायला हवं. ते कळूनही तो स्वत:च्या प्रेमापुढे हतबल असेल, तर त्यानं निशाची पहिली भेट होताक्षणी तिचा गैरसमज दूर करायला हवा; आपल्याला साक्ष का देता आली नाही, हे स्पष्ट करायला हवं. ते न करता तो तिच्याशी राक्षसी वृत्तीनं वागत राहतो. स्वत:चा प्रेम करण्याचा अधिकार बजावताना तिचा प्रेम न करण्याचा अधिकार मात्र तो नाकारत राहतो. आपण नकळत (किंवा अगदी निशाच्या चुकीमुळे) हिंसेच्या ज्या चक्रात गुरफटतो आहोत, त्यात आपली आणि आपल्या जवळच्या सर्वांचीच होरपळ होणार आहे, याची जाणीव त्याला असल्याचं दिसत नाही. अशावेळी शहाणा आणि अस्सल प्रेम करणारा माणूस आपल्या प्रेमिकेला त्याची झळ पोहोचू नये, म्हणून जिवाचा आटापिटा करील. इथे हे गृहस्थ तिला क्षणोक्षणी स्वत:बरोबर फरपटवतात, कोणत्याही क्षणी तिच्या जिवाला धोका होईल, अशी परिस्थिती निर्माण करतात.
 हा सरळसरळ सूड आहे. प्रेमाच्या नावाखाली अर्जुन निशावर सूडच उगवताना दिसतो. बरं, आपल्याला साक्ष न देण्यास भाग पाडणारी मजबुरी निशाला पटवून देण्यासाठी अर्जुननं हा घाट घातलाय, असं मानलं तरी काय दिसतं? तिच्याशी लावलेलं बळजबरीचं लग्नही तो खरंच मानतो. कारण, मुद्दा पटवून झाल्यावर तो तिला त्या लग्नातून मुक्त करत नाही.
निशाचं पात्रही असंच गमतीशीर. हरिद्वारमध्ये आपल्याला कोणी ओळखणार नाही, आडनाव विचारणार नाही. अर्जुन दीक्षित आपल्या प्रेमात पडेलच, त्या प्रेमापोटी तो संजय शर्माशी पंगा घेईलच, त्याचा मुडदासुद्धा पाडीलच... एवढी गृहीतकं रचून ती हरिद्वारला येते, हे थक्क (किंवा दिग्मूढ की काय म्हणतात ते) करणारं आहे 
मुंबईत `अर्जुन पंडित'नं आयुष्यात पुन्हा (तोही इतक्या हिंसक पद्धतीनं) प्रवेश केल्यानंतर ती ताबडतोब त्याला पोलिसांच्या ताब्यात देत नाही. हे पोलिसही असले झंगड की, एक वर्षात त्यांना पंडित दिसतो कसा, हेही ठाऊक नाही आणि निशाचं प्रकरण कळल्यावर तो तिच्या घरात निश्चित सापडेल, हे लक्षात घेऊन तिथं `फिल्डिंग'ही लावत नाहीत. `आपण अर्जुनशी जे केलं ते वाईट केलं,' अशी अपराधी टोचणी निशाच्या मनात आहे, असं तिचा एक मित्र (अन्नु कपूर) वारंवार (तिलाच) सांगतो. ते खरं मानलं, तरी अर्जुनच्या नृशंसपणाला आळा घालण्याचा कोणताच प्रयत्न निशा करत नाही, करते तो त्याला भोसकण्याचा बालिश प्रयत्न.
 मानवी मनोव्यापारांचा गुंता इतका विलक्षण असतो की, निशा आणि अर्जुनचं वर्तन कदाचित त्यांच्या त्यांच्या पातळीवर शंभर टक्के खरं असू शकतं. मात्र, हे सिनेमाच्या भाषेत मांडताना त्याची अपरिहार्यता प्रेक्षकाला पटायला हवी. सुधीर मिश्रा प्रभृती तीन लेखकांनी मिळून लिहिलेल्या पटकथेत नेमकं हेच झालेलं नाही. शिवाय अर्जुन जे करतो ते प्रेमच, असा हट्ट त्यांनीच धरलेला असल्यानं त्याच्या व्यक्तिमत्त्वाला येणारा अपरिहार्यपणे दुटप्पीपणाची झाक येते.
मग बलात्काराचा खटला `आय विटनेस'च्या साक्षीवर अवलंबून नसतो, याची जाणच न ठेवणं, साध्या सरळ मार्गानं आयुष्य जगलेला अर्जुन मुंबईत एकदम कुंगफू- कराटे- मार्शल आर्ट्स आणि सर्व शस्त्रविद्यांमध्ये एकदम पारंगत कसा होतो, याचं उत्तर न देणं, वगैरे प्रमाद फार छोटे ठरतात. अर्जुन हरिद्वाराचा, `दीक्षित'- म्हणून तो `शुद्ध हिंदी'त बोलला की झालं व्यक्तिरेखाटन (आणि नायकाचा प्रादेशिक वेगळेपणासुद्धा दिल्याचं समाधान), अशीच एकंदर बाळबोध समज असेल, तर अपेक्षा काय बाळगणार?
  दिग्दर्शक राहुल खैल यांनी हातात पडलेली पटकथा, तंत्रदृष्टय़ा निर्देष आणि दृश्यात्मक पातळीवर प्रभावी करण्याची जबाबदारी चोख बजावली आहे. पण मुळात निर्दोष पटकथा रचून घेणं, हेही दिग्दर्शकाचंच (आणि प्राथमिक स्वरुपाचं) काम आहे, हे ते विसरले आहेत, गर्दीच्या ठिकाणी हिंसा `रेखीवपणे' चित्रीत करण्यात खैल यांची मास्टरी आहे. हरिद्वारच्या बौद्ध मठात ध्यानमग्न भिख्खुंच्या पार्श्वभूमीवर संजय शर्माची हत्या, रेल्वे स्टेशनच्या गर्दीतला चित्तथरारक पाठलाग, रेल्वे यार्डातला क्लायमॅक्स यासारख्या दृश्यांमध्ये त्यांची ही हुकूमत प्रकर्षानं जाणवते. निर्मल जानी या गुणी छायालेखकाच्या साह्यानं त्यांनी संपूर्ण सिनेमाला एकसंध दृश्यात्मक पोतही दिला आहे. पण त्यातून सिनेमा प्रेक्षणीय झाला, तरी `बघणीय' काही होत नाही.
 अन्यायामुळं पेटून उठलेला बलदंड हिंसक तरुण ही सनीची हातखंडा भूमिका. मात्र, राहुल रवैलच्याच `अर्जुन'पासून या `अर्जुन पंडित'पर्यंत बराच काळ लोटलाय. सनी आता तरुण नाही, त्याची ही सुप्रसिद्ध अदाकारी प्रेक्षकांना अतिपरिचित आहे आणि मुळात त्याच्याविषयी सहानुभाव वाटावा, अशी ही भूमिकाच नाही. जुहीच्या भूमिकेला वरवर पाहता काही अनोख्या छटा दिसतात. पण त्यांना तार्किक बैठक नसल्यानं तीही निष्प्रभ होते. शिवाय समीपदृश्यांमध्ये तिच्या वाढत्या वयाची दु:खद जाणीव होते ती वेगळीच. मुकेश ऋषी, आशिष विद्यार्थी, सौरभ शुक्ल, वीरेंद्र वर्मा वगैरेंच्या बरोबरीनं आपले सचिन खेडेकर, रवी पटवर्धन आणि गणेश यादव हे मराठी कलावंत दुय्यम भूमिकांमध्ये व्यावसायिक सफाई दाखवतात.
 दिलीप सेन-समीर सेन यांच्या संगीतात खास दम नाही; कारण गाण्यांना सिच्युएशन्सच नाहीत. जे एक गाणं ठेकेबाज आहे, ते दलेर मेहंदीचं गाणं आहे.
  आपल्याला एकतर्फी आवडणाऱया मुलीचा क्रूर छळ करण्यातच पुरुषार्थाची परिसीमा मानणाऱया तमाम विकृत प्रेमिकांना हा सिनेमा `शैक्षणिक' आनंद देईल. इतरांनी या प्रेमाचा पिचका पोंगा घेऊन ज्याला-त्याला `वाजवत' सुटलेल्या पिसाट पंडिताच्या वाटेला जाऊन भेजा हटवून न घेणेच इष्ट.

No comments:

Post a Comment