Tuesday, January 17, 2012

बडे ‘बिल'वाला (बडे दिलवाला- नवा)


 बडे दिलवाला' पाह्यल्यावर पहिला विचार काय डोक्यात येतो माहितीये? सिनेमाच्या नावात काहीतरी गफलत झालीये. हा `बडे दिलवाला' नसून `बडे बिलवाला' आहे?
 कुठल्याही हॉटेलात- अगदी `फाईव्हस्टार'मध्ये किंवा परदेशात तुम्ही जास्तीत जास्त बिल (टिप धरून) किती दिलं असेल? काहीशे, काही हजार? अगदी लाखभर गृहीत धरूयात. `बडे दिलवाला'चा नायक दोन कोटी पन्नास लाख साठ रुपये पन्नास पैसे बिल देतो. हे ऐकून उडाला नसाल तर तपशील ऐका. यात बिल आहे साठ रुपये पन्नास पैशाचं आणि टिप...? अडीच कोटी रुपयांची.
   आहे ना `बडे बिलवाला'?
 शकील नूरानी लिखित-दिग्दर्शित या विलक्षण चित्तचक्षुचमत्कारिक कथानकाचा नायक आहे, रामप्रसाद (सुनील शेट्टी) हा आधुनिक रामावतार, कर्णावतार, बुद्धावतार, इतकंच नव्हे तर गांधीजींचाही अवतार. म्हणून- तर त्याला ओळखीचं लोक `बापू' म्हणतात. हे गृहस्थ पोलिस इन्स्पेक्टर असूनही स्वच्छ चारित्र्याचे आणि अहिंसक प्रवृत्तीचे आहेत.
  अर्थातच सत्ययुगातून थेट अवतरलेला हा राम आजच्या कलियुगात फिट नाही. त्याची पत्नी मंथरा (अर्चना पूरणसिंग) मात्र या युगातली आधुनिक स्त्राe. पैसे न खाणाऱया, सद्वर्तनी, सत्शील रामामुळे तिच्या नशिबात वनवासासारखे खडतर दिवस आले आहेत. ती ब्युटी पार्लरमध्ये नोकरी करून स्वत:च्या हौसामौजा पुरवते. ती ना नवऱयाकडे लक्ष देत ना आपल्या अंतरा (बेबी इरम) या शाळकरी मुलीकडे.
  एकदा मंथराच्या वडिलांनी तिच्या स्वप्नात येऊन दिलेल्या `आदेशानुसार रामप्रसाद लॉटरीचं तिकीट काढतो. एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस पियाला (प्रिया गिल) टिप देण्यासाठी पैसे नसताना तो तिला सांगतो, की लॉटरीचं तिकीट लागलं तर त्यातली अर्धी रक्कम तुझी टिप, नाही लागलं तर पुढच्या वेळी मी तुला टिप म्हणून दहा रुपये (तिकिटाची अर्धी किंमत) देईन.
  रामप्रसादला चक्क पाच कोटीचं पहिलं बक्षीस लागतं. तो पियाला अडीच कोटी रुपये टिप देतो. बाकीच्या पैशातून बराच `दानधर्म' करतो. पिया रामवर प्रेम करू लागते. इकडे मंथराच्या पार्लरमधला एक कावेबाज ग्राहक मन्नुभाई (परेश रावल) मंथराला `फिल्म फायनान्स'च्या जाळ्यात खेचतो. मंथराची अय्याशी आणि चित्रपट निर्मितीवरची उधळपट्टी राम-अंतरा आणि मंथरा यांच्यात दरी निर्माण करते. पिया मात्र रामबरोबरच अंतरावरही प्रेमाचा वर्षाव करत राहते.
  राम-पिया यांच्यातील जवळीक वृत्तपत्रवाले मीठमसाला लावून छापतात. त्याचा फायदा घेऊन मन्नुभाई राम आणि मंथरा यांचा घटस्फोट घडवून आणतो. पियाचं पूर्वायुष्य उकरून, तिला सुहागरात्रीच धंद्याला लावू पाहणाऱया तिच्या नादान पतीला (राजू खेर) न्यायालयात आणतो तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो. परिस्थितीच्या रेटय़ानं एकत्र आलेले राम-पिया अंतराच्या इच्छेनुसार तिचे `मम्मी-पापा' होऊन जातात. मंथरानं लॉटरीच्या लॉटरीच्या संपूर्ण रकमेसाठी लावलेल्या दाव्यात भरपाईसाठी राम-पियाकडे पैसे नसतात. ही कहाणी तटस्थरपणे पाहणारा एक सहृदय पत्रकार (सचिन खेडेकर) राम-पियाची खरी गोष्ट छापतो आणि तमाम भारतवासी पोस्टाने समस्त नियम धुडकावून पोस्टाच्या पाकिटांमधून त्यांना शंभराच्या नोटा सदिच्छांसह पाठवून शेवट गोड करतात.
  रामप्रसादसारखा सत्पुरुष वास्तवात विरळाच. त्यात त्यानं अडीच कोटी रुपयांची टिप देणं धक्कादायक- अतर्क्य वाटतं. अतर्क्य गोष्टींवर सिनेमे निघू नयेत, असा काही नियम नाही. गोष्ट म्हणून हे कथाबीज रुटीन सिनेमांपेक्षा खूप वेगळं आहे, हेही मान्य करायला हवं. पण, एखादी अतर्क्य भासणारी कथा मांडताना लेखक-दिग्दर्शकाला तिच्यातलं अजब तर्कशास्त्र गवसावं लागतं आणि ते त्यानं अधिकाधिक प्रबळपणे मांडावं लागतं. शकील नूरानी यातच फार कमी पडले आहेत. अतर्क्य कथानक त्यांनी ऍब्सर्ड आणि अखेरीस हास्यास्पद बनवून टाकलं आहे.
   पाच कोटीच्या लॉटरीचे पूर्ण पैसे कधीच कुणाला मिळत नाहीत, करोत्तर रक्कम बरीच कमी असते, असल्या किरकोळ व्यावहारिक मुद्दय़ांना त्यांनी विचारच केलेला नाही. पियाला निम्मी रक्कम देण्यासाठी मंथराला रामनं `ईझा'त पटवणंही प्रेक्षकाला पटणं कठीण आहे. राम आणि पिया यांच्यातलं नातं तर विलक्षण गोंधळाचं दर्शन घडवतं. पियाला राम (अडीच कोटी रु. देण्याव्यतिरिक्त) कोणत्या कारणांनी आवडतो? तो विवाहित आणि एका मुलीचा बाप आहे हे ठाऊक असताना ती त्याच्यावर थेट प्रेम कसं करू लागते? तेही ठीक मानलं तरी रामशी जोडी जुळण्याची स्वप्नं ती इतक्या बिनदिक्कतपणे कशी पाहू शकते? फुटकळ कारणांनी घटस्फोट घेण्याइतकी उधळ मंथरा मुळात रामबरोबर दहा वर्ष संसार कसा करते? असले असंख्य प्रश्न `बडे दिलवाला' पाहताना पडत राहतात.
  लेखक म्हणून गुंत्यात गुंता वाढवणारे नूरानी दिग्दर्शक म्हणून फारच कच्चे जाणवतात. कोणताही प्रसंग खुलवण्यासाठी आवश्यक दृश्यविभागणी, भावभावनांची आलेखमांडणी वगैरे प्राथमिक गोष्टीही ते करीत नाहीत. पियाला अडीच कोटी रुपये देण्याचा प्रसंग यादृष्टीने () बघण्याजोगा आहे.
  त्यातल्या त्यात मंथराच्या व्यक्तित्त्वाची जातकुळी ओळखून तिचं `परफेक्ट' अर्कचित्र साकारणारी अर्चना पूरणसिंग या बेजान सिनेमात थोडीशी धुगधुगी आणते. तिच्या विडंबनयुक्त शैलीतील अविष्कारामुळं सिनेमाच्या शेवटीही ती `व्हॅम्प' होत नाही, हे तिचं यश. सर्व प्रथितयश सिनेताऱयांशी घसट असल्याचं नाटक करणारा, त्यांच्यावर आणि सिनेमाधंद्यावर मार्मिक कॉमेंटस् करणारा परेश रावळचा मन्नुभाईही ए-वन. आश्चर्य म्हणजे या दोघांमधले प्रसंगच सिनेमात सगळ्यात उठावदार झाले आहेत. एरवी पिळपिळीत संवाद प्रसवणारी मुकेश कुमार यांची लेखणीही या प्रसंगांमध्ये खुसखुशीत धमाल उडवते.
 सुनील शेट्टी गंभीर आणि सज्जन दिसण्याचा जीवतोड प्रयत्न करतो. अभिनय करण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न सदोष संवादफेकीमुळं निष्प्रभ होऊन जातो. सर्वाधिक निराशा करते प्रिया गिल. ती एखाद्या रेखीव चित्रासारखा सुबक-सुंदर दिसते. पण, चित्रासारखी निर्जीवही भासते. तिची एकसुरी संवादफेक कुठलीच भावना धड व्यक्त करत नाही आणि प्रेक्षकाच्या मनात वैतागाची भावना मात्र निर्माण करते. बेबी इरम सुद्धा तिच्यापेक्षा बरीच समजून-उमजून वावरते पडद्यावर.
  तांत्रिक बाजूंमध्ये पासापुरते गुण मिळवणाऱया `बडे दिलवाला'चं आदेश श्रीवास्तवकृत संगीत मात्र फर्स्टक्लास मिळवण्याच्या तोडीचं आहे. `अपने मेहबूब की तस्वीर', `बाँट रहा था जब खुदा' आणि `जवाँ जवाँ हे आरजू' ही गाणी अतिशय सुरेल जमली आहेत. पण, आलं गाणं की उठ पळ स्वित्झर्लंडला, अशा घाऊक `टेकिंग'मुळे पडद्यावर त्यांची वाट लागली आहे. कुठलं दृश्य कुठल्या गाण्यातलं, हेही आठवू नये, इतकं त्यांचं चित्रण एकसाची आहे. 
 तिकिटाचे पैसे वाया घालवण्याची हिंमत करण्याइतकं मोठं मन असेल तरच `बडे दिलवाला'च्या वाटेला जा.

No comments:

Post a Comment