Friday, January 20, 2012

`जागल्या'ची हाक (हु तु तु)आजकाल कवीला विचारतो कोण? कवीकडे लक्ष देतो कोण? लक्ष वेधून घ्यायचं असेल, तर बॉम्बस्फोट घडवावे लागतात.'
  `जे न देखे रवी, ते देखे कवी.'
 गुलजार यांच्या `हु तु तु'मध्ये `कवी'चा उल्लेख असलेली ही दोन विधानं प्रकर्षानं लक्षात राहतात कारण संवेदनक्षम लेखक- दिग्दर्शक असलेल्या गुलजार यांची स्वत:ची प्रकृती, प्रवृत्ती, भाववृत्ती कवीची आहे.
 भोवतालच्या समाजातली अस्फुट स्पंदनं टिपून त्यावर मार्मिक भाष्य करणारा, भविष्याचा वेध घेणारा कवी.
 भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या वाटचालीचे साक्षीदार असणाऱया गुलजार यांनी दिग्दर्शकीय कारकिर्दीतल्या पहिल्याच `मेरे अपने'पासून समकालीन तरुणाईतल्या खळबळीचा वेध घेतला आहे. तरल, काव्यात्म सिनेमांबरोबर `आँधी'सारखा प्रगल्भ राजकारण- पट दिला आहे. आयुष्याच्या उत्तरकाळात या `संध्यामग्न कवी'ला पुन्हा एकदा समकालीन तरुणाईच्या व्यथा- वेदनांशी वडीलकीच्या नात्यानं तादात्म्य पावावंसं वाटतं, हे `माचिस' पाठोपाठ `हु तु तु'मधून जाणवत. भावगर्भ, तरल कवितांसाठी आणि सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेल्या या कवीच्या मनातला खदखदता अंगार आता विद्रोहाच्या स्वप्नांनी फुलून उठला आहे. `हु तु तु' हा `मेरे अपने,' `आँधी' आणि `माचिस'च्या दिग्दर्शकाचा सिनेमा आहे.
  पण, `हु तु तु' हा निखळ राजकीय सिनेमा किंवा राजकारण - पट नाही. तसा `आँधी'ही नव्हता आणि `माचिस'ही. राजकारणातल्या सारीपाटावरचे डावपेच त्यांच्या सिनेमात कधीच केंद्रस्थानी नव्हते. केंद्रस्थानी होता तो त्या साठमारीचा `माणसां'वर होणारा परिणाम सामान्य माणसांवर तसाच राजकारण्यांमधल्याही माणसांवर होणारा.
 `हु तु तु'मध्ये ही माणसं आहेत पन्ना, आदी, मालती बर्वे, सावंतराव गद्रे आणि भाऊ.
 पन्ना (तब्बू) ही मुख्यमंत्री मालती बर्वे (सुहासिनी मुळ्ये) यांची मुलगी. तिच्या अपहरणापासून `हु तु तु' सुरू होतो आणि गुलजारांच्या लाडक्या `फ्लॅशबॅक' तंत्रातून भूत-वर्तमानात आंदोळत उलगडतो.
  मालतीबाइभच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पन्नाच्या लहानपणी, ती शाळेत असताना झालेली असते. महाराष्ट्रातल्या शेवडी नावाच्या एका खेडय़ातल्या शाळेतल्या या शिक्षिकेचं ठसठशीत रुप आणि सामाजिक कार्यकर्तीसाठी आवश्यक लढाऊपणाची गुणवत्ता सावंतराव गद्रे (मोहन आगाशे) हा स्थानिक आमदार हेरतो. तो स्थानिक महिला मंडळाचं नेतृत्व मालतीकडे सोपवतो.
  उपजत नेतृत्वगुणांच्या बळावर मालती लोकप्रिय होत जाते. राजकारणात `यश'स्वी होऊ लागते. तिचे आणि सावंतरावाचे संबंध नेता आणि अनुयायाची मर्यादा ओलांडतात, हे शाळकरी पन्नाच्याही लक्षात येतं. गुळाचं गुऱहाळ चालवणारे तिचे सत्शील वडील अमोल बर्वे (शिवाजी साटम) मात्र पत्नीच्या यशात सुख मानून तिला सर्वातोपरी साह्य करत राहतात.
  मालतीनं पक्षात प्रवेश केल्यावर संपूर्ण कुटुंबच मुंबईत स्थलांतरित होतं. मालतीला सावंतरावाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळतं. अमोल बर्वे बांधकाम कंत्राटदार बनतो. पन्नाचा धाकटा भाऊ अरुण परदेशातून शिक्षण घेऊन परततो. पन्ना धाकटा भाऊ अरुण परदेशातून शिक्षण घेऊन परततो. पन्ना पोलिस ऍकॅडमीत दाखल होते. मालतीच्या राजकीय- आर्थिक भरभराटीचा मेद आणि मद सर्वच कुटुंबियांच्या अंगात भिनू लागतो.
  तरीही पन्ना अस्वस्थ असते. आईच्या यशस्वी राजकीय-सामाजिक आयुष्याची काळी बाजू तिला ठाऊक असते त्यामुळे आईशी तिची नाळ कधीच जुळत नाही. आईच्या सत्तापदांमुळे लाभलेल्या सुखवस्तू आयुष्यातही ती विलक्षण एकाकी राहते. `टॉमबॉईश', `तिरसट, तिखट जिभेची आणि शिवराळ बनून जाते.
  तिला तिच्यासारखाच, सर्व काही असूनही एकाकी जोडीदार भेटतो आदित्यच्या-आदीच्या (सुनील शेट्टी) रुपानं. पी. एन. पटेल (कुलभूषण खरबंदा) या बडय़ा उद्योजकाचा हा मुलगा. आपल्या बापानं कामगारांची केलेली पिळवणूक, फोडलेले संप, भ्रष्टाचार यांच्या सावटात वाढलेला हा हळवा तरुण पन्नाकडे ओढला जातो. दोघे मिळून आपापली रिकामी आयुष्यं निरर्थक मौजमस्तीनं भरू पाहतात.
 आदीचे लहानपणीचे शिक्षकजोशीमास्तर (दामू केंकरे) त्याच्या वडिलांच्या कारखान्यातल्या कामगारांच्या वस्तीत राहतात. डाव्या विचारांचा त्यांच्यावर पगडा आहे. याच वस्तीत आदी... पन्नाला भेटतो. भाऊ (नाना पाटेकर) हा दलित कवी... खरं तर क्रांतिकारक शाहीरच. तो आपल्या पथकाबरोबर गाणी गाऊन -नाचून भोवतालच्या परिस्थितीवर मार्मिक टिप्पणी करतो, गोरगरिबांमध्ये जगण्याच्या लढय़ासाठी हिंमत जागवतो, सामान्य माणसाच्या अधिकारांचं डोळ्यांत तेल घालून रक्षण करतो. नि:स्वार्थ भाऊमध्ये मालतीलाही धाक घालणारं नैतिक सामर्थ्य आहे
मालतीबाईच्याच गावचा असल्यानं त्याच्या मनात `बाई'बद्दल ममत्व आहे, पण तिच्या गैरकृत्यांवर नेमकं बोट ठेवायलाही तो कचरत नाही. हा `जागल्या' आदी-पन्ना यांच्यातल्या सुस्तावून पडलेल्या `माणसां'ना जागं करतो, त्यांच्या दिशाहीन उसळ्या घेणाऱया रक्ताची खदखद शांतवून काही सार्थ करण्याची उर्मी जागवतो, जगण्याचं कारण मिळवून देतो.
  दरम्यानच्या काळात मालतीबाईचं पक्षातलं वाढतं वर्चस्व सहन न होऊन सावंतराव तिला हमखास हरण्याची खात्री असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवायला लावतो. जिद्दी मालतीबाई तीही जिंकते. पटेलच्या साह्यानं सावंतरावाचा अपघाती मृत्यू `घडवून' सूडही घेते. तिचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग सुकर होतो. पुढच्या वाटचालीत अडसर फक्त एकच असतो... सामान्यांची सद्सद्विवेक `शक्ती' बनून टोचणारा भाऊ.
  दरम्यानच्या काळात आदीचा गर्भ पन्नाच्या पोटात वाढत असतानाच आदी-पन्नाच्या गाडीला अपघात होतो. आदी बेपत्ता होतो, पन्नाचा गर्भपात होतो. पुन्हा एकाकी झालेली पन्ना भाऊच्या आधारानं जगू पाहते. त्यांच्यात मैत्रीचं, विश्वासाचं, सकारात्मक कामाचं नातं निर्माण होतं. तेही मालतीबाईच्या डोळ्यांत स्वाभाविकपणे सलू लागतं.
  मालतीबाई मुख्यमंत्री झाल्याबद्दल पनवेलमध्ये तिच्या जंगी जाहीर सत्कार-समारंभाची तयारी सुरू असतानाच पन्नाचं अपहरणं होतं. दुर्जनांची सत्ता उलथून सामान्य माणसांचं. समतेचं- न्यायाचं राज्य प्रस्थापित करू पाहणाऱया सशस्त्र क्रांतिकारकांनी पन्नाला पळवून नेलेलं असतं, तिच्या बदल्यात त्यांच्या एका माणसाची सुटका करून घेण्यासाठी.
  क्रांतीकारकांच्या या टोळीत पन्नाला आदी भेटतो... अपघातात पाय गमावून कृत्रिम पायाच्या आधारे लंगडत मन:पूत प्रेम केलं, त्याच पन्नाला गरज भासल्यास ठार मारण्याची त्याची तयारी आहे. पन्नालाही ठाऊक नसलेली तिच्या आईची कुकर्मं तिला आदीकडून समजतात. संपूर्ण समाजाला किडीसारखा पोखरून टाकणारा राजकीय भ्रष्टाचाराचा रोग आपल्या नसानसांत भिनलाय, याची जीवघेणी जाणीव तिला होते.
 तिच्या अपहरणानंतर मालतीबाईनं दलित वस्तीवर कसा नांगर फिरवला, जोशीमास्तरांना अटक करून पोलिस कोठडीत त्यांची `आत्महत्या' कशी घडवण्यात आली, हे समजल्यावर हादरलेली पन्ना उद्ध्वस्त होते भाऊ भेटल्यावर. भाऊला तुरुंगात विजेच्या धक्क्य़ांनी पार लोळागोळा करून टाकण्यात आलेलं असतं. त्याचं शरीर विकलांग स्थितीत जिवंत असतं, पण त्याच्यातला `भाऊ' निर्घृणपणे संपवण्यात आलेला असतो.
 संपूर्ण जगणंच उद्ध्वस्त झालेले पन्ना आणि आदी त्यावेळी निर्णय घेतात... आपल्या रक्तातच उगवलेली कीड समूळ नष्ट करण्याचा. स्वत:बरोबरच त्या भ्रष्ट सत्तेच्या बांडगुळांना मुळापासून उखडून संपवण्याचा.
  या निर्धारानं `मानवी बॉम्ब' बनून ते मालती बर्वेच्या सभास्थानाकडे कूच करतात... तिथे पोहोचतात आणि कामगिरी पार पाडतात...
 ही `हु तु तु'ची कथा. सिनेमा पाह्यल्यावर ती समजते, पण ती सांगितल्यावर सिनेमा समजतो का, ती वाचून सिनेमा `दिसतो' का? नाही दिसत, नाही समजत.
  सिनेमा समजून घेण्याचा एक मार्ग आहे कथेच्या अंगानं तो `पाहण्या'चा. पण सतत बाळबोध कथानकांची बाळगुटी चमच्यानं किंवा बोंडल्यानं पाजली गेल्यानं सिनेमा- परिशीलनाच्या बाबतीत `पाळण्यात'च राहिलेल्या सामान्य प्रेक्षकाला त्या पद्धतीनंही हा सिनेमा पाहणं पचत नाही. एकदम कडुनिंबाचा कडुझार काढा घेतल्यासारखी स्थिती होते. कथेच्या बाबतीत असंख्य प्रश्न पडत राहतात.
  महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. मग परिसर कोकणाचा, समुद्र-माडांचा आणि तिथे गुळाचं गुऱहाळ (तेही `बर्व्या'चं), पश्चिम महाराष्ट्राचा संदर्भ सांगणारं वातावरण आणि बोली, पन्ना, `सावंतराव' गद्रे ही मराठी नावं... ही सरमिसळ मराठी प्रेक्षकाला बुचकळ्यात पाडणारी. अपघातात बेपत्ता झालेला आदी थेट क्रांतिकारकांच्या टोळीत पोहोचणं लेखक- दिग्दर्शकाच्या `सिनेमॅटिकलिबर्टी'लाही ताण देऊन जातं. शिवाय महाराष्ट्रात नक्षलवाद्यांचा अपवाद वगळता सशस्त्र क्रांतिकारकांची चळवळ नाही. ती चळवळही समाजकारणाच्या मुख्य प्रवाहात (आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण करू धजण्याइतपत शक्तिशालीही) नाही.  
सामाजिक सुधारणा, हक्कांबद्दलची जागरुकता आणि एकंदर कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात महाराष्ट्राचा अगदीच बिहार झालेला नाही. `हु तु तु'मध्ये दिसते ती परिस्थिती बिहारसदृश आहे. शिवाय सिनेमात वृत्तपत्रांचा ओझरताही उल्लेख नाही. टीव्ही दिसतो तो `बातम्या'पुरता. महाराष्ट्रातल्या माध्यमसृष्टीचा प्रसार आणि प्रभाव लक्षात घेता कोणीही मुख्यमंत्री वा अन्य सत्ताधीश एवढय़ा बेमुर्वतखोरपणे अत्याचार करू धजेल, असे वाटत नाही. मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे प्रयत्नही महाराष्ट्रात फारच तुरळक आणि निष्प्रभ स्वरुपाचे आहेत.
  मग `हु तु तु'मध्ये दिसतो तो महाराष्ट्र कुठला? हा प्रश्न पडला की, `हु तु तु'चा कथात्मक अंगानं विचार करणं सोडावं लागतं. हा सिनेमा रुपकात्मक आहे, असं गृहीत धरलं, तर() हे सारे प्रश्न निकालात निघतात. गुलजारांची कथा महाराष्ट्रात `घडणारी' कथा नाही, तर प्रातिनिधिक कथेला महाराष्ट्राचं नेपथ्य दिलेलं आहे. सध्याच्या राजकारणातली खेचाखेची आणि `हु तु तु' या नावानं महाराष्ट्रात खेळली जाणारी कबड्डी यांच्यातलं गुलजारांना जाणवलेलं साधर्म्य, हाच फक्त त्या नेपथ्याला `मंचा'वरील नाटय़ाशी जोडणारा दुवा. महाराष्ट्रातल्या वास्तवाचे जेवढे संदर्भ त्यांना आवश्यक वाटले, तेवढेच त्यांनी या कथानकात वापरले आहेत.  
भाऊचा संपूर्ण वेश, त्याच्या हातातला दंडुका, त्याच्या गाण्यांच्या शब्द स्वररचनेवरचा मराठी लोकसंगीताचा प्रभाव, पथनाटय़सदृश किंवा सेवा दलाच्या मेळ्यांसारखी नृत्य-नाटय़रचना, यातून गुलजारांनी सिनेमाला मराठी `फ्लेवर' दिला आहे, पण, ते सिनेमाचं मूलतत्व नाही. आंब्याच्या आईस्क्रीमला आंब्याचा वास असतो म्हणून ते आंबा ठरत नाही, असतं आईस्क्रीमच त्यातला हा प्रकार.
 सिनेमाचं मूलतत्त्व समजतं श्रेयनामावली आठवल्यावर या श्रेयनामावलीसाठी आर. के. लक्ष्मण यांची रेखाचित्रं वापरली आहेत. देशातल्या घडामोडींवरची सामान्य माणसाची- `कॉमन मॅन'ची प्रतिक्रिया मार्मिक रेषा आणि तिरकस भाष्यातून व्यक्त करणाऱया लक्ष्मणच्या व्यंगचित्राच्या जातकुळीचा हा सिनेमा आहे. इथे सामान्य माणसाबरोबरच स्वत: गुलजारांचं प्रतिनिधित्व करतो तो भाऊ. (म्हणूनच तर तो `कवी' आहे) त्याच्या बोलण्यात उपरोध, गाण्यात चैतन्य आणि कृतीत करुणा आहे. तो कलावंत आहे... परखड, तिरकस, मार्मिक भाष्य करतानाच भीषण भविष्याची चाहूल लागताक्षणी समाजाला सजग करू पाहणारा कलावंत.
  `माचिस'पाठोपाठ `हु तु तु' हाही गुलजार या द्रष्टय़ा कवीनं निबर कातडीच्या समाजाला भविष्यातल्या वावटळीचा दिलेला इशारा आहे, ही `जागल्या'ची हाक आहे, सामान्य माणसाला सावध करू पाहणारी. भविष्य नासवणारा भ्रष्टाचाराचा रोग आपल्या `प्रकृती'त भिनण्याआधीच नष्ट करायला हवा, रक्तात भिनला असेल तर ते रक्तही (आतडय़ाची माया विसरून) जाळून टाकायला हवं, असा प्रखर संदेश देताना गुलजारांनी नकळत हिंसेची भलामण केली आहे. सुखवस्तू सज्जन आदर्शवाद्यांची अगतिकता पराकोटीला पोहोचली की, त्यांना सशस्त्र क्रांतीची लालभडक स्वप्नं पडत असावीत बहुतेक!
 बहुसंख्य निर्बुद्ध व्यावसायिक सिनेमांमधल्या हिंसेच्या मार्गाबद्दलचा रोमँटिसिझम आणि `हु तु तु'चा शेवट यांच्यातली गुणात्मक तफावत बरीच धूसर आहे. कारण प्रतिकात्मक रुपातही भ्रष्टाचारी- अत्याचारी सत्ताधीश आणि नाडली-पिडली जाणारी दुर्बळ सामान्य जनता अशी ढोबळ विभागणी `हु तु तु'मध्ये दिसते. भ्रष्टाचार हा राजकारण्यांचा मक्ता नाही. तो समाजाच्या सर्व थरांमध्ये कमीअधिक प्रमाणात झिरपलाय. एका पातळीवर शोषित असलेला सामान्य माणूस संधी मिळेल तिथे शोषकही होतो, अत्याचारी, दुराचारीही असतो. स्वत: गुलजार ज्या सिनेमासृष्टीत वावरतात, तिथे माफिया गुंडांच्या, गैरमार्गानं संपत्ती गोळा केलेल्या धनदांडग्यांच्या अर्थबळावर आपली `कलाकृती' निर्माण करणाऱया दिग्दर्शकांची, कलावंतांची वानवा नाही. हाही भ्रष्टाचारच आहे, याचं भान `हु तु तु'मध्ये दिसत नाही.
  भ्रष्टाचाराची अशी अतिशय सोपी, द्विस्तरीय मांडणी केल्यामुळं `हु तु तु'मध्ये हिंसेची अपरिहार्यता मांडणारा असहाय शेवटही क्रमप्राप्तच ठरतो.
 `हु तु तु' खऱया अर्थानं विलोभनीय ठरतो तो गुलजारांचं बलस्थान असलेल्या व्यक्तिरेखाटन आणि माणसांमधल्या बहुपेडी नातेसंबंधांच्या चित्रणात. त्यांच्याकडे हाडामांसाची माणसं रेखाटण्याचं अद्भुत सामर्थ्य आहे. एखाद्या कथेत वा कादंबरीत भेटणारी पात्रं पडद्यावर साकारतो हा माणूस! तब्बू, सुनिल शेट्टी, नाना पाटेकर या `परिचित' चेहऱयांमधून अपरिचित पन्ना, आदी आणि भाऊ उभे करणं, हे सोपं काम नाही तेही पात्रांच्या `इंट्रोडक्शन'वर फुटेज खर्च न करता. इथे गुलजारांच्या लेखणीला आर.के.लक्ष्मण यांच्या कुंचल्याची ताकद लाभलेली दिसते
फिल्मी `नाटय़ा'चा लवलेशही नसलेले अकृत्रिम भासणारे प्रसंग आणि सूक्ष्म बौद्धिक विनोदाची, मर्मग्राही अल्पाक्षरी भाष्याची पखरण असणारे संवाद यांच्या नेमक्या फटकाऱयांतून गुलजार प्रसंगांचं, पात्रांचं अर्कचित्रण करतात. प्रादेशिकतेचा संदर्भ देणारी मराठी भाषाही त्यांनी कथानकाच्या ओघात इतक्या सहजगत्या गुंफली आहे की, अमराठी प्रेक्षकालाही ती खडय़ासारखी बोचू नये, साखरेसारखी विरघळून त्याच्यापर्यंत पोहोचावी.
 गुलजारांची हीच ताकद दिसते. अचूक कलावंत निवडीत, त्यांच्या दिग्दर्शनात सुनील शेट्टीची संवादफेकही सुधारते. त्याच्या चेहऱयातला (एरवी मठ्ठपणा वाटणारा) निरागसपणा त्यांनी आदर्शवादी आदीच्या व्यक्तिरेखाटनासाठी अचूक वापरून घेतला आहे... त्याला साधी मिशी लावल्यावर तो गंभीर आणि परिपक्व वाटतो. त्यानं आदीचं एकूण चालणंबोलणंही झकास आत्मसात केलंय. सुनीवरचा `पैलवान'कीचा (अन्यायकारक) शिक्का `हु तु तु'मुळे पुसला जाईल. तबूमधल्या `अभिनेत्री'चा शोध गुलजारांनीच लावला होता. `हु तु तु'मध्येही तिनं कमालच केली आहे. बॉयकटमधली तिची शिवराळ, बेपर्वा भासणारी अस्वस्थ पन्ना आदीच्या `मृत्यू'नंतर आपल्या डोळ्यांदेखत बदलत जाते, हे तिनं भावदर्शनाबरोबरच देहबोलीतूनही समर्थपणे दर्शवलंयतिच्या चेहऱयावरचं आरस्पानी भावदर्शन तर थक्क करून टाकणारं आहे.
नाना पाटेकरला `हु तु तु'मध्ये पाहणं हा विलक्षण आल्हाददायक अनुभव आहे. त्याच्या राकट व्यक्तिमत्त्वाच्या कपारीआड स्नेहाळ, दयार्द्र आणि आश्वासक माणुसकीचा मनगटाएवढा जाड झरा दडलेला असतो, हे `थोडासा रुमानी हो जाए' पाहिलेल्यांना स्मरत असेल. हा सुप्त-लुप्त झरा गुलजारांनी पुन्हा खोदून बाहेर काढलाय. भाऊच्या व्यक्तिमत्त्वातली जरब- धाक नानाच्या (पडद्यावरच्या आणि पडद्याबाहेरच्याही) `प्रतिमे'त आहे. पण तोच खर्जातला आवाज दलितांचं गाऱहाणं मांडताना सायीसारखा स्निग्ध होऊन जातो आणि त्याच राकट चेहऱयावर आपल्या माणसांबद्दलची व्याकुळ काळजी झळकते तेव्हा प्रेक्षकाचं काळीज थरारून जातं. चांगल्या दिग्दर्शकाच्या निंयत्रणात नाना काय दर्जाचा अभिनय करून जातो, हे
 `हु तु तु'मध्ये दिसतं.
  पण, `हु तु तु'मधली हुकुमाची राणी आहे सुहासिनी मुळये यांनी साकरलेली मालती बर्वे. `भुवनशोम'मध्ये लाघवी किशोरीच्या भूमिकेत प्रेक्षकांवर भुरळ घालून गेलेल्या सुहासिनीबाइभनी मालती बर्वेचा आब-रुबाब झोकात उभा केला आहे. त्यांचं खानदानी रुप, करारी आवाज, सत्तेच्या परीसस्पर्शानं झळाळून उठणारं तेज, अधिकारदर्शक डौलदार चाल, मुलीच्या काळजीनं निर्माण झालेली आईची व्याकुळता, व्यवहारी मन जागं झाल्यावर त्या व्याकुळतेवर मात करणारा मंत्रीणबाइभचा करारीपणा, हे भाव झराझर व्यक्त करणारा चेहरा... केवळ लाजबाव!
 मोहन आगाशे, कुलभूषण खरबंदा, शिवाजी साटम, दामू केंकरे यांनीही
  `हु तु तु'ला अभिनयदृष्टय़ा उच्च पातळीवर नेऊन ठेवलंय.
  मनमोहन सिंग आणि राजन कोठारी यांनी छायालेखनात, महाराष्ट्राचा उन्हानं रापलेला राकट-कणखर परिसरही यथार्थपणे टिपलाय... हिवाईही. पन्नाच्या बंदीगृहांची प्रकाशयोजना प्रसंगांमधील भावनाटय़ाला गहिरं करणारी आहे. नितीन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाची आणि नरिंदर सिंग यांच्या ध्वनीलेखनाची समर्थ साथ त्यांना लाभली आहे. सलीम अरिफयांच्या वेशभूषेनं पात्ररेखाटनात मोलाची कामगिरी बजावली आहे.
  गुलजारांच्या सिनेमाचं संगीत हा कानसेनांसाठी मोठा अमोल ठेवा असतो. `हु तु तु'मध्ये ही परंपरा केवळ पुढे चाललेली नाही तर तिला प्रादेशिकतेचा नवा पैलू लाभला आहे. `छई छप्पा छई' आणि `इतना लंबा कश लो यारो' ही मधाळ गाणी गुलजार-विशाल कॉम्बिनेशनच्या सर्व परिचित गुणवैशिष्टय़ांचं दर्शन घडवतात. वेगळी आहेत ती भाऊच्या तोंडची `घपला है भई घपला', `बंदोबस्त है', `जागो जागो जागते रहो' आणि `निकला, नीम के तले से निकला' ही अस्सल मराठमोळ्या स्वरसाजाची गाणी.  
मराठी स्वररचनेच्या अनोळखी `मीटर'मध्ये कविता वाटणारी विडंबगीतं रचण्याची कसरत लिलया करणाऱया गुलजारांनी `तलाव', `चांदोबा' यासारखे मराठी शब्दही त्यात चपखल पेरले आहेत. विशालसारख्या अमराठी संगीतकारानं मराठी लोकगीतांचा स्वरसाज आत्मसात करून त्यात अर्थवाही प्रयोगही केले आहेत. रुपकुमार राठोडनं या गाण्यांमध्ये शाहिरी थाटाचा किंचित फाटणारा- रेकणारा स्वर अप्रतिम लावून या गाण्यानं सोनं केलं आहे. भूषण लखांद्री यांनी लोकनृत्य आणि पथनाटय़ यांचा समन्वय साधणारं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. कथाभाग पुढे नेणाऱया `जागो, जागो जागते रहो' आणि `बंदोबस्त हे' या गाण्यांचं टेकिंगही एकदम `हट के' झालं आहे.

गुलजारांनी संवेदनाशील कवीच्या तगमगीतून उद्भवणारा विद्रोही सूर `हु तु तु'मध्ये लावला आहे. `जे न देखे रवी ते देखे कवी' या उक्तीनुसार दिशाहीन तरूण पिढीला भीषण भविष्याबद्दल सावध करणारा इशारा दिला आहे. तो इशारा भविष्यात खरा ठरला आणि तरुण पिढीला `हु तु तु'चा हिंसेचा मार्ग स्वीकारावा लागला तर गुलजार `द्रष्टे कवी' ठरतीलही कदाचित पण आपण मात्र निश्चितच नादान ठरू.

2 comments:

  1. saarakhe saarakhee chaangale, darjedaar aanee maarmik vaachoonahee kantaalaa yeto. Kadhitaree porakat, bhukkad ase kaaheetaree liheet jaawee maanasaane.

    ReplyDelete